Monday 8 August 2016

जास्तीत जास्ती काय होईल...

जे आपलं क्षेत्रं नाही तिथे उडी टाकायला हवी, मराठी माणूस इथे मागे पडतो धंद्यात, वगैरे ऐकायला ठीक आहे, आचरणात आणताना फाटते. बाबांच्या बरीच वर्ष सहवासात असलेला एक अण्णा होता. मणी त्याचं नाव. अतिशय गोड बोलणार. त्यानी बाबांना भरीला घातलं, आपण हॉटेल चालवायला घेऊ म्हणून. आम्ही व्यवहारी अपूर्णांक. लेबर, मेहनत त्याची, पैसे आम्ही लावायचे, पन्नास टक्के भागीदारी, असला भारी करार. वारज्याचा आताचा फ्लायओव्हर ओलांडला की शिवण्याला जाताना डाव्या हाताला एक हॉटेल होत. ब-याच जणांनी ते चालवायला घेतलं आणि तीनचार महिन्यात बंद केलं होतं. त्यामुळे मालक एकदम सेंटी झालेला कारण त्याच्या आईचं नाव होतं हॉटेलला. आम्ही मालकाकडे गेलो ऍग्रीमेंटसाठी, त्याच्याकडे अनंतवेळा केल्यामुळे मजकूर छापून तयार होता. वीस हजार डिपॉझिट आणि महिना तीन हजार भाडं (१९९५), तीन वर्षाचा करार. ऍग्रीमेंटच्या शेवटी एक पॉईंट होता. हॉटेल मधेच बंद केल्यास तीन वर्षाचं भाडं भरावं लागेल. 

ओपनिंग झालं, स्वप्नं बघून झाली. साताठ वेटर्स, दोन आचारी. कटलरी, डोश्याकरता पाच एम.एम.चं एम.एस.शीट सहाफूट बाय दोन फूट लोखंडी स्टॅन्डवर वेल्ड करून आणलं, पुढे ते बरीच वर्ष सिंगल बेड म्हणून वापरलं. फ्रिज होताच. बाकी भांडीकुंडी आणली. किटल्या आणल्या. लगेच आजूबाजूच्या वर्कशॉप्समधून चहाचा रतीबही मिळाला दोनवेळचा. फुलय्या म्हणून मेन आचारी, मणीचा माणूस. संध्याकाळी पुढे कढई लावून वडापाव. सुरवात एकदम झकास होती. पण जेम्स हॅडली चेसच्या स्टो-यात कशी माशी शिंकते तसं झालं. मणीची बायको इमर्जन्सीमधे बाळंत झाली. ती गावाला जाणार असं ठरलेलं पण जुलाब लागलेला माणूस आणि पोटुशी बाई सारखीच, एकदा कळ आली की विषय संपला. मलाही कामधंदा नव्हताच. तो म्हणाला, दोनेक महिने सांभाळशील का, घरी कुणी नाहीये माझ्या. तो आणि बायकोच फक्तं. गल्ल्यावर बसायला माझी कशाला ना असेल, तर मी जायला सुरवात केली हौसेने. सकाळी सातला हजर, सुटायला रात्री दहा. 

मजा वाटायची. बेल मारून किती रे म्हणायला. संध्याकाळी दीडेकशे वडापाव जायचे. पहिल्या दिवसापासून मी दोन रुपयाच्या कोथिंबिरीपासून हिशोब ठेवायला सुरवात केली तिथे माशी शिंकली. रोज संध्याकाळी मला अंदाजे प्रॉफिट कळायचा. दोनेक महिने बरे गेले. मग मणी कारणं सांगून आलाच नाही कधी. आचारी त्याचेच. वेटर्स आणि मालक मी, महाराष्ट्रीयन. सकाळी नाश्ता, दोनवेळचं जेवण, चहा फुकट असायचा. किती खावं माणसानी? एक कॅरॅक्टर सकाळीच दोन पाव पॅटिस, दोन वडा सांबार, एक उत्तप्पा इतका ऐवज हाणायचा. त्यांचा नाश्ता बघूनच मला आपण गाळात जाणार हे दिसायचं. तरीपण मी शांत. अण्णा लोकांचं प्लानिंग सुरेख. मला जमणार नाही बसायला म्हणून मणीनी अंग काढून घेतलं. एक दिवशी पगार घेऊन सहा वेटर्स, एक असिस्टंट आचारी गायब झाले. उरलो मी, फुलय्या, एक पोरगा आणि एक म्हातारा वेटर. तो एकदा चहा घेऊन गेला की तासभर तिकडेच. बारा पंधरा तास एकटा फुलय्या तरी काय काय करणार? तो वेटर बाहेर गेला की मी वेटर कम फडकंवाला पो-या कम कॅशिअर. तरी असे दोनेक आठवडे निघाले. 

