Tuesday 20 August 2013

विचार संपेल?


सकाळी साळगावकर गेल्याचं समजलं. पाठोपाठ दाभोळकर…

"साळगावकर" म्हटलं की "कालनिर्णय" शब्दं जसा ओघाने येतो तसं "दाभोळकर" म्हटलं की ओघाने पुढचा शब्दं "अंधश्रद्धा निर्मूलन" हाच  येतो, समाजाकरिता, त्यांच्या सुधारणेसाठी हा वेडा माणूस आयुष्यभर लढला.  बरं, कार्य तर असं की तिथे पाठीराखे कमी आणि विरोधक जास्तं.  चेष्टा, टोमणे हे तर कायमचंच पण हा माणूस प्रत्येक ठिकाणी जाऊन वाद घालायचा म्हणजे संवादातून मुद्दा पटवून द्यायचा. 

अनेक लोकांची पितळं त्याने उघडी पाडली. पण आपण फार ढोंगी आहोत. "कुणीतरी"- म्हणजे स्वतः सोडून हे काम इतर कुणीतरी करायला हवं असं आपल्याला कायम वाटतं. दाभोळकर 'कुणीतरी' पैकी होते. वेड घेतलेली माणसं अशीच असतात. त्यांना स्वतःचा मुद्दा पटवायचा नव्हता तर समजावून सांगायचा होता. अज्ञान दूर करायचा वसा घेतलेला माणूस. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक अजून काही पिढ्या गेल्या तरीही कळणार नाही इतके आपण रूढीवादी आहोत. आपल्यात ती ताकद नाही, धैर्य नाही.
 
काही ठिकाणी वाचलं की आपला बिहार झाला. तुलना खालच्या माणसाशी करून प्रगती होते का? म्हणजे इतके दिवस आपल्या इथे बिहार सारखी परिस्थिती नाही हे सुखावत होतं का आपल्याला? आता दु:खं कशाचं आहे नेमकं? बिहार पातळीला आलो याचं की  आपल्याला आपल्या पूर्वसुरींच्या कर्तुत्वावर फार काळ काढता येणार नाही याचं? शिखंडी समाजात वैचारिक वंध्यमैथुन आठवडाभर होईल, एकाच दिवशी दोघेजण गेले म्हणून वाहिन्यांवरचे तज्ञ रुसले असतील. पोकळी, पुरोगामी महाराष्ट्र, काळिमा, निषेध या शब्दांचा अर्थ विसरायला होईल इतक्या वेळा आज ऐकायला मिळतील.      
 

मुद्दे संपले की गुद्दे सुरु होतात असं म्हणतात. दाभोळकरांना निरुत्तर करायला मुद्दे कुठून आणणार? बरं, वैचारिक वाद घालावा तर तेवढी बौद्धिक ऐपत विरोध करणा-यांची नाहीये.  मग फक्तं एकच मार्ग उरतो - विचार संपवा  किंवा विचार करणारा संपवा. आणि माणूस नेहमी सोप्पा मार्ग स्वीकारतो. आजही तेच झालं.  लोकमान्य टिळक गेल्यावर राम गणेश गडकरी म्हणाले होते - "आता कुणाला बघितल्यावर विडी फेकावी असं पुण्यात कुणी उरलं नाही". जगात चांगली माणसं आधीच कमी झाली आहेत. आज अजून दोन कमी झाली, एक व्यक्ती कमी झाली, एक कमी केली गेली एवढाच काय तो फरक.
 
-- जयंत विद्वांस  






No comments:

Post a Comment