Wednesday 21 August 2013

मला सुंदर दिसलेल्या ललना (६)… क्रिस एवर्ट


पहिल्या पाच भागात रूपानी सुंदर असणं थोडंफार तरी गरजेचं असतं अशा चित्रपटांशी निगडीत ललना पाहिल्या. पण मला काही खेळाडूही असे लक्षात राहिले आहेत. अग्रभागी आहे ती ख्रिस एव्हर्ट.

स्मिता आणि शबाना जशा आळीपाळीने उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार घ्यायच्या तीच पद्धत ख्रिस आणि मार्टिनाची होती. भांडण न करता वाटून घेतल्यासारख त्या विम्बल्डन जिंकायच्या. ब्युटी आणि बीस्ट असाच असायचा सामना तो. एका बाजूला डावखुरी ताकद आणि एकीकडे नजाकत. मात्रं दोघीही ग्रेसफुल होत्या. जिमी कॉनर्स बरोबर तिचं गुळपीठ होतं हे वाचून पण मला कॉनर्सचा हेवा वाटायचा. लेडी डायना आणि ख्रिस यांच्या चेह-यात मला कायम उगाचच काही साम्य आहे असं वाटत आलंय. सरळ नाक आणि सुंदर, प्रसन्न पण करारी झाक असलेला चेहरा. जिंकली म्हणून तिनी कधी उड्या मारल्या नाहीत, हरली म्हणून अगदी दु:ख्खी कष्टी चेहराही नाही, चिडणं नाही, लाईनमनला शिव्या नाहीत. एक सुसंस्कृत, जमिनीवर पाय असलेलं व्यक्तिमत्व खेळतंय असं वाटायचं. (तेंव्हा बायकांचं टेनिस 'टेनिस हा बघण्याचा मुख्यं भाग' या उद्देशानी बघितलं जायचं). परदेशी खेळाडूंचं मला एका बाबतीत कायम कौतुक वाटत आलंय. लोकांनी 'कधी' विचारायच्या ऐवजी 'का' विचारावं अशाच वेळी ते निवृत्ती घेतात (आपल्याकडील एकमेव उदाहरण सुनील गावसकर - हे वाक्यं पण त्यांचंच). ख्रिस निवृत्तं झाली आणि टेनिस मधली सौंदर्यपूर्ण नजाकत संपली. सौंदर्य हल्ली असतच पण नजाकत शोधावी लागते.

मार्टिना निव्वळ पुरुषी होती. तिची दुहेरीतील साथीदार पाम श्रायव्हर बरोबर तिचं 'नातं' जोडून काही काळ चविष्ट चर्चाही झाली. पण तिनी कुणाला हुंगून सुद्धा विचारलं नाही. तिनी नकार ही दिला नाही, हो ही म्हणलं नाही. कुछ तो लोग कहेंगे म्हणत ती खेळत राहिली. ती चिडकी नव्हती, चुकीच्या निर्णया विरुद्ध त्रागा न करता ती खांदे उडवून पुढच्या खेळासाठी सज्ज व्हायची. महिला टेनिस खेळाडूंच्या हक्कांसाठी, बक्षिसाच्या रकमेतल्या तफावतीसाठी, हल्ला झालेल्या मोनिका सेलेससाठी ती हिरीरीनी लढली. आजारातून परत आलेल्या पेस साठी ती त्याची मिश्रं दुहेरीत साथीदार झाली. तिचं शेवटचं विम्बल्डन मला अजून आठवतंय. फायनलला स्पेनच्या कोंचिता मार्टिनेझकडून ती हरली. हरल्याचं नाही वाईट वाटलं पण आता या हिरवळीवर ती परत दिसणार नाही यानी डोळ्यात पाणी आलं असावं.

 स्टेफी ग्राफ आली आणि सगळी गणितच बदलली. उंच, गरुडासारखं नाक आणि जर्मन जिद्द तिच्या नसानसात होती. ती शांतपणानी समोरच्याचा भुगा करायची. याना नोव्होत्नाचा हताश चेहरा मी विसरलेलो नाहीये. दुस-या सेट मधे ती ५-१ (४०-०) होती, एक गुण आणि विम्बल्डन जिंकलं इतकं सोप्पं होतं. याना उपविजेती झाली. पेशन्स, जिद्द म्हणजे  बघायचं असेल तर तो सामना बघावा. एकाच वर्षी तिनी आणि बेकरनी पहिल्यांदा विम्बल्डन जिंकलं होतं. ती सोनेरी केसांची दोन गोरीपान मुलं आनंदानी निथळत होती. सगळे मान सन्मान मिळवून ती आंद्रे अग्गास्सी बरोबर संसारी झाली.  

या तीनही सुंदर स्त्रियांचा एक गुण घेण्यासारखा आहे. तिघी स्वत:बद्दल असं नाही पण एकूणच कमी बोलायच्या. वाचाळपणा करून प्रसिद्धी मिळवायची त्यांना गरजच नव्हती. अशीच मला अर्जेन्टीनाची गब्रिएला सबातिनी आणि फ्रांसची मेरी पिअर्स पण लक्षात आहेत.

सायना नेहवाल पण मला सुंदर दिसते. माजी खेळाडू विमलकुमारनी 'सकाळ' मधे एका लेखात ऑलिम्पिकमधे पाहिलेल्या परदेशी खेळाडूंविषयी लिहिल होतं - 'मला प्रकर्षानी जाणवलं की एकाच्याही अंगावर कणभरही चरबी नाही, फक्तं स्नायू आणि मांस'. सायना तशीच आहे. मुळात सुसंस्कृत आई वडील आणि महान गुरु गोपीचंद (शीतपेयानी शरीराला अपाय होतो आणि खेळाडूंना ते घातक म्हणून बक्कळ पैसे देणा-या शीतपेयाची जाहिरात नाकारणारा वेडा माणूस) यांच्यामुळे तिचे पाय जमिनीवरून उचलले जातात ते फक्तं भन्नाट शॉट मारायला. जगात पहिला क्रमांक पटकावण हे खायचं काम नाहीये. विद्या विनयेन शोभते हे आचरणात आणणारे किती जण आहेत? सायना आणते. 

आधीच आदर्श दुर्मिळ होत चाललेत. वाढलेल्या वयामुळे जी अक्कल येते त्याने तुम्ही ठरवू शकता कसं वागायचं ते पण एवढ्या लहान वयात ही जी समज तिच्यात आहे त्याला सलाम. हवा असली की फुल हलतं मग शॉट चुकतो, जाळ्यात अडकतो हे खेळाएवढंच तिच्या वागण्यात पण तिनी लक्षात ठेवलंय.         

मुळात स्त्रियांना अनेक शारीरिक अडचणी असतात. तरीही कसोशीने इतकी वर्षं दूरचे प्रवास, दडपण, स्पर्धा या सगळ्यांना तोंड देत सतत जिंकणं, उच्च पदावर निष्कलंकित राहणं हे येरा गबाळ्याचे काम नोहे. त्यामुळे या चेह-यानी असोत नसोत मला गुणांमुळे सुंदर दिसलेल्या ललनांना सलाम.  

--जयंत विद्वांस


No comments:

Post a Comment