Wednesday 24 August 2016

सत्तर एमएमचे आप्त (१६)… परवीन बाबी…

शेरखानजी पश्तुनी वंशाचा पठाण होता. शहाजहानच्या काळात ते भारतात आले. त्यानी भारतात १६५४ ते १६९० 'बाबी'राज्यं चालवलं, मग नंतर उरलेले इथेच राहिले. चितोडच्या राणा विरुद्ध केलेल्या कामगिरीबद्दल हुमायूंनी त्याला 'बाबी' किताब दिला होता. मराठ्यांनी सगळा गुजरात ताब्यात घेतला तरी जुनागढ आणि इतर तीन सुभे 'बाबी'कडे राहिले. त्या वंशातला जुनागढचा शेवटचा नवाब फाळणी  झाल्यावर पाकिस्तानात निघून गेला. परवीन त्याच वंशातली होती. आत्ता जिवंत असती तर ती ६७ वर्षाची असती. तिचे वडील ती दहा वर्षाची असतानाच गेले. फिल्म इंडस्ट्रीमध्ये उच्चंशिक्षित लोक कमी असायचे किंवा कमी यायचे तेंव्हा. अमिताभ बी.एस.सी.आहे, गोगा कपूर एम.ए.(पॉलिटिक्स), बलराज सहानी एम.ए.(हिंदी) आणि परवीनसुद्धा एम.ए.(इंग्लिश लिटरेचर) होती. 

ब-याच जणांना सेहवाग नविन आला होता तेंव्हा तेंडुलकर खेळतोय का सेहवाग आहे हे पटकन कळायचं नाही तसंच काहीही कारण नसताना परवीन आणि झीनतमधे घोळ व्हायचा. पण परवीन होती मात्रं खानदानी सुंदर अगदी, वयात आल्याची जाणीव तिनी आणि झीनतने करून दिली होती. तिच्याकडून लोकांनी, समीक्षकांनी अभिनयाची अपेक्षा कधीच ठेवली नव्हती. त्यामुळे ते आरोप तिच्यावर झालेच नाहीत फार. पण ती बाहुलीही नव्हती, तिचा प्रेझेंस रॉयल असायचा, तीला मातीत घोळून काढली असती तरी ती गावकी गोरी कधीच वाटली नसती. श्रीमंत घरातली, थोडी आगाऊ, शिक्षित, बिनधास्त मुलगी वाटायची ती. शशीकपूर बरोबर 'सुहाग'मधे ती म्हणते ना 'घरमें हो मुश्किल, तो दफ्तर ले चलो', तशीच वागली ती आयुष्यंभर, निर्बंध नसलेलं, मन मानेल तसं. महेश भट, कबीर बेदी, डॅनी बरोबर तिचे अल्पकालीन सहवास होते. अमिताभबरोबर तिचं सूत होतं अशीही बातमी होती. इतर नावंही तिला जोडली होती. एकदा तुमचा स्टँप प्रसिद्ध झाला की लोक परस्पर कुठल्या पाकिटाला चिकटवतील सांगता येत नाही.     

महेश भटनी त्यांच्यावर आधारित 'अर्थ' काढला. ती गेल्यावर २००६ ला 'वो लम्हे' काढला, मुलीला घेऊन तिच्यावर 'फिर तेरी कहानी याद आयी' काढला पण हे सगळं त्यानी सांगितलेलं किंवा त्याची बाजू, कितपत खरी त्यालाच माहित, तसाही तो विश्वासार्ह माणूस नाहीये म्हणा. अमिताभ मला मारायचा प्रयत्नं करतोय असे आरोप तिने  वेडेपणात केले त्यामुळे फार गाजावाजा झाला नाही. रूतलेलं कधी वर तरंगेल सांगता येत नाही. 'टाईम'च्या मुखपृष्ठावर झळकलेली ती पहिली बॉलीवूड अभिनेत्री होती. ७३ ला क्रिकेटियर सलीम दुराणी बरोबरचा 'चरित्रं' फ्लॉप गेला पण परवीनची नोंद झाली आणि मग ७४ ला तिचा पहिला सुपरहिट आला 'मजबूर'. नंतर तिचे बच्चनबरोबरचे 'अमर अकबर', 'कालिया', 'शान', 'खुद्दार', 'दिवार', 'महान', 'देशप्रेमी', 'दो और दो पांच', 'सुहाग', 'नमकहलाल', 'काला पत्थर' (शेवटचे चार शशीची हिरोईन) सगळे चित्रपट हिट किंवा सुपरहिट झाले. 

