Showing posts with label माझी काही पत्रं. Show all posts
Showing posts with label माझी काही पत्रं. Show all posts

Monday, 13 January 2014

इतकाच काय तो फरक....

चि. ……
स  अ.आ.

बऱ्याच दिवसात तुझं काही पत्रं  नाही, फोन नाही. 'बऱ्याच दिवसात' असं आपलं एक म्हणण्याची पद्धत. असो, फार नाही लांबण लावणार,  तुला वेळ तर हवा ना. परवा सहज वाचत बसलो होतो पे
पर मध्ये ते दहावीच्या पोरांसाठी लेख येतात ना ते - प्र.४) फरक ओळखा (मार्क दहा). मला वीज चमकावी तशी एक गंमत नजरेसमोर उभी राहिली. आपल्या दोघातली. 
बघ वाचून. आहे की नाही साम्य ते सांग.
अरे, तुझ्या लक्षात येतंय का? (विसरला असशील याची खात्री आहे) सगळं कसं सेम टू सेम आहे. नाही? थांब जरा मीच सांगतो. तुला कसं आठवेल तेंव्हाचं. पस्तिसेक वर्ष झाली त्याला . केवढा निरागस होतास तू,

आठवतं? तुझाही तो पहिलाच दिवस. माझाही तो पहिलाच. तुला उत्सुकता, भीती दोन्ही होतं. काहीच फरक नाही रे, मलाही तसंच वाटत होतं. साम्य क्रमांक एक, नंतर म्हणशील बाबा तुम्ही फसवता
 मला
 
तुला सगळं  सगळं नवीन होतं. टाय, ड्रेस, बूट, दप्तर, कम्पास, रुमाल आणि पाण्याची बाटली. (तो फोटो सापडेल बघ जुन्या अल्बम मध्ये - अर्थात ठेवला असशील तर) माझं पण सगळं नवीन होतं.  इथेही सेमच बघ सगळं . साम्य क्रमांक दोन. 

तेव्हा तु आत जाताना मागे पाहिलंस. मी मागे न बघता निघालो तुझा धीर सुटू नये म्हणून. आणि त्या दिवशी मी पण वळून पाहिलं आणि तूही मागे नाही बघितलंस. हं, इथपर्यंत सगळं सारखं आहे. साम्य क्रमांक तीन.
खरंच इथपर्यंत सगळं सारखं आहे. पुढचा प्रश्नं,  प्र.४) फरक ओळखा (मार्क मोठ्ठ शून्यं). मी शाळा सुटल्यावर न्यायला आलो, तू मात्रं आला नाहीस, येणार नाहीस एवढाच काय तो फरक…… 
असो, सुखात रहा. आशीर्वाद आहेतच. 
तुझा बाबा  
..............

--जयंत  विद्वांस



Monday, 7 October 2013

प्रिय राहुल...

प्रिय राहुल 

आम्ही पु.लं.चा नारायण वाचला, ऐकला आणि गेली 15-16 वर्षे पाहीला पण. काल भारतीय संघाचा नारायण निवृत्त झाला. द्यानेश्वरांनी चालवलेली पहिली आणि ही दुसरी, अश्या दोन भिंती आम्हांला माहीत आहेत.

तो जोकर होता बावन पत्त्यातला. ट्रायो, सेकंड सिक्वेनस् हवाय, वापरा बिनधास्तं. त्यानं काय केलं नाही? त्यानी जे सांगितलं ते सगळं केलं संघासाठी. फक्तं त्यानी कधी रडीचा डाव खेळला नाही, त्यानी अंपायरला शिव्या दिल्या नाहीत, तो कुणाच्या अंगावर धाउन गेला नाही, मॅच फिक्सिंग मधे साधा उल्लेख नाही, वादळी मुलाखती नाहीत, लफडी नाहीत.

तो म्हणजे क्रिकेट मधला आशा काळे, अलका कुबलचा वारसदार. त्याची बॅट म्हणजे पतिव्रताच. जरा पदर ढळणार नाही. कव्हर चा फटका तर किती मोहक. चेंडूला फार त्रास तर होणार नाही ना, गोलंदाजाला राग तर येणार नाही ना अश्या सगळ्या काळ्ज्या त्यानी घेतलेल्या असायच्या. सेहवागसारखा स्पीड, रिचर्डसची ताकद, गॉवरची नजाकत काही काही नसायचं त्यात. त्यात असायचं परफेक्शन्.

