Wednesday 3 August 2016

काळ आला होता पण....

जुलै महिना म्हटला अंगावर काटा येतो माझ्या. ती घटना आठवली की तसं काही घडलं होतं यावर माझा स्वतः:चाच विश्वास बसत नाही. पाण्यात जायची मला भीती तेंव्हापासून वाटत आलीये. घडून गेलेल्या घटनेचा छाप आपल्या मेंदूवर पडत असावा. दातात अन्नाचा कण रुतावा तसे प्रसंग अडकून पडतात मेंदूत. कांजिण्या झालेल्या माणसालाच नागीण होते असं म्हणतात कारण तो विषाणू अनेक वर्ष शरीरात सुप्तावस्थेत पडून असतो आणि अतिउष्णतेने तो जिवंत होऊन प्रवासाला सुरवात करतो म्हणून एखादी नस तुरीच्या शेंगेसारखी फोड आल्यासारखी दिसतेआणि त्रास होतो. तसा त्या घटनेचा विषाणू माझ्या डोक्यात अडकून पडला असावा. पाण्याशी किंवा आगीशी खेळू नये असं म्हणतात हे अनुभव आल्याशिवाय कळत नाही माणसाला. 

तरी चौतीस वर्ष झाली आता जवळपास त्या घटनेला. मी नववीला असेन. असाच धो धो पाऊस होता सलग दहाएक दिवस. नदी मोठी होती, गटार नव्हती झाली. तेंव्हा सायकली काढून पाणी बघायला जाण्यात पण आनंद होता. लकडीपूलावर उभं रहायचं आणि खाली बघायचं. तांबडं पाणी पायाखालून न भिजवता जातंय ते भारी वाटायचं. दोनेक मिनीटांनी पूल पुढे चालला आहे असं वाटायचं आणि डोळे गरगरायचे. कमानीला टेकलेलं पाणी वर उडायचं आणि दव पडल्यावर कापड जसं ओलसर होतं तसे कपडे दमट व्हायचे. तेंव्हा काही रेनकोट, जर्किन्स वगैरे ऐष नव्हती. हुडहुडी भरली की परत सायकली हाणत परत निघायचं. सगळी थंडी पेडल मारून गायब व्हायची. मग दुस-या दिवशी शाळेत पाण्याच्या हाईटच्या अफवा पसरायच्या. प्रत्येकानी बघितलेली पातळी हीच उच्च असायची पण एकाच्याही पातळीत पाणी पुलावरून गेलं असं नसायचं. अंग ऐकीव गप्पांचं पेव फुटायचं. सांगणा-यानीही न पाहिलेली माणसं कृष्णा, कोयना, गोदावरी, मुळा, मुठेच्या पुरात कशी उड्या मारायची याची माहिती चघळली जायची. 

कुठेतरी असलं धाडस आपल्याला येत नाही याची खंत वाटल्यामुळे माणूस ती गोष्टं अजून तिखट मीठ लावून त्यात स्वतः ते बघितलं असल्याची लोणकढी ठोकून सांगतो. तर काही मुलं आणि मी आमचं असं ठरलं की आपण भांबुर्ड्यातून नदीवर जाऊयात. शनिवारी शाळा तशीही दुपारीच सुटायची. दप्तरं मामाकडे भिकारदासला ठेवली आणि आम्ही चारपाच जण निघालो. नव्या पुलावरून खाली आलो आणि तिथे रोडलाच सायकली लावल्या. आत्ताच्या सावरकरभवनच्या अलीकडे शनिवारात जायला एक दगडी कॉजवे आहे खूप जुना. एरवी तो दिसायचा पण पाणी सोडलं की तो गायब व्हायचा. त्याच्याकडे जायला दगडी पाय-या आहेत भक्कम. त्या कॉजवेवरून चालत किंवा सायकल घेऊन पलीकडे जायचं पाण्यातून हा एक डफ्फड खेळ तेंव्हा खेळायला मजा यायची. पाणी लोटायचं, मग कडेनी जाणारा कुणी मोठा माणूस हात द्यायचा. 

तर आम्ही सगळे गेलो कॉजवेवर. घोट्यापर्यंत पाणी असेल. त्यात पाय ठेऊन उभं राहिल्यावर पुढं ढकलल्यासारखं व्हायचं पण मजा येत होती. हळूहळू पाणी वाढायला लागलं. गुडघ्याच्याखाली वीतभर आलं तरी आम्ही तसेच उभे. एकतर कॉजवेच्यामध्ये त्यात पावसालाही सुरवात झाली बारीक बारीक. आमच्यातल्या एकाची फाटली दीड हात, त्यानी सांगितलं, आम्ही सांगितलं नाही एवढंच. माझे पाय लटपटायला लागले. बुडताना माणूस वाचवणा-याला पण मिठी मारून बुडवतो असं वाचलेलं. आमच्या दोस्ताचा तोल गेला, कॉजवेचा काठ कुठे ते कळेना. पडणार या भीतीनेच तो लटपटला आणि पडला. माझा हात धरल्यामुळे मी ही पडलो आणि पुढे काय होणार या भितीनी ओरडायला सुरवात केली. कॉजवेवरून आम्ही खाली काही सेकंदात गेलो असू. त्यानी हात सोडवून घेतला. मी आपला पुढेच चाललोय. तो कडेनी लावलेल्या दगडाला अडकला आणि त्यानी ओरडायला सुरवात केली. पाणी माझ्या उंचीचं असावं. पण मला पोहता येत नाही. त्यात कपडे भिजलेले, वरुन पाऊस, पुढे काय होणार ही भीती. नाकातोंडात पाणी जायला लागलं. दोन माणसं पळत येताना दिसली एवढाच काय तो दिलासा पण मी हळूहळू पुढेच जात होतो. 

