Monday 8 August 2016

चमक...

त्याचं खरं नाव श्रीनिवास दत्तात्रय मोघे पण आमचं गावं त्याला मयत्या बामण किंवा मयत्या भट म्हणतं. एवढं सुंदर नाव पण गावानी पार त्याची रया घालवली. दहावा, तेरावा, श्राध्द एकदा त्याच्या मागे लागलं ते लागलंच. शेजारच्या एखाद्या गावात नाईलाज म्हणून, अगदीच कुणी मिळत नाही म्हणून, क्वचित त्याला सत्यनारायण वगैरे मिळायचा. बाकी पैसा मिळवून देणारी वास्तुशांत, लघूरूद्र, शांती, बारशी, लग्नं ही भिक्षुकी त्याच्या नशिबात नव्हती, मिळालं एखादं काम तरी दुर्मिळ योग तो. एखाद्या कलाकारावर जसा एक शिक्का बसतो आणि दुस-या भूमिकेत त्याला प्रेक्षक स्विकारत नाहीत तसं काहीसं झालं होतं त्याचं. पण पितृपंधरवड्यात त्याला उसंत नसायची, बाकी कुणी गेलं तरंच काम त्याला. शेजारपाजारच्या चारपाच गावात पण तोच जायचा. मामलेदारासाठी लोक थांबतात तसे लोक त्याच्या येण्याकडे डोळे लावून असायचे अगदी. श्री अगदी मिटल्या तोंडाचा होता. मंत्र म्हणताना जे काय तोंड उघडेल तेवढंच. 

सव्वापाच फुटाच्या आसपास उंची, लख्ख गोरा रंग, कायम दाढी व्यवस्थित केलेली, शाईने भरल्यासारखे काळेभोर डोळे, पट्टीनी आखल्यासारखं सरळ नाक, भटजी असून पोट अजिबात न सुटलेला, सडपातळ शरीरयष्टी, कायम झिरो मशिन मारलेलं डोकं आणि मागे इंचभर शेंडी. श्री देखणाच होता. माझ्याच वयाचा तो. आम्ही दहावीपर्यंत एकाच वर्गात होतो. नंदादीप जसा कायम तेवता असतो तशी त्यांच्याकडे जगण्यासाठीची ओढाताण कायम तेवती असायची. त्याचे वडील तालुक्याच्या गावाला प्राथमिक शिक्षक होते. चिमूटभर पैशात अजून एक थेंब पडावा म्हणून ते भिक्षुकीही करायचे. आमची दहावीची परीक्षा झाली त्याच वर्षी कांडर चावून त्याचे वडील गेले. नंतर मी मुंबईला शिकायला गेलो, श्री तिथेच राहिला. पंचवीसेक पोती तांदूळ निघेल एवढा शेताचा तुकडा, बारापंधरा आंबा, काजू, फणसाची झाडं, नारळ आणि स्वतःचं चि-यात बांधलेलं अनेक पिढ्या चालत आलेलं घर, एवढीच काय ती त्याची इस्टेट. त्याची आई सुशीला, ती बारमाही आजारी असायची. सतत खोकायची आणि हिरवं, पिवळं थुंकायची. जीव जात नाही म्हणून कंटाळलेली असायची ती कायम. खोकून कंटाळा आला की ती नशिबाला आणि देवाला शिव्या द्यायची.

