Wednesday 24 August 2016

'दारू'काम...

शेण गुंजभर खाल्लं काय आणि किलोभर खाल्लं काय, शेण ते शेणंच. दारू, मदिरा, मद्यार्क, सोमरस, स्पिरिट, अल्कोहोल वगैरे नावं असली तरी कुणीही 'चला आज जायचं का दारू प्यायला' असं तोंड वर करून म्हणत नाही त्यापेक्षा 'बसायचं का? हे जास्ती प्रचलित आहे. प्रत्येकाची आवड वेगळी, चवी वेगळ्या, कारणं वेगळी. माणसं जातीवरून जशी एकमेकाला कमी लेखतात तशीच कोण काय पितो यावरून त्याची पत ठरते. रम पिणारे सगळ्यात ताकदवान असा त्यांचा समज असतो. मग व्होडका, व्हिस्कीवाले दुय्यम स्थानावर, जीन, बिअर पिणारे म्हणजे कंडम माणसं. वाईन वगैरे बायकांची कामं. त्यात परत पोटजाती, रम व्हाईट की रेड, बिअर स्ट्रॉंग की माईल्ड, व्हिस्की माल्ट की सिंगल माल्ट यावर तुमची पिण्याची लायकी ठरते. फेणी, मोहाची, फळांच्या वाईन्स हे देशी आणि तकिला, स्कॉच (यात परत सिंगल माल्ट, मल्टिग्रेन, किती वर्ष जुनी वगैरे प्रकारावरून तुच्छ ठरवता येतं) हे परदेशी प्रकार जरा कमी प्यायले जातात. ताडी, माडी, देशी आणि हातभट्टीचे 'सेवक' वेगळे. आंतरजातीय विवाह लावल्यासारखा कॉकटेल हा अजून एक प्रकार.    

'दारू पिण्याची कारणे' असं पुस्तक जर काढायचं असेल तर महिनाभर बारमध्ये नुसतं जाऊन बसलं तरी खंड निघतील. न झालेले काल्पनिक प्रेमभंग हे सगळ्यात मोठं कारण, इतर कारणात - मागच्या वेळेला मी दिलेली म्हणून आज तू दे, आज पैसे आहेत म्हणून, टेन्शन आलंय म्हणून, टेन्शन संपलं म्हणून, एन्जॉय, ब-याच दिवसांनी मित्रं भेटले म्हणून, परत भेटणार नाही लवकर म्हणून, लाचेच्या पार्ट्या (लोन, टेंडर, प्लॅन पासिंग, सरकारी कामं), काय करू आज वेळच जात नाही म्हणून, अरे उद्यापासून मी जाम बिझी आहे म्हणून, उद्या सुट्टी म्हणून, ऑफिसची पार्टी, मॅच जिंकली/हरली म्हणून, आपला भाऊ नगरसेवक झाला म्हणून, कुणीतरी फुकट देतंय म्हणून, ब-याच दिवसात घेतली नाही म्हणून, पाऊस मस्तं पडलाय म्हणून गरम व्हायला, प्रचंड ऊन म्हणून गार व्हायला, प्रमोशन झालं म्हणून, बेकार आहे म्हणून. कारणं अनंत आहेत, अजून निर्माण होतील पण एका स्टेजनंतर शरीराला दारूची गरज निर्माण झाली की मग कारण लागत नाही. पाय आपोआप वळतात, पैशांची तजवीज होते मग त्यासाठी माणसं कुठल्याही थराला जातात. 

सुरवात मोठी मजेशीर असते. 'घे रे, काही नाही होत' हे पहिलं वाक्यं  त्यातलं. मग बिअर घेतल्यावर फार टांगा पलटी होत नाही म्हणून तिच्यापासून सुरवात होते. त्यात बॉटम्सअप, एकावेळी किती, मुतायला न जाता किती वगैरे रेकॉर्ड्स चालू होतात. मग टिन वरून माईल्ड, आख्खी बाटली मग दीड, दोन, तीन. मग केजी पास झाल्यासारखं पहिल्या वर्गात स्ट्रॉन्ग अभ्यासक्रम चालू होतो. पुढे त्यानी मुंग्यासुद्धा येत नाहीत डोक्याला (खरंतर येतात पण कुणीतरी म्हणतं अजून बिअरवरच आहे हे येडं) म्हणून रम किंवा व्हिस्की चालू होते. इंग्लिश नाव अवघड असेल तर फार भारी वाटतं म्हणून पिणारे मी पाहिलेत. त्यात नवशिके बावळट भोपळे/डबे बांधून पोहतात तसं थम्सअप घालून सुरवात करतात त्यामुळे चव भिकार आहे हे समजत नाही आणि मुंग्या आलेल्या डायरेक्ट कळतं. किती जणांना खरंच कळतं की आपल्याला पेगमधे पाणी किती, सोडा किती आणि बर्फाचे खडे किती हवेत ते? वेटर जे तयार करतो ते पितात ९५ टक्के लोक. हेतू एकंच, नशा झाली पाहिजे. चवीची कल्पना केलेलीच नाही कधी. प्यायची फक्तं. 

नवशिके खूप पैसे घालवतात कारण चखणा नावाखाली काहीही महागडं खातात, ब-याच वेळा आपण काही कमी नाही हे दाखवण्यासाठी, बॉइल्ड एग्ज, चिकन टिक्का, कबाब, तंदूर, सिक्स्टीफाईव्ह, मंचुरियन, मसाला पापड, चीज पायनॅपल चेरी यावर किंमतीच्या अनेक पट पैसे देतात. सॅलड, दाणे (खारे, शिजवलेले), चकलीच्या सळया, फरसाण, नायलॉन पोह्याचा चिवडा, मटकी उसळ वगैरे फ्री स्नॅक्स. (उकडलेली अंडी तिखट मीठ लावून, शिंगाड्याच्या पिठाचे दाणे आणि चिझलिंग बिस्किटं मला सगळ्यात जास्ती आवडतात :P) यात फुकटे आणि मला नको काही, मी पीत नाही म्हणणारे जेवल्यासारखा चखणा खातात. त्यात काही जण दाणे खाताना त्यांची नाकं काढून टेबलावर घाण करतात, फरसाण सांडतात, सिगरेटची राख डिशमध्येच झाडतात, पाण्याचे ग्लास आडवे करतात, एकमेकांच्या ग्लासात दारू ओततात. अशा लोकांना कायद्याने बंदी घालायला हवी. 

माणूस बदलतोच एकदा तिथे बसला की. शूर होतो, इंग्लिश बोलतो, मोठ्यामोठयांदा बोलतो, मुद्दाम चार जणांना फोन करून कुठे बसलोय ते सांगतो, शिव्या देऊन आपली दोस्ती कशी आहे त्याचे जगापुढे फ्लेक्स लावतो, बिल आल्यावर पैसे कमीत कमी कसे देता येतील असा विचार करणारा पण आधी लाखाच्या गप्पा मारतो, 'तुझ्यासाठी काय पण' वगैरे संवाद आहेतच. कुणाला कसा मारायचा, गेम कशी केली/कशी करणार आहे, तीला कसा भिडलो, कशी चेपली तिला (निव्वळ १०१ टक्के अफवा सगळ्या), लोकांना असूया वाटतील असे पुढचे प्लॅन्स वगैरे प्रकार तर ऐकणीय असतात. मागच्या अमुक अमुकच्या पार्टीत मी सात पेग प्यायलो होतो (जेमतेम साडेतीन असतात कारण माप अंदाजे असतं) पण कसा घरी चालत गेलो याला होकार देणारा माणूस मागच्या वेळेला आठ म्हणालेला असतो तेंव्हा यानी दुजोरा दिलेला असतो एवढाच घ्यायचा. मग त्या बरोबर सिग्रेटीचा धूर निघतो. प्रत्येकाची स्टाईल वेगळी. कुणी सर्कल काढतो, कुणी पंख्यामुळे निघत नाही म्हणतो, कुणी शेवटी जीव खाऊन फिल्टर पर्यंत कश मारून विझवतो कुणी, जी मिळेल तिचे दोन पफ मारून घेतो. हिरो लोकांचा फार प्रभाव असतो. कुणी त्यांच्या स्टाईलनी ग्लास धरतात, कुणी चौथ्या पाचव्या बोटात सिगरेट धरतात किंवा गजानन महाराज स्टाईल. 