संयम शब्दाचा अर्थ जास्तं त्रास न घेता पटवून द्यायचा असेल तर त्याचं नाव घ्या, पटेल लगेच्. सभ्यं लोकांचा खेळ असं म्हणतात क्रिकेटला, आताही म्हणतील, पण आत्ता खेळणा-या काही मोजक्या सभ्यं माणसांपैकी एक काल निवृत्त झाला.

द्राविडी प्राणायाम चा खरा अर्थ त्याला ज्यांनी गोलंदाजी केली त्यांना विचारा. तू केंव्हा निवृत्त व्हावस्, व्हायला हवं होतं या बद्दल बरेच जण बोलत होते, बोलतील. ज्यांना स्‍वतःला कधी निवृत्त व्हावं हे कळलं नाही, ते तर सल्लागार म्हणून आघाडीला होते. आम्ही साधे भारतीय, व्यक्तिपूजक प्रेक्षक, फार काही कळत नसल्यामुळे आम्ही खेळाचा आनंद लुटू शकतो. तुला मोफत सल्ला देण्याएवढा अधिकार नाही आणि पात्रताही नाही. असो.

राहुल, तू आम्हांला जो आनंद दिलास् त्या बद्द्ल शतशः आभार.
--- जयंत विद्वांस   



-- 

Thursday, 3 October 2013

प्रिय ‘ती’स् .....


किती वर्षांनी दिसलीस? जवळजवळ १९-२० वर्षांनी. जग फार छोटं आहे म्हणतात तरीही एकाच शहरात एवढा काळ लागला नुसतं दिसायला, समोरासमोर येणं अजून लांबच आहे. 

काळाचा फार परिणाम तुझ्यावर झाला नाही, याचं कौतुक वाटलं. सगळेच् देखणे चेहरे वाढत्या वयात तसेच रहात नाहीत. काहीवेळेस जुने चेहरे आठवणीतून पुसून टाकावेत इतके बदलतात. तू फेसबुकावर आहेस की नाहीस माहित नाही. तुझ्यावर ती-1 ते 15 अशा तब्बल पंधरा कविता झाल्यात… इतर सौंदर्यकवितांचं  प्रेरणास्त्रोत पण तूच तर आहेस त्यामुळे फक्त १५ नाहीत. त्याची रॉयल्टी काय देउ??? 

मनात असूनही हाक मारू शकलो नाही कारण आपण परत न भेटणच इष्टं असं मला वाटलं. काही जपलेल्या गोष्टी असतात त्या तशाच राहिलेल्या ब-या, नाही का? अज्ञानात सुख असतं असं म्हणतात, जबाबदा-या, संसार, मुलं, समाज या सगळ्या जंजाळातून त्या पूर्वीच्या भावना उरतीलच असं नाही. असतील उरल्या तरी दर्शविता येतीलच असंही नाही. सगळीच कुचंबणा आणि बंधनं. त्यामूळे जे जपलय तेच छान आहे असा विचार केला.



असेल योग तर भेटूच आपण आज ना उद्या. दोघांकडेही सांगण्या ऐकण्यासारखं खूप असेल, फक्तं काळ तेवढा शिल्लक असला म्हणजे झालं.

(कुठल्याही मृत अथवा जिवंत, एक किंवा अनेक व्यक्तिशी संबंध आढळल्यास तो योगायोग समजू नये.)
......

