Saturday 12 December 2015

अज्ञानात सुख असतं.....

अज्ञानात सुख असतं..... 

'अज्ञानात सुख असतं' या वाक्यात खूप काही दडलंय. अफाट आनंद आहे, बालसुलभ औत्सुक्य आहे, अचानक काहीतरी नवीन गवसल्याचा भारावून टाकणारा हर्ष आहे, ज्ञानानी होणा-या दु:खापासून, क्लेशापासून वंचित ठेवणारं अमृत आहे, आपल्याला जे ज्ञात आहे तेच अंतिम, चांगलं अशी वरवर कुपमंडूक वाटणारी पण सुखी ठेवणारी वृत्ती आहे, एक निरागस बाल्यं जपता येईल असं काहीतरी त्यात आहे. तुम्ही जेंव्हा नवीन असता तेंव्हा रहस्यकथा असो नाहीतर एखादं कोडं किंवा अगदी सुडोकू असो, ते सुटेपर्यंत जी बौद्धिक मजा येते त्यात अज्ञानाचा मोठा वाटा असतो. एकदा तुम्ही सराईत झालात की ती मजा जाते. अर्थात एखादी गोष्टं अनुभवाने, अनेकवेळा केल्याने अंगवळणी पडते आणि अज्ञान उघड्यावर ठेवलेलं पेट्रोल जसं गायब होतं तसं नकळत नाहीसं होतं. त्याचेही फायदे आहेतच पण अज्ञानात मिळणारा आनंद किंवा ते निष्पाप सुख त्यात नाही. अज्ञानातलं सुख आणि लहानपणा देगा देवा या एकाच दर्जाच्या गोष्टी आहेत. 

आम्ही एकदा नागपूरला गेलो होतो लग्नासाठी ८४ ला. सगळेजण एअरपोर्ट जवळ म्हणून तो बघायला गेलो होतो. नात्यातलीच एक बाई पहिल्यांदाच घर सोडून नागपूरला म्हणजे एवढ्या लांब गेली होती. तिनी अत्यंत आणि ख-या निरागसतेने विचारलं, 'यातून चक्कर मारायचे किती पैसे घेत असतील?' सगळेजण हसले, ती खट्टू झाली. एकानी तिला समजावून सांगितलं, ते किती खर्चिक आहे ते. खरंतर ८४ साली उपस्थितातल्या ९९ टक्के लोकांना खरंच किती पैसे घेतात हे ही सांगता आलं नसतं पण हसलो मात्रं सगळेच. तिला ज्ञान प्राप्तं झालं हे मान्यं आहे पण त्यातून निष्पन्न काय झालं? तर चक्कर मारण्याएवढे पण पैसे आपल्याकडे नाहीत हे दु:ख तिच्या पदरात आलं. काहीवेळेस न मिळालेल्या गोष्टी पण आनंद देणा-या असतात कारण अज्ञानामुळे आपण त्या प्राप्त झाल्याची स्वप्नं पहात असतो. 

त्या अजरामर 'अमर अकबर' मधे निरुपा रॉयला रक्तं देतात त्या शॉटला मी कायम ढसाढसा हसलोय. पण अजाणतेपणी पहिल्यांदा पाहिला तेंव्हा मात्रं आईचं आणि मुलांचं रक्तं एकसारखंच असतं आणि एकमेकांना कडेला झोपवून ते लगेच भरता येतं असं खरं कळेपर्यंत कितीतरी वर्ष माझा समज होता. पण त्या अज्ञानामधे विश्वास होता, एक दिलासा होता - उद्या समजा काही झालं आपल्याला तर आईचं रक्तं मिळेल किंवा तिला काही झालं तर आपलं तिला देत येईल - हा विश्वास ज्ञानामुळे मिटला. ज्ञान गरजेचं आहे हे मान्यं आहे पण त्या रक्तात पण ग्रुप असतात, अमक्याला अमुकच चालतो, वेळप्रसंगी ती बाटली मिळवण्यासाठी कसं दर दर की ठोकरे खात फिरावं लागतं, दुर्मिळ ग्रूप पण असतो म्हणे त्यात, या बाकी चिंता वाढल्या त्याचं काय? एका विशिष्ठ ठिकाणी डोक्यावर फटका बसून वर बघितलं आणि नेमक्या त्याच वेळी साईबाबांच्या डोळ्यातून निघणा-या दिव्यज्योती डोळ्यात शिरल्या की अंधा आदमी डोळस होतो, फक्तं सरपटत जाउन पायरीवर डोकं आदळायचं टायमिंग जमलं की झालं असंही वाटायचं तेंव्हा. साला मनमोहन देसाई एकदम निरागस माणूस असणार (ज्ञानप्राप्ती झाल्यामुळेच त्यानी जीव दिला असणार). 


