Monday 9 July 2018

सुटका..

सुटका... 

हिरव्यागार डोंगराच्या कुशीत लपलेल्या त्या छोट्याश्या गावात जन्मं आणि मरण याशिवाय फार दखल घेण्याजोगी गोष्टं फार कधी घडायचीच नाही. गावात माणसं रहात नव्हती असं नाही पण सगळी पोटासाठी पहाटे घराबाहेर पडायची ती संध्याकाळ झाल्याशिवाय घरी यायची नाहीत. खंडाळा सोडला की दोन चार बोगदे गेल्यावर गाडी शब्दशः क्षणभराकरता एके ठिकाणी थांबायची. माणसं उतरायची तिथे. रेल्वेलाईनच्याकडेने एक पायवाट फुटायची ती काही अंतर समांतर जाऊन डोंगराला वळसा घालून सरळ दरीत उतरल्यासारखी दिसायची. उतरलेली माणसं त्या पायवाटेवरून गावात जायची. वरून वस्ती दिसायची नाही. लपून बसल्यासारखी सगळी घरं डोंगराच्या मागे होती. प्रत्येकाची शेती होती पण उत्पन्न फार नव्हतं, पोटापुरतं धान्यं निघायचं. मग रानमेवा द्रोणात भरून विकायचं काम बायका, मुली करायच्या. बरीचशी माणसं रेल्वेत बिगारी होती. सगळी कष्टाची काम तीच माणसं करायची, मग ते रूळ चेक करणं असो, गुड्सच्या गाड्यांवर माल भरणे असो ही सगळी कामं करायला बाप्ये जायचे वाडीतले. त्यांना ड्युटीवर जाण्यासाठी आणि परत आणल्यावर उतरण्यासाठी गाडी तिथे थांबत असे. पावसाळ्याचे चार महिने मात्रं जिकीरीचे असायचे. एकतर संततधार, निसरड्या वाटा, शेतीची कामं वगैरे प्रकारात पार घाम निघायचा त्यांचा. 

अर्थात ती सगळी माणसं काटक होती. सततच्या कष्टामुळे पोट सुटलेला माणूस दिसणं अवघड, सगळे कसे खराट्याच्या काडीसारखे बारीक आणि ताठ. तिथे म्हातारी माणसं मरायला टेकली की मगच घरकोंबडी व्हायची. नाहीतर रुळाच्या कडेला बसून घरच्या माणसांची वाट बघत विड्या पीत, तंबाखू मळत, वाढलेल्या दाढ्या खाजवत बसायची आणि मग आलेल्या माणसाच्या सोबतीने घराकडे जायची. सडा टाकल्यावर जसे पाण्याचे थेंब अंगणात पडतात आणि काही दूरवर पण कुठेही पडतात तशी त्या इवल्याश्या गावातल्या वस्ती विखुरलेली होती. अमाप जागेचा त्यांना काहीही उपयोग नव्हता. कुणी अतिक्रमण करत नव्हतं, भांडण करत नव्हतं, दावे लावत नव्हतं. सगळ्यांचीच परिस्थिती एकसारखीच होती. अंधार पडल्यावर त्या पायवाटेवर स्वतःहून कुणी चालत येईल अशी अजिबात शक्यता नव्हती. आलाच तरी घाबरून तो माणूस दरीत गेला असता पाय घसरून. त्यामुळे तसं गाव सुखी होतं. एरवी दिवसभर घरात लहान रांगती मुलं, कमरेत वाकलेल्या म्हाता-या, बाळंतीण बायका किंवा आजाराने अंथरूण धरलेलं कुणीतरी असंच असायचं. बाकी सगळी गडबड रात्रं होत आली की चालू व्हायची आणि लगेच संपायचीही. लाईट नव्हतेच, सकाळी जायचं असायचं. त्यामुळे जेवलं की बिड्या ओढणे, तंबाखू खाणे आणि बायकांना मिसरी लावणे एवढेच उद्योग असायचे, या किरकोळ व्यसनांनंतर त्यांची चैन संपायची आणि गाव कुणीतरी दम दिल्यासारखं शांत झोपून जायचं. 