जयंत विद्वांस

Saturday, 21 September 2013

कपाट

प्रिय.....
किती वर्ष लोटली गं तुला पत्रं लिहून? अगं वेळच आली नाही ना कधी पत्रं लिहायची, मग कसं लिहिणार? कारण तर हवं ना.  असो! आज काय करावं हा प्रश्नं पडला. वेळ जाता जाईना. म्हटलं दोन कामं आहेत म्हणा पेंडिंग. एक म्हणजे तुला पत्रं आणि दुसरं, तुझ्या अत्यंत आवडीचं काम - मी घातलेला पसारा हसतमुखाने आवरायचं. पण तू जिंकलीस हे मान्यच करायला  हवं. तू कधीतरी चिडावंस म्हणून मी काय कमी प्रयत्नं केले?  उलट तू लवकरात लवकर सगळं उरकून मिश्किल हसायचीस.
दुसरं काम आधी केलं मी मुद्दाम आज. तुझ्या काय काय वस्तू सापडतात ते बघून म्हटलं तुला दोन चार तिरकस शेरे मारता येतील. म्हणून आधी कपाट आवरायला घेतलं. काय बायका गं तुम्ही… किती सोस तो वस्तू जोंबाळून ठेवायचा असा शेरा मी तयारच ठेवला होता. पण छे!!! ती ही संधी तू दिलीच नाहीस. माझाच कप्पाच सगळ्यात गचाळ होता. नेहमीप्रमाणे मी तिकडे दुर्लक्ष करून तुझ्या कप्प्याकडे गेलो आधी. काय नी काय वस्तू तरी एकेक तुझ्या. यादीच केली मी. मला माहितीये, तू म्हणणार, 'तुम्हाला नाही कळणार यातली गम्मत'… तरी पण केलीये.        
आपल्या साखरपुड्याची घडीवर विरलेली ती अंजिरी साडी, अगं किती विटलीये ती. पण तुझ्या गो-या रंगाला काय खुलून दिसायची ना ती. त्याखाली लग्नातला घडी विस्कटलेला मोरपिशी शालू, बुट्टे मात्रं अजून चमकदार आहेत. इनमिन पाच फूट तू, तुझ्यापेक्षा त्या शालूचंच वजन जास्तं भरलं असतं तेंव्हा. लहानच होतीस म्हणा तेंव्हा तू तशी. चेह-यावर पोक्तं, गंभीर भाव आणायची कसरत बघताना मला मात्रं हसू फुटत होतं. तरी नथ सारखी करायच्या नावाखाली तू हसून घ्यायचीसच.  तू मुळात एक डामरट्ट  मुलगी  आहेस असं माझं अजूनही ठाम मत आहे. आणि काय गं तुझा हा लग्नाआधीचा फोटो!!! एक्सरे काढल्यासारखा हडकुळा. पण  तुझ्या  डोळ्यात तेंव्हा दिसलेली जादू मात्रं अजून तशीच आहे. हडकुळेपणामुळे जास्तंच उठून दिसणारं सरळ नाक आणि वेध घेणारे करारी पिंगट डोळे.  पण काही म्हण तू, ह्या जुन्या कृष्णं-धवल फोटोंना ब-याच वर्षांनतर जी मजा येते न बघण्यात ती  आताच्या  रंगीत  फोटोला नाही बघ. लग्नाचा अल्बम बघ. फुगलाय आता. तेंव्हा कुठे गं क्वालिटी आलीये एवढी. बरेचसे पुसट झालेत आता. पण  काय  गम्मत आहे बघ, काहीही दिसत नसलं तरी आपण दोघं बरोब्बर सांगू शकतो कुठला फोटो ते.        
दरवर्षी मला नवीन डायरी मिळायची. लग्नं झाल्यावर मिळालेली पहिली डायरी तू घेतली होतीस ताब्यात, हक्काने. वर्षभरात  काहीही लिहिलं नाहीस त्यात!!! पण कुठेतरी लिहिलेलं सापडेल म्हणून पानं चाळली, तर काय रे बाबा वस्तू. त्या राजा केळकर संग्रहालयात कश्या असतात वेगवेगळ्या, अगदी तशाच. पहिल्या पानावरचं वळणदार 'श्री' सोडलं तर मी काही तुझ्यासारखा नाही म्हणा प्रतिकात्मक आठवणी वगैरे जपणारा. पण तुझ्या त-हेत-हेच्या गोष्टी मात्रं भन्नाटच आहेत बरं का… अर्क असतो तशा. हं.…काय काय आठवलं त्या बघून. एका दिवाळीत आणलेल्या दहाच्या को-या बंडलातल्या सिरिअल मधल्या दहा नोटा. तू म्हणालीस, असू दे लक्ष्मी जपावी, तरच रहाते. एक तुझा आवडता सिद्धिविनायकाचा फोटो, एवढी मोठ्ठी फ्रेम केली आहेस तरी तो बारीक जपलासच. आपल्या लग्नानंतर तेंव्हाच्या प्रथेप्रमाणे स्टुडीओत जाऊन काढलेला फोटो आणि आपल्या दोघांकडच्या लग्नपत्रिका. आपण जुने झालो आता. आपल्यात पण बदल झाला, कागदात होईल नाही तर काय. कागद पुसट झाले की ब्रेल लिपी येत असेल का ग त्यावर?? काही दिसो न दिसो, बोटं फिरवली की वाचता येतं, दिसतंही. असो…              
आणि हे काय…लागल्या असत्या की या सुया आत्ता मला!!! मला हसूच आलं पटकन. लोकरीच्या गुंड्यात खोचल्या आहेस तू पण केवढ्या थंडगार पडल्यात त्या. लोकरीची ऊब मायेचा हात फिरल्यावर येत असावी. आणि हे बघ काय - अर्धवट गुंडाळून ठेवलेलं भरतकामाचं घर? ते घर आहे हे त्यावरच्या आधीच काढलेल्या चित्रामुळे कळलंय, बरं का. हसू नकोस ग. तुला सगळ्यातली आवड आणि  माझी  सगळ्यात  बोंब. चांगलं काय ते कळायचं पण कला वगैरे प्रकार नाहीच जमले मला कधी.    
 

