Thursday 24 November 2016

त्यात काये एवढं काळजी करण्यासारखं?...

टू व्हीलरवर मी आणि क्षमा रग्गड हिंडलोय, आधी स्प्लेंडर आणि मग फिएरो. अष्टविनायक, कोल्हापूर, अलिबाग, बोरवाडी, रोहा (याचे भयावह किस्से परत कधी) महाबळेश्वर, डोंबिवली, बदलापूर अनेकवेळा. सातारा रोडनी खंबाटकीपर्यंत सा.बां.मंत्री असल्यासारखे पण आम्ही जाऊन यायचो. घाट चढायचा, येताना बोगद्यातून यायचो. एकदा क्षमा डोंबिवलीला गेलेली. मला खाज भयंकर, म्हटलं तू बदलापूरला ये, मी इकडून येतो. सकाळी जनरली लवकर निघायचो मी. तेंव्हा मोबाईल नव्हता. गाडीचं डिझाईन करताना त्यात एरोडायनॅमिक्स असतं म्हणे. वा-याला कापताना स्पीड कमी होत नाही म्हणजे. मी स्पीडला मि.इंडिया सारखाच होतो जवळपास, वारा अडेल असा देह नव्हताच मुळी त्यामुळे गाडी विनाअडथळा बुंगाट जायची. सर्व्हिसिंग करून आणलेलीच होती. सकाळी खारदूंग ला ची मोहीम असल्यासारखा निघालो. ब्लॅक जर्किन होतं माझ्याकडे थ्री पीस सुटसारखं. त्याच्या सगळीकडच्या चेन लावण्यात एक किलोमीटर जाईल माणूस.    

तर साडेपाच पावणेसहाला निघालो असेन. अंधारच होता. डिसेंबर असेल. हाफ किक स्टार्ट झाली गाडी. पहिला स्टॉप देहूरोड फाटा असं ठरवून निघालो. टर्नला पायