Monday 8 August 2016

खेळ न झालेल्या रविवारचा वृत्तांत...

(आमच्या खास वार्ताहराकडून...)

सतत पडत असलेल्या पावसामुळे आज एमसीजीवर खेळ होऊ शकला नाही. आमच्या प्रतिनिधीनी उपग्रहामार्फत केलेल्या हेरगिरीमुळे घराघरात नेमकं काय घडलं याचा वृत्तांत देत आहोत. या वयात पाय घसरणं चांगलं नाहीये अर्थातच त्यामुळे निसरड्या मैदानावर खेळ झाला नाही हे बरेच झाले. ज्यांना यायचंच नव्हतं त्यांनी समूह संचालक श्री.अजय मराठे यांना 'पाऊस असल्यामुळे येत नाही' असे मेसेजेस टाकले.

दत्ता मोरे घरातल्याघरात दोनच्या जागी तीन पळण्याचा सराव करताना आढळले. खालून थोडे पाय कमी करून घेता आले तर फरक पडेल असा विचार त्यांनी बोलूनही दाखवला. गेल्या दोनेक रविवारची नेत्रदीपक फलंदाजी आणि वृत्तांतातील कौतुक यामुळे आपण मोठ्या चेंडूऐवजी लहान चेंडू हातात धरून करिअर करायला हवं होतं याची चुटपुट त्यांना लागून राहिली. पण साईझ डज मॅटर. मोठे चेंडू सगळ्यांनाच आवडतात. प्रशांत शिरोडकर हे चारपाच गाद्या कडेला लावून झेलंदाजीचा सराव करताना आढळले. दहापैकी तीनवेळा गादीवर न पडता ते झेल घेण्यात यशस्वी झाले. केतन तेरेदेसाई हे एक प्रतिज्ञा पाठ करताना आढळले. 'क्रिकेट हा माझा आवडता खेळ आहे. मैदानावरील सर्व खेळाडू माझे बांधव आहेत. मैदानावरच्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या चिडखोरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. मी ज्या टीममध्ये आहे त्यातील खेळाडू आउट नाही असे सांगून त्यांचा मान ठेवीन आणि तरीही प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. मी ग्राउंडवर कमरेतून वाकण्याची आणि जलद पळण्याची प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी ह्यांतच माझे सौख्य सामावले आहे'. 

'गली'तले सुप्रसिद्ध क्षेत्ररक्षक मनोज गोडबोले हे घरात पॅसेजमध्ये झेलांचा सराव करताना आढळले. नंतर आरशासमोर उभे राहून उत्तम फेक करूनसुद्धा धावचीत असूनही न दिल्यास राग, नैराश्य काबूत ठेवण्यासाठी त्यांनी योगसाधना केली. अविनाश रहाळकर एक ते शंभर आकडे न चुकता हाताच्या आणि पायाच्या बोटांवर मोजण्याचा सराव करत होते. उदा.साधारण अंकगणितात तीन रन्स काढल्यावर छत्तीस नंतर एकोणचाळीस होतात पण त्यांच्या हिशोबात ते चाळीस किंवा एक्केचाळीस होत होते. त्यांनी अजय मराठे यांना फोन लावल्यावर त्यांनी 'तू मगाचचे दोन धरले नाहीत, त्रेचाळीस होतात' असं सवयीने सांगून टाकलं. आपली अफरातफर खूपच कमी आहे याचा अंदाज आल्याने रहाळकर आनंदी झाले. मिहीर भागवत, समीर व्होरा, आकाश मेहता यांनी खिडकीतून बाहेर डोकावून बघितलं आणि 'पाऊस पडतोय, खेळ काही होणार नाही, चला पैसे तरी छापून येऊ' असं म्हणून ते तिघेही आपापल्या घरातून घराबाहेर पडले. 

नितीन करमरकर यांच्या घरी मात्रं अत्यंत वेगळं चित्रं होतं. आजूबाजूची सगळी लहान मुलं त्यांच्याभोवती गोलाकार बसली होती.  स्वतः:चे प्रत्येकी तीन ते चार धावचीत, यष्टिचीत, झेल आणि सामना जिंकून देणा-या खेळ्या यावर ते स्वतः भाष्यं करत होते. दर वीस मिनिटांनी घरातला २०१४ साली आणलेला व्हॉलीनीचा स्प्रे जेमतेम फवारणी केल्यासारखा ते खांद्यावर मारत होते. एका मुलानी 'काका, गेले चार महिने आम्ही हेच ऐकतोय, खरे किस्से सांगा ना काही' म्हटल्यावर त्याला त्वरित घराबाहेर काढण्यात आले आणि याला परत बोलावू नका रे परत असं म्हटल्यावर इतर मुलं पण लगेच 'काका आम्हांला पण काढा ना घराबाहेर' असं म्हणत पळून गेली. मयुरेश बुधकर इंग्लंडसारखं वातावरण असल्यामुळे सतत ग्लास, बर्फ, स्कॉचची बाटली शोधत होते. बायकोनी फक्तं 'बघितल्यावर' त्यांनी 'अडुळसा कुठे ठेवलंय गं' असं विचारत बाजू सावरून घेतली. 

रोहित दणाणे आणि प्रविण देवधर घरात टोलेजंग षटकार मारायचा सराव करताना आढळले. साधारण चारसहा कपबश्या, दोन डबे आणि एक एलईडी बल्ब जमिनीवर आल्यामुळे रोहित दणाणे नंतर दरवाज्याच्या बाहेर उकिडवे बसल्याचे दिसले. सुशांत पाटील यांनी जुने दिवस आठवून त्याला स्वतः:चा डबा जिन्यात खायला दिला. चारनंतर घरात घेणार आहे असं तो म्हणाल्याचं पाटील यांनी सांगितलं. देवधर यांना झालेल्या मारहाणीच्या जागा ते गरम पाण्याची पिशवी घेऊन शेकत बसले होते. पुढचा आठवडा त्यांना कंपनी कँटीनमध्ये जेवायला लागणार असल्याचं त्यांनी आमच्या प्रतिनिधीला स्काईपवर सांगितलं. नितीन अंमलदार आणि त्यांचे चिरंजीव यांचं लुटुपुटुचं भांडण चालू होतं. 'रनाउट' ही एकांकिका त्यांनी सादर केली. मुलानी शेवटी हात टेकले आणि 'बाबा, नेहमीप्रमाणे तू जिंकलास' असं म्हटल्यावर नाटक संपलं. जेवताना आणि जेवण झाल्यावर फॉर अ चेंज म्हणून ऑफिस ऐवजी घरी वामकुक्षी घेताना पण ते बॅट घट्ट धरून झोपले होते. 

श्री.अजय मराठे खेळ न झाल्यामुळे खट्टू होऊन साश्रू डोळ्यांनी खिडकीत उभे होते. डॉ.मनोज गद्रे यांनी त्यांच्या घराच्या खिडकीतून ते करुण दृष्यं पाहून त्वरित छत्री घेऊन अजय मराठे यांच्या घरी प्रयाण केले. एवढया लांबून भरलेले डोळे दिसत असतील तर चार फुटांवरून त्यांना रनाउट दिसला नसेल का? पण त्यांच्या गरीब स्वभावाचा फायदा घेऊन काही लोकांनी त्यांना मैदानावर बोलू दिलं नाही हा ताजा प्रसंग निंदनीय आहे. गद्रे यांनी फोन लावून हिंदीतून दोन पोहे आणि दोन कॉफी याची ऑर्डर दिली आणि 'मैदानावरील वाढती असहिष्णूता आणि त्यावरचे उपाय' यावर त्यांनी चर्चा केली. अजय मराठे यांनी एटीकेट्स न पाळता सलग चार जांभया दिल्यामुळे गद्रे पोह्यांचा शेवटचा घास घेऊन घरी गेले.  

