Tuesday 20 August 2013

का''ळ''निर्णय झाला. . .

साळगांवकर गेले. महाराष्ट्रात एकदा एखाद्या माणसाला आपला म्हटला की लोक शेवटपर्यंत ते पाळतात. चितळे-बाकरवडी, कामत-ऑर्किड, साळगांवकर-कालनिर्णय अश्या जोड्या आम्ही लावलेल्या आहेत. त्या रहाणारच.  "भिंतीवरी कालनिर्णय असावे" कितीतरी वर्षं ही ओळ ऐकत आलोय. रहस्यपटाला रिपीट प्रेक्षक नसतो हा तोटाच तसच दिनदर्शिकेला अल्पकाळ मागणी हा तोटाच. त्यातही विविध संस्था, बँका दिनदर्शिका फुकट पण देतात तरीपण 'कालनिर्णय' विकत घेणारी माणसं आहेत. पु.लं, वसंत बापट, व.पु. असे दिग्गज लोक त्यांनी मागच्या पानावर आणले. ती कल्पना भन्नाटच होती. विविध उपयोगी माहितीनी नटलेली दिनदर्शिका एवढंच नव्हतं ते, वार्षिक कुळाचार पाळतात तसा 'कालनिर्णय' घेणे हा ही त्यातलाच एक भाग आहे एवढं लोकांनी प्रेम केलं त्यांच्यावर. विविध भाषात, आकारात निघणारं कालनिर्णय खूप लोकांना वर्षभर रोजगार पुरवीत आहे हा मुद्दा विचार करण्याजोगा आहे.   
 
 
 
साळगांवकरांनी मुहूर्त सांगितला की तो दुसरीकडे कन्फर्म करायची गरज कधी कुणाला भासली नाही. झी वर गणेशोत्सवात ते गणपतीची महती सांगायचे. ऐकत राहावं असं बोलायचे ते. न थांबता, घाई वाटेल इतपत सलग बोलायचे ते. ज्योतिर्भास्कर पेक्षा 'कालनिर्णय' ही ओळख मोठ्ठी होती. मला ज्योतिष या विषयाची मोठी गम्मत वाटत आलेली आहे.  ज्योतिर्भास्कर साळगांवकरांनी दैनिक काढलं होतं.  'कालनिर्णय'च्या खपाचे जितके महिने तेवढेही महिने ते चाललं नाही. त्यांनी या अपत्याचं भविष्य पाहिलं नसेल का?  
 
जोपर्यंत जगात मराठी माणूस आहे तो पर्यंत  "भिंतीवरी कालनिर्णय.. " रहाणारच. 
 
--जयंत विद्वांस

No comments:

Post a Comment