Sunday 24 February 2013

समजून घे रे


समजून घे रे

सांग कशी येऊ मी सोडून सारे
तुझ्यासाठी जीव तुटे, समजून घे रे

ध्यानीमनी एक तुझीच प्रतिमा
मी रोहिणी अन तू माझा चंद्रमा
प्रीत माझी सोन्याची परखून घे रे
तुझ्यासाठी जीव तुटे, समजून घे रे

तुझेच गीत सदा माझ्या अधरी
भोळी मी राधा अन तू सखा हरी
सुर तुझ्या पाव्याचे जुळवून घे रे
तुझ्यासाठी जीव तुटे, समजून घे रे

जमली तशी केली प्रीती तुजवरी
दुःखं तुला देऊ मी ही कुठवरी
मैफिल तुझी तू सजवून घे रे
तुझ्यासाठी जीव तुटे, समजून घे रे

जयंत विद्वांस

1 comment: