Wednesday 24 August 2016

मैं तो आरती उतारू रे...

इसब, गजकर्ण या त्वचारोगात अंगाला प्रचंड कंड सुटते. त्यात पण ओला आणि कोरडा प्रकार असतो. एकदा खाज सुटली की माणूस थांबू शकत नाही, रक्तं आलं तरी चालेल पण खाजवावंच लागतं. तसा एक साहित्यइसब किंवा गजकर्ण आजार फेसबूक आणि इथून कॉपी पेस्टून व्हॉट्सॅपवर पसरला आहे. काही दिवसांनी इये मराठीचिये नागरी वाचक कमी आणि साहित्यिक जास्ती असा प्रकार होण्याची शक्यता आहे. मूळ हेतूचा पुढे कसा विपर्यास होतो किंवा कसे विभत्स स्वरूप पहायला मिळते याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे पुण्याचा गणेशोत्सव. तद्वत मार्करावांनी दिलेल्या उमटायच्या संधीचं झालं आहे. यात गंमत म्हणून काही ना काही स्टेटस टाकत रहाणारे, मजा घेणारे लोक येत नाहीत. जे वैद्य शिरवाडकर काढा (किंवा इतर कुठल्याही साहित्यिकाचा काढा) पिऊन इथे साहित्यिक होऊन पोट साफ करतात त्यांच्याबद्दलही हे मत नाही. हे मत आहे त्यावर लाईक, कॉमेंटचा जोगवा मागणा-यांविषयी. माणसं आपल्याला झेपेल ते का करत नाहीत? बांबू आहे म्हणून बायका लगेच पोलव्हॉल्ट करायला जातात का? उलट थोडा कापून धुणं वाळत घालायची काठी करतील. 

पाच वर्षांमागे मी फेसबुकावर आलो तेंव्हा खेड्यातलं पोर शहरात आलं की अचंबित नजरेनी सगळीकडे बघतं तशी माझी अवस्था होती. लोकांचे विचार किंवा साहित्यं वाचून मला न्यूनगंड यायचा. मुळात कविता किंवा इतर वाचन ही कमी असल्यामुळे हे चौर्यकर्म वगैरे आहे का हे समजायचं नाही. सदगदित व्हायचो अगदी. फेअर अँड लव्हलीची जाहिरात बघून काळी मुलगी जशी स्वप्नाळू होते तसा मी स्वप्नाळू व्हायचो. मला कधी जमेल असं लिहायला असं वाटायचं. पूर्वसुरींचा प्रभाव लिखाणावर असण्यात गैर काहीही नाही. आपली वाट सापडेपर्यंत त्या पाऊलवाटेवर चालण्यात कमीपणा नाही. पण चोरकाम वाईट. क्षणिक प्रसिद्धी आणि वाहवा मिळवून काय फायदा. एकदा पोस्ट टाकल्या टाकल्या मिनिटात एकाला तो व्हॉट्सॅपवर नाव काढून आल्याचं त्यानी मला सांगितलं. नाव काढून काय मिळतं? ना स्वतः:ला क्रेडिट ना दुस-याला. मग यात आनंदाचा भाग काय आहे? तर वाचणारे ते त्यानीच लिहिलंय असं समजून कौतुक करतात आणि टाकणारा 'नरो वा कुंजरो वा'च्या धर्तीवर फक्तं स्मायली किंवा धन्यवाद देतो. अशी होते सुरवात स्वआरतीची. 

तेंव्हा मी काहीही लिहीत नसल्यामुळे असेल पण एक अत्यंत हळवं, तरल वगैरे काव्यं लिहिणारी डबलग्राज्वेट कवयित्री माझ्या प्रेमात पडली होती पाच वर्षांपूर्वी. भेट वगैरे व्हायच्या आधीच तो अध्याय संपवला (त्यावर चर्चा नकोय). तर तेंव्हा तिचे दोनोळी किंवा चारोळी मेसेज यायचे. एकदा अशाच दोनोळी आल्या, सुरेख होत्या. हल्ली जमतंय तिला असं वाटून गेलं मला. मग एका समूहावर पर्दाफाश केला एका जाणकार माणसानी. इलाही जमादारांची एक गझल बाईंनी खाली स्वतःचं नाव कसं दिसतं हे बघण्यासाठी असेल पण स्वतः:चं नाव लावून पोस्ट केली होती. त्यावर तो माणूस तुटून पडला. मग सिरिअल किलरचा एक खून सापडल्यावर बाकी खून जसे पटापट उघडकीला येतात तशा तिच्या इतर चो-या लोकांनी उकरून काढल्या. मग तिनी जो पळ काढलाय तो आजतागायत, अर्थात दुस-या कुठल्या नावानी, फोटोनी दुकान चालू असेल तर सांगता येत नाही. काय मिळालं  या सगळ्यातून, माहित नाही, क्षणिक आरत्या झाल्या, एवढंच. काय समाधान मिळत असेल खोटेपणाचं हे मला कोडंच आहे. 

ग्रहणात मागितलेल्या दानासारखी लोक प्रशंसा, कौतुक मागत फिरतात तेंव्हा कीव येते. मागे एका व्हॉट्सॅप ग्रुपात होतो. एक उच्चशिक्षित मेंबर होता. बरं लिहायचा. मग त्याची तेवढीच उच्चंशिक्षित बायको सामील झाली. मग याच्या पोस्टी पण वाढल्या आणि एक दिवस त्याचा मेसेज आला, 'जरा कौतुक कर ना पोस्टचं, बायको पण वाचेल म्हणजे'. माणसं नि:शब्दं करतात :P . प्रॉडक्शनलाईनला पट्ट्यावर जशा वस्तू पुढे पुढे सरकतात तसे मेसेजेस वर वर जात नाहीसे होतात तिथे असल्या अपेक्षा कशाला हव्यात? माझ्या पोस्टला लाईक, कॉमेंट करा असे मेसेज वाचले की मला भोवळ येते. आपण हास्यास्पद होतोय हे कशामुळे कळत नसेल? असले जोगवा मागणारे लोक मला कंटाळतात लवकर. सूड म्हणून पोस्टी वाचतात फक्तं, लाईक, कॉमेंट करत नाहीत. ते एक बरंच आहे म्हणा. ही सगळी कंड सुसह्य करण्याचे मार्ग ही आहेत म्हणा. आपल्यासारखेच लोक जमवले की मग सगळं कसं छान छान. अच्छे दिन आ गये चा फील येतो. एका स्वयंघोषित दिग्गज व्यक्तिमत्वाच्या चांगल्या पोस्टवर मी मोठी कॉमेंट टाकली होती व्हॉट्सॅपला. रात्री दीडला मेसेज होता, 'मी एफबीला टाकलीये हीच पोस्ट, तेवढी हीच कॉमेंट तिकडे पण टाका ना'. म्हणजे माझं कौतुक पुरेसं नव्हतं कारण ते बुरख्यात होतं. ते तिथे अनेकांना दिसायला हवं होतं. मी आपला साधा माणूस, टाकली कॉमेंट तिथेही. तेंव्हापासून एकही कॉमेंट दिली नाही हा भाग वेगळा.   

अनंत ग्रुपात पोस्टायचं. बार्टर सिस्टीमनी देवाण घेवाण ठेवायची. सामूहिक झिम्मा खेळायचा. पहिल्या शोधनिबंधात लिहिल्याप्रमाणे संख्या महत्वाची, काही काही पोस्ट्सवरच्या कॉमेंट्ससुद्धा वाचनीय असतात. अशी क्वालिटी जोगवा फेम साहित्यिकांच्या पोस्ट्सवर दिसत नाही. माणसाला ओवाळून घ्यायची हौस फार. नसेल कुणी तयार तर मग ही वेळ येते. आपलं आपणच तबक तयार ठेवायचं आणि मान गोल फिरवायची, हाय काय अन नाय काय. माझ्या डोळ्यापुढे कायम लाडात बोलणारी कानन कौशल उर्फ इंदुमती पैंगणकर येते लगेच. समोर संतोषी मातेच्या जागी कौतुक करणारा माणूस आहे आणि इकडे पोस्टकर्ता अत्यंत भक्तिभावाने, नजरेत कौतुक थबथबलंय आणि मग तो ऑडिओ चालू करतोय, उषा मंगेशकर 'मैं तो आरती उतारू रे' म्हणतीये. मी बेशुद्ध पडतो लगेच. अर्धवट ग्लानीत मी असल्या देवळापासून विरुद्ध दिशेला पळत सुटलोय असं दिसायला सुरवात होते आणि सुरक्षित अंतर कापलं की मी शुद्धीवर येतो. 

या सगळ्या आजाराची लागण व्हायची नसेल तर तुमची जवळची माणसं चांगली हवीत. माझी बायको आणि मुलगी म्हणून प्रशंसनीय आहेत. दोघीही एका शब्दात कौतुक संपवतात, फार फार तर दोन शब्दं, त्यापेक्षा एखादा शब्दं अजून सांगण्याच्या लायकीची माझी पोस्ट नसते असा त्यांचं ठाम मत आहे, त्यामुळे माझे पाय आपोआप जमिनीवर रहातात. त्यामुळे आता घरी गेलो की त्यांना उभं करतो, कानन कौशल सारखं तबक घेतो, तेवढं मागून 'मैं तो आरती उतारू रे' म्हणा रे कुणीतरी. ;) :P 

जयंत विद्वांस 

(सदर 'शोधनिबंध - भाग (२)' हा 'फेसबूकीय मानसशास्त्रीय आजार - लक्षणं, परिणाम, कारणे, उपाय आणि उच्चाटन' या प्रबंधाकरीता मिळालेल्या शिष्यवृत्तीतून लिहिला आहे. कुणावर वैयक्तिक टीका करण्याचा हेतू नाही, कुणाला स्वतःला लागू होतंय असं वाटलं तर गेट वेल सून :P )

फेसबुकीय वाढदिवस...

फेसबुकानी काय काय दिलं आजवर? मित्रं दिले, लिहायला शिकवलं, चांगलं वाचता आलं, माणसं सापडली, काही जवळ आली, काही हरवली, काही टिकून राहिली. भांडणं, वाद, उखाळ्यापाखाळ्या वगैरे उद्योग हौस असेल तर आहेतच इथे रग्गड पण इथे खदखदून हसायला त्यापेक्षा जास्ती मिळालं. लाईक्स, कॉमेंट्सच्या नादात रोज काहीतरी उमटण्याच्या खेळात चांगलं लिहिणारी माणसं घसरताना बघितली. जागतिक चावडी आहे ही, आपल्याला योग्यं वापर करता आला का हा प्रश्नं मला वारंवार पडतो. इथेही लाटा असतात. अर्धवट, चुकीच्या, खोट्या ऐकीव माहितीवर लोक तत्परतेने स्टेटस टाकतात. इथे बाजू मांडणारे कमी आणि घेणारे जास्ती. एकदा एक झेंडा हातात धरला की त्यात न पटणारं असलं तरी मान्यं करायचं नाही हा इथला प्रघात आहे. धार्मिक, राजकीय, जातीय पोस्ट्सवर तर न फिरकलेलं बरं. सगळा माल पामेला अँडरसनसारखा सिलिकॉन घालून फुगवलेला, भोपळा दिसत असला तरी त्यात सत्यं लिंबाएवढं,.   

इथे अनेक 'डे' असतात. टॅगाटॅगी, दिंड्या, सणवार वेगळे. एकूणच हा अभ्यासाचा विषय आहे त्यामुळे तूर्तास फेसबुकीय वाढदिवस घेऊयात. वर म्हटलं तसं खळखळून हसता येण्याचा दुर्मिळ योग यामुळे येतो. झुकेन्द्रानंद सरस्वती हा स्वतः मानसोपचार तज्ञ असणार. लोकांना खुश करण्याचे मार्ग त्याच्याइतके कुणी शोधले नसतील. 'मला कुणीतरी विचारतंय' ही आनंद देणारी गोष्टं त्यानी अनेक प्रकारे राबवली. फलाण्यानी तुम्हाला लाईक केलं, कॉमेंट केली, रिऍक्ट केलं, पोक केलं, फॉलो केलं अशा सुखावणा-या बातम्या तो होज पाईप लावून २४ x  ७ ओतत असतो. याच दिवशी मागच्या वर्षी तुम्ही काय काय कचरा इथे टाकलात ते सांगतो. कुणाचे वाढदिवस आहेत, कुणी इव्हेंटला बोलावलंय वगैरे आमंत्रणं मागच्या वेळेला तुम्ही आला नाहीत वगैरे कुठलाही राग मनात न धरता देत असतो. यामुळे कुणाचे वाढदिवस विसरलो वगैरे पापातून आपोआप मुक्तता मिळते. नोटिफिकेशन आलं की धावायचं. 

सोहळा असतो. रात्री बारा वाजता उत्सवमूर्तीच्या भिंतीवर जाऊन पताका लावण्यात बोल्टसुद्धा मागे पडेल असा स्पीड असतो. उत्सवमूर्ती स्वतः दबा धरून असते. हाच माझा खरा हितचिंतक म्हणून लगेच लाईकचं हळदीकुंकू केलं जातं (सवाष्णीच्या गुणधर्मानुसार तिचा/ त्याचा असेल की आपली दोन बोटं लगेच करंड्यात गेली पाहिजेत) आणि अनेकविध प्रकारांनी आभारप्रदर्शन चालू होतं. जुन्या काळी राजे महाराजे भेटले की इकडून नजराण्यांच्या डिश दिल्या जात मग समोरून परतीचे नजराणे दिले जायचे तसं लगेच thankkkkkkkkku so much, थँक्स, धन्यवाद आणि अशा अनेक थाळ्या भरभरून परतभेटी दिल्या जातात. वाणं लुटावीत ना तशा अनेकविध कॉमेंट्स असतात. बाहेर विकत घेतला तर हजार रुपये पडतील असे दोन तीन मजली केक डझनात गिफ्ट मिळालेले असतात. ते गुलाब गुलकंदाचे नसतात म्हणून नाहीतर पतंजली तोट्यात जाईल असा वर्षभर पुरेल इतका गुलकंद निघेल एवढाले पुष्पंगुच्छ मिळतात. कुणी हौशी माणूस कविता करतं, कुणी उत्सवमुर्तीचा फोटो निवडून त्यावर चारोळी लिहितं. आपण फ्लेक्स लावणा-यांना का हसतो? ते काय वेगळं करतात?    

एकमेकांच्या नावाचे अपभ्रंश करून जी जवळीक दिसते ती अजून कशात नाही. लब्यू, जियो, आभाळभर शुभेच्छा, हॅपीवाला बर्थडे, अजून शंभर वर्षे जग (हा शाप शुभेच्छा म्हणून देतात हल्ली) वगैरे प्रकार म्हणजे इतरांना जरा जास्ती जवळीक दिसते. प्रगटदिन (की प्रकटदिन), भूतलावर आल्याचा सुदिन वगैरे म्हणजे साहित्यिक पातळी. मग पार्टी मागितली जाते, द्यायची नसल्यामुळे लगेच होकार दिला जातो. सगळ्याच शुभेच्छा खोट्या नसतात किंवा त्यावरची आभारप्रदर्शनंही. त्यामुळे उगाच प्रत्येकानी ते स्वतः:ला लावून घेऊ नये. पण नाटकीपणाचं एकूण प्रमाण जास्ती आहे त्याबद्दल आहे हे. विश केलं नाही म्हणून रुसवे फुगवे पन्नाशीला आलात तरी शिल्लक असतील तर फक्तं वय वाढलं एवढाच त्याचा अर्थ आहे. आमच्या इथे एक सत्तरी पार केलेलं (वाचा - नमुने (५) ) विचित्रं विश्वं होतं. ते स्वतः:च आज माझा वाढदिवस आहे म्हणायचे आणि लहान मुलासारखं विश करणा-यावर खुश व्हायचे. नाही केलं तर फुरंगटायचे सुद्धा. मी आपला साधा माणूस, मी विचारलं, 'दरवर्षी याच तारखेला येतो का?' त्यांनी तसंही माझं नाव टाकलंच होतं पण त्यामुळे नंतर 'विशा'यचा माझा त्रास कायमचा संपला. 

मधे एकानी स्वतः:चा फोटो टाकून उद्या वाढदिवस आहे त्याची तयारी अशी स्वतः:च दवंडी पिटवली होती (या क्षणापर्यंत फ्रेंड आहे तो, नंतर असेल की नाही माहित नाही). बिलेटेड असतात तशा बिफोर शुभेच्छा सुरु झाल्या. दुसया दिवशी उद्यापन झालं ते वेगळं. मला हसू नाही आलं. आजार किती बळावलाय असं वाटून गेलं. अटेंशन सिकींग असतंच माणसाच्या स्वभावात, माझ्याही आहे, पण इतकं नको. आपण हास्यास्पद होतोय वगैरे लक्षात येत नसावं का? अजून एक किस्सा मला आठवतोय. एकानी काही काळ फेबू कुलूप लावून ठेवलं होतं. वाढदिवसाच्या आधी दोन दिवस कुलूप काढण्यात आलं. लोकांना नोटिफिकेशनचे खलिते पोच झाले. मग धरणाचे दरवाजे उघडावेत आणि पाण्याचे लोट वहावेत तशा काही क्युसेक शुभेच्छा आल्या. पूर ओसरण्यासाठीच असतो, तो ओसरला. काय साध्यं झालं? तुम्ही फेबूला असा नसा, ज्याला विश करायचंय तो करेलच की. पण मग त्यात क्वांटिटीची मजा नाही. जाहिरात झाली पाहिजे. संख्या दिसली पाहिजे. 

नंतरची जी आभारप्रदर्शनं असतात ती तर जीवनगौरव पुरस्कार मिळाल्यावर जी भाषणं होतात त्या तोडीची असतात. शुभेच्छांच्या पावसात न्हाऊन गेलो, मेक माय डे, कसा उतराई होऊ कळत नाही, असाच लोभ असू द्या, कुणाला धन्यवाद म्हणायचं राहून गेलं असेल तर माफ करा. मला ओरडून सांगावसं वाटतं, 'अरे बाबा, देऊळ दिसल्यावर जसा हात छातीपाशी जातो कारण तो उगाच नाराज नको म्हणून तसंच नोटिफिकेशन दिसल्यावर एक ओळ टायपायला खर्च काही नाही आणि नोंद होते, आपल्या तारखेला परतफेड होते म्हणून आहे हे सगळं. तारीख पुसून टाक आणि बघ पुढच्या वर्षी किती शुभेच्छा येतात ते'. पण असं कुणी करणार नाही कारण एकदा एक नाकपुडी बंद करून दुस-या नाकपुडीत सतत बोर्डावर रहायच्या नशेची पावडर ओढली की त्यापासून सुटका नाही. काही गोष्टी वैयक्तिक असाव्यात. एक दिवसाचा खोटा, मागून घेतलेला आनंद मिळवण्यात हशील नाही. 

मी वाढदिवस कधीही साजरा करत नाही. त्यात साजरं करण्यासारखं काही आहे असं मला वाटत नाही. बायको आणि मुलगी नशिबवान, दोघी तिथीने दस-याला अवतीर्ण झाल्या. त्यामुळे साजरा करताना धर्माचा आधार घेऊन तारखेपेक्षा तिथी महत्वाची या नावाखाली वाढत्या महागाईत एकाच खर्चात तीन सोहळे पार पडतात हा माझा त्यापाठीमागचा शुद्ध हेतू आहे. माझ्या नशिबात ते ही नाही. भाद्रपद कृष्णं चतुर्दशी हा जन्माला येण्याचा मुहुर्त साधणं काही माझ्या हातात नव्हतं. एक दिवस उशीर केला असता तर काय बिघडलं असतं खरंतर? पण सर्वपित्रीचा सुवर्णमुहुर्त काही साधता आला नाही, हे खरं. सगळीकडे माझ्या वाढदिवसानिमित्त घराघरात खीर, वडे चालू आहेत हे पाहून मला भरून तरी आलं असतं. पण ते सुद्धा नशिबात लागतं. 

खरंतर वाढदिवस म्हणजे आयुष्यातलं एक वर्ष संपल्याची नोंद. ते कुणाबरोबर गेलं, कसं गेलं, काय राहून गेलं हे आठवण्याचा दिवस. आपल्या व्यक्तीच्या डोळ्यात कौतुक दिसलं की झालं. मग जगानी विश केलं काय न केलं काय, काय फरक पडतो. निदान मला तरी नाही.     

जयंत विद्वांस 

(सदर शोधनिबंध 'फेसबूकीय मानसशास्त्रीय आजार - लक्षणं, परिणाम, कारणे, उपाय आणि उच्चाटन' या प्रबंधाकरीता मिळालेल्या शिष्यवृत्तीतून लिहिला आहे. कुणावर वैयक्तिक टीका करण्याचा हेतू नाही, कुणाला स्वतःला लागू होतंय असं वाटलं तर गेट वेल सून :P )

  

'दारू'काम...

शेण गुंजभर खाल्लं काय आणि किलोभर खाल्लं काय, शेण ते शेणंच. दारू, मदिरा, मद्यार्क, सोमरस, स्पिरिट, अल्कोहोल वगैरे नावं असली तरी कुणीही 'चला आज जायचं का दारू प्यायला' असं तोंड वर करून म्हणत नाही त्यापेक्षा 'बसायचं का? हे जास्ती प्रचलित आहे. प्रत्येकाची आवड वेगळी, चवी वेगळ्या, कारणं वेगळी. माणसं जातीवरून जशी एकमेकाला कमी लेखतात तशीच कोण काय पितो यावरून त्याची पत ठरते. रम पिणारे सगळ्यात ताकदवान असा त्यांचा समज असतो. मग व्होडका, व्हिस्कीवाले दुय्यम स्थानावर, जीन, बिअर पिणारे म्हणजे कंडम माणसं. वाईन वगैरे बायकांची कामं. त्यात परत पोटजाती, रम व्हाईट की रेड, बिअर स्ट्रॉंग की माईल्ड, व्हिस्की माल्ट की सिंगल माल्ट यावर तुमची पिण्याची लायकी ठरते. फेणी, मोहाची, फळांच्या वाईन्स हे देशी आणि तकिला, स्कॉच (यात परत सिंगल माल्ट, मल्टिग्रेन, किती वर्ष जुनी वगैरे प्रकारावरून तुच्छ ठरवता येतं) हे परदेशी प्रकार जरा कमी प्यायले जातात. ताडी, माडी, देशी आणि हातभट्टीचे 'सेवक' वेगळे. आंतरजातीय विवाह लावल्यासारखा कॉकटेल हा अजून एक प्रकार.    

'दारू पिण्याची कारणे' असं पुस्तक जर काढायचं असेल तर महिनाभर बारमध्ये नुसतं जाऊन बसलं तरी खंड निघतील. न झालेले काल्पनिक प्रेमभंग हे सगळ्यात मोठं कारण, इतर कारणात - मागच्या वेळेला मी दिलेली म्हणून आज तू दे, आज पैसे आहेत म्हणून, टेन्शन आलंय म्हणून, टेन्शन संपलं म्हणून, एन्जॉय, ब-याच दिवसांनी मित्रं भेटले म्हणून, परत भेटणार नाही लवकर म्हणून, लाचेच्या पार्ट्या (लोन, टेंडर, प्लॅन पासिंग, सरकारी कामं), काय करू आज वेळच जात नाही म्हणून, अरे उद्यापासून मी जाम बिझी आहे म्हणून, उद्या सुट्टी म्हणून, ऑफिसची पार्टी, मॅच जिंकली/हरली म्हणून, आपला भाऊ नगरसेवक झाला म्हणून, कुणीतरी फुकट देतंय म्हणून, ब-याच दिवसात घेतली नाही म्हणून, पाऊस मस्तं पडलाय म्हणून गरम व्हायला, प्रचंड ऊन म्हणून गार व्हायला, प्रमोशन झालं म्हणून, बेकार आहे म्हणून. कारणं अनंत आहेत, अजून निर्माण होतील पण एका स्टेजनंतर शरीराला दारूची गरज निर्माण झाली की मग कारण लागत नाही. पाय आपोआप वळतात, पैशांची तजवीज होते मग त्यासाठी माणसं कुठल्याही थराला जातात. 

सुरवात मोठी मजेशीर असते. 'घे रे, काही नाही होत' हे पहिलं वाक्यं  त्यातलं. मग बिअर घेतल्यावर फार टांगा पलटी होत नाही म्हणून तिच्यापासून सुरवात होते. त्यात बॉटम्सअप, एकावेळी किती, मुतायला न जाता किती वगैरे रेकॉर्ड्स चालू होतात. मग टिन वरून माईल्ड, आख्खी बाटली मग दीड, दोन, तीन. मग केजी पास झाल्यासारखं पहिल्या वर्गात स्ट्रॉन्ग अभ्यासक्रम चालू होतो. पुढे त्यानी मुंग्यासुद्धा येत नाहीत डोक्याला (खरंतर येतात पण कुणीतरी म्हणतं अजून बिअरवरच आहे हे येडं) म्हणून रम किंवा व्हिस्की चालू होते. इंग्लिश नाव अवघड असेल तर फार भारी वाटतं म्हणून पिणारे मी पाहिलेत. त्यात नवशिके बावळट भोपळे/डबे बांधून पोहतात तसं थम्सअप घालून सुरवात करतात त्यामुळे चव भिकार आहे हे समजत नाही आणि मुंग्या आलेल्या डायरेक्ट कळतं. किती जणांना खरंच कळतं की आपल्याला पेगमधे पाणी किती, सोडा किती आणि बर्फाचे खडे किती हवेत ते? वेटर जे तयार करतो ते पितात ९५ टक्के लोक. हेतू एकंच, नशा झाली पाहिजे. चवीची कल्पना केलेलीच नाही कधी. प्यायची फक्तं. 

नवशिके खूप पैसे घालवतात कारण चखणा नावाखाली काहीही महागडं खातात, ब-याच वेळा आपण काही कमी नाही हे दाखवण्यासाठी, बॉइल्ड एग्ज, चिकन टिक्का, कबाब, तंदूर, सिक्स्टीफाईव्ह, मंचुरियन, मसाला पापड, चीज पायनॅपल चेरी यावर किंमतीच्या अनेक पट पैसे देतात. सॅलड, दाणे (खारे, शिजवलेले), चकलीच्या सळया, फरसाण, नायलॉन पोह्याचा चिवडा, मटकी उसळ वगैरे फ्री स्नॅक्स. (उकडलेली अंडी तिखट मीठ लावून, शिंगाड्याच्या पिठाचे दाणे आणि चिझलिंग बिस्किटं मला सगळ्यात जास्ती आवडतात :P) यात फुकटे आणि मला नको काही, मी पीत नाही म्हणणारे जेवल्यासारखा चखणा खातात. त्यात काही जण दाणे खाताना त्यांची नाकं काढून टेबलावर घाण करतात, फरसाण सांडतात, सिगरेटची राख डिशमध्येच झाडतात, पाण्याचे ग्लास आडवे करतात, एकमेकांच्या ग्लासात दारू ओततात. अशा लोकांना कायद्याने बंदी घालायला हवी. 

माणूस बदलतोच एकदा तिथे बसला की. शूर होतो, इंग्लिश बोलतो, मोठ्यामोठयांदा बोलतो, मुद्दाम चार जणांना फोन करून कुठे बसलोय ते सांगतो, शिव्या देऊन आपली दोस्ती कशी आहे त्याचे जगापुढे फ्लेक्स लावतो, बिल आल्यावर पैसे कमीत कमी कसे देता येतील असा विचार करणारा पण आधी लाखाच्या गप्पा मारतो, 'तुझ्यासाठी काय पण' वगैरे संवाद आहेतच. कुणाला कसा मारायचा, गेम कशी केली/कशी करणार आहे, तीला कसा भिडलो, कशी चेपली तिला (निव्वळ १०१ टक्के अफवा सगळ्या), लोकांना असूया वाटतील असे पुढचे प्लॅन्स वगैरे प्रकार तर ऐकणीय असतात. मागच्या अमुक अमुकच्या पार्टीत मी सात पेग प्यायलो होतो (जेमतेम साडेतीन असतात कारण माप अंदाजे असतं) पण कसा घरी चालत गेलो याला होकार देणारा माणूस मागच्या वेळेला आठ म्हणालेला असतो तेंव्हा यानी दुजोरा दिलेला असतो एवढाच घ्यायचा. मग त्या बरोबर सिग्रेटीचा धूर निघतो. प्रत्येकाची स्टाईल वेगळी. कुणी सर्कल काढतो, कुणी पंख्यामुळे निघत नाही म्हणतो, कुणी शेवटी जीव खाऊन फिल्टर पर्यंत कश मारून विझवतो कुणी, जी मिळेल तिचे दोन पफ मारून घेतो. हिरो लोकांचा फार प्रभाव असतो. कुणी त्यांच्या स्टाईलनी ग्लास धरतात, कुणी चौथ्या पाचव्या बोटात सिगरेट धरतात किंवा गजानन महाराज स्टाईल. 

दारू जेंव्हा गरज होते तेंव्हा सगळं संपतं, माणसाचं माकड होतं. संसार रस्त्यावर येतो, स्तर कमी होतो. माणूस शेवटी ताडी, हातभट्टी, देशीवर येतो (इथे शिक्षण, पैसे, जात वगैरे प्रकार दुय्यम आहेत, अनेक चांगल्या घरातली माणसं मी पाहिलीयेत अशी). शिकार केल्यावर तो प्राणी आतून पोखरून त्यात पेंढा भरतात तसा देह आतून पोकळ होतो. डोळ्याखाली पिशव्या येतात, चेहरा लाल पडतो, बार उघडायची लोक वाट पाहू लागतात. असतील टेन्शन्स ओढवून घेतलेली, दैवाने आलेली संकटे असतील पण दारूची पळवाट सोपी पडते मग. एकदा नशा झाली की काही काळ सगळ्याचा विसर पडतो, उद्याचं उद्या बघू एवढाच त्याचा अर्थ. कमकुवत मानसिकता, संकटाला तोंड देण्याची संपलेली जिद्द, नैराश्य, सगळं संपल्याची विषण्णता आणि समोर डोंगराएवढे प्रॉब्लेम्स. हळूहळू जीव जाणार हे कन्फर्म असल्यामुळे माणूस मग रग्गड दारू प्यायला लागतो. 

माझा स्टॅमिना जबरी आहे, टँकर आहे, आपल्याला काही फरक पडत नाही, इथे कोण जगणार आहे जास्ती, मी तुला पोचवून जाणार, **त दम लागतो एवढी प्यायला, आपण कुणाला घाबरत नाही, दुनियामें मोहब्बत बडी चीज है अशी अनेक भंपक आणि स्वतःला खुश करणारी विधानं बोलायला अक्कल लागत नाही. आपल्याला एकूणच क्वांटिटीचं आकर्षण जास्ती आहे, क्वालिटी नसली तरी चालेल. राखी सावंत म्हणून अनेकांना माहितीये बघा. 'किती' यावर चुरस असते, क्वालिटी काय का असेना किंवा नसेना. बरं, एकही माणूस शुद्धीत असताना त्यापासून होणारे फायदे सांगू शकणार नाही त्यामुळे तो खूप पितो हे विधान त्याला कधीच मान्यं नसतं. त्याचा त्याच्यावर कंट्रोल असतो आणि तो मनात आणलं तर कधीही सोडू शकतो यावर तो सोडून इतर कुणाचाच विश्वास नसतो. स्वतः:ची फसवणूक एकदा स्वतःकडून चालू झाली की मग दुस-याची गरज नसते तुमची माती करायला.      

कुठलीही गोष्टं वाईट नसते. तुम्ही कसा उपयोग करता यावर ते अवलंबून असतं. सर्जनची नाईफ ऑपरेशन करेल आणि कुणा क्रूर माणसाच्या हातात आली तर भोसकायला पण उपयोगी येईल. बेनाड्रील, कुमारी आसव किंवा कुठलंही आसव म्हणजे काय असतं असा दावा करणारे लोक महान असतात. किती प्रमाणात घ्यायचं हे तज्ञानी ठरवलं की त्याला औषध म्हणतात. नाहीतर मग त्यांनी दोन चमचे रम घ्या सकाळ संध्याकाळ असं सांगितलं असतं की पण आपण आपल्या फायद्याची माहिती नेहमी ओरडून सांगतो. मुळात दारू वाईट नाही. तुम्ही तिला कसं घेताय यावर ते अवलंबून आहे. मी मागे स्कॉचवर लिहिलं होतं. मला तो प्रकार फार आवडतो पण म्हणून मी रोज संध्याकाळी घरी गेल्यावर बाटली उघडून बसत नाही. बरेच वर्षात तर मी बारमध्ये पण गेलेलो नाही, परवडत नाही. मजा घेता यायला पाहिजे. मला येते. माझं तिच्यावाचून काही अडत नाही, तिचंही नाही. आमचं लिव्ह इन रिलेशनशिपसारखं आहे, एकमेकांवर बंधनं नाहीत. डोळा मारला, दोघ हो म्हणालो की सहवास चालू. तो थोडक्यात उरकला की गोडी रहाते. एकमेकांचा कंटाळा आला, शिसारी आली की मजा गेली.  

माझ्या दृष्टीने स्कॉच हा धांदलीचा विषयच नाही. माहौल पाहिजे. स्नेहभोजनाची गर्दी इथे कामाची नाही. चारजण म्हणजे सुद्धा गर्दीच ती. एकेमेकांचे चेहरे स्पष्टं दिसतायेत एवढा पुरेसा उजेड, तोंडात टाकायला जीभ चुरचुरेल अशी लसणाची तिखट शेव, खारे काजू, तळलेला बांगडा, सुरमईचा तुकडा, शिंगाड्याच्या पिठातले तपकिरी दाणे, चिजलिंगची मुठीनी खायला बिस्किटे, एवढं पुरेसं आहे. राजकारण, अनुपस्थित व्यक्ती, वैयक्तिक दु:खं, अडचणी यावर बोलायची ही वेळ नव्हे. मस्तं गाणी, संगीत, नविन काहीतरी वाचलेलं, ऐकलेलं सांगावं, ऐकावं. उद्या सुट्टी आहे, थोडी शिरशिरी आल्यासारखं वाटू लागलंय, गर्भारबाई सारखं शरीर आळसावत चाललंय, पाय ताणले जातायेत, ग्लास खाली ठेवून परत उचलायला कष्ट पडतील म्हणून तो तसाच हातात धरून त्याच्यावर माया माया केली जातीये. बास, यापेक्षा काही नाही लागत वेगळं स्वर्गात चक्कर मारायला.

स्कॉच जिभेवरून पोटात जाते तो अनुभवण्याचा विषय आहे. आळवून म्हटलेल्या ठुमरीचा मजा, बेगम अख्तरच्या 'जाने क्यू आज तेरे नामपे रोना आया'चा दर्द, हुरहूर, तलतची 'शामे गमकी कसम'ची कंपनं, सैगलचं 'बाबुल मोरा', किशोरचं 'ये क्या हुआ', मुकेशचं 'कही दूर जब' त्यात वस्तीला आहेत. तिचा घोट कसा जिभ मखमलीनी ल्यामिनेट करून जातो. तो थंड प्रवाह इच्छित स्थळी पोचेपर्यंत गळ्यातून मिनिएचर मोरपिसं फिरवत जातो. न चावणा-या गोड काळ्या मुंग्या गुदगुल्या करत नखशिखांत फिरतात. दोनचार आवर्तनं झाली की तुम्हांला नील आर्मस्ट्रोन्ग झाल्यासारखं वाटू शकतं. तुम्ही चंद्रावर उतरला आहात, चंद्रावरचं काळं कुत्रं सुद्धा तिथे नाहीये, वजनरहित अवस्था, तरंगणं चालू डायरेक्ट. एवढी स्वस्तातली चांद्रसफर इस्रोच्याही आवाक्याबाहेरची आहे.  

पहिल्या वाक्यात म्हटलं तसं. शेणच ते पण श्रावणी केली असं समजतो कारण क्वांटिटी तेवढीच असते माझी. आपण कुणाला पी म्हणत नाही, आग्रह करत नाही. तसंही माणूसघाणेपणा इथे कामाला येतो, कुणाला नादी लावल्याचा आरोप नाही, काही नाही. तिढे सोडवायला, स्वतःवर प्रेम करायला, आठवणीत रमताना, अशक्यं स्वप्नं बघायला आणि जगाशी खोटं बोलून झालं की मनाला उत्तरं देताना स्कॉच थोडी बरी पडते एवढं मात्रं नक्की. :)

जयंत विद्वांस

(शेवटचे दोन पॅरा 'स्कॉच' पोस्ट मधून, आधी वाचले असतील तरी परत वाचलेत म्हणून काही बिघडत नाही :P )

बिनगोळीचं पिस्टल...

एकटक नजरेनी बघत होता तो. गेला अर्धा एक तास तो क्षणभरही जागचा हलू शकला नव्हता, जणू काही तो ते घडायचीच आतुरतेने वाट बघत होता. 

त्याला समोरच्या हॉटेलच्या रूममधे दिसत असलेला माणूस साधारण सहा फुटाच्या आसपास असावा आणि ती मादक देखणी बाई साधारण पाच फुटाच्या आसपास. तिचा ड्रेस जरा उत्तानच आहे. ती फोनवर असताना तो आतल्या रूममधून बाहेर आलाय, काहीतरी खोटं आहे तिच्या फोनवरच्या बोलण्यात याची त्याला जाणीव झालीये. त्यामुळे त्याच्या चेह-यावरचे भाव मात्रं काहीतरी खटकत असल्यासारखे. स्वतःच्या सावलीवरही शंका घेणारी माणसं जगात असतात कारण ती मागे असते सहसा, त्यापैकी तो एक वाटतोय. एकाचवेळी चेह-यावर बेफिकिरी, काहीतरी मिसिंग आहे ते शोधण्याची धडपड आहे आणि हे तिला दिसू नये म्हणून लपविण्याची खटपट. तो आता पूर्णपणे आपल्या तावडीत आल्याची तिची जवळपास खात्री पटलीये. 

तिच्या डोक्यात काहीतरी मागचा सूड आहे, संधीची आतुरतेनी वाट पहाणे म्हणजे काय ते तिच्या चेह-यावर कळतंय. ती बाई आहे एवढाच तिचा कमजोर मुद्दा आहे खरं तर पण तिनी काहीतरी मदतीची व्यवस्था केलेली आहे हे नक्की. ती त्याच्या अंगचटीला जातीये पण तो खांबासारखा उभा आहे फक्तं. कुणीही विरघळेल आणि तिला कवेत घेईल एवढी सुंदर ती नक्कीच आहे. पण त्याच्या चेह-यावर असल्या आमिषांना मी कोळून प्यायलोय असा भाव आहे. तिनी भरून दिलेला पेग तो पितोय पण संशयानी खिडकीचा पडदा बाजूला करून तो खालीही बघतोय. ती त्याच्याशी शृंगारिक, लाडं लाडं बोलतीये. आता बहुतेक तिची वेळ आलीये. त्या माणसाच्या नावानी खालून कुणीतरी जोरात हाका मारतंय. तो परत एकदा खिडकीतून बघतोय आणि पडदा सोडून तिच्याकडे. तिच्या ओठांवर असुरी हसू आहे. तो नक्कीच कुणीतरी पोलादी नर्व्हज असलेला माणूस असणार. तो पिस्टल हातात घेऊन तिच्याकडे शांतपणे बघत म्हणतोय. 'सोनिया, ये तुम जानती हो...' 

तेवढ्यात मागून आवाज आला 'काय बघतोयेस रे?' आणि तो दचकला. 

-----

त्यानी पॉझ करून सांगितलं, 'डॉन'. 'नविन?' 'नाही, तो पाहिलाय पण जुना जास्ती आवडतो, अर्थात प्राणचा नादिया कोमेनसीला न्यूनगंड आणेल असा बॅलन्स आणि एंडची बालिश मारामारी सोडून'. 'ते 'ये मेरा दिल' करीनापेक्षा हेलनचं खतरा आहे पण, इतक्या वेळा बघितलंय मी पण हेलनचं ते असुरी हसणं आणि 'सोनिया, ये तुम जानती हो...' नंतरचा आश्चर्यचकित चेहरा काय केलाय रे तिनी'. 'अरे अभिनय काय शबाना, स्मिता, रेखाच करायच्या का, बिंदू, हेलन, ललिता पवार, अरुणा इराणी पण करायच्या पण नशिबात लागतं कौतुक होणं सुद्धा'.   

'तुला हेलन आणि बिग बी मध्ये साम्य काय आहे माहितीये? तो ७३ आणि ती ७७ आहे पण वय वाढत रहाणारच, ते दिसतात मात्रं अजूनही ग्रेसफुल. हेलन तर एकदम गोड आज्जीबाई दिसते आता. काळ बदलत राहील, तुझ्या म्हातारपणात कुणी डान्सचं कौतुक केलं की तू तुझ्या नातवाला/नातीला सांग, 'तुला ग्रेसफुल, हलणारं रबर, फ्लेक्झिबल देह बघायचाय? गुगलला सर्च कर हेलन सॉंग्ज म्हणून, कशावरही क्लिक कर, त्यावेळेस ट्वेल्व्ह जी वगैरे कनेक्शन असेल, तुझा चष्मा लावून होईपर्यंत ती उदबत्तीच्या वलयासारखी पुढे निघून गेलेली असेल. रिवाइंड करून बघशील आणि म्हणशील 'हेलन, तुझ्या काळात बाकीचे टू जी स्पीडला नाचत होते तेंव्हा तू फोर जी ला इझीली नाचत होती, एवढं मात्रं खरं'.   

-----

त्यानी प्ले करून अमिताभ श्रीवास्तवचा तोंड बांधलेल्या हेलन रिचर्डसन खानला मागून बिनगोळीचं पिस्टल लावून इफ़्तिखार खानला लांब अंतरावर ठेवत निघून जाण्याचा मार्ग मोकळा केला.  

जयंत विद्वांस 

सत्तर एमएमचे आप्त (१६)… परवीन बाबी…

शेरखानजी पश्तुनी वंशाचा पठाण होता. शहाजहानच्या काळात ते भारतात आले. त्यानी भारतात १६५४ ते १६९० 'बाबी'राज्यं चालवलं, मग नंतर उरलेले इथेच राहिले. चितोडच्या राणा विरुद्ध केलेल्या कामगिरीबद्दल हुमायूंनी त्याला 'बाबी' किताब दिला होता. मराठ्यांनी सगळा गुजरात ताब्यात घेतला तरी जुनागढ आणि इतर तीन सुभे 'बाबी'कडे राहिले. त्या वंशातला जुनागढचा शेवटचा नवाब फाळणी  झाल्यावर पाकिस्तानात निघून गेला. परवीन त्याच वंशातली होती. आत्ता जिवंत असती तर ती ६७ वर्षाची असती. तिचे वडील ती दहा वर्षाची असतानाच गेले. फिल्म इंडस्ट्रीमध्ये उच्चंशिक्षित लोक कमी असायचे किंवा कमी यायचे तेंव्हा. अमिताभ बी.एस.सी.आहे, गोगा कपूर एम.ए.(पॉलिटिक्स), बलराज सहानी एम.ए.(हिंदी) आणि परवीनसुद्धा एम.ए.(इंग्लिश लिटरेचर) होती. 

ब-याच जणांना सेहवाग नविन आला होता तेंव्हा तेंडुलकर खेळतोय का सेहवाग आहे हे पटकन कळायचं नाही तसंच काहीही कारण नसताना परवीन आणि झीनतमधे घोळ व्हायचा. पण परवीन होती मात्रं खानदानी सुंदर अगदी, वयात आल्याची जाणीव तिनी आणि झीनतने करून दिली होती. तिच्याकडून लोकांनी, समीक्षकांनी अभिनयाची अपेक्षा कधीच ठेवली नव्हती. त्यामुळे ते आरोप तिच्यावर झालेच नाहीत फार. पण ती बाहुलीही नव्हती, तिचा प्रेझेंस रॉयल असायचा, तीला मातीत घोळून काढली असती तरी ती गावकी गोरी कधीच वाटली नसती. श्रीमंत घरातली, थोडी आगाऊ, शिक्षित, बिनधास्त मुलगी वाटायची ती. शशीकपूर बरोबर 'सुहाग'मधे ती म्हणते ना 'घरमें हो मुश्किल, तो दफ्तर ले चलो', तशीच वागली ती आयुष्यंभर, निर्बंध नसलेलं, मन मानेल तसं. महेश भट, कबीर बेदी, डॅनी बरोबर तिचे अल्पकालीन सहवास होते. अमिताभबरोबर तिचं सूत होतं अशीही बातमी होती. इतर नावंही तिला जोडली होती. एकदा तुमचा स्टँप प्रसिद्ध झाला की लोक परस्पर कुठल्या पाकिटाला चिकटवतील सांगता येत नाही.     

महेश भटनी त्यांच्यावर आधारित 'अर्थ' काढला. ती गेल्यावर २००६ ला 'वो लम्हे' काढला, मुलीला घेऊन तिच्यावर 'फिर तेरी कहानी याद आयी' काढला पण हे सगळं त्यानी सांगितलेलं किंवा त्याची बाजू, कितपत खरी त्यालाच माहित, तसाही तो विश्वासार्ह माणूस नाहीये म्हणा. अमिताभ मला मारायचा प्रयत्नं करतोय असे आरोप तिने  वेडेपणात केले त्यामुळे फार गाजावाजा झाला नाही. रूतलेलं कधी वर तरंगेल सांगता येत नाही. 'टाईम'च्या मुखपृष्ठावर झळकलेली ती पहिली बॉलीवूड अभिनेत्री होती. ७३ ला क्रिकेटियर सलीम दुराणी बरोबरचा 'चरित्रं' फ्लॉप गेला पण परवीनची नोंद झाली आणि मग ७४ ला तिचा पहिला सुपरहिट आला 'मजबूर'. नंतर तिचे बच्चनबरोबरचे 'अमर अकबर', 'कालिया', 'शान', 'खुद्दार', 'दिवार', 'महान', 'देशप्रेमी', 'दो और दो पांच', 'सुहाग', 'नमकहलाल', 'काला पत्थर' (शेवटचे चार शशीची हिरोईन) सगळे चित्रपट हिट किंवा सुपरहिट झाले. 

'खुद्दार'मधल्या 'मच गया शोर'मधे नथ घालून नाक मुरडणारी, नऊवारी घातलेली परवीन काय अप्रतिम देखणी दिसलीये, 'दिवार' मधली अनिता. त्यात तिनी अभिनय केला होता खरंच. मूल होणार, लग्नं होणार म्हणून आनंदलेली अनिता तिनी छान दाखवली होती. यश चोप्रा डायरेक्टर म्हणून चांगला असेल पण तो पार्शल होता. श्रीदेवीसाठी 'चांदनी' मधला जुहीचा रोल कापला (त्या बदल्यात तिला 'डर' दिला), 'डर'मधे त्यानी शाहरुखसाठी सनीचा रोल कापला. 'सिलसिला'चं ओरिजिनल कास्टींग परवीन आणि स्मिता पाटील असं होतं. मग ते सगळं बारगळलं, कुणी सांगावं स्मिताच्या प्रेझेंसनी वेगळी परवीन दिसलीही असती कदाचित. फार अभिनयक्षमता नसताना तिला यश मात्रं अफाट मिळालं. सगळं भरघोस मिळाल्यावर काय करायचं आता नेमकं हे उमजलं नाही की नैराश्य येत असावं. विनोदखन्ना असाच बायको, मुलं सोडून रजनीशकडे गेला (गेला नसता तर बच्चनला टफ होता तो) तशी परवीन ८३ ला शांतीच्या शोधात देशोदेशी फिरायला लागली. 

८९ ला ती भारतात आली ते फक्तं तिचं नाव घेऊन, हवा भरलेल्या फुग्यासारखी ती जाड झाली होती. तिला पॅरानॉईड स्किझोफ्रेनिया झालाय असं लोकांचं म्हणणं होतं आणि तसं काही नाहीये असं तिचं. त्यामुळे तिनी नातेवाईकांसकट सगळ्यांशी संबंध कमी केले आणि ती अजूनच एकटी पडली. बिल क्लिंटन, रॉबर्ट रेडफोर्ड, प्रिन्स चार्ल्स, मोसाद, केजीबी, सीआयए, सीबीआय, काही गव्हर्नमेन्टस मला मारायला टपलीयेत. अमिताभ इंटरनॅशनल गँगस्टर आहे, त्याच्या गुंडानी मला एका बेटावर नेऊन माझ्या कानाच्या जवळ सर्जरी करून एक चीप घातलीये असे आरोप तिनी केल्यावर ती शहाणी राहिली नव्हती हे नक्कीच होतं, ते कळायला डॉक्टर कशाला हवा होता. बच्चनचे सिनेमे केबलवर दिसले तरी ती व्हायोलंट व्हायची म्हणे. मुस्लिम परवीन नंतर ख्रिश्चन झाली पण धर्म बदलला म्हणून मन:शांती मिळत नाही. निदान चार पैसे राखून असल्यामुळे ती रस्त्यावर आली नाही एवढं मात्रं झालं.   

दैव माणसाला कुठल्या मार्गानी नेईल सांगता येत नाही. मधुमेहामुळे तिच्या डाव्या पायाला गँगरीन झालं होतं, त्यामुळे ती व्हीलचेअर वापरायची. तीन दिवस दरवाज्याबाहेरचं दूध, पेपर उचललं न गेल्यामुळे कुणीतरी पोलीस बोलावले आणि त्यांना तीन दिवसापूर्वी मेलेली, पायाला बँडेज असलेली, वस्तू अस्ताव्यस्त पडलेली, पोटात अन्नाचा कण नसलेली श्रीमंत परवीन सापडली. ती मेल्यावर संपत्तीवर हक्क सांगायला मरताना एकटी असलेल्या परवीनच्या नातेवाईकांची झुंबड उडाली. तिच्या मृत्युपत्राप्रमाणे सत्तर टक्के संपत्ती गरीब 'बाबी' लोकांच्या मदतीसाठी ट्रस्टला, वीस टक्के तिचा मित्रं मुरादखान बाबीला आणि उरलेले दहा टक्के ख्रिश्चन मिशनरीला दान गेले. सगळं वाटून ती २३ जानेवारी २००५ ला तिच्या आईच्या शेजारी मातीत विसावली. पुढे पाच वर्षांनी जागा संपल्यावर नविन येणा-यांसाठी जागा करायला सांताक्रूझची दफनभूमी खोदली गेली त्यात ती, मधुबाला, रफी, तलत, साहिर आणि नौशादचे अवशेष दुसरीकडे हलवले गेले. 

एरवी कधी भेटले नसतील सगळे एकत्रं पण निदान या कारणानी एकमेकांत मिसळले असतील. दोन सौंदर्यवती, दोन गायक, एक शायर आणि एक संगीतकार. मातीत गेलं एकदा की काही नाही यातलं, गरीब श्रीमंत, सुंदर, कुरूप सगळेच सारखे. परवीन काय आपण काय, मातीत जायच्या आत नाव राहील असं चांगलं काहीतरी करून जाता यायला हवं एवढं खरं. 

जयंत विद्वांस  

तिची आणि त्याची गोष्टं...

चोवीस वर्षांपूर्वी मुली, काय मुलं काय एवढी डेरिंगबाज नव्हती. ती अपघाताने दोन दिवस त्याच्या घरी आली त्याच्या बहिणीबरोबर. तो चोवीस, ती सतरा. दोन वेण्या, काळभोर डोळे, नावाप्रमाणे हसमुख चेहरा. प्रपोझ वगैरे करायची गरजच पडली नाही. काय झालंय ते दोन्हीकडे समजलं होतं मग उगाच शब्दं कशाला खर्चायचे. तिनी एकटक बघावं आणि या बावळटानी चुकून तिच्याकडे बघितलं तर तिनी पटकन लाजून दुसरीकडे बघावं इतकं सगळं अलवार आणि नवखं. बाकी पब्लिकला कळलं होतं पण दोघांनाही ते टॉप सिक्रेट वाटत होतं. एकदम 'पुष्पक' सिनेमा, सायलंट मुव्ही. तो तिला स्टेशनला सोडायला गेला जाताना. एरवी अखंड बडबड करणारा तो एकही शब्दं बोलला नाही आणि ती पण मागे टीचभर गाडीवर वितभर अंतरात अर्ध्या फुटाचं अंतर कसोशीने पाळत गप्पं बसलेली. 

साधनं जेवढी मदत करतात तेवढीच गंमत पण घालवतात. आता मोबाईल आले. लोकं सतत बोलतात एकमेकांशी, पटकन जवळ येतात तेवढ्याच वेगानी लांब जातात. तेंव्हा दोघांच्या घरी लँडलाईनपण नव्हता. कित्त्येक महिन्यात बोलणं शक्यं व्हायचं नाही. पत्रं हाच उपाय, ते पण कुणाच्या तरी पत्त्यावर पाठवायचं. ते वहीत ठेवून किंवा कुणाच्या घरी बसून वाचायचं. तो वीसेक पानं लिहायचा, ती दोन तीन. दोनेक  महिन्यातून कधी तरी ते भेटायचे. दोस्ताच्या घरी किंवा कुठे सेटिंग लावून. मधे दोन हात अंतर ठेवून बसायची ती. साहजिकच होतं ते, बंद घरात काहीही होऊ शकलं असतं, म्हणून. ती एकटक सगळं ऐकायची. एकदा ती म्हणाली, 'तुझे डोळे खूप छान आहेत'. तो म्हणाला. 'आत्तापर्यंत कुणी सांगितलंच नाही मला असं'. 'म्हणून तर सांगितलं, तू एक गोड बावळट आहेस'. 'तू तरी कुठे मोठी शहाणी आहेस?' 'तुला हो म्हटलं तिथे झालंच की सिद्ध मी मूर्ख आहे ते'. निघताना तिचा चेहरा निर्माल्यं व्हायचा, त्यालाही परत येताना जीवावर यायचं. 

मग एक दिवशी तिनी आईला गुपित सांगितलं. तिनी वेळकाळ बघून नव-याला सांगितलं. मग शहाण्या बापासारखा तो त्याच्या घरी गेला. 'लग्नं इथे का आमच्या इथे? अपेक्षा काय आहेत?' वगैरे विचारपूस झाली. ती एकुलती एक आणि एक लहान भाऊ. तिच्या आईला तो आवडला होता पण नवरा आग्यावेताळ. ''घरी बोलून फोन करतो', म्हणाले. घरी गेल्यावर त्यानी दोन महिन्यांनी सांगितलं, 'नको, त्याचा पार्टनरशिपमधे धंदा आहे, नोकरी असती तर हो म्हटलं असतं'. ती फुरंगटली. कसं सांगायचं हे तिला कोडं. तिनी धीर करून त्याला सांगितलं. मग तो म्हणाला, 'अशीच येशील? लग्नं करू, मी सांगितलंय घरी'. ती म्हणाली, 'बाबांना दोनवेळा अँटॅक येऊन  गेलाय, मी तसं केलं आणि काही बरं वाईट झालं तर आयुष्यभर खात राहील, मागे लहान भाऊ आहे म्हणून नको'. मग परत ते भेटले एकदा. 'थांबशील माझ्यासाठी?' 'थांबेन, पण अजून काही वर्षांनी तुझं हेच कारण असेल तर कसं करायचं?' तिच्याकडे उत्तर नव्हतं. फक्तं प्रश्नं उरले मग दोघंही गप्पं झाले. ती रडत म्हणाली, 'तुझी पत्रं ठेवणं शक्यं नव्हतं खरंच मला, म्हणून नाईलाजाने फाडून टाकली सगळी'. तिनी आधी सांगितल्यामुळे तिची पत्रं त्यानी बरोबर नेली होती, ती तिला परत दिली. पत्राच्या शेवटी असायचे ते 'तुझी, तुझी आणि फक्तं तुझीच' हे अर्थ संपलेले शब्दं तिचे तिनी परत घेतले. 

मग दोघंही अनोळखी झाले. सातेक महिन्यांनी तिनी एकदा झोपेच्या गोळ्या घेतल्याचं कळलं त्याला. मग तो तिला भेटून आला पण घटना घडून महिने लोटल्यामुळे तेवढा असर शिल्लक नव्हता. 'का केलंस असं? आणि कळवता पण नाही आलं साधं?' 'काय कळवणार होते नाहीतरी? वाचले हे? आठ दिवस होते दवाखान्यात, परत नाही करणार असं काही'. एकेकाच्या पश्चातापाच्या कल्पना असतात. आपण याला नाही म्हटलंय या गंडापोटी अर्धा फूट लांब बसणा-या तिची समर्पणाची तयारी होती. तो मोठा होता वयानी, ती अजाण होती. त्यामुळे घडलं काहीच नाही. सगळं बोलून झाल्यावर निघताना तिचा चेहरा खट्टू झाला, त्यालाही कदाचित हे शेवटचं भेटणं या विचारानी परत येताना जीवावर आलं. निरोप पटकन संपवावा. मागे वळून बघितलंत की काँक्रीट स्लॅबपण ढासळतो. तिचं मग वीस वर्षांपूर्वी लग्नं झालं, त्याचं नोकरी लागल्यावर सतरा वर्षांपूर्वी. एकोणीस वर्षांपूर्वी ती दिवाळीत त्याला रस्त्यात भेटली. 'कसा आहेस?' 'मस्तं, तू कशी आहेस?' 'ठीक, लग्नं केलंस?' 'नाही अजून पण करणार तर आहेच :) ', 'किती अचानक भेटलास'. 'बाकी बरी आहेस ना?' 'हो'. 'चल निघू? आईकडे चाललीये'. 'बाय'. अजून एक वर्षानी 'बीस साल पहले की बात है' म्हणता येईल. 'त्या'ची बायको गंमतीने म्हणते, 'ती' सुखी झाली, सुटली आणि मी अडकले. तो फक्तं हसतो. तिनी सुखीच असावं अशी त्याची कायमच इच्छा आहे. 

चोवीस वर्ष झाली. आता त्याला कुणी म्हटलं 'तुमचे डोळे खूप छान आहेत' तर तो म्हणतो 'थँक्स' आणि मनात म्हणतो, 'तिनी चोवीस वर्षांपूर्वीच सांगितलं होतं हे मला पण कुणी म्हटलं की बरं वाटतं, त्या निमित्ताने का होईना ती आठवते'. तिची आणि त्याची गोष्टं अशीच आहे, अर्धी राहिलेली. जग खूप छोटं आहे, त्याला वाटतं, कधी तरी ती त्याला भेटेल रस्त्यात. तेंव्हा कदाचित त्याला चष्मा असेल, तो मुद्दाम काढेल आणि ती हसून म्हणेल, 'अजूनही तुझे डोळे खूप छान आहेत बर का '.  

तिची आणि त्याची गोष्टं... 

जयंत विद्वांस 

सत्तर एमएम चे आप्तं (१५)…. राखी मजुमदार…

काल राखी एकोणसत्तर वर्षाची झाली. भारताच्या स्वातंत्र्याला जितकी वर्ष पूर्ण होतील तितकीच वर्ष राखीलाही होत रहातील कारण ती १५ ऑगस्ट १९४७ ला बंगाल मधे जन्माला आली. तिच्या वडिलांचा बुटाचा धंदा होता तो सोडून त्यांना बांगलादेश मधून बंगालला यावं लागलं. ती ही हेलनसारखीच विस्थापित होती. सोळाव्या वर्षी तिचं लग्नं पत्रकार अजय विश्वासशी झालं जेंव्हा तिला लग्नाचा अर्थही माहित नव्हता आणि अठराव्या वर्षी ते मोडलं. तिचं दुसरं लग्नं मात्रं ब्रेकिंग न्यूज होती. संपूर्णसिंह कालरा उर्फ गुलझारशी तिचं लग्नं झालं. स्वप्नं कितीही सुंदर असलं तरी फार काळ टिकत नाही तसं काहीसं झालं. मीनाकुमारीमध्ये अडकलेल्या गुलझार आणि एक वर्षाच्या मेघनाला मागे सोडून ती एक दिवस घर सोडून गेली. 'माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी लघुकथा' असं म्हणायचा गुलझार तिच्या बाबतीत. ती निघून गेल्यावर तो म्हणाला होता, 'शहर की बिजली गई, बंद कमरेमें बहोत देर तक कुछभी दिखाई न दिया, तुम गई थी जिस दिन, उस रोज ऐसाही हुआ था'. बडे लोग, बडी बाते. 

शशी कपूर (१०) आणि अमिताभ (८) बरोबर तिनी जास्ती काम केलं. 'त्रिशूल', 'काला पत्थर', 'मुकद्दरका सिकंदर', 'कभी कभी', 'कस्मे वादे' ('शान' मधे वहिनी होती आणि 'लावारीस' धरला नाही कारण पडद्यावर समोरासमोर नाहीत पण ती त्याची आई होती त्यात) हिट झाले पण 'बेमिसाल', 'जुर्माना', 'बरसात की एक रात' फ्लॉप झाले. राखीचं एक कौतुक मला कायम वाटत आलंय. सिनेमा हिट असो फ्लॉप असो, तिच्या करिअरवर काही फार परिणाम झाला नाही त्याचा. 'जीवनमृत्यू', 'शर्मिली', 'ब्लॅकमेल' 'लाल पत्थर' मधली राखी अवखळ, लोभस, गोंडस होती नंतर ती फार मॅच्युअर्ड वाटायला लागली पडद्यावर. ग्रेसफुल होतीच ती. अतिशय गंभीर चेह-याची खरतर ती, आब राखून असलेली, गप्पं असणारी माणसं एक वचक निर्माण करतात. कधीही स्फोट होईल या भितीनी लोक चार हात लांब असतात. राखी तशी होती. ती एकूण १६ वेळा नॉमिनेट झाली फिल्मफेअरसाठी (बेस्ट ८, सपोर्टींग ८) आणि माधुरी (६/१४) पण म्हणून तिची काही माधुरीसारखी क्रेझ नव्हती. 

राखीचे पटकन दहा भन्नाट रोल, अजरामर डायलॉग, गाणी सांगा म्हटलं तर अवघड आहे पण मला राखी आवडायची. तिचे काही रोल्स माझ्या लक्षात आहेत. 'दुसरा आदमी', 'परोमा' 'तृष्णा', 'श्रद्धांजली' मी पाहिलेले नाहीत त्यामुळे त्यावर उगाच पिंक टाकणार नाही. अशोककुमार जेवढ्या सहजतेने नायकाचा चरित्रं अभिनेता झाला तेवढ्याच सहजपणे राखी आई झाली. निरुपा रॉय, रत्नमाला, रिमा यांचं कौतुक झालं तेवढं राखीचं नाही झालं. विधवा, अन्याय झालेली आणि मुलं मोठी झाल्यावर सूड घेतात अशा भूमिका तिच्या वाट्याला जास्ती आल्या. 'करण अर्जुन', 'खलनायक'. 'रामलखन', 'सोल्जर', 'बाजीगर' यात ती तशी होती. 'बाजीगर' मध्ये ती वेडी होती त्यामुळे सूड घेतल्याचा आनंद तिला मिळत नाही एवढाच फरक. मद्यसेवनानी बोजड झालेल्या जिभेनी 'मेरे करण अर्जुन आयेंगे' म्हणते तेंव्हा मला थोडं वाईट वाटतं. घा-या डोळ्यांची, गोब-या गालांची, रॉयल लूक असलेली राखी 'गीत गाता हू मैं 'गाण्यात 'लाल पत्थर'मध्ये हेमा मालिनीपेक्षा सरस दिसते. 

'गदर-एक प्रेमकथा' काढणारा पण एक्याऐंशी साली पैसे नसलेला तेवीस वर्षाचा डायरेक्टर अनिल शर्मा तिच्याकडे गेला होता 'श्रद्धांजली' साठी. राखीने केला तो सिनेमा तरीही आणि तो हिट ही झाला. राखीचे काही अभिनयकण माझ्या लक्षात आहेत. 'शक्ती' मध्ये बापलेकात घुसमटलेली आई तिनी काय मस्तं उभी केलीये. 'बसेरा' मध्ये शशीकपूरच्या संसारात रमलेली रेखा बघून ती वेडी असल्याचं नाटक करून परत दवाखान्यात जायला निघते तेंव्हा ते नाटक ओळखलेल्या पूनम धिल्लनकडे ती जे बघते, बास, फिल्मफेअर किती मिळाले वगैरे काही संबंध नाही अशी बघते ती. तिचे तीन तळतळाट माझ्या लक्षात आहेत. असं वाटतं की वास्तवात ती जर कुणाला असं म्हणाली तर लागतील तिचे शाप. एक 'करन अर्जुन' मधला, एक 'रामलखन' मधला आणि एक 'बाजीगर' मधे दलीप ताहिलला ती बोलते तो. तिचा स्वभाव जसा शांत आहे तशा भूमिकेत ती त्यामुळे अजून जमून जाते. 'त्रिशूल' आणि 'काला पत्थर' मध्ये ती कुठेही कमी पडलेली नाही अमिताभसमोर. 

पण मला तिचा सगळ्यात आवडलेला चित्रपट 'साहेब'. मी तो खूपवेळा बघितलाय. ती बडी बहू आणि सासरा उत्पलदत्त. प्रेमळ, घर सावरून घेणारी, मानानी मोठी आणि मनानेही मोठी असलेली, धाकटा दिर अनिलकपूरवर पुत्रवत प्रेम करणारी तिची भाभी बघाच. माणूस बोलतो समोरच्याला एक राग आल्यावर तावातावाने, चिडून आणि एक सात्विक संतापानेही बोलतो. राखीच्या त्या सात्विक रागाच्या उद्रेकी संवादाला मला हमखास रडू येतं. दवाखान्यात ती बघायला जाते त्याला, तेंव्हा काचेतून बघणारी राखी. संपूर्ण चित्रपटात कदाचित लेखक सचिन भौमिकनी लिहिलेल्यापेक्षा काकंणभर सरस बडी बहू तिनी पडद्यावर दाखवलीय. मतलबी दीरजावेकडे ती फक्तं बघते त्यात, उत्पलदत्तला सासरा म्हणून तिनी दिलेला रिस्पेक्ट बघाच एकदा. असल्या परफॉर्मन्सना बक्षिस नसेल मिळत पण मला आवडला तो. तसं तर काय 'शोले'ला पण एकंच फिल्मफेअर होतं म्हणून तो काय पाहिला नाही का कुणी?  

राजेश खन्ना हा अमिताभपेक्षा व्हर्सेटाइल अभिनेता होता असं तिचं मत आहे. काही काही गोष्टी मोठ्या गंमतीशीर असतात, पटकन लक्षात येत नाहीत. राखीच्या नशिबात तीन गोष्टी कधीच पडद्यावर नव्हत्या - कॉमिक रोल, गुलझारच्या दिग्दर्शनाखाली काम आणि नृत्यं. तिच्यावर एकही डान्स नाही. ती आली तेंव्हापासून ते आत्तापर्यंत गोबरे गाल आणि तब्येत राखून आहे. एकतर ती स्वतः किंवा इतरांविषयी खूप कमी बोललीये. मीनाकुमारीच्या 'मै चूप रहूंगी'सारखी ती गप्पं आहे. आधी ती अमिताभच्या शेजारी रहायची. त्याच्या लग्नात 'भादुरी आणि मंडळी' तिच्याच घरी उतरली होती. नंतर तिनी पुलंचा 'मुक्तांगण' बंगला विकत घेतला. २०१५ नंतर ती आता पनवेलच्या फार्महाउसवर राहतीये. आता थकलीये, फारशी दिसतही नाही कुठे. 

काय करत असेल फार्महाऊसवर एकटी? असले दळिद्री प्रश्नं मला पडतात आणि विषण्ण व्हायला होतं. सूर्यास्त तरुणपणात कॅमेरात टिपायची मोठी हौस असते पण आता फक्तं सनसेट अशी वेळ आली की काय टिपणार? अवघड आहे सगळं. 'पल पल दिलके पास' ऐकतो आता , नको ते अभद्र विचार उगाच. 

जयंत विद्वांस

जेम्स हॅडली चेस...

मृत व्हायच्या आत काही मृत व्यक्तींना भेटायचा अशक्यंयोग जर शक्यं झाला तर माझ्या लिस्टीत चेस वरती असेल. रेनेलॉज ब्राबझान रेमंड हे त्याचं खरं नाव आणि जेम्स हॅडली चेस, जेम्स डॉचर्टी, आर. रेमंड, रेमंड मार्शल आणि अँब्रोस ग्रांट ही टोपणनावं. १९०६ ते १९८५ तो भौतिक आयुष्यं जगला आणि त्याच्या थ्रिलर्समधून आता तो जिवंत आहे. नव्वद पुस्तकं लिहिली त्यानी, त्यातल्या पन्नासवर चित्रपट निघाले. न सांगता काढलेले वेगळे (आर या पार - द सकर पंच). नुकताच येऊन गेलेला 'जॉनी गद्दार' त्याच्या स्टोरीवर नाही पण धाटणी तीच. डायरेक्टर श्रीराम राघवननी विजय आनंद आणि चेसला अर्पित केलीये ती फिल्म. नील मुकेशच्या हातात चेसचं पुस्तक आणि हॉटेलमध्ये टीव्हीवर 'जॉनी मेरा नाम' चालू असतो अशी श्रद्धांजली त्यानी वाहिलीये त्यात. 

तो एवढी वेगवेगळी पात्रं जिवंत कशी उभी करू शकला याचं मला कोडं पडायचं. अठराव्या वर्षी घरातून तो निघून गेला. तो पुस्तकं विकायचा, तो उत्तम फोटोग्राफर होता (Cade - वाचा त्याची त्यासाठी), तो वाचायचा खूप, क्लासिकल संगीत ऐकायचा, मेकॅनो खेळायचा. नकाशांच्या सहाय्याने त्यानी अमेरिकन गँग्ज वरती 'नो ऑरकिड्स फॉर मिस ब्लाँडीश' लिहिली आणि मग तो सुटलाच तिथून. त्याच्यावर मग नाटक आणि मग सिनेमाही निघाला. आयुष्यात फक्तं दोनदा अमेरिकेला धावत्या भेटी देणा-या या माणसाने नकाशे आणि माहितीवर आधारीत अमेरिकेचं अंडरवर्ल्ड खरं वाटेल असं उभं केलं. त्याच्या पुस्तकांना दंड झाले, केसेस झाल्या. मग त्यानी टोपणनावं घेतली. प्रसिद्ध होण्यासाठी अशा गोष्टी खूप मदत करतात. 

८३-८४ च्या आसपास भानू शिरधनकर अनुवादित 'गिधाडांची जातच चिवट' (Vulture is a patient Bird) आणि 'कुणीतरी आहे तिथे' (Knock, Knock! Who's There?) वाचलं होतं. नंतर स्टोरी लक्षात अजिबात नव्हती पण चेस वाचावा असं याच पुस्तकामुळे डोक्यात फिट्ट बसलं होतं. 'शेवटपर्यंत चेस खिळवून ठेवतो' या वाक्यात नाविन्यं काहीही नाही. चेस कडून काय शिकलो असेन तर माणूस डोळ्यासमोर उभा करणे आणि सगळं समोर घडतंय असं वाटायला लावणे. मानवी स्वभावांचे नमुने पेश करण्यात चेसचा हातखंडा आहे. अति तिथे माती, हव्यास वाईट असतो, जे मिळालंय त्यात समाधान मानावं, हातचं सोडून पळत्या पाठी जाऊ नये या सगळ्या उपदेशांचा अर्थ चेसची पुस्तकं वाचली की कळतो. माणसांचे विविध नमुने तो पेश करतो. एकाच माणसात वाईटाबरोबरच कुठेतरी तीट लावावी एवढा चांगुलपणा असतोच हे तो सांगतो. सस्पेन्स आणि थ्रिलर्स यात फरक आहे. उगाच ओळखा पाहू खुनी कोण असला त्रास चेस देत नाही. 

त्यामुळे अंदाज चुकला म्हणून वाचक खट्टू वगैरे होत नाही. अतिशय बांधेसूद वाटणारे प्लॅन्स कसे मातीत जातात हे चेस दाखवतो. मग कधी माणसं चुकतात, कधी अशक्यं घटना घडतात, कधी कुणीतरी हिशोबात न धरलेलं अचानक टपकतं आणि हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातो. सहसा त्यातल्या बायका टंच, घातक, लोभी, कृतघ्न, दगाबाज असतात आणि क्वचित चांगल्याही असतात पण त्यांचंही वाईट होतं (A Lotus for Miss Quon). But a short time to Live वाचताना तर प्राक्तनात असेल तर कुसंगतीनी चांगल्या माणसाच्या नशिबी कसे भोग येतात ते वाचून विषण्णता येते. खानोलकरांना कुणीतरी विचारलं, 'अरे त्या ह्याला पांगळा का केलास कथेत?' ते म्हणाले, 'मी केला नाही, तो झाला'. लेखकाच्या हातात काही नसतं. त्याची पात्रं आपापलं नशीब आणि भोग घेऊनच येतात तर. चेसच्या पुस्तकातून अशी अनेक माणसं आढळतील जी हतबल आहेत, मनाविरुद्ध विनाशाकडे वाटचाल करतायेत.

चांगलं पुस्तक कुठलं? डोळ्यांवर झापड येत असतानाही जे बाजूला ठेवावंसं वाटत नाही ते. अर्थात हे अवलंबून आहे. दासबोध, ज्ञानेश्वरी मी वाचायला घेतली तर मला झोप येईल कारण माझी आवड ती नाही, बौद्धिक कुवतही नाही तेवढी. थ्रिलर्स मात्रं मला मोह घालतात याला कारणीभूत चेस. पाठलाग, कुणीतरी पुढे पळतंय आणि कुणीतरी मागावर आहे, पुढच्याची सुटण्याची धडपड आणि मागच्याची त्याला पकडण्याची धावपळ हा उंदीरमांजराचा खेळ 'पैचान कोन'पेक्षा मला जास्ती आवडतो. इथे कानशिलं गरम करणं वगैरे प्रकार नाही तो शेल्डन आणि रॉबिन्सकडे. इथे जरासा कुठे उल्लेख येतो पण तो डिटेल्ड का नाहीये असं वाटतंच नाही इतके तुम्ही त्या Chase मध्ये इन्व्हॉल्व्ह्ड असता. अशक्यं योगायोगही आहेत त्याच्या कथेत पण ते फार मनावर घेण्यासारखं नाही. मार्क गरलँड, स्टिव्ह हर्मास, इन्स्पेक्टर लेपस्की, बिगलर, फ्रॅंक टेरेल, डॉन मिक्लेम अशी पात्रं वारंवार वेगवेगळ्या पुस्तकातून भेटतात. 

मला चेस आवडला म्हणजे दुस-याला आवडेल असं नाही पण एकदा वाचून बघा, सगळं लक्षात असलं तरी परत परत वाचाल. अतिशय सोप्प्या इंग्रजीत लिहिलंय (मला कळलं म्हटल्यावर हे खरंतर वेगळं सांगायला नकोय). त्याच्या पुस्तकाला फेरारीचा वेग आहे. मी सूक्ष्मरूपाने इंग्लंड, तिथली खेडी, अमेरिका बघून आलोय त्यातून. ती सगळी पात्रं मी माझ्या बाजूला अनुभवली आहेत. त्याचे पुस्तकातून असलेले तोंडाला पाणी आणणारे मेन्यू आणि अमुक इयर्स ओल्ड वाईन, बर्बन, स्कॉच त्या ठिकाणी जाऊन अनुभवाव्यात अशी दुर्दम्य इच्छा आहे. माझी वीसेक वाचायची राहिलीयेत अजून त्याची, एकदा डेक्कनला यादी घेऊन जाईन आता. पुण्यात असाल तर डेक्कनला मिळतील नाहीतर वासन पब्लिकेशन्स, चेन्नई, एअर मेलनी घरपोच पाठवतात. पीडीएफपण मिळतील नेटवर पण पुस्तक हातात धरून लोळत वाचण्यात जी मजा आहे ती त्यात किंवा किंडलला नाही. 

कोल्हापूरहून निघालेले लेटेस्ट अनुवाद त्यानी पाहिले असते तर रंकाळ्यात उडी घेतली असती इतके भिकार आहेत. मला कुणी दत्तक घेतलं आणि उदरनिर्वाहाची ददात मिटली तर मी चेस मराठीत आणेन कारण मुळामुठेत जीव दिला त्यानी तरी जीव जाईल एवढं पाणी नसतं, दगड लागून काय खरचटेल तेवढंच, त्याला वर काढता येईल. कादंबरीची झेप अजून माझ्या आवाक्याबाहेर आहे, शॉर्ट स्टोरीज आत्ता कुठे जमू लागल्यात असा भ्रम आहे पण कधी लिहिलंच मोठं काहीतरी तर चेससारखं थ्रिलरच लिहीन आणि त्यालाच अर्पण करेन. त्याचा इंग्रजी अनुवाद कुणाला करायचा असेल तर आत्ताच सांगून ठेवा. ;) :)  

जयंत विद्वांस 

गुडबाय एफबी...

मित्रं आणि मैत्रिणींनो, इथून आपली रजा घेतोय. कंटाळा आला किंवा तोचतोच पणा जाणवायला लागला म्हणून असेल पण अकाउंट बंद करतोय. परत कधी येईन की न येईन माहित नाही. असाच लोभ असू द्या, कधी काही चुकीचं वागलो असेन तर मोठ्या मनानी माफ कराल. माझ्या पोस्ट्सवर तुम्ही सगळ्यांनी अतोनात प्रेम केलंत, त्यामुळेच थोडंफार, बरंवाईट लिहीत राहिलो. तुम्ही मला मिस कराल त्यापेक्षा जास्ती मी तुम्हांला मिस करेन. जाण्यापूर्वी थोडं मनातलं सांगेन म्हणतोय. 

पाचेक वर्ष झाली इथे येऊन. ० ते ३८६० फ्रेंड्स(?) लिस्टीत आले, त्यातल्या सत्तरेक लोकांना फार तर भेटलो असेन, त्यांच्याशी बोललो असेन. बाकी माणूसघाणेपणा कंटिन्यू ठेवला. वाईट अनुभव कमी आले, विनोदी जास्ती आले. कुणाच्या इनबॉक्सात लाळ सांडली नाही, भिकार फोटोवर गॉर्जस, अप्रतिम असं खोटं बोललो नाही. उगाच वाद घातले नाहीत, अर्धवट माहितीवर राजकीय पोस्ट्स टाकल्या नाहीत, ज्यातलं आपल्याला समजत नाही त्यावर पोस्टायची व्याधी लावून घेतली नाही. सुविचार, शेरोशायरी, व्हिडीओजच्या लिंका पेस्टायला नेट खर्च केलं नाही, फार कुणाच्या पोस्टीवर कॉमेंटलो नाही, कुणाच्या वाढदिवसाच्या नोटिफिकेशनवर पहिली शुभेच्छा देण्यासाठी धापा टाकत गेलो नाही, स्वतःची तारीख दिली नाही त्यामुळे मी केलेलं तुला विश पण तू विसरलास हा आरोप झाला नाही. त्यामुळे शिष्ठ, स्वतः:ला समजतो कोण वगैरे अप्रसिद्धी फुकट मिळाली. 

आपल्याला कशावर लिहिता आलं ते अजमावता आलं. लाईक्स, कॉमेंट्सच्या संख्येने हुरळून जायला झालं, खट्टूही झालो पण ती पण एक फेज असते, ती अनुभवली. तर निरोप फार लांबवायचा नसतो, मजा जाते. थोडक्यात मजा, सो, गुडबाय फ्रेंड्स. 

जयंत विद्वांस  

-----

कुणाला वैयक्तिक वाटू नये म्हणून स्वतःवरच पोस्ट लिहावी म्हटलं. नवनीत गाईडनुसार अपेक्षित कॉमेंट्स खालीलप्रमाणे... 

काsssss?......., काय झालं?, बोललं का काही कुणी?, ;( 
नको जाऊस रे, पाहिजे तर गॅप घे पण परत ये, 
मिस यू, का असं?, 
......! 
जयंतराव, हे वागणं बरं नव्हं
 
न टाकलेल्या कॉमेंट्स.... 