दारू जेंव्हा गरज होते तेंव्हा सगळं संपतं, माणसाचं माकड होतं. संसार रस्त्यावर येतो, स्तर कमी होतो. माणूस शेवटी ताडी, हातभट्टी, देशीवर येतो (इथे शिक्षण, पैसे, जात वगैरे प्रकार दुय्यम आहेत, अनेक चांगल्या घरातली माणसं मी पाहिलीयेत अशी). शिकार केल्यावर तो प्राणी आतून पोखरून त्यात पेंढा भरतात तसा देह आतून पोकळ होतो. डोळ्याखाली पिशव्या येतात, चेहरा लाल पडतो, बार उघडायची लोक वाट पाहू लागतात. असतील टेन्शन्स ओढवून घेतलेली, दैवाने आलेली संकटे असतील पण दारूची पळवाट सोपी पडते मग. एकदा नशा झाली की काही काळ सगळ्याचा विसर पडतो, उद्याचं उद्या बघू एवढाच त्याचा अर्थ. कमकुवत मानसिकता, संकटाला तोंड देण्याची संपलेली जिद्द, नैराश्य, सगळं संपल्याची विषण्णता आणि समोर डोंगराएवढे प्रॉब्लेम्स. हळूहळू जीव जाणार हे कन्फर्म असल्यामुळे माणूस मग रग्गड दारू प्यायला लागतो. 

माझा स्टॅमिना जबरी आहे, टँकर आहे, आपल्याला काही फरक पडत नाही, इथे कोण जगणार आहे जास्ती, मी तुला पोचवून जाणार, **त दम लागतो एवढी प्यायला, आपण कुणाला घाबरत नाही, दुनियामें मोहब्बत बडी चीज है अशी अनेक भंपक आणि स्वतःला खुश करणारी विधानं बोलायला अक्कल लागत नाही. आपल्याला एकूणच क्वांटिटीचं आकर्षण जास्ती आहे, क्वालिटी नसली तरी चालेल. राखी सावंत म्हणून अनेकांना माहितीये बघा. 'किती' यावर चुरस असते, क्वालिटी काय का असेना किंवा नसेना. बरं, एकही माणूस शुद्धीत असताना त्यापासून होणारे फायदे सांगू शकणार नाही त्यामुळे तो खूप पितो हे विधान त्याला कधीच मान्यं नसतं. त्याचा त्याच्यावर कंट्रोल असतो आणि तो मनात आणलं तर कधीही सोडू शकतो यावर तो सोडून इतर कुणाचाच विश्वास नसतो. स्वतः:ची फसवणूक एकदा स्वतःकडून चालू झाली की मग दुस-याची गरज नसते तुमची माती करायला.      

कुठलीही गोष्टं वाईट नसते. तुम्ही कसा उपयोग करता यावर ते अवलंबून असतं. सर्जनची नाईफ ऑपरेशन करेल आणि कुणा क्रूर माणसाच्या हातात आली तर भोसकायला पण उपयोगी येईल. बेनाड्रील, कुमारी आसव किंवा कुठलंही आसव म्हणजे काय असतं असा दावा करणारे लोक महान असतात. किती प्रमाणात घ्यायचं हे तज्ञानी ठरवलं की त्याला औषध म्हणतात. नाहीतर मग त्यांनी दोन चमचे रम घ्या सकाळ संध्याकाळ असं सांगितलं असतं की पण आपण आपल्या फायद्याची माहिती नेहमी ओरडून सांगतो. मुळात दारू वाईट नाही. तुम्ही तिला कसं घेताय यावर ते अवलंबून आहे. मी मागे स्कॉचवर लिहिलं होतं. मला तो प्रकार फार आवडतो पण म्हणून मी रोज संध्याकाळी घरी गेल्यावर बाटली उघडून बसत नाही. बरेच वर्षात तर मी बारमध्ये पण गेलेलो नाही, परवडत नाही. मजा घेता यायला पाहिजे. मला येते. माझं तिच्यावाचून काही अडत नाही, तिचंही नाही. आमचं लिव्ह इन रिलेशनशिपसारखं आहे, एकमेकांवर बंधनं नाहीत. डोळा मारला, दोघ हो म्हणालो की सहवास चालू. तो थोडक्यात उरकला की गोडी रहाते. एकमेकांचा कंटाळा आला, शिसारी आली की मजा गेली.  