नंतर उपग्रह श्रीश्रीश्री रवी उटगीकर यांच्या घरावर स्थिर करण्यात आला. पेपर वाचून झाल्यावर सारसबागेतल्या स्त्रीभक्तं बघायच्या राहिल्याचा खेद त्यांच्या चेह-यावर दिसत होता. त्यांनी फक्तं आजची सुट्टी कशी घालवायची याची स्ट्रॅटेजी ठरवूयात म्हटल्यावर घरात एकदम गडबड उडाली. मुलानी अभ्यासाची पुस्तकं काढली, मित्राला फोन लावला आणि कॉल लागलेला नसतानाही 'मी येतोय तुझ्याकडे' म्हणून तो घाईघाईने घराबाहेर पडला. बायको किचन मध्ये गेली आणि डॉगीनी पळत येऊन भिंतीवर तीनचार वेळा डोकं आपटून घेऊन तो निपचित पडला. त्वरेने उटगीकर त्याला घेऊन (डॉगीचे) फॅमिली डॉक्टर श्री. विनायक लिमये यांच्याकडे गेले. उटगीकर यांनां बाहेर थांबायला सांगून लिमये यांनी डॉगीच्या कानात 'अरे दुस-याचं दु:खं बघावं, प्राजमधला स्टाफ प्रत्येक रविवार स्वातंत्र्यदिन असल्यासारखा एन्जॉय करतो, त्यांना सहा दिवस मानसिक त्रास असतो, तुला तर एकंच दिवस' असा डोस दिला. डॉगी बराच वेळ त्यांच्या खांद्यावर अश्रू ढाळून शेवटी उठला. प्रिस्क्रिप्शनमध्ये 'स्ट्रॅटेजी' हा शब्दं पुढचे चार आठवडे घरात उच्चारू नये, एवढंच पथ्य पाळण्याचं त्यांनी लिहून दिल्याचं कळतं. 

मंदगती गोलंदाज नंदू बापट घरात आपण ज्या टीममध्ये आहोत त्यांना जिंकायला समजा तीन धावा हव्यात तर झेल कसा नैसर्गिकरित्या सोडावा, चेंडू पायातून मागे कसा जाईल आणि संघ विजयी होईपर्यंत चेंडू कसा थ्रो करू नये याचा सराव करताना दिसले. चेहरा अत्यंत निरागस, निष्पाप वगैरे दिसण्यासाठी त्यांना अतोनात कष्ट पडले असावेत कारण चेह-याचे स्नायू दुखावल्यामुळे त्यांनी गालाला शेवटी आयोडेक्स लावलं. दुसरे अतिमंदगती गोलंदाज जयंत विद्वांस यांनी त्यांना फोन करून चेंडू अजून कसा वळवता येईल (तुझा शेवटचा कधी वळला होता? इति नंदू बापट), मिहीरच्या वेगाला आपण किती साली गाठू शकू, चंदू खिरीड यांचा आवाज नेमका कुठून येतो, त्यानी खरंच वेग वाढतो का वगैरे विषयांवर चर्चा केली. सर्वात शेवटी नंदू बापट यांनी गोलंदाजीचं मर्म सांगितलं, 'एमसीजीवर बॉल मागे गेला पाहिजे बॅट लागायच्या आधी, बाकी चेंडू वळणे, फ्लाईट देणे, (बॉल) कट करणे, चेंज ऑफ पेस या सगळ्या अंधश्रद्धा आहेत'. 

(सदर वृत्तांत हा आमच्या खास प्रतिनिधीकडून आलेला आहे. त्यामुळे काही वाद निर्माण झाल्यास संपादक त्याला उत्तर देण्यास बांधील नाहीत. प्रतिनिधीचे नाव गोपनीय आहे तरी चौकश्या करू नयेत)

जयंत विद्वांस

No comments:

Post a Comment