गेला का? बरं झालं, नाहीतरी शिष्ठच होता. 
हा एकटाच लेखक, कद्धी म्हणून माझ्या चारोळी, कवितेला लाईक नाही करायचा नाहीतरी, घाण गेली. 
स्वतः:च्या पोस्टीवरच्या लाईक, कॉमेंट बघायला यायचा नाहीतरी फक्तं, करायचीयेत काय असली इथे, खोगीरभरती नुसती
कुठे राहवणार आहे, नाटकं उगाच, येईल परत 
अटेंशन सिकींग सिंड्रोम, दुसरं काय. 
हल्ली पोस्टीला कुणी विचारत नाही बहुतेक म्हणून घाऊक सहानुभूती गोळा करणं चाललेलं दिसतंय. 

..... 

यावर माझा मित्रं मन्या मराठे म्हणाला ते मला पटलं.... 

'माकडा, तू असलास काय किंवा नसलास काय, काही फरक पडणार नाही. फार्फार तर लोक चार दिवस मिस करतील. कुणासह जगता येतं तसच कुणाशिवाय जगण्याची सवय लवकर होते कारण आता ते माणूस नाही हे पक्कं माहित असतं. भा.रा.म्हणून गेलेत, 'जन पळभर म्हणतील हाय हाय', गोखले म्हणाले, 'रे तुझ्यावाचून येथले काही अडणार नाही'. तुझा प्रॉब्लेम काय आहे नेमका? एफबी काय, आयुष्यं काय, मी जातोय, मी जातोय असं बोंबलून सांगण्यात हशील नाही. कुणी तरी थांब म्हणावं, रडण्यासाठी खांदे गोळा करायला ठीक आहे पण त्यानी फार तर चार दिवस बरं वाटेल, इगो सुखावेल, कॉमेंट्स, लाईक्सच्या संख्येने कृतकृत्यं वाटेल पण निष्पन्नं काय? वपु म्हणाले होते, 'नाविन्यासारखी चटकन शिळी होणारी दुसरी गोष्टं नाही'. माणसाचा आफ्रिदी होता कामा नये. असंख्य पुनरागमनं हा चेष्टेचा विषय होतो. पुनरागमन कसं हवं? सगळी टीम पॅकरकडे गेल्यावर दहा वर्षाच्या गॅपनंतर एक्केचाळिसाव्या वर्षी परत ऑस्ट्रेलियाचा कप्तान झालेल्या बॉबी सिंप्सनसारखं. 

मुरली खैरनारसारखा माणूस इथून अचानक एक्झिट घेतो. ते काही आपल्या हातात नाही पण तरीही चुटपुट लागतेच की. अशी चुटपुट लागेल कुणाला असं कर काहीतरी करून जा इथे. पराकोटीचं दु:खं अबोल असतं. शब्दात व्यक्तं होत नाही ते. जग काय, एफबी काय इथे कुणीही तुम्हांला आमंत्रण दिलेलं नाही. तुम्ही आलात या, रमलात तर रमा, काही चांगल लिहिता आलं तर लिहा, चार लोकांना आनंद द्या. एक्झिट आहेच ठरलेली त्याचा गवगवा कशाला? 

..... 

तात्पर्य : मी गेलो काय, राहिलो काय, कुणाला फरक पडावा ही अपेक्षा नाही. इथे येताना संगम ब्रास बँड लावून वाजतगाजत आलो नाही मग जाताना उगाच फ्लेक्स लावायचा खर्च कशाला तो. (कितीजण अनफ्रेंड करतील तो आकडा कळवळा जाईल). ;) ;P 

जयंत विद्वांस 


  

Monday 8 August 2016

चमक...

त्याचं खरं नाव श्रीनिवास दत्तात्रय मोघे पण आमचं गावं त्याला मयत्या बामण किंवा मयत्या भट म्हणतं. एवढं सुंदर नाव पण गावानी पार त्याची रया घालवली. दहावा, तेरावा, श्राध्द एकदा त्याच्या मागे लागलं ते लागलंच. शेजारच्या एखाद्या गावात नाईलाज म्हणून, अगदीच कुणी मिळत नाही म्हणून, क्वचित त्याला सत्यनारायण वगैरे मिळायचा. बाकी पैसा मिळवून देणारी वास्तुशांत, लघूरूद्र, शांती, बारशी, लग्नं ही भिक्षुकी त्याच्या नशिबात नव्हती, मिळालं एखादं काम तरी दुर्मिळ योग तो. एखाद्या कलाकारावर जसा एक शिक्का बसतो आणि दुस-या भूमिकेत त्याला प्रेक्षक स्विकारत नाहीत तसं काहीसं झालं होतं त्याचं. पण पितृपंधरवड्यात त्याला उसंत नसायची, बाकी कुणी गेलं तरंच काम त्याला. शेजारपाजारच्या चारपाच गावात पण तोच जायचा. मामलेदारासाठी लोक थांबतात तसे लोक त्याच्या येण्याकडे डोळे लावून असायचे अगदी. श्री अगदी मिटल्या तोंडाचा होता. मंत्र म्हणताना जे काय तोंड उघडेल तेवढंच. 

सव्वापाच फुटाच्या आसपास उंची, लख्ख गोरा रंग, कायम दाढी व्यवस्थित केलेली, शाईने भरल्यासारखे काळेभोर डोळे, पट्टीनी आखल्यासारखं सरळ नाक, भटजी असून पोट अजिबात न सुटलेला, सडपातळ शरीरयष्टी, कायम झिरो मशिन मारलेलं डोकं आणि मागे इंचभर शेंडी. श्री देखणाच होता. माझ्याच वयाचा तो. आम्ही दहावीपर्यंत एकाच वर्गात होतो. नंदादीप जसा कायम तेवता असतो तशी त्यांच्याकडे जगण्यासाठीची ओढाताण कायम तेवती असायची. त्याचे वडील तालुक्याच्या गावाला प्राथमिक शिक्षक होते. चिमूटभर पैशात अजून एक थेंब पडावा म्हणून ते भिक्षुकीही करायचे. आमची दहावीची परीक्षा झाली त्याच वर्षी कांडर चावून त्याचे वडील गेले. नंतर मी मुंबईला शिकायला गेलो, श्री तिथेच राहिला. पंचवीसेक पोती तांदूळ निघेल एवढा शेताचा तुकडा, बारापंधरा आंबा, काजू, फणसाची झाडं, नारळ आणि स्वतःचं चि-यात बांधलेलं अनेक पिढ्या चालत आलेलं घर, एवढीच काय ती त्याची इस्टेट. त्याची आई सुशीला, ती बारमाही आजारी असायची. सतत खोकायची आणि हिरवं, पिवळं थुंकायची. जीव जात नाही म्हणून कंटाळलेली असायची ती कायम. खोकून कंटाळा आला की ती नशिबाला आणि देवाला शिव्या द्यायची.

श्री अभ्यासात तसा बरा होता. बारावी करून मग बी.ए.,बी.एड.करून शिक्षक व्हायचं होतं त्याला. आम्ही ब-याच वेळा या विषयवार नदीवर पाण्यात दगड मारत बोलत बसायचो. खूप त्रोटक बोलायचा तो पण नेमकं बोलायचा. 'सात वर्ष लागतील, पण मी बारावी झालो की करेन काही नोकरी, जमेल मला?'. 'जमेल रे, हा हा म्हणता दिवस जातील'. 'दहावीच्या सुट्टीत बघतो, तालुक्याला स्टेशनरीच्या दुकानात पार्ट टाईम'. 'अरे होईल सगळं नीट'. एखाद्या झाडाचं जसं बोन्साय होतं ना तसं याचं उलटं झालं होतं. लहान रोप असतानाच तो झाड झाला होता. डोळ्यात आणि डोक्यात सतत काळजी. तसाही त्यामुळे तो अबोलच असायचा पण वडील गेल्यावर तर श्री अजूनच मुका झाला. प्राथमिक शिक्षकाकडे किती पुंजी असणार. अकाली प्रौढत्व आलेला पंधराएक वर्षाचा श्री स्टेशनरीच्या दुकानात लागला खरा पण तिथे असा कितीसा पैसा मिळणार. मधेच शेतीची कामं, आईचं आजारपण, कायम पैशाची ओढाताण यातंच त्याची उमेद आणि वय दोन्ही नासून गेलं. त्याच्या वडिलांबरोबर जे भटजी होते त्यातल्या एकानी त्याला भिक्षुकी शिकवली म्हणून थोडं फार बरं झालं. वडील गेल्यावर दिवसाआड मिळणारं जेवण रोज मिळू लागलं. 

तो एकदा मयताचा विधी करायला गेला, मग कायम जातंच राहिला. त्यामुळे लोकांनी परस्पर तो शुभकार्याचा भटजी नाही हे ठरवून टाकलं आणि त्याचा उत्कर्ष थांबला. कुणाकडेही तो पैसे एवढेच द्या असं मागायचा नाही, गरीब लोकं दोन दिवस उशिरा का होईना पण आणून द्यायचे, प्रतिष्ठित, ऐपत असलेली माणसं एवढ्यात कोण मरणार आहे परत नाहीतरी असा धूर्त विचार करून निम्मेच पैसे त्याला द्यायचे, ते ही गड्याकरवी पाठवून. श्री कुणालाच काही बोलायचा नाही. माझ्या लग्नाला तेवढा तो मुंबईला आला होता. नाहीतर आईमुळे त्याला कुठेच जाता यायचं नाही. त्याला मुंबई दाखवायची असं मी गावाला गेलो की कायम बोलण व्हायचं. पण लग्नाच्या गडबडीत काही जमणं शक्यं नव्हतं. ते राहिलं ते राहिलंच. नंतर माझंही गावाला जाणं येणं कमी होत गेलं. एखादी वस्तू अचानक हरवावी पण अमुक एक ठिकाणी ठेवल्याचं आठवावं ना तसा श्री माझ्या आयुष्यातून कुठे आहे हे माहित असलं तरी हरवल्यासारखा झाला. गावाहून कुणी आलं तर उडत उडत त्याच्याबद्दल कळायचं. होळी, गणपतीला जाणंही कमी होत गेलं आणि मग पेन्सिलनी लिहिलेलं पुसट व्हावं तसा श्री ही पुसट झाला. 

परवा गावी गेलो होतो आठ दिवसांकरता. जमिनीचं काम होतं म्हणून. रोज संध्याकाळी श्री कडे जायचो गप्पा मारायला. आता मी पंचेचाळीशी पार केली म्हणजे श्री ही अर्थात तेवढ्याच वयाचा. काळवंडलेला वाटला जरा. डोळ्याखाली काळी वर्तुळं दिसत होती. माझं पोट सुटलंय, तो मात्रं आहे तसा सडपातळ आहे अजून. काळभोर डोळे कधीकाळी चमकदार होते त्याचे खरंतर पण आता अगदी निस्तेज काजव्यासारखे झाले होते. 'ये रे, किती वर्षांनी आलास, बरं वाटलं, किती दिवस आहेस'. 'अरे, आत तर येऊ दे, जमिनीच्या कामासाठी आलोय, आहे आठ दिवस'. 'मग ये की रोज गप्पा मारायला, जेवायलाच येत जा इथे रात्रीचा, सकाळी जा आपल्या कामाला'. 'चालेल, पण तुला कशाला त्रास, दोन माणसांचा स्वयंपाक उगाच'. ' असू दे रे, आई गेल्यापासून मी एकटाच जेवतोय वर्षभर भुतासारखा, आणि भातामटी करायला काय कष्टं मोठे? येत जा, वाट बघतो', मग मी मुंबईला परतेपर्यंत जात राहिलो त्याच्याकडे. बोळा निघावा आणि तुंबलेलं पाणी मोकळं व्हावं तसा श्री बोलत होता आठ दिवस. 

'मला वर्षभर भात, भाकरीसाठी लागेल एवढा तांदूळ ठेवतो आणि उरलेला विकतो. आंब्या, फणसाचे, काजू, नारळाचे येतात थोडेफार पैसे आणि सटरफटर भिक्षुकी. चाललंय. तुला गंमत सांगतो, आईकडे चाळीसेक तोळे दागिने होते, तिला तिच्या आईने, सासूने दिलेले. मरायच्या आधी पंधरा दिवस मला कडीकोयंड्याचा कुलूपबंद पितळी डबा दिला आणि हे मोड म्हणाली. आयुष्यंभर पैसा नाही म्हणून औषधं कमी घेत राहिली, मेलीही नाही आणि जगलीही नाही नीट. मला मरू दे पण तिच्या औषधाला गेले असते सगळे तरी मला चाललं असतं. मी फक्तं हसत राहिलो बघ त्या दिवशी. मला खूप कीव आली तिची. कसला मोह पडतो रे एवढा सोन्याचा? सुनेकरता ठेवले म्हणावेत तर ते ही नाही. मी शिक्षक झालो असतो तेंव्हा मोडले असते तर. परत तेवढेच केले असते मी उमेदीने. या वयात कुठे विचारू तिला, का ठेवलेस दडवून म्हणून. कदाचित तिच्या उशिरा चूक लक्षात आली असावी. उपभोग घेणं सुद्धा नशिबात लागतं रे. दोनेक आठवड्यात गेलीच ती त्यानंतर'.  

'पण एवढ्या वर्षात कधी तिनेही माझ्या लग्नाचा विषय काढला नाही, मी ही नाही. आमच्या दोघांच्या तोंडातच दोनवेळा पडेल की नाही याची भ्रांत तिथे अजून एक तोंड आणि मग निसर्गनियमाने अजून नंतरची तोंडं कुठे  वाढवणार? आणि एकदा कुठलीही भूक मेली ना की ती कायमची मरते बघ. निदान चार नातेवाईक असतील तर विषय निघतो, कुणीतरी पुढाकार घेतो, इथे कुणीच नव्हतं. कोण विषय काढणार? आणि विचारून 'नाही' ऐकण्यापेक्षा काहीवेळा नसलेलं बरं असतं बघ. होते सवय. असो! कुणालाच सांगितलं नाहीये मी हे. सोनं मोडून बँकेत ठेवलेत पैसे. व्याज चांगलं येतं. भरपूर पुस्तकं आणलीयेत, ती वाचतो दिवसरात्रं. लोकांचा समज आहे माझं अवघड आहे एकूण, मी ही तो समज दूर करत नाही. अरे इतक्या वर्षांची सवय लागलीये, मन मारून, पोट मारून जगायची, पैसा उडवता येतंच नाही बघ'. मला फक्तं आवंढा आला. इथे रोजचे जगण्याचे क्षुल्लक अडथळे आम्हांला किती भयंकर वाटतात आणि इथे कुणाच्यातरी चिकटपणामुळे, विक्षिप्तपणामुळे आयुष्यं नासून जातं तरी चेह-यावर विषादाची सुरकुतीसुद्धा नाही.

शेवटच्या दिवशी तो म्हणाला, 'एवढा खीर वड्याचा सिझन मारला की येतो मुंबईस, सुट्टी काढ, चांगले टॅक्सीने फिरू सगळीकडे, खर्च सगळा माझा हं पण. वर्षातून एकदा तरी तुझ्याकडे येणार, सगळी मुंबई झाली पालथी घालून की मग दुसरं शहर बघू'.  'तू ये तर, आधी कळव फक्तं म्हणजे तशी सुट्टी टाकायला मला' असं सांगून मी निघालो. इतक्या वर्षाच्या आयुष्यात पहिल्यांदाच मला त्याच्या काळ्याभोर डोळ्यात विलक्षण चमक दिसली, वर्षातून चार दिवस सुट्टी घेऊन ती कायम ठेवणं माझ्या हातात निश्चित होतं, ते मी करणार हे नक्की. 

जयंत विद्वांस

खेळ न झालेल्या रविवारचा वृत्तांत...

(आमच्या खास वार्ताहराकडून...)