त्या 'उत्सव'मधे एकदा तो शेखर सुमन रेखाचा एकेक दागिना काढतो (तो अजरामर हेवा आहे मला आजवर वाटलेला, मी त्या शॉटचे दहाबारा रिटेक करून विनामोबदला काम केलं असतं शिणमात), नंतर रेखा कंचुकीतली एक क्लिप काढते आणि सगळे दागिने झटक्यासरशी काढते. चारुदत्त खुळाच म्हणावा लागेल लगेच क्लिप काढणार असेल तर, काहीवेळेला मठ्ठ असल्याच्या किंवा तसं दाखवल्याचा फायदा असतो. समोरच्याला ते कळत असतं तरीपण त्यात मजा असते. सगळ्या ठिकाणी ज्ञान आहे म्हणून लगेच पाजळायचं नसतं, ना वसंतसेनेला मजा न चारुदत्ताला. वपु म्हणाले होते. 'नाविन्यासारखी चटकन शिळी होणारी दुसरी गोष्टं नाही'. त्यामुळे दरवेळेला ती क्लिप काढणे म्हणजे तो आनंद शिळा करणं आहे, घाईच्या वेळची गोष्टं अलाहिदा :P .   

आता तर काय नेटमुळे ज्ञान कमी आणि माहिती जास्ती मिळते. त्यामुळे धड अज्ञान पण नाही आणि पूर्ण ज्ञान पण नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे मला खेड्यातून आलेल्या माणसांच्या निरागसतेचा, भोळेपणाचा फार हेवा वाटतो. त्या बिचा-यांना ओढ वाटते शहराची, न्यूनत्व जाणवतं पण ते किती सुखी आहेत याची त्यांना कल्पना नाहीये. मधे एके ठिकाणी वाचलं होतं. कुठल्यातरी देशात एक माणूस तीस वर्षांची शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर आला. कोल्ड्रिंक्स कलर मधे मिळतात, कानाला हेडफोन लावून बोलता येतं हे बघून तो आश्चर्यचकित झाला म्हणे. ही दुनिया माझी नाही असं त्याला वाटलंही असेल कदाचित. ज्ञान मिळणं म्हणजे माघारी न येता येणारी प्रक्रिया आहे. नॉन रिटर्निंग व्हॉल्व्ह, पुढे जायचं, मागे एन्ट्री बंद. ज्ञान म्हणजे फूल होणं, एकदा ते झालं की कळीत्वं संपलं. ज्ञान म्हणजे  दुध - दही - ताक - लोणी - तूप अशी साखळी आहे. एकदा पुढे गेलात की मागच्या स्थितीतला आनंद संपला. 

म्हणून वर जरी म्हटलं ना अज्ञानात सुख असतं तरी फक्तं एकाच बाबतीत ते नसतं. 'शेवटी' आपण जातो म्हणजे नक्की कुठे जातो हे अज्ञान अजून तरी दूर झालेलं नाही याचं मात्रं प्रत्येकाला दु:खं आहे, भीती आहे. देव मोठा मजेशीर माणूस असणार. नियम सिद्ध करण्यासाठी तो त्याला अपवाद तयार करून ठेवतो. अज्ञानात सुख असतं म्हणतोयेस ना, घे, म्हण मग या बाबतीत पण. ते ज्ञान कधी प्राप्त होणार नाही हे ही निश्चित आहे त्यामुळे त्याची चिंता न करता सुखासाठी गरजेचं असलेलं अज्ञानाचं दही घुसळायची घाई करायची नाही म्हणजे झालं. 'शेवटी' ज्ञान किती मिळवलं हे कोण मोजतंय, सुख किती मिळालं याची गणती जास्ती झाली म्हणजे हस-या चेह-यानी तिकडे गेलं की झालो सुखी. 

जयंत विद्वांस 


No comments:

Post a Comment