श्री अभ्यासात तसा बरा होता. बारावी करून मग बी.ए.,बी.एड.करून शिक्षक व्हायचं होतं त्याला. आम्ही ब-याच वेळा या विषयवार नदीवर पाण्यात दगड मारत बोलत बसायचो. खूप त्रोटक बोलायचा तो पण नेमकं बोलायचा. 'सात वर्ष लागतील, पण मी बारावी झालो की करेन काही नोकरी, जमेल मला?'. 'जमेल रे, हा हा म्हणता दिवस जातील'. 'दहावीच्या सुट्टीत बघतो, तालुक्याला स्टेशनरीच्या दुकानात पार्ट टाईम'. 'अरे होईल सगळं नीट'. एखाद्या झाडाचं जसं बोन्साय होतं ना तसं याचं उलटं झालं होतं. लहान रोप असतानाच तो झाड झाला होता. डोळ्यात आणि डोक्यात सतत काळजी. तसाही त्यामुळे तो अबोलच असायचा पण वडील गेल्यावर तर श्री अजूनच मुका झाला. प्राथमिक शिक्षकाकडे किती पुंजी असणार. अकाली प्रौढत्व आलेला पंधराएक वर्षाचा श्री स्टेशनरीच्या दुकानात लागला खरा पण तिथे असा कितीसा पैसा मिळणार. मधेच शेतीची कामं, आईचं आजारपण, कायम पैशाची ओढाताण यातंच त्याची उमेद आणि वय दोन्ही नासून गेलं. त्याच्या वडिलांबरोबर जे भटजी होते त्यातल्या एकानी त्याला भिक्षुकी शिकवली म्हणून थोडं फार बरं झालं. वडील गेल्यावर दिवसाआड मिळणारं जेवण रोज मिळू लागलं. 

तो एकदा मयताचा विधी करायला गेला, मग कायम जातंच राहिला. त्यामुळे लोकांनी परस्पर तो शुभकार्याचा भटजी नाही हे ठरवून टाकलं आणि त्याचा उत्कर्ष थांबला. कुणाकडेही तो पैसे एवढेच द्या असं मागायचा नाही, गरीब लोकं दोन दिवस उशिरा का होईना पण आणून द्यायचे, प्रतिष्ठित, ऐपत असलेली माणसं एवढ्यात कोण मरणार आहे परत नाहीतरी असा धूर्त विचार करून निम्मेच पैसे त्याला द्यायचे, ते ही गड्याकरवी पाठवून. श्री कुणालाच काही बोलायचा नाही. माझ्या लग्नाला तेवढा तो मुंबईला आला होता. नाहीतर आईमुळे त्याला कुठेच जाता यायचं नाही. त्याला मुंबई दाखवायची असं मी गावाला गेलो की कायम बोलण व्हायचं. पण लग्नाच्या गडबडीत काही जमणं शक्यं नव्हतं. ते राहिलं ते राहिलंच. नंतर माझंही गावाला जाणं येणं कमी होत गेलं. एखादी वस्तू अचानक हरवावी पण अमुक एक ठिकाणी ठेवल्याचं आठवावं ना तसा श्री माझ्या आयुष्यातून कुठे आहे हे माहित असलं तरी हरवल्यासारखा झाला. गावाहून कुणी आलं तर उडत उडत त्याच्याबद्दल कळायचं. होळी, गणपतीला जाणंही कमी होत गेलं आणि मग पेन्सिलनी लिहिलेलं पुसट व्हावं तसा श्री ही पुसट झाला. 

परवा गावी गेलो होतो आठ दिवसांकरता. जमिनीचं काम होतं म्हणून. रोज संध्याकाळी श्री कडे जायचो गप्पा मारायला. आता मी पंचेचाळीशी पार केली म्हणजे श्री ही अर्थात तेवढ्याच वयाचा. काळवंडलेला वाटला जरा. डोळ्याखाली काळी वर्तुळं दिसत होती. माझं पोट सुटलंय, तो मात्रं आहे तसा सडपातळ आहे अजून. काळभोर डोळे कधीकाळी चमकदार होते त्याचे खरंतर पण आता अगदी निस्तेज काजव्यासारखे झाले होते. 'ये रे, किती वर्षांनी आलास, बरं वाटलं, किती दिवस आहेस'. 'अरे, आत तर येऊ दे, जमिनीच्या कामासाठी आलोय, आहे आठ दिवस'. 'मग ये की रोज गप्पा मारायला, जेवायलाच येत जा इथे रात्रीचा, सकाळी जा आपल्या कामाला'. 'चालेल, पण तुला कशाला त्रास, दोन माणसांचा स्वयंपाक उगाच'. ' असू दे रे, आई गेल्यापासून मी एकटाच जेवतोय वर्षभर भुतासारखा, आणि भातामटी करायला काय कष्टं मोठे? येत जा, वाट बघतो', मग मी मुंबईला परतेपर्यंत जात राहिलो त्याच्याकडे. बोळा निघावा आणि तुंबलेलं पाणी मोकळं व्हावं तसा श्री बोलत होता आठ दिवस. 