सतत पडत असलेल्या पावसामुळे आज एमसीजीवर खेळ होऊ शकला नाही. आमच्या प्रतिनिधीनी उपग्रहामार्फत केलेल्या हेरगिरीमुळे घराघरात नेमकं काय घडलं याचा वृत्तांत देत आहोत. या वयात पाय घसरणं चांगलं नाहीये अर्थातच त्यामुळे निसरड्या मैदानावर खेळ झाला नाही हे बरेच झाले. ज्यांना यायचंच नव्हतं त्यांनी समूह संचालक श्री.अजय मराठे यांना 'पाऊस असल्यामुळे येत नाही' असे मेसेजेस टाकले.

दत्ता मोरे घरातल्याघरात दोनच्या जागी तीन पळण्याचा सराव करताना आढळले. खालून थोडे पाय कमी करून घेता आले तर फरक पडेल असा विचार त्यांनी बोलूनही दाखवला. गेल्या दोनेक रविवारची नेत्रदीपक फलंदाजी आणि वृत्तांतातील कौतुक यामुळे आपण मोठ्या चेंडूऐवजी लहान चेंडू हातात धरून करिअर करायला हवं होतं याची चुटपुट त्यांना लागून राहिली. पण साईझ डज मॅटर. मोठे चेंडू सगळ्यांनाच आवडतात. प्रशांत शिरोडकर हे चारपाच गाद्या कडेला लावून झेलंदाजीचा सराव करताना आढळले. दहापैकी तीनवेळा गादीवर न पडता ते झेल घेण्यात यशस्वी झाले. केतन तेरेदेसाई हे एक प्रतिज्ञा पाठ करताना आढळले. 'क्रिकेट हा माझा आवडता खेळ आहे. मैदानावरील सर्व खेळाडू माझे बांधव आहेत. मैदानावरच्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या चिडखोरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. मी ज्या टीममध्ये आहे त्यातील खेळाडू आउट नाही असे सांगून त्यांचा मान ठेवीन आणि तरीही प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. मी ग्राउंडवर कमरेतून वाकण्याची आणि जलद पळण्याची प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी ह्यांतच माझे सौख्य सामावले आहे'. 

'गली'तले सुप्रसिद्ध क्षेत्ररक्षक मनोज गोडबोले हे घरात पॅसेजमध्ये झेलांचा सराव करताना आढळले. नंतर आरशासमोर उभे राहून उत्तम फेक करूनसुद्धा धावचीत असूनही न दिल्यास राग, नैराश्य काबूत ठेवण्यासाठी त्यांनी योगसाधना केली. अविनाश रहाळकर एक ते शंभर आकडे न चुकता हाताच्या आणि पायाच्या बोटांवर मोजण्याचा सराव करत होते. उदा.साधारण अंकगणितात तीन रन्स काढल्यावर छत्तीस नंतर एकोणचाळीस होतात पण त्यांच्या हिशोबात ते चाळीस किंवा एक्केचाळीस होत होते. त्यांनी अजय मराठे यांना फोन लावल्यावर त्यांनी 'तू मगाचचे दोन धरले नाहीत, त्रेचाळीस होतात' असं सवयीने सांगून टाकलं. आपली अफरातफर खूपच कमी आहे याचा अंदाज आल्याने रहाळकर आनंदी झाले. मिहीर भागवत, समीर व्होरा, आकाश मेहता यांनी खिडकीतून बाहेर डोकावून बघितलं आणि 'पाऊस पडतोय, खेळ काही होणार नाही, चला पैसे तरी छापून येऊ' असं म्हणून ते तिघेही आपापल्या घरातून घराबाहेर पडले. 

नितीन करमरकर यांच्या घरी मात्रं अत्यंत वेगळं चित्रं होतं. आजूबाजूची सगळी लहान मुलं त्यांच्याभोवती गोलाकार बसली होती.  स्वतः:चे प्रत्येकी तीन ते चार धावचीत, यष्टिचीत, झेल आणि सामना जिंकून देणा-या खेळ्या यावर ते स्वतः भाष्यं करत होते. दर वीस मिनिटांनी घरातला २०१४ साली आणलेला व्हॉलीनीचा स्प्रे जेमतेम फवारणी केल्यासारखा ते खांद्यावर मारत होते. एका मुलानी 'काका, गेले चार महिने आम्ही हेच ऐकतोय, खरे किस्से सांगा ना काही' म्हटल्यावर त्याला त्वरित घराबाहेर काढण्यात आले आणि याला परत बोलावू नका रे परत असं म्हटल्यावर इतर मुलं पण लगेच 'काका आम्हांला पण काढा ना घराबाहेर' असं म्हणत पळून गेली. मयुरेश बुधकर इंग्लंडसारखं वातावरण असल्यामुळे सतत ग्लास, बर्फ, स्कॉचची बाटली शोधत होते. बायकोनी फक्तं 'बघितल्यावर' त्यांनी 'अडुळसा कुठे ठेवलंय गं' असं विचारत बाजू सावरून घेतली. 

रोहित दणाणे आणि प्रविण देवधर घरात टोलेजंग षटकार मारायचा सराव करताना आढळले. साधारण चारसहा कपबश्या, दोन डबे आणि एक एलईडी बल्ब जमिनीवर आल्यामुळे रोहित दणाणे नंतर दरवाज्याच्या बाहेर उकिडवे बसल्याचे दिसले. सुशांत पाटील यांनी जुने दिवस आठवून त्याला स्वतः:चा डबा जिन्यात खायला दिला. चारनंतर घरात घेणार आहे असं तो म्हणाल्याचं पाटील यांनी सांगितलं. देवधर यांना झालेल्या मारहाणीच्या जागा ते गरम पाण्याची पिशवी घेऊन शेकत बसले होते. पुढचा आठवडा त्यांना कंपनी कँटीनमध्ये जेवायला लागणार असल्याचं त्यांनी आमच्या प्रतिनिधीला स्काईपवर सांगितलं. नितीन अंमलदार आणि त्यांचे चिरंजीव यांचं लुटुपुटुचं भांडण चालू होतं. 'रनाउट' ही एकांकिका त्यांनी सादर केली. मुलानी शेवटी हात टेकले आणि 'बाबा, नेहमीप्रमाणे तू जिंकलास' असं म्हटल्यावर नाटक संपलं. जेवताना आणि जेवण झाल्यावर फॉर अ चेंज म्हणून ऑफिस ऐवजी घरी वामकुक्षी घेताना पण ते बॅट घट्ट धरून झोपले होते. 

श्री.अजय मराठे खेळ न झाल्यामुळे खट्टू होऊन साश्रू डोळ्यांनी खिडकीत उभे होते. डॉ.मनोज गद्रे यांनी त्यांच्या घराच्या खिडकीतून ते करुण दृष्यं पाहून त्वरित छत्री घेऊन अजय मराठे यांच्या घरी प्रयाण केले. एवढया लांबून भरलेले डोळे दिसत असतील तर चार फुटांवरून त्यांना रनाउट दिसला नसेल का? पण त्यांच्या गरीब स्वभावाचा फायदा घेऊन काही लोकांनी त्यांना मैदानावर बोलू दिलं नाही हा ताजा प्रसंग निंदनीय आहे. गद्रे यांनी फोन लावून हिंदीतून दोन पोहे आणि दोन कॉफी याची ऑर्डर दिली आणि 'मैदानावरील वाढती असहिष्णूता आणि त्यावरचे उपाय' यावर त्यांनी चर्चा केली. अजय मराठे यांनी एटीकेट्स न पाळता सलग चार जांभया दिल्यामुळे गद्रे पोह्यांचा शेवटचा घास घेऊन घरी गेले.  

नंतर उपग्रह श्रीश्रीश्री रवी उटगीकर यांच्या घरावर स्थिर करण्यात आला. पेपर वाचून झाल्यावर सारसबागेतल्या स्त्रीभक्तं बघायच्या राहिल्याचा खेद त्यांच्या चेह-यावर दिसत होता. त्यांनी फक्तं आजची सुट्टी कशी घालवायची याची स्ट्रॅटेजी ठरवूयात म्हटल्यावर घरात एकदम गडबड उडाली. मुलानी अभ्यासाची पुस्तकं काढली, मित्राला फोन लावला आणि कॉल लागलेला नसतानाही 'मी येतोय तुझ्याकडे' म्हणून तो घाईघाईने घराबाहेर पडला. बायको किचन मध्ये गेली आणि डॉगीनी पळत येऊन भिंतीवर तीनचार वेळा डोकं आपटून घेऊन तो निपचित पडला. त्वरेने उटगीकर त्याला घेऊन (डॉगीचे) फॅमिली डॉक्टर श्री. विनायक लिमये यांच्याकडे गेले. उटगीकर यांनां बाहेर थांबायला सांगून लिमये यांनी डॉगीच्या कानात 'अरे दुस-याचं दु:खं बघावं, प्राजमधला स्टाफ प्रत्येक रविवार स्वातंत्र्यदिन असल्यासारखा एन्जॉय करतो, त्यांना सहा दिवस मानसिक त्रास असतो, तुला तर एकंच दिवस' असा डोस दिला. डॉगी बराच वेळ त्यांच्या खांद्यावर अश्रू ढाळून शेवटी उठला. प्रिस्क्रिप्शनमध्ये 'स्ट्रॅटेजी' हा शब्दं पुढचे चार आठवडे घरात उच्चारू नये, एवढंच पथ्य पाळण्याचं त्यांनी लिहून दिल्याचं कळतं. 

मंदगती गोलंदाज नंदू बापट घरात आपण ज्या टीममध्ये आहोत त्यांना जिंकायला समजा तीन धावा हव्यात तर झेल कसा नैसर्गिकरित्या सोडावा, चेंडू पायातून मागे कसा जाईल आणि संघ विजयी होईपर्यंत चेंडू कसा थ्रो करू नये याचा सराव करताना दिसले. चेहरा अत्यंत निरागस, निष्पाप वगैरे दिसण्यासाठी त्यांना अतोनात कष्ट पडले असावेत कारण चेह-याचे स्नायू दुखावल्यामुळे त्यांनी गालाला शेवटी आयोडेक्स लावलं. दुसरे अतिमंदगती गोलंदाज जयंत विद्वांस यांनी त्यांना फोन करून चेंडू अजून कसा वळवता येईल (तुझा शेवटचा कधी वळला होता? इति नंदू बापट), मिहीरच्या वेगाला आपण किती साली गाठू शकू, चंदू खिरीड यांचा आवाज नेमका कुठून येतो, त्यानी खरंच वेग वाढतो का वगैरे विषयांवर चर्चा केली. सर्वात शेवटी नंदू बापट यांनी गोलंदाजीचं मर्म सांगितलं, 'एमसीजीवर बॉल मागे गेला पाहिजे बॅट लागायच्या आधी, बाकी चेंडू वळणे, फ्लाईट देणे, (बॉल) कट करणे, चेंज ऑफ पेस या सगळ्या अंधश्रद्धा आहेत'. 

(सदर वृत्तांत हा आमच्या खास प्रतिनिधीकडून आलेला आहे. त्यामुळे काही वाद निर्माण झाल्यास संपादक त्याला उत्तर देण्यास बांधील नाहीत. प्रतिनिधीचे नाव गोपनीय आहे तरी चौकश्या करू नयेत)

जयंत विद्वांस

जास्तीत जास्ती काय होईल...

जे आपलं क्षेत्रं नाही तिथे उडी टाकायला हवी, मराठी माणूस इथे मागे पडतो धंद्यात, वगैरे ऐकायला ठीक आहे, आचरणात आणताना फाटते. बाबांच्या बरीच वर्ष सहवासात असलेला एक अण्णा होता. मणी त्याचं नाव. अतिशय गोड बोलणार. त्यानी बाबांना भरीला घातलं, आपण हॉटेल चालवायला घेऊ म्हणून. आम्ही व्यवहारी अपूर्णांक. लेबर, मेहनत त्याची, पैसे आम्ही लावायचे, पन्नास टक्के भागीदारी, असला भारी करार. वारज्याचा आताचा फ्लायओव्हर ओलांडला की शिवण्याला जाताना डाव्या हाताला एक हॉटेल होत. ब-याच जणांनी ते चालवायला घेतलं आणि तीनचार महिन्यात बंद केलं होतं. त्यामुळे मालक एकदम सेंटी झालेला कारण त्याच्या आईचं नाव होतं हॉटेलला. आम्ही मालकाकडे गेलो ऍग्रीमेंटसाठी, त्याच्याकडे अनंतवेळा केल्यामुळे मजकूर छापून तयार होता. वीस हजार डिपॉझिट आणि महिना तीन हजार भाडं (१९९५), तीन वर्षाचा करार. ऍग्रीमेंटच्या शेवटी एक पॉईंट होता. हॉटेल मधेच बंद केल्यास तीन वर्षाचं भाडं भरावं लागेल. 

ओपनिंग झालं, स्वप्नं बघून झाली. साताठ वेटर्स, दोन आचारी. कटलरी, डोश्याकरता पाच एम.एम.चं एम.एस.शीट सहाफूट बाय दोन फूट लोखंडी स्टॅन्डवर वेल्ड करून आणलं, पुढे ते बरीच वर्ष सिंगल बेड म्हणून वापरलं. फ्रिज होताच. बाकी भांडीकुंडी आणली. किटल्या आणल्या. लगेच आजूबाजूच्या वर्कशॉप्समधून चहाचा रतीबही मिळाला दोनवेळचा. फुलय्या म्हणून मेन आचारी, मणीचा माणूस. संध्याकाळी पुढे कढई लावून वडापाव. सुरवात एकदम झकास होती. पण जेम्स हॅडली चेसच्या स्टो-यात कशी माशी शिंकते तसं झालं. मणीची बायको इमर्जन्सीमधे बाळंत झाली. ती गावाला जाणार असं ठरलेलं पण जुलाब लागलेला माणूस आणि पोटुशी बाई सारखीच, एकदा कळ आली की विषय संपला. मलाही कामधंदा नव्हताच. तो म्हणाला, दोनेक महिने सांभाळशील का, घरी कुणी नाहीये माझ्या. तो आणि बायकोच फक्तं. गल्ल्यावर बसायला माझी कशाला ना असेल, तर मी जायला सुरवात केली हौसेने. सकाळी सातला हजर, सुटायला रात्री दहा. 

मजा वाटायची. बेल मारून किती रे म्हणायला. संध्याकाळी दीडेकशे वडापाव जायचे. पहिल्या दिवसापासून मी दोन रुपयाच्या कोथिंबिरीपासून हिशोब ठेवायला सुरवात केली तिथे माशी शिंकली. रोज संध्याकाळी मला अंदाजे प्रॉफिट कळायचा. दोनेक महिने बरे गेले. मग मणी कारणं सांगून आलाच नाही कधी. आचारी त्याचेच. वेटर्स आणि मालक मी, महाराष्ट्रीयन. सकाळी नाश्ता, दोनवेळचं जेवण, चहा फुकट असायचा. किती खावं माणसानी? एक कॅरॅक्टर सकाळीच दोन पाव पॅटिस, दोन वडा सांबार, एक उत्तप्पा इतका ऐवज हाणायचा. त्यांचा नाश्ता बघूनच मला आपण गाळात जाणार हे दिसायचं. तरीपण मी शांत. अण्णा लोकांचं प्लानिंग सुरेख. मला जमणार नाही बसायला म्हणून मणीनी अंग काढून घेतलं. एक दिवशी पगार घेऊन सहा वेटर्स, एक असिस्टंट आचारी गायब झाले. उरलो मी, फुलय्या, एक पोरगा आणि एक म्हातारा वेटर. तो एकदा चहा घेऊन गेला की तासभर तिकडेच. बारा पंधरा तास एकटा फुलय्या तरी काय काय करणार? तो वेटर बाहेर गेला की मी वेटर कम फडकंवाला पो-या कम कॅशिअर. तरी असे दोनेक आठवडे निघाले. 

