Monday 5 August 2013

मला सुंदर दिसलेल्या ललना (५)…सुलोचना दीदी आणि जयश्री गडकर…

सुलोचना दीदी आणि जयश्री गडकर… 
प्रत्येक चित्रपटसृष्टीचा एकेक अंगभूत गुणविशेष असतो. नायिकांच्या बाबतीत तर ते प्रकर्षानं जाणवतं. दक्षिणेकडे अशक्तं नायिका दिसणार नाही, हिंदीत सतत उकाड्यात वावरल्यासारखे कमी कपडे किंवा कपड्यांचा फारसं भान नसलेल्या नायिका आणि मराठी चित्रपटात सोज्वळ चेहरे असतातच आणि मादकपणा एकूणच कमी अशा नायिका (आत्तापर्यंत तरी ही ओळख थोडीफार टिकून आहे).

मला मराठी चित्रपटात सगळ्यात सुंदर वाटलेल्या दोन नायिका, पहिल्या सुलोचनाबाई आणि दुस-या जयश्री गडकर. एक सोज्वळ सौंदर्य आणि एक मर्यादशील पण मादक देखणेपण. सुलोचना बाईंचा चेहरा अजूनही तसाच आहे, सात्विक, समाधानी, सोज्वळ पण सुंदर, परत परत बघावा असा. आपल्याकडे एकदा शिक्का बसला की तो पुसला जात नाही. दीदींना एका चाहत्यानी  'भाऊबीज' मधल्या 'चाळ माझ्या पायात, पाय माझे तालात' वर नाच केल्याबद्दल प्रेमापोटी रागे भरलं होतं - "तुम्ही असली गाणी करत जाऊ नका".  पाहायला गेलं तर गाण्यात काही वाईट नाहीये त्या पण ते दुसरं कुणीतरी करावं, यांनी नाही, हे प्रेम आहे.


मोठी वहिनी, प्रेमळ आई, बहिण या भूमिका करण्यासाठी त्यांना कधी कष्ट पडलेच नसावेत. नायिका, चरित्र नायिका सगळीकडे त्या ठसा उमटवून गेल्या (त्या अंधा कानून मधे हेमा मालिनी आणि रजनीकांतची आई  होत्या. तो वडिलांवर गेला असावा अशी समजूत करून घ्यावीच लागते). 'सांगत्ये ऐका' जेवढा हंसा वाडकर, जयश्री गडकरचा होता तेवढाच त्यांचा पण होता. त्यात अतिप्रसंगाच्या वेळी त्यांचा भेदरलेला चेहरा पहाच एकदा. विश्वासघात, असहाय्यता आणि पुढे वाढून ठेवलेलं अभद्र देणं सगळ नुसतं चेह-यातून पोचतं. (भगवान के लिये मुझे छोड दो या सारखं भंपक वाक्य ऐकलं नसेल, भगवानला मानत असता तर केला असता का बलात्कार त्यानी?) .

मोलकरीण, एकटी, सांगत्ये ऐका, मोहित्यांची मंजुळा, वहिनीच्या बांगड्या असे किती तरी चित्रपट समोर उभे रहातात. वहिनीच्या बांगड्या एवढा आठवत नाही पण एका दृश्यात त्या आणि माधव वझे रस्त्यातून अनवाणी जात असतात, ते दृश्य अजूनही लक्षात आहे. अजाण वयातला बडबड करणारा उत्साहानी फसफसणारा माधव वझे आणि त्याचा हात धरून शांतपणे चाललेली, डोक्यात इतर विचार असलेली, पण त्याला न थांबवता त्याचा हिरमोड न करणारी वहिनी. शेवटचा एक प्रसंग लक्षात आहे विवेक हमसून हमसून रडतो तो (चु.भू.दे.घे.). अगदी लहान वयात पण तो सीन बघताना डोळ्यातून घळाघळा पांणी आलं होतं एवढं मात्रं आठवतं.

जयश्री गडकरांचे एक गाव बारा भानगडी, मानिनी, साधी माणसं, सांगत्ये ऐका, मल्हारी मार्तंड, मोहित्यांची मंजुळा आणि नाव आठवत नसलेले कितीतरी चित्रपट मी पाहिलेत. उत्तमोत्तम लावण्या, सुंदर कथा, चांगले दिग्दर्शक, सहकलाकार हे सगळं जरी असलं तरी त्यात चमकायला स्वतच्या अंगात पण काही गुण असावे लागतात, ते जयश्री गडकरांकडे होते म्हणूनच त्या यशस्वी झाल्या. नुसते गोड चेहेरे, अफाट नृत्यं कौशल्यं असलेल्या काय कमी होत्या का? पण एखादाच खणखणीत गुण असण्यापेक्षा त्या सगळ्या गुणांमधला भरपूर हिस्सा त्या बाळगून होत्या. सुडौल पण भारदस्त शरीरयष्टी, मोहक चेहरा आणि नृत्यकौशल्यं एवढ्या गुणांवर पण त्या तरल्या असत्या. पण असावं आपलं अजून काहीतरी वेगळं म्हणून त्या अभिनय पण करायच्या. 'सांगत्ये ऐका' मधला त्यांचा अल्लडपणा, पहिल्या प्रेमाची नव्हाळी मस्तच होती. 'एक गाव बारा भानगडी' मध्ये त्यांच्यावर चित्रित झालेलं 'कशी गौळण राधा बावरली' हे गाणं जेवढं श्रवणीय आहे तेवढंच प्रेक्षणीयही आहे. अत्यंत तन्मयतेने त्या ते गाणं म्हणत आहेत हे जाणवत.


एका चित्रपटात त्या न्हाऊन केस सुकवत बाहेर येतात, शप्पथ सांगतो, मला तर त्या शिकेकाईचा पण वास आला इतक्या त्या टवटवीत दिसत होत्या. चंद्रकांत, सुर्यकांत, अरुण सरनाईक, राजा गोसावी यांच्या बरोबर त्या शोभायच्या. तमासगीर, शहरी आणि ग्रामीण असे फरक नुसत्या वेशभूषा बदलून नाही तर त्याप्रमाणे त्यांची भाषेची ढब ही त्या बदलायच्या. 
पूर्वी चांगल्या चित्रपटांचे (राजकपूर, प्रभातचे सिनेमे, राजा परांजपे यांचे आठवतात) सप्ताह लागायचे. मल्टीप्लेक्सच्या जमान्यात कोण येणार म्हणा बघायला. डीव्हीडी वर येतात बघता पण थेटरातली मजा घरात नाही. कारण माहित नाही पण थेटरातल्या अंधारात परवानगी न मागता जो हुंदका फुटतो तसा घरात फुटत नाही. 'भाऊबीज', 'वहिनीच्या बांगड्या', 'एक गाव बारा भानगडी', 'मानिनी', 'साधी माणसं' थेटरात बघायचा योग येणं अवघड आहे. 
--जयंत विद्वांस

No comments:

Post a Comment