'खुद्दार'मधल्या 'मच गया शोर'मधे नथ घालून नाक मुरडणारी, नऊवारी घातलेली परवीन काय अप्रतिम देखणी दिसलीये, 'दिवार' मधली अनिता. त्यात तिनी अभिनय केला होता खरंच. मूल होणार, लग्नं होणार म्हणून आनंदलेली अनिता तिनी छान दाखवली होती. यश चोप्रा डायरेक्टर म्हणून चांगला असेल पण तो पार्शल होता. श्रीदेवीसाठी 'चांदनी' मधला जुहीचा रोल कापला (त्या बदल्यात तिला 'डर' दिला), 'डर'मधे त्यानी शाहरुखसाठी सनीचा रोल कापला. 'सिलसिला'चं ओरिजिनल कास्टींग परवीन आणि स्मिता पाटील असं होतं. मग ते सगळं बारगळलं, कुणी सांगावं स्मिताच्या प्रेझेंसनी वेगळी परवीन दिसलीही असती कदाचित. फार अभिनयक्षमता नसताना तिला यश मात्रं अफाट मिळालं. सगळं भरघोस मिळाल्यावर काय करायचं आता नेमकं हे उमजलं नाही की नैराश्य येत असावं. विनोदखन्ना असाच बायको, मुलं सोडून रजनीशकडे गेला (गेला नसता तर बच्चनला टफ होता तो) तशी परवीन ८३ ला शांतीच्या शोधात देशोदेशी फिरायला लागली. 

८९ ला ती भारतात आली ते फक्तं तिचं नाव घेऊन, हवा भरलेल्या फुग्यासारखी ती जाड झाली होती. तिला पॅरानॉईड स्किझोफ्रेनिया झालाय असं लोकांचं म्हणणं होतं आणि तसं काही नाहीये असं तिचं. त्यामुळे तिनी नातेवाईकांसकट सगळ्यांशी संबंध कमी केले आणि ती अजूनच एकटी पडली. बिल क्लिंटन, रॉबर्ट रेडफोर्ड, प्रिन्स चार्ल्स, मोसाद, केजीबी, सीआयए, सीबीआय, काही गव्हर्नमेन्टस मला मारायला टपलीयेत. अमिताभ इंटरनॅशनल गँगस्टर आहे, त्याच्या गुंडानी मला एका बेटावर नेऊन माझ्या कानाच्या जवळ सर्जरी करून एक चीप घातलीये असे आरोप तिनी केल्यावर ती शहाणी राहिली नव्हती हे नक्कीच होतं, ते कळायला डॉक्टर कशाला हवा होता. बच्चनचे सिनेमे केबलवर दिसले तरी ती व्हायोलंट व्हायची म्हणे. मुस्लिम परवीन नंतर ख्रिश्चन झाली पण धर्म बदलला म्हणून मन:शांती मिळत नाही. निदान चार पैसे राखून असल्यामुळे ती रस्त्यावर आली नाही एवढं मात्रं झालं.   

दैव माणसाला कुठल्या मार्गानी नेईल सांगता येत नाही. मधुमेहामुळे तिच्या डाव्या पायाला गँगरीन झालं होतं, त्यामुळे ती व्हीलचेअर वापरायची. तीन दिवस दरवाज्याबाहेरचं दूध, पेपर उचललं न गेल्यामुळे कुणीतरी पोलीस बोलावले आणि त्यांना तीन दिवसापूर्वी मेलेली, पायाला बँडेज असलेली, वस्तू अस्ताव्यस्त पडलेली, पोटात अन्नाचा कण नसलेली श्रीमंत परवीन सापडली. ती मेल्यावर संपत्तीवर हक्क सांगायला मरताना एकटी असलेल्या परवीनच्या नातेवाईकांची झुंबड उडाली. तिच्या मृत्युपत्राप्रमाणे सत्तर टक्के संपत्ती गरीब 'बाबी' लोकांच्या मदतीसाठी ट्रस्टला, वीस टक्के तिचा मित्रं मुरादखान बाबीला आणि उरलेले दहा टक्के ख्रिश्चन मिशनरीला दान गेले. सगळं वाटून ती २३ जानेवारी २००५ ला तिच्या आईच्या शेजारी मातीत विसावली. पुढे पाच वर्षांनी जागा संपल्यावर नविन येणा-यांसाठी जागा करायला सांताक्रूझची दफनभूमी खोदली गेली त्यात ती, मधुबाला, रफी, तलत, साहिर आणि नौशादचे अवशेष दुसरीकडे हलवले गेले. 

एरवी कधी भेटले नसतील सगळे एकत्रं पण निदान या कारणानी एकमेकांत मिसळले असतील. दोन सौंदर्यवती, दोन गायक, एक शायर आणि एक संगीतकार. मातीत गेलं एकदा की काही नाही यातलं, गरीब श्रीमंत, सुंदर, कुरूप सगळेच सारखे. परवीन काय आपण काय, मातीत जायच्या आत नाव राहील असं चांगलं काहीतरी करून जाता यायला हवं एवढं खरं. 

जयंत विद्वांस  

No comments:

Post a Comment