शनिवारी रात्री कर्जत किंवा लोणावळ्याहून येताना बरेचजण गुत्त्यावर जाऊन पैसे असतील तेवढी पिऊनच घरी यायचे. पावसाळयात मग पडझड व्हायचीच, कुणी न कुणी नशेत घसरून पडायचं. मग गावात गावठी उपचार केले जायचे आणि माणूस बरा व्हायचा, अगदीच हाड मोडलं तर लोणावळा, मग घरातल्या बाईच्या अंगावरचा एखादा दागिना मोडला जायचा. कमीत कमी गरजा असणारी माणसं सगळी खरंतर पण शहरात गेले की ती कफल्लक व्हायची. त्यामुळे ब-याच वेळा माणसं दुखणी अंगावरच काढायची. रम्या सुर्वे तर पार मेटाकुटीला आला होता खर्च करून. सहा महिन्यामागे त्याचा बाप पाय घसरून रुळावर पडला आणि घोट्याजवळ हाड मोडलं होतं. अज्ञानात सुख असतं, इतकी वर्ष माहित नव्हतं तोवर व्यवस्थित चालू होतं. तपासण्या झाल्यावर त्याला शुगर निघाली. त्यामुळे जखम काही लवकर बरी होईना. एकतर क्षणभर थांबणा-या गाडीत चढायचं त्यात परत लोणावळ्याला उतरून बाहेर यायला जीव जायचा, तिथून दवाखान्यात रिक्षा आणि परत येताना हाच सगळा व्याप. पण नाईलाज होता. म्हातारा तसाही पार ऐंशीला टेकला होता पण टेकीला आला तरी टिकून होता. तसा तो ही रेल्वेतून रिटायर्ड होऊन पेन्शन खात होता इतकी वर्ष. पण गेल्या सहा महिन्यात साठवलेली सगळी पेन्शन संपली होती. 

आज मात्रं दोघे हतबल झाले होते. हाड जुळत आलं होतं पण दुस-या पायाला झालेली जखम दिवसेंदिवस चिघळतच चालली होती. पाण्याने गच्च भरलेल्या पॉलीथीन पिशवीसारखा पाय बदबदला होता नुसता. गँगरीन झालं होतं, पाय कापावा लागणार होता घोट्यापासून. दोन दिवसांनी येतो म्हणून दोघं निघाले. म्हाता-याची अवस्था रम्याला बघवेना. दोघेही स्टेशनवर येईपर्यंत शांत होते. एक्स्प्रेसचा ड्रायव्हर ओळखीचा होता त्यामुळे दोघे इंजिनातच बसले. विचारपूस झाली पण शेवटी ज्याचं त्यालाच. मिनिटभर गाडी त्याने जास्ती थांबवली. बाहेर पाऊस तुफान होता. अंगावर फाटके रेनकोट घालून दोघंही चालू लागले. आता पाय अजूनच रग लागल्यासारखा झाला होता. पायवाटेच्या पहिल्याच वळणाला म्हातारा झाडाच्या आडोशाला थांबला. थोड्या अंतरावर रेल्वेची एक पडीक भंगार लोखंडी केबिन होती. तिथे गेलो तर भिजणार नाही म्हणून रम्याने त्याला कसंबसं तिथे आणलं. पाच मिनिटांच्या अंतराला पंधरा मिनिटं लागली. रम्या अजूनच काळजीत पडला. म्हातारा तापाने फणफणला होता तेवढ्यात. घरी न्यायचं कसं आणि परत आणायचं कसं दोन दिवसांनी हा यक्ष प्रश्नं होता त्याच्यापुढे. वाहन नाही एकतर त्यात पाऊस. रम्याने हात कोरडे करत दोन बिड्या पेटवल्या, एक म्हाता-याला दिली, एक आपण ओढायला सुरवात केली. 

'टैम काय झाला रे?' 
'सात वाजलेत. दम धर. पाऊस थांबल, तोवर सांजच्या गाडीला कुणी ना कुणी येईलच, तुला उचलून न्यायाला हवं, इथे हाय बघ एक खुर्ची, त्यात बसवून नेतो'. 
'ते डागदर काय का म्हणना, म्यां काय यायचो नाय परत तिकडे. घरीच मरतो. किती जगू अजून आणि पैश्ये कुटून आणशील'. 
'ते बघतो मी. ते पाय कापावा लागलंच नायतर अख्खा पाय सडल म्हन्लाय त्यो. घोटाभर गेला तर काठी घेऊन चालशीला तरी, गुडघ्यात कापला तर काय करशील? परवाच्याला पहाटच निघू म्हंजी निवांत आलो तरी एक्स्प्रेस घावतीये बघ. आजचा शिंदे ड्रायव्हर आहे परवा सकाळी. थांबवितोय म्हन्लाय जास्ती वेळ'. 
'तू काय बी म्हन, म्यां काय यायचा नाय. थोट्या पायाने घरात पडून -हावू का? आणि करनार कोन माझं. आपल्या दोगांना बी बायकू नाही, दोगी गेल्या मागच. तू कामावर जाशील का माझं करशील? तुला प्वार असतं तर काय तरी झालं असतं. त्ये जाव दे, घरीच मरन मी त्यापेक्षा, चल जावू हळूहळू. पाऊस काय थांबनारा नाय ह्यो. 