आता मात्र हद्द झाली हा. तुला खरं तर पुरस्कारच द्यायला हवा. मौल्यवान हिरा ठेवल्यासारखी कोप-यात दडवलेली ही दागिन्यांची मखमली पिशवी!!! आणि आत काय तर काळ्या पडलेल्या दोन चांदीच्या वेढण्या, एक छल्ला आणि एक तू हौसेने अंबाड्यात घालण्याकरता केलेलं चाफ्याचं फू आणि एक बिन झाकणाचा रिकामा करंडा. समोर असतीस तर हिसकावून घेतलं असतंस. 'तुम्हाला नाही कळणार' हे वाक्यं तर हल्ली मीच आधी म्हणतो. उद्या गावात गेलो की विचारतो या गोष्टी कळण्यासाठी आहे का एखादं पुस्तक म्हणून. अर्थात अडलं की तुलाच विचारणार. उत्तर ही पाठ आहे तुझं. 'झेपतंय तेच करावं माणसानी'. फक्त हे वाक्य जाताजाता, सुरक्षित अंतरावर गेल्यावर तू जे टाकतेस ना, ते तुलाच जमतं.   

आता हे आणि काय या पिशवीत? धन्यं आहात आपण. वरच्या सोनेरी पाकिटाएवढंच पिवळं पडलेलं, मी पाठवलेलं पहिलं वहिलं पत्रं, एक संपूर्ण चार्तुमास, एक अकरावा अध्याय, एक सुवर्ण भिशी योजनेची जाहिरात. कशाचा कशाला तरी मेळ आहे का मला सांग. नाही, वस्तू, आठवणी जपाव्यात पण निदान त्यात काही तरी सुसंगती हवी की नको? असो! 'तुम्हाला नाही कळणार' ऐकण्यापेक्षा गप्पं बसलेलं बरं. बाकी काही आवरण्यासारखा नाहीचे कप्पा. मला बोलायला कारण मिळावं म्हणून मी शोधल्या आपल्या तुझ्या मागे खोचून ठेवलेल्या पिशव्या.  

फार विरह व्हावा असं खरं तर आपलं काही वय नाहीये. पण अलीकडे काहीच बोलणं नाही आपलं. त्यामुळे विरह की काय तो वाढलाय खरा. :) …  मी पण आता एक वेगळीच गम्मत करणार आहे. माझं पण सामान बांधून तयार ठेवणार आहे उद्या. 
तुझ्या भाषेत, अगदी चला म्हटलं की निघायला तयार पाहिजे माणूस अशी तयारी. मी पण जरा तुझ्यासारखं व्हायचं ठरवलंय. आता वाचल्यावर डोळ्यात पाणी येईस्तोवर हसशील, माहितीये मला. पण खरच सांगतोय… मी तुझे या भिंतींवर, वस्तूंवर, माझ्या अंगावर रेंगाळणारे स्पर्श गोळा केले की मग घ्यायचं काही काही उरणार नाही मागे. मग मी तयार. तिकीट बुक झाल्याचं कन्फर्म झालं कि निघालोच बघ. 
पण खरं सांगू का, ब-याच दिवसांनी आवरतोय ना घर त्यामुळे धांदल उडाली बघ माझी. तू गेल्यानंतर पहिल्यांदाच.....
--जयंत विद्वांस