Thursday 24 November 2016

या परत ...


नुकतीच गाडी घेतली होती तेंव्हा, सेकंडहँड स्प्लेंडर. बरीच वर्ष लायसन्स नव्हतंच. रम्या म्हणाला, 'साखरवाडीला जायचं का, लोणंदजवळ, उद्या लग्नं आहे, दुपारी परत येऊ'. त्याची सासुरवाडी होती ती. दीड दोन तास लागतील म्हणाला फारफार. डिसेंबर होता. सहालाच अंधार व्हायचा. साडेपाचाला निघालो, हडपसरला पेट्रोल भरलं, बार भरला आणि निघालो. दिवेघाटातच थंडी वाजायला सुरवात झाली होती. स्प्लेंडरचा हेडलाईट म्हणजे एकदम पॉवरफुल काम. चाकाच्या पुढे उजेड असल्यासारखं जाणवेल इतपत तीव्र प्रकाश. अरनॉल्ड असल्यासारखा फक्तं हाफ स्वेटर घातलेला आणि वीसेक रुपयात मिळणारे पिव्वर लेदरचे रेक्झिनचे ग्लोव्ह्ज. ते काही लायकीचे नाहीत हे घाटात बोटं गार पडल्यावर लक्षात आलं. जेजुरीच्या पायथ्याशी चहा प्यायला, अग्निहोत्र केलं, परत बार भरला आणि बुडाखाली १००० सीसी असल्याच्या थाटात निघालो.

स्प्लेंडर का असेना पण समोरून ट्रक आला की ऐकायला जाणार नाहीत अशा शिव्या देऊन डीपर डिमर स्टाईल वगैरे एक नंबर आपली. कडेनी अंधार तुफान, माझा एक टाका थंडी आणि अंधारानी उसवला होता. एकदा डीपर डिमर दिल्यावर असं लक्षात आलं की लाईट ऑफ होतोय. थांबून ट्रायल घेतली तर एकानी मान टाकली होती. मॅक्स पाच फुटावरचं दिसत होतं. आहे तो पण बल्ब गेला तर रस्त्याच्या कडेला बसायला लागलं असतं. कडेला शेती आहे, माळरान आहे की स्मशान आहे काहीही कळणार नाही असा अंधार. मग मागून एखादा ट्रक आला की त्याच्यामागे, कार मागे काही काळ कुत्रं धावतं, तसे स्पीडनी जायचो. आम्हांला घाबरून तो पुढे पळाला की आम्ही स्लो. रम्याला दहावेळा विचारलं की अरे कधी येणार. रम्या पण गूगल मॅप एकदम. लोणंदच्या आधी पहिला लेफ्ट म्हणाला. एक पूल लागतो तो ओलांडला की लेफ्टायचं. म्हणजे लोणंदला जायचं, मागे यायचं आणि राईटला वळायचं. कित्ती इझी. अनेक पूल गेले. लगेचचा लेफ्ट काही येईना.

रस्त्यात एका स्पॉटला दोन पोलीस अडथळे लावून शेकोटी करत बसलेले. दुसरा टाका उसवला. लायसन्स नाही त्याचे पैसे द्यावे लागणार. पण त्यांनी आमच्याकडे ढुंकूनसुद्धा बघितलं नाही. टाका परत जागेवर. शेवटी एका पुलापाशी रम्या ओरडला हाच तो लेफ्ट. वळलो, पोचलो. मग एका उसाच्या ट्रॉलीमागून बार्शीलाईटच्या स्पीडनी साखरवाडी गाठलं. लोणंदला लग्नं होतं. सकाळी लोणंदला येऊन लग्नं लावलं. जेवायला थांबण्यात अर्थ नव्हताच म्हणून लवकर निघालो. हा भंगार आहे, हा भिकार दिसतोय असं म्हणत ढाबे रिजेक्ट करत जेजुरी ओलांडली. अडीच तीन झाले असतील. आग पडलेली त्यामुळे दिसलेल्या पहिल्या ढाब्यावर गाडी लावली. अघळपघळ काम होतं. खंडहर बघायला येतात तसे आम्ही दोघेच होतो उभे. दोन मिनिटांनी मग दहाबारा वर्षाचा मुलगा आला. म्हटलं हा बहुतेक बंद झाला ढाबा सांगणार. भूक लागल्यामुळे बसलो. 'काय काय आहे रे?' 'शेठ, तुम्ही मागाल ते'. पोरानी पहिल्याच फटक्यात आडवा केला मला.