'मला वर्षभर भात, भाकरीसाठी लागेल एवढा तांदूळ ठेवतो आणि उरलेला विकतो. आंब्या, फणसाचे, काजू, नारळाचे येतात थोडेफार पैसे आणि सटरफटर भिक्षुकी. चाललंय. तुला गंमत सांगतो, आईकडे चाळीसेक तोळे दागिने होते, तिला तिच्या आईने, सासूने दिलेले. मरायच्या आधी पंधरा दिवस मला कडीकोयंड्याचा कुलूपबंद पितळी डबा दिला आणि हे मोड म्हणाली. आयुष्यंभर पैसा नाही म्हणून औषधं कमी घेत राहिली, मेलीही नाही आणि जगलीही नाही नीट. मला मरू दे पण तिच्या औषधाला गेले असते सगळे तरी मला चाललं असतं. मी फक्तं हसत राहिलो बघ त्या दिवशी. मला खूप कीव आली तिची. कसला मोह पडतो रे एवढा सोन्याचा? सुनेकरता ठेवले म्हणावेत तर ते ही नाही. मी शिक्षक झालो असतो तेंव्हा मोडले असते तर. परत तेवढेच केले असते मी उमेदीने. या वयात कुठे विचारू तिला, का ठेवलेस दडवून म्हणून. कदाचित तिच्या उशिरा चूक लक्षात आली असावी. उपभोग घेणं सुद्धा नशिबात लागतं रे. दोनेक आठवड्यात गेलीच ती त्यानंतर'.  

'पण एवढ्या वर्षात कधी तिनेही माझ्या लग्नाचा विषय काढला नाही, मी ही नाही. आमच्या दोघांच्या तोंडातच दोनवेळा पडेल की नाही याची भ्रांत तिथे अजून एक तोंड आणि मग निसर्गनियमाने अजून नंतरची तोंडं कुठे  वाढवणार? आणि एकदा कुठलीही भूक मेली ना की ती कायमची मरते बघ. निदान चार नातेवाईक असतील तर विषय निघतो, कुणीतरी पुढाकार घेतो, इथे कुणीच नव्हतं. कोण विषय काढणार? आणि विचारून 'नाही' ऐकण्यापेक्षा काहीवेळा नसलेलं बरं असतं बघ. होते सवय. असो! कुणालाच सांगितलं नाहीये मी हे. सोनं मोडून बँकेत ठेवलेत पैसे. व्याज चांगलं येतं. भरपूर पुस्तकं आणलीयेत, ती वाचतो दिवसरात्रं. लोकांचा समज आहे माझं अवघड आहे एकूण, मी ही तो समज दूर करत नाही. अरे इतक्या वर्षांची सवय लागलीये, मन मारून, पोट मारून जगायची, पैसा उडवता येतंच नाही बघ'. मला फक्तं आवंढा आला. इथे रोजचे जगण्याचे क्षुल्लक अडथळे आम्हांला किती भयंकर वाटतात आणि इथे कुणाच्यातरी चिकटपणामुळे, विक्षिप्तपणामुळे आयुष्यं नासून जातं तरी चेह-यावर विषादाची सुरकुतीसुद्धा नाही.

शेवटच्या दिवशी तो म्हणाला, 'एवढा खीर वड्याचा सिझन मारला की येतो मुंबईस, सुट्टी काढ, चांगले टॅक्सीने फिरू सगळीकडे, खर्च सगळा माझा हं पण. वर्षातून एकदा तरी तुझ्याकडे येणार, सगळी मुंबई झाली पालथी घालून की मग दुसरं शहर बघू'.  'तू ये तर, आधी कळव फक्तं म्हणजे तशी सुट्टी टाकायला मला' असं सांगून मी निघालो. इतक्या वर्षाच्या आयुष्यात पहिल्यांदाच मला त्याच्या काळ्याभोर डोळ्यात विलक्षण चमक दिसली, वर्षातून चार दिवस सुट्टी घेऊन ती कायम ठेवणं माझ्या हातात निश्चित होतं, ते मी करणार हे नक्की. 

जयंत विद्वांस

No comments:

Post a Comment