माझ्या दृष्टीने स्कॉच हा धांदलीचा विषयच नाही. माहौल पाहिजे. स्नेहभोजनाची गर्दी इथे कामाची नाही. चारजण म्हणजे सुद्धा गर्दीच ती. एकेमेकांचे चेहरे स्पष्टं दिसतायेत एवढा पुरेसा उजेड, तोंडात टाकायला जीभ चुरचुरेल अशी लसणाची तिखट शेव, खारे काजू, तळलेला बांगडा, सुरमईचा तुकडा, शिंगाड्याच्या पिठातले तपकिरी दाणे, चिजलिंगची मुठीनी खायला बिस्किटे, एवढं पुरेसं आहे. राजकारण, अनुपस्थित व्यक्ती, वैयक्तिक दु:खं, अडचणी यावर बोलायची ही वेळ नव्हे. मस्तं गाणी, संगीत, नविन काहीतरी वाचलेलं, ऐकलेलं सांगावं, ऐकावं. उद्या सुट्टी आहे, थोडी शिरशिरी आल्यासारखं वाटू लागलंय, गर्भारबाई सारखं शरीर आळसावत चाललंय, पाय ताणले जातायेत, ग्लास खाली ठेवून परत उचलायला कष्ट पडतील म्हणून तो तसाच हातात धरून त्याच्यावर माया माया केली जातीये. बास, यापेक्षा काही नाही लागत वेगळं स्वर्गात चक्कर मारायला.

स्कॉच जिभेवरून पोटात जाते तो अनुभवण्याचा विषय आहे. आळवून म्हटलेल्या ठुमरीचा मजा, बेगम अख्तरच्या 'जाने क्यू आज तेरे नामपे रोना आया'चा दर्द, हुरहूर, तलतची 'शामे गमकी कसम'ची कंपनं, सैगलचं 'बाबुल मोरा', किशोरचं 'ये क्या हुआ', मुकेशचं 'कही दूर जब' त्यात वस्तीला आहेत. तिचा घोट कसा जिभ मखमलीनी ल्यामिनेट करून जातो. तो थंड प्रवाह इच्छित स्थळी पोचेपर्यंत गळ्यातून मिनिएचर मोरपिसं फिरवत जातो. न चावणा-या गोड काळ्या मुंग्या गुदगुल्या करत नखशिखांत फिरतात. दोनचार आवर्तनं झाली की तुम्हांला नील आर्मस्ट्रोन्ग झाल्यासारखं वाटू शकतं. तुम्ही चंद्रावर उतरला आहात, चंद्रावरचं काळं कुत्रं सुद्धा तिथे नाहीये, वजनरहित अवस्था, तरंगणं चालू डायरेक्ट. एवढी स्वस्तातली चांद्रसफर इस्रोच्याही आवाक्याबाहेरची आहे.  

पहिल्या वाक्यात म्हटलं तसं. शेणच ते पण श्रावणी केली असं समजतो कारण क्वांटिटी तेवढीच असते माझी. आपण कुणाला पी म्हणत नाही, आग्रह करत नाही. तसंही माणूसघाणेपणा इथे कामाला येतो, कुणाला नादी लावल्याचा आरोप नाही, काही नाही. तिढे सोडवायला, स्वतःवर प्रेम करायला, आठवणीत रमताना, अशक्यं स्वप्नं बघायला आणि जगाशी खोटं बोलून झालं की मनाला उत्तरं देताना स्कॉच थोडी बरी पडते एवढं मात्रं नक्की. :)

जयंत विद्वांस

(शेवटचे दोन पॅरा 'स्कॉच' पोस्ट मधून, आधी वाचले असतील तरी परत वाचलेत म्हणून काही बिघडत नाही :P )

No comments:

Post a Comment