तोंडात शेवाळं, अंगाला घाण चिकटत होती. पाणी अगदी गळ्यापर्यंत आलं. मी धीर सोडलेला होता पूर्ण. कॉजवेपासून साधारण पन्नास फूट पुढे आलो असेन, म्हटलं सकाळी बहुतेक संगम पुलावर फुगलेला मिळणार मी. तेवढ्यात एक माणसानी उडी मारलेली मी पाहिली. स्पीडला येत होता तो पाण्यात. जवळ येऊन त्यानी माझं बखोट धरलं आणि प्रवाहाच्या विरुद्ध चालत मला खेचत आणला. कॉजवेवर आल्यावर दगडी पाय-यांवर बसलो. भितीनी अंग थरथर कापत होतं नुसतं. सगळ्या बाजूंनी माणसं बोलत होती. दोस्त लोक चिडीचूप एकदम. मला रडूच फुटलं. पावसात कपडे स्वच्छ झाले. पाऊस थांबल्यावर सायकली काढल्या, दप्तरं घेतली आणि सरळ सगळे आपापल्या घरी आलो, कुठेही काही बोलायचं नाही या बोलीवर. घरी सायकलची चेन पडल्यामुळे पडलो असं सांगितलं. कपडे खराब झालेले, फाटलेले, अंगाला शेवाळाचा वास. गरम पाण्यानी अंघोळ करुन पण भीतीची हुडहुडी जात नव्हती. तेंव्हापासून मी धरणातून पाणी सोडलेला फोटोसुद्धा लांबून बघतो. 

काळ आला होता पण वेळ आली नव्हती, देव तारी त्याला कोण मारी वगैरे म्हणींचा अर्थ तेंव्हा कळला. आयुष्याची दोरी बळकट म्हणून वाचलो. मरताना म्हणे शेवटच्या क्षणी आयुष्य डोळ्यासमोर स्क्रोल होतं. मला भीतीनी असेल पण तसं काही झालं नाही म्हणजे मी मरणार नव्हतो एवढं नक्की. तसं काही झालं असतं तर कॉजवेला तुझं नाव दिलं असतं असं दुस-या दिवशी मित्रं म्हणाला होता. पण मी क्रेडिट घेणारा माणूस नाही म्हणून 'मी ढकलतो तुला, तुझं नाव लागू दे' म्हटल्यावर परत एकदा आम्ही एकमेकांचे कपडे फाडले तो भाग वेगळा. :)

जयंत विद्वांस 

-------

(सदर पोस्ट ही पूर्णपणे काल्पनिक असून ती कुठल्याही प्रकारे माझ्या आयुष्याशी कणभरही संबंधित नाही याची कृपया नोंद घ्यावी. पुढेमागे आत्मचरित्रं लिहीन म्हणतोय. ओ हेन्री शॉर्ट स्टोरीज करता प्रसिद्ध होता तद्वत माझं आत्मचरित्रं कदाचित शॉर्टोबायोग्राफी म्हणून साहित्यात नविन पायंडा पाडेल इतका मजकूर अल्पं असेल. थोरामोठयांच्या बालपणात काही ना काही क्रांतिकारक, धाडसाची घटना घडलेली असतेच. टिळकांची शेंगांची टरफलं, गावसकर पाळण्यात बदली झाला तसं माझ्या बालपणात मी जन्माला आल्यावर सतत आठ दिवस रडत होतो, ही घटना सोडल्यास दुसरी मोठी घटना नाही. माझा आवाज बंद करायला किती हात शिवशिवले असतील देव जाणे. पण मग पाने भरणार कशी आणि लोक मला थोर समजतील का या दुहेरी चिंतेने मला सतत ग्रासलेले आहे म्हणून हा खटाटोप. खरंतर पानशेतच्या पुरात सापडलो असंच लिहिणार होतो पण खोटं तरी किती बोलणार ना. 

कुणाला असे स्वतः:च्या आयुष्यातले घडलेले, न घडलेले धाडसी प्रसंग लिहून हवे असल्यास इनबॉक्सात संपर्क साधावा. दर खालीलप्रमाणे :

बालपणातले प्रसंग (इयत्ता तिसरी ते दहावी) : एक पानी प्रसंग - रु.तीनशे फक्तं 
मध्यमवर्गीय लो बजेट साहस : दोन पानी प्रसंग - रु.पाचशे फक्तं
दाक्षिणात्य सिनेमांच्या पठडीतले साहस : तीन पानी प्रसंग + त्या प्रसंगात मी सोबत असल्याचा उल्लेख करणे कायद्याने बंधनकारक - रु.हजार फक्तं

पान साईझ ए फोर, फॉण्ट साईझ अकरा. प्रेमभंगावरच्या गहिवर आणणा-या कविता पाठपोट कागदावर किलोच्या भावात मिळतील. 

अत्यंत महत्वाची सूचना : पैसे मिळाल्यावर'च' लेख मेल केला जाईल. 'च' हे अक्षर ठळक टायपातले आणि बुडाला व्दिरेखांकित केलेले आहे असे समजून वाचावे)

जयंत विद्वांस 

No comments:

Post a Comment