Monday 5 August 2013

निश्चय…

म्हटलं तर आचरणात आणण्यासारखं आहे पण कितपत जमेल सांगता येत नाही.
माझ्या एका मित्रानी सांगितलेली बोधकथाच आहे ही. तेंव्हा तो डोंबिवलीला रहात होता. तरी साधारण ८३-८४ ची गोष्टं असेल. ते चाळीत रहायचे. वडील रेल्वेत होते आणि पार्ट टाईम काम पण करायचे. खाऊन पिउन सुखी चौकोनी कुटुंब. महिना अखेरीला अडीअडचणीला पन्नास रुपये एका नोटेत देऊ शकणारं चाळीतलं एकमेव कुटुंब. चाळीतच अजून एक गरीब (ह्या शब्दानी अपमान होतो, लाज वाटते म्हणून वापरण्यासाठी 'मध्यमवर्गीय' असाही एक शब्दं आहे) ब्राम्हण कुटुंबं  होत. आजारपण आणि इतर अडचणींमुळे त्यांना काही रक्कम उसनी लागत होती. मित्राच्या वडिलांनी बिनव्याजी, कधी देणार परत असं काहीही न विचारता त्या काकूंना पैसे दिले. रक्कम मोठी होती. पण मदत चांगल्या माणसाला आहे याची त्यांना खात्री होती.
दर महिना ठराविक किंवा जमतील तेवढे पैसे देऊन त्या काही रक्कम परत करायच्या. जवळ जवळ दीड दोन वर्ष लागली त्यांना सगळे पैसे फेडायला. शेवटचे पैसे परत देताना डोळ्यात अश्रू आणून त्यांनी मनापासून आभार मानले. विषय तिथेच संपला. त्यानंतर दोन तीन महिन्यांनी त्या एकदा खूप आनंदात मित्राच्या घरी आल्या. हातात तीन पुड्यांचा स्टेनलेस स्टीलचा डबा होता. चेह-यावरून आनंद नुसता निथळत होता. सांगताना पण त्यांना खूप आनंद होत होता. 'काल सुट्टी न यांना, बाजारात गेलो होतो तेंव्हा घेतला. छान आहे ना?' मित्राच्या आईला कळेना एक साधा स्टेनलेस स्टीलचा डबा, त्यात एवढा आनंद म्हणजे जर विचित्रच वाटलं. काकूंच्या चेह-यावरचा गोंधळलेला भाव बघून त्या जर वरमल्या. 
'बरोबर आहे तुमचं. डबा  साधाच आहे. पण आनंद मात्रं खरा आहे. तुम्ही वेळेत मदत केलीत, व्याज घेतलं नाहीत. देणं डोक्यावर होतं, लाज वाटायची, कधी फिटतील पैसे असं वाटायचं. तेंव्हा आम्ही निश्चय केला की सगळे पैसे फिटेपर्यंत घरात एकही नवीन गोष्टं घ्यायची नाही. आज जवळ जवळ  दोन सव्वा दोन वर्षांनी आम्ही घरात ही पहिली नवीन वस्तू आणली, म्हणून दाखवायला आले.'
म्हणून म्हटलं ना आचरणात आणण्यासारखं आहे पण कितपत जमेल सांगता येत नाही.
जयंत विद्वांस 

1 comment:

  1. Jayantji,do you have a Old Marathi movie-Manini-Casting Jayashri Gadkar and Chandrakant Gokhale..This movie is untraceable..Most of the songs are of Great Poetess Bhahinabai Chaudhary..If you are having please intimate me.
    Madhav Kulkarni-9422013900

    ReplyDelete