तो पो-या पण भारी होता. एक माणूस टेबलावर बसलाय. 'चहा दे रे', 'किती', 'एक'. असे डायलॉग रोज व्हायचे. मला सांगा एक माणूस दोन चहा मागवेल का? मी त्याला सांगितलं तरी त्याच्यात काही बदल झाला नाही. एक दिवशी फुलय्यानी सांगून टाकलं, नाही जमणार म्हणून. आता आचारी कुठून आणायचा? मणीचं काहीच अडकलेलं नव्हतं. मग एका शनिवारी मी आणि फुलय्यानी शेवटचे वडापाव विकले आणि तो आठला गेला. पाव देणारा साडेनऊ दहाला यायचा पैसे घ्यायला. मी सगळं बंद करून थांबलो. त्याला खूप वाईट वाटलं. फक्तं त्याचे पैसे देण्यासाठी मी दोन तास थांबलो त्यामुळे त्याला खूप भरून आलं. 'कोई कोई जगा ऐसाच रह्यता साब, चलताच नही, मिलेंगे कभी फिर, पैचानोगे ना?' असं म्हणून तो गेला. दुस-या दिवशी मी टेंपोतून सगळं सामान घेऊन आलो. आता प्रश्नं मालकाला जाऊन सांगायचं. तो बिल्डर होता. त्याच्याकडे मी आणि बाबा लुनावर गेलो. त्याच्या घराकडे वळायच्या आधी थांबून काय काय बोलायचं ते ठरलं. बाबांना पैशाचं टेंशन आलेलं. बीपी वाढलं असावं. म्हटलं जाऊ तर, एवढं काय घाबरायचं, जास्तीत जास्ती काय होईल ३३ महिने x तीन हजार वजा डिपॉझिट वीस हजार द्यावे लागतील. 

त्यानी खूप थयथयाट केला. एग्रीमेंटप्रमाणे मी वागणार वगैरे चालू झाला. ट्रूथ इज अ शॉर्टकट. आम्हांला कसा अरबी हॉर्स लागलाय ते त्याला सांगितलं. मग जरा निवळला तो. पाच त्यानी दिलेच नाहीत, पंधरा पाच पाच करून दिले त्यानी दोन वर्षात. केवळ त्या माणसाचा चांगुलपणा आणि आमचा खरेपणा यामुळे फटका बसला नाही. सामान आणलं होतं ते पैसे द्यायचेच होते. एक नविन अनुभव पंचवीसेक हजारात गाठीशी आला. तेंव्हापासून दोन गोष्टी शिकलो. खरं बोललं की समोरच्याला अपील होतं आणि जास्तीत जास्ती काय होईल याच्या शक्यता कळल्या की तोटा किती ते कळतं मग तो भरून कसा काढायचा याचं प्लॅनिंग करता येतं. तसा मी दीर्घद्वेषी आहे. माझे पैसे ब-याच जणांनी बुडवलेत पण नाही म्हणता येत नाही त्याला काय करणार. त्यापैकी एकानी त्याच्या प्रॉब्लेम्समुळे जीवनयात्रा संपवली, मरणान्ती वैराणी. बाकी दोन आणि मणी कधी चुकून तावडीत आले तर मी सोडणार नाही एवढं निश्चित. बहोत मजा आयेगा खेलका. 

जास्तीत जास्तं काय होईल, लोक मला खुनशी म्हणतील, म्हणू देत. व्हल्चर इज अ पेशंट बर्ड अँड आय लाईक टू वेट. ;) :) 

जयंत विद्वांस 

No comments:

Post a Comment