तो पो-या पण भारी होता. एक माणूस टेबलावर बसलाय. 'चहा दे रे', 'किती', 'एक'. असे डायलॉग रोज व्हायचे. मला सांगा एक माणूस दोन चहा मागवेल का? मी त्याला सांगितलं तरी त्याच्यात काही बदल झाला नाही. एक दिवशी फुलय्यानी सांगून टाकलं, नाही जमणार म्हणून. आता आचारी कुठून आणायचा? मणीचं काहीच अडकलेलं नव्हतं. मग एका शनिवारी मी आणि फुलय्यानी शेवटचे वडापाव विकले आणि तो आठला गेला. पाव देणारा साडेनऊ दहाला यायचा पैसे घ्यायला. मी सगळं बंद करून थांबलो. त्याला खूप वाईट वाटलं. फक्तं त्याचे पैसे देण्यासाठी मी दोन तास थांबलो त्यामुळे त्याला खूप भरून आलं. 'कोई कोई जगा ऐसाच रह्यता साब, चलताच नही, मिलेंगे कभी फिर, पैचानोगे ना?' असं म्हणून तो गेला. दुस-या दिवशी मी टेंपोतून सगळं सामान घेऊन आलो. आता प्रश्नं मालकाला जाऊन सांगायचं. तो बिल्डर होता. त्याच्याकडे मी आणि बाबा लुनावर गेलो. त्याच्या घराकडे वळायच्या आधी थांबून काय काय बोलायचं ते ठरलं. बाबांना पैशाचं टेंशन आलेलं. बीपी वाढलं असावं. म्हटलं जाऊ तर, एवढं काय घाबरायचं, जास्तीत जास्ती काय होईल ३३ महिने x तीन हजार वजा डिपॉझिट वीस हजार द्यावे लागतील. 

त्यानी खूप थयथयाट केला. एग्रीमेंटप्रमाणे मी वागणार वगैरे चालू झाला. ट्रूथ इज अ शॉर्टकट. आम्हांला कसा अरबी हॉर्स लागलाय ते त्याला सांगितलं. मग जरा निवळला तो. पाच त्यानी दिलेच नाहीत, पंधरा पाच पाच करून दिले त्यानी दोन वर्षात. केवळ त्या माणसाचा चांगुलपणा आणि आमचा खरेपणा यामुळे फटका बसला नाही. सामान आणलं होतं ते पैसे द्यायचेच होते. एक नविन अनुभव पंचवीसेक हजारात गाठीशी आला. तेंव्हापासून दोन गोष्टी शिकलो. खरं बोललं की समोरच्याला अपील होतं आणि जास्तीत जास्ती काय होईल याच्या शक्यता कळल्या की तोटा किती ते कळतं मग तो भरून कसा काढायचा याचं प्लॅनिंग करता येतं. तसा मी दीर्घद्वेषी आहे. माझे पैसे ब-याच जणांनी बुडवलेत पण नाही म्हणता येत नाही त्याला काय करणार. त्यापैकी एकानी त्याच्या प्रॉब्लेम्समुळे जीवनयात्रा संपवली, मरणान्ती वैराणी. बाकी दोन आणि मणी कधी चुकून तावडीत आले तर मी सोडणार नाही एवढं निश्चित. बहोत मजा आयेगा खेलका. 

जास्तीत जास्तं काय होईल, लोक मला खुनशी म्हणतील, म्हणू देत. व्हल्चर इज अ पेशंट बर्ड अँड आय लाईक टू वेट. ;) :) 

जयंत विद्वांस 

शिवरंजनी...

'थोडा है थोडेकी जरुरत है' हे गाणं' मला फार आवडतं. कितीही मिळालं तरी माणसाची ओढ संपत नाही. 'अजून' या शब्दाला मरण नाही. जगणं, खाणं, पैसा, संपत्ती, इंद्रियसुख, सत्ता 'अजून' हवी असते. व्हिडिओकॉनचे धूत म्हणाले होते, 'कितीही मोठं घर असलं तरी एक खोली कमी पडते आणि पगार कितीही असला तरी नेहमी हजार रुपयांनी कमी पडतो'. कोंड्याचा मांडा करून जगणारी पिढी आता दुर्मिळ प्रजातीत मोडेल. कर्ज उपलब्ध आहे म्हणून घेणं वाढलं आणि नंतर पर्यायाने देणं वाढलं, गरजेसाठी घेणारे कमी झाले. आहे त्यात सुखी राहणं याकरता कसब लागतं. आहे म्हणून उधळण केली तर छानच दिसते की, पण असलं तरी मोजकं निवडून पण काही सुंदर करता येतं. माझी आजी एक वाटी चक्का होईल एवढ्याच दह्याला फाशी द्यायची आणि फडक्याला बोटं पुसावीत तेवढं जेवताना वाढायची सगळ्यांना, आता चार किलो आणून आंबे, सुकामेवा घातलात तरी तशी चव येणार नाही. सात शुद्ध स्वर, चार कोमल आणि एक तीव्र असा डझनभर ऐवज आहे म्हणून उधळण न करता निगुतीने कसं करायचं हे भूप आणि शिवरंजनीत बघायला मिळेल. 

भूप, शिवरंजनी आणि सामान्य माणसाचा खिसा यात साम्यं काय तर तिघातही 'म' 'नी' नाही, भूपात शुद्ध गंधार आणि शिवरंजनीत कोमल एवढाच, काय तो फरक. जुन्या लॉईड, रिचर्ड्सच्या विंडीज टीममध्ये एकटाच गोरा असलेला लॅरी गोम्स उठून दिसायचा तसा इथे सगळ्या शुद्ध स्वरातला कोमल गंधार लॅरी गोम्स सारखा आहे. शिवरंजनी हा अतिशय करूणरस ओतणारा राग आहे. रागात, दु:खात माणूस जसा तिरमिरत निघतो तसं इथे आहे. काही वगळल्याची भावना या 'रागा'ला पण होत असावी का? दुवा तोडावा तसं सारेग नंतर म कडे दु:खी नजरेने बघत पुढे जायचं आणि नंतर नी ला टाटा करून जावं लागत असल्यामुळे खंतावलेला राग असावा का हा? मोजक्या स्वरात असल्यामुळे याच्या सुरावटी कदाचित लवकर ओळखता येत असाव्यात किंवा त्यातल्या चाली सारख्या वाटत असाव्यात.

वाटव्यांची दोन गाणी सापडली शोधता शोधता या रागात, नावडीकरांनी म्हटलेलं 'रानात सांग कानात' आणि वाटव्यांनी म्हटलेलं 'वारा फोफावला', अजूनही असतील. वर्तुळाकार चेह-याचे नावडीकर आम्हांला मराठी शिकवायला होते सहावीला पण ते भावगीत गायक आहेत हे कुठे तेंव्हा कळायला. ते भावगीत गायन मागेच पडलं आता. एखाद्या अल्बमच्या जोरावर आणि दोनचार तुरळक हिट गाण्यांवर जगणारे गायक आले. सगळी बत्तीशी दाखवून, खूप त्रास होत असल्यासारखी तोंडं करून, बद्धकोष्ठ झाल्यासारखे हावभाव करून, शब्दं थुंकल्यासारखे बाहेर फेकणारे गायक आता जोरात आहेत. तिस-या आघाडीचं सरकार जितके दिवस टिकायचं तेवढे दिवस त्यांची गाणी कानावर पडतात म्हणजे तशी व्यवस्था असते. पेटीच्या मागे बसलेले तोळामासा वजनाचे वाटवे कुठलाही आव न आणता भाव असलेलं गीत गायचे. माणिक वर्मांचं 'सावळाच रंग तुझा' त्यातलंच. एक धागा सुखाचा' वर मी मागे लिहिलं आहे त्यामुळे परत इथे लांबी वाढवत नाही. त्या हातमागाच्या ठेक्यावर गाणारे हताश राजा परांजपे, गदिमांच्या शब्दातलं जीवनसार आणि बाबूजींचा आवाज असा सगळा तो सुरेल योग आहे. जोगांनी संगीत दिलेलं 'बाजार फुलांचा भरला', निसर्गराजा ऐक सांगतो' हे संवादगाणं, भीमसेनजींचं 'राजस सुकुमार मदनाचा पुतळा', राम कदमांचं 'दिसला ग बाई दिसला' आणि अतिशय सुंदर ठेका असलेलं हृदयनाथ मंगेशकरांचं आज गोकुळात रंग खेळतो हरी' हे सगळी शिवरंजनी मधली गाणी आहेत.


'बाबुल मोरा' लिहिणा-या बहादूरशहा जफरचं 'लाल किला' मधलं रफीचं 'न किसकी आँख का नूर हू' या रागातलं सुंदर गाणं आहे. वैषम्यं, विफलता, हताशपणा शब्दात तर आहेच पण चालीत पण आहे. रफीची यातली अनेक गाणी  मला सापडली. 'गझल' मधलं 'रंग और नूरकी बारात किसे पेश करू', 'सूरज'मधलं 'बहारो फूल बरसाओ', 'ब्रह्मचारी'मधलं 'दिलके झरोकोमें तुझको बिठाकर', लता बरोबरची तीन 'प्रोफेसर' मधलं 'आवाज दे के हमे तुम बुलाओ', 'जनम जनम के फेरे मधलं 'जरा सामने तो आओ छलिये' आणि अंजाना'मधलं 'रिमझिमके गीत सावन गाये', लताची पण अनेक लोकप्रिय गाणी आहेत यात - 'जंजीर'मधलं 'बनाके क्यू बिगाडा रे', घुंघट'मधलं   'लागे ना मोरा जिया', 'तुम्हारे लिए' मधलं जयदेवचं 'तुम्हे देखती हूँ, तो लगता है ऐसे', 'एक दुजे के लिए'चं 'तेरे मेरे बीचमें', 'मेहबूब की मेहंदी मधलं 'जाने क्यू लोग मोहब्बत करते है', 'आँखें' मधलं 'मिलती है जिंदगीमे, मोहब्बत कभी कभी', लता मुकेशचं 'संगम'मधलं 'ओ मेरे सनम'. लताचं आणि किशोरचं एक टँडम आहे 'मेहबूबा'चं 'मेरे नैना सावनभादो, फिर भी मेरा मन प्यासा', करूणरस तर यात दिसतोच पण हॉन्टेड मटेरिअल पण यात आहे. जुन्या 'बीस साल बाद'चं लताचं 'कही दीप जले, कही दिल' पण यातलंच आहे. 'जिस देशमें गंगा बहती है'मधलं अप्रतिम 'ओ बसंती पवन पागल' यातलंच आहे. डोंगर कुठला आहे माहीत नाही तो पण तो डोंगर आणि पद्मिनी छान दिसते या गाण्यात.


बाकी मग 'साथी'मधलं मुकेश, सुमन कल्याणपूरचं 'मेरा प्यार भी तू है' आहे. शम्मीकपूरची नक्कल केलेल्या राजीव कपूरच्या पदार्पण चित्रपट 'एक जान है हम'चं टायटल सोंग 'याद तेरी आयेगी' आहे, अन्वर, शब्बीरकुमार, मोहम्मद अझीझ भाग्यवान माणसं, हिमेश रेशमियाच्या तुलनेत खूप बरी म्हणा, नाकात म्हणूनही, केवळ रफीची नक्कल म्हणून ही माणसं चालली. 'मर्द'मधली गाणी(?) ऐकून अझीज आणि शब्बीरकुमारनी कान मेण ओतून बंद केले असते. प्यार झुकता नही'चं शब्बीर लताचं 'तुमसे मिलकर ना जाने क्यू' याच रागात आहे. एरवी नाक मुरडणा-या गायिकेला हे गेंगाणे आवाज का खटकले नाहीत याचं आश्चर्य वाटतं. 'कर्मा'चं किशोर कविता कृष्णमूर्तीचं 'ना जैय्यो परदेस' यातंच आहे. 'प्रेमरोग'चं 'मेरी किस्मतमें तू नही शायद' यातलंच आहे. वाडकर लागले की मी गाणं म्यूट करतो. कुठलंही गाणं त्यांच्यावर चित्रित झालंय असंच गातात ते, हिरो ओळखता येणार नाही तुम्हांला. एक अपवाद, 'सत्या'चं 'सपनेमें मिलती है' पहिल्या फटक्यात आवडलं होतं मला. माधुरीला हिट एन हॉट करणारं 'बेटा'मधलं 'धक धक करने लगा' पण यातलंच आहे.


वेळ झाला की कधीतरी बैजवार 'मुकद्दर का सिकंदर'वर लिहीन. त्यातली सगळी गाणी सुंदर होती. त्यातलं 'ओ साथी रे' शिवरंजनीत आहे. सात विभागात निवड झाल्यामुळे असेल एकही फिल्मफेअर नव्हतं याला. अतिशय सुंदर व्यक्तिरेखा त्यात छोट्या छोट्या तपशिलांनी उभ्या केल्या आहेत. राखीला मनोमन चाहणारा, मालकीण म्हणून तिच्याबद्दल आदर वाटणारा अमिताभ. त्यानी तिकिटं घेतलेली राखीला आवडलेलं नाहीये, त्याच्या रस्त्यावर गाण्याबद्दल ती कुचकं बोलून माईक त्याच्याकडे देते. मितभाषी सिकंदर नंतर जे बोलतो ते त्या गाण्यासाठी परफेक्ट इंट्रो आहे.डबडबलेल्या डोळ्यांनी गाणारा अमिताभ, काहीही माहीत नसलेला विनोद खन्ना आणि कोड्यात पडलेली 'मेमसाब' राखी. जोहराजानचा रोल भावखाऊ होताच पण राखीचा रोल ही छान होता त्यात. विविध भावना तिनी काय सुंदर दाखवल्यात. परिस्थिती पालटल्यावरची गंभीर, विनोद खन्नाचं आहे असं समजून मिळालेल्या पत्रानंतर झालेला आनंद, शेवटी मेमसाबला झालेला उलगडा. बाई एखाद्याचा तिरस्कार कसा करते हे बघायचं असेल तर तिची मेमसाब बघावी यातली. 


आणि आता मला या रागात आवडलेलं शेवटचं गाणं. 'मेरा नाम जोकर' यशस्वी न होण्याचं एक कारण जसं अपप्रचार होतं तसंच थकलेला आर.के.हे पण होतं. आधीच तो सहा वर्ष चालू होता, लेंग्दी होता, त्याचं वय जाणवतं. पहिले दोन प्रेमभंग फार वरवरचे वाटतात त्यात मला तरी. सगळ्याजणी एकेक करून आयुष्यातून निघून गेल्यावर आलेलं एकाकीपण पद्मिनी गेल्यावर जास्ती जाणवतं. सिमी ग्रेवालच्या सोडून जाण्यात दु:खं फार नव्हतं, ते होणारच होतं, मुळात ते एकतर्फी प्रेम होतं. रशियन सुंदरी मरीना परत जाण्यात ती परदेशी आहे हे मनाला समजवायला कारण होतं पण प्रसिद्धीसाठी स्टेपिंग स्टोन करून पुढे गेलेली पद्मिनी जरा जास्तीच जिव्हारी लागते. अंधारात डोळयांवर गॉगल लावून बसलेला आर.के., त्याच्याजवळ राहिलेला 'तो'च, मागे ती रंगीत जळमटं आणि त्याच्या हातातला तो छोटा जोकर तो खाली सोडतो, तो चालतो हे तेंव्हाच कळतं. या गाण्याची चाल आर.के.चीच होती. एकटेपण फार भीषण असतं. हात विस्फारून सगळीकडे धावणारा आर.के. डोळे ओलसर करतो. सोडून गेलेली माणसं त्याला बोलावतायेत असा निव्वळ भास आणि त्या रंगीत जळमटलेल्या एकांतातून तो आरश्याच्या तुकड्यात दिसणा-या पद्मिनीपाशी येऊन थबकतो. 'जाने कहां गये वो दिन'....


आयुष्यं जगावं लागतंच. सगळी सप्तकं, साती सूर लाभतीलच असं नाही. भूप, शिवरंजनी सारखं काही वगळून तुटपुंज्या स्वरांचं काही नशिबात आलं तरी त्यातून स्वर्ग निर्माण करता यायला हवा. आनंद महागडा गोल्फ खेळून पण मिळतो आणि पत्त्यांचा बंगला करून पण मिळतो. शेवटी तात्पर्य काय, प्रत्येकाच्या पेटीचे सूर निराळे. काहींच्या काही स्वरपट्ट्या रिकाम्या असल्या म्हणजे रुसायचं नसतं. आपल्या आवडीची सुरावट त्यावर वाजत नसेल तर ते दु:खं जोपासण्यापेक्षा जी वाजतीये ती ही वाईट नाही हे समजून घेण्यात जास्ती आनंद आहे. :)


जयंत विद्वांस