रम्याला काय सुचेना. दोघंही शांत बसून राहिले. अंधार आणि पाऊस, दोन्ही वाढतच राहिले. अंधारात माणसं जात होती गावाकडे पण केबिनला कुणी बघितलं नाही, तशीही ती थोडीशी आतल्या अंगाला होती. घड्याळात नऊ बघून रम्याचे धाबे दणाणले. आपल्याला झोप लागली हे त्याला मान्यं होईना. म्हातारा  पार भट्टीसारखा गरम झाला होता. आता कुणी येईल याची खात्री नव्हती. काय करावं त्याला काही सुचेना. म्हातारा झोपेत बरळत होता. रात्रं तिथे काढण्याशिवाय गत्यंतर नव्हतं आता. बिडी बंडल पण सादळलं होतं. तिथेच पडलेली जुनी ताडपत्री त्याने म्हाता-याचा अंगावर घातली. बिड्या ओढत रम्या अंधारात बघत बसला. तो ही आता पंचावन्नच्या आसपास असेल. सगळा गतकाळ डोळ्यापुढून झरझर जात राहिला. त्याची आई आणि बायको सहा महिन्यांच्या अंतराने गेल्या त्यालाही आता चार वर्ष होऊन गेली होती. त्याला पोरंबाळं काहीच नव्हती. कधी एकदा सकाळ होतीये असं त्याला झालं होतं.सकाळ झाल्यावर प्रॉब्लेम्स सुटणार नव्हते पण उजेड पडणार होता, माणसं दिसणार होती. त्याच्यासाठी ते ही खूप आशादायक होतं. तो ही रेल्वेत होता. रिटायर व्हावं आणि बापाची सेवा करावी जमेल तेवढी हे त्याने डॉक्टरकडे असतानाच मनाशी ठरवलं होतं. त्याला परत झोप लागली. सहाच्या सुमारास पावलं वाजली आणि तो खडबडून जागा झाला. केबिनच्या बाहेर येत त्याने चाहूल घेतली, सगळी ओळखीचीच होती. बाप्ये माणसं पटापट धावली आतमधे. 

म्हातारा रात्रीच कधीतरी थंड पडला होता. मग एकंच हल्लकल्लोळ झाला. जो तो जमेल तेवढं रडू लागला आणि हळूहळू शांत झाला. मग आजारपण, अडचणी यांचा पाढा वाचला गेला. शेवटी त्याला गावात न्यायचं ठरलं, नशिबाने पाऊस थांबला होता. ताडपत्रीत गुंडाळून त्याला न्यायचं ठरलं. लोक आळीपाळीने ओझं उचलत होते आणि रम्या मागे मागे चालत राहिला. गावात परत एकदा सगळा सोपस्कार झाला रडण्याचा आणि विचारपूस करण्याचा. संध्याकाळपर्यंत सगळं पार पडलं. परत येताना खरंतर रम्याला हायसं वाटत होतं. पाय कापायला बाप आला नसता हे ठाम माहित होतं त्याला. तो सुटला याचं खरंतर त्याला खूप समाधान वाटलं होतं पण तसं बोलणं जनरीतीला धरून नव्हतं. घरी आल्यावर तो मग पहाट होईस्तोवर एकटाच हमसाहमशी रडत बसला आणि ग्लानी आल्यासारखा झोपी गेला. जग आल्यावर त्याने बाहेर डोकावलं तर अगदी सोनसळी प्रकाश पडला होता, पाऊस थांबला होता. त्याला खूप प्रसन्नं वाटलं खरंतर आणि लगेच तो ओशाळलाही पण खरंच होतं ते. कितीही माया असली तरी पैसे, ने आण त्याला शक्यं नव्हतं अर्थात त्याने ते पार पाडलं असतंच उरापोटावरून पण काहीवेळा देव करतो ते ब-यासाठी असं म्हणायचं. झेपेल एवढं दुःखं देतो, झेपेनासं झालं, त्याला दया आली की सुटका करतो. 

सुटका, गेलेल्या माणसाची तर होतेच पण पाठीमागे राहिलेल्या माणसाची पण होते, हेच खरं. 

जयंत विद्वांस

No comments:

Post a Comment