झेरॉक्स काढून प्लास्टिकमध्ये घातलेलं केलेलं मेनूकार्ड टाकलं त्यानी. फक्तं जेवण होतं म्हणून मुद्दाम 'बिअर नाही का रे' विचारलं. 'कुठली हवी, सांगा नुसतं'. पोरगं चलाख होतं यात वादच नाही. त्याला पैसे देऊन दोन खजुराहो आणायला सांगितल्या. साडेतीन मिनिटात पोरगा चिल्ड बाटल्या घेऊन अवतीर्ण झाला. गावरान चिकन आहे म्हणाला. आम्ही शहरातले शहाणे. त्याला म्हटलं, 'लेका, आतून गरम करून आणणार राहिलेलं आणि आत्ता केलंय म्हणणार'. 'शेठ, कोंबड्या फिरतायेत ना त्या सगळ्या आपल्याच आहेत, बोट दावा, पकडतो आणि या माझ्या मागे, तुमच्यासमोर मान कापतो'. मी परत गार. बरं या सगळ्या बोलण्यात बनेलपणा अजिबात नाही, प्युअर इनोसंस. म्हटलं वेळ लागेल रे, आधीच भूक लागलीये, राहू देत. 'बसा ओ शेठ, रस्सा देतो बिअरबरोबर'. त्यानी मोठी ताटली भरून काकडी, टोमॅटो, चार पापड तळून, फरसाण आणून ठेवलं. आम्ही अजून एक बिअर आणायला लावली. 'ह्या संपत आल्या की सांगा, गरम होईल उगाच'. पोरगा मला आवडायला लागला होता. आधीच मला बिअर म्हणजे ख्यालगायकी होती, निवांत काम असायचं. दोघातल्या तिस-या खजुराहोपर्यंत तास निघाला. पोरानी गरम गरम मिठाचा दाणा टाकलेलं, मिरची लावलेलं चिकनचं ते गरम सूप आणलं. त्या चवीला शब्द नाहीत. इकडे थंडगार आणि वाटीतून आग नुसती. पाचेक वाट्या तरी हाणल्या मी.

नंतर त्यानी जेवण आणलं. तसा चिकनचा रस्सा मी परत खाल्लेला नाही. बकासुरासारख्या तीन मोठाल्या भाक-या आणि नंतर टेकडीसारखा भात हाणला मी रस्सा घालून. आम्हांला देताना त्यानी प्लेटचा हिशोब लावलाच नव्हता. तुडुंब भरलो. त्या दिवशीचा 'अन्नदाता सुखी भव' आशिर्वाद अतिशय खरा आणि मनापासून होता. आम्हांला मागायला लागतच नव्हतं, त्याआधीच तो वाढायचा. बरं सॅलडचे पैसे त्यानी घेतलेच नाहीत. तो ज्या तृप्तं नजरेने बघत होता ना कडेला उभं राहून ते बघणं त्याच्या वयाच्या पटीत होतं. वीसेक वर्षांपूर्वीचं बिल, कितीसं असणार ते. रम्याला म्हटलं त्याला पैसे देऊ. जेवण झाल्या झाल्या टेबल लगेच साफ. पोरगा फक्तं शाळेत शिकलेला नव्हता पण सर्व्हिस इंडस्ट्रीला लागतात ते गुण त्याच्यात उपजत होते. त्याला निघताना वीस रुपये दिले. घेताना त्याच्या चेह-यावर कुठेही तुपकट लाचारी नव्हती. उलट आपलं चीज केल्याचा अभिमानयुक्तं आनंद होता. ढाब्याच्या एंट्रीला आम्ही निघाल्यावर तो हात वगैरे हलवून कुठलाही औपचारिकपणा न करता एखाद्या मोठ्या माणसासारखं 'या परत' म्हणाला. शब्दात सांगता येणार नाही असं काहीतरी वाटून गेलं. 

त्या रोडला परत जाणं झालंच नाही. ते पोरगंही आता तिशी ओलांडून गेलं असेल. तो ढाबा असेल, नसेल, माहित नाही, असला तर आठवेल की नाही हे ही आहे. पण कसलंही नातं, दोस्ती, ओळख नसलेला तो छोटा जवान ज्या प्रेमानी, हस-या चेह-यानी म्हणाला ना 'या परत', तसं अनोळखी माणसाकडून ऐकल्यालाही तेवढीच वर्ष झाली. :)

जयंत विद्वांस     
      

No comments:

Post a Comment