Sunday 24 February 2013

द्रौपदीसी बंधू शोभे नारायण

भरजरी गं पितांबर दिला फाडून 
द्रौपदीसी बंधू शोभे नारायण

सुभद्रा कृष्णाच्या पाठची बहीण
विचाराया गेले नारद म्हणून
बोट श्रीहरीचे कापले गं बाई
बांधायाला चिंधी लवकर देई
सुभद्रा बोलली, शालू नी पैठणी
फाडून का देउ, चिंधी तुम्हांस मी?
पाठची बहीण झाली वैरीण



द्रौपदी बोलली हरीची मी कोण?
परी मला त्याने मानीली बहीण
काळजाची चिंधी काढून देईन
एवढे तयाचे, माझ्यावर ऋण
वसने देउन प्रभू राखी माझी लाज
चिंधीसाठी आला माझ्या, दारी हरी आज  

त्रैलोक्यं मोलाचे वसन दिले फाडून


प्रेमाचे लक्षण, भारी विलक्षण
जैसी ज्याची भक्ती, तैसा नारायण
रक्ताच्या नात्याने, उपजे न प्रेम
पटली पाहीजे, अंतरीची खूण
धन्य तोची भाउ, धन्य  ती बहीण
प्रीत ती खरी जी, जागे लाभाविण
चिंधी पाहून हरी जाहले प्रसन्नं....
द्रौपदीसी बंधू शोभे नारायण....

आज राखी पौर्णिमा. आपल्याकडे डे नसतात, सण असतात. असच भावाबहीणीचं नातं दृढ करणारा हा सण. ज्यांना भाऊ नाहीत त्या चंद्राला भाऊ मानतात, ज्यांना बहीण नाही त्यांनी काय करायचं? त्यांनी कुठल्याही स्त्रीचा आदर ठेवावा, म्हणजे समाजात आपोआप स्त्रीयांना मान मिळेल. त्या करता लगेच राख्या बांधायची गरज आहे असं नाही.

वरचं गाणं असच एक सुंदर गाणं आहे. आपण श्रीकृष्णाला एक ऑलराउंडर देवाच्या रूपात बघतो, असं भाग्यं दुस-या कुठल्या देवाला नाही. तो पांडवांचा सखा, मार्गदर्शक आहे, राधेचा प्रियकर आहे, गरीबांचा त्राता आहे, सुदामासारख्याचा मित्रं आहे, गोपींची चेष्टा करणारा खटयाळ तरूण आहे आणि द्रौपदीचा तारणहारही. तो तिला दुर्वास आणि दुःशासन दोघांपासून वाचवतो. असा हा पाठीशी उभा रहाणारा, एवढं सगळं जमतं, त्या कृष्णाला बोटभर चिंधी मिळणं अवघड आहे का? पण अशा छोटया छोटया गोष्टीतूनच प्रेम दिसतं.

घा-या, गो-या असूनही लबाड न वाटणा-या अत्यंत सात्विक चेह-याच्या वनमालाबाई, कुठल्याही आईला आपलाही मुलगा असाच असावा असं वाटायला लावेल असा माधव वझेंचा निरागस शाम, आचार्य अत्र्यांचे अर्थवाही शब्दं, आशाताईंचा आवाज (हया आवाजाचं वर्णन करताना शब्दं सापडत नाहीत, हया गाण्यात माया अक्षरशः त्यांच्या आवाजतून ओथंबते) आणि वसंत देसाईंचं संगीत असा सगळा जूळून आलेला योग आहे हा. ही देवाघरची माणसं, सोप्या सोप्या शब्दात कुठलाही आव न आणता आपलं आयुष्यं सुंदर करून गेली. 

-- जयंत विद्वांस  




No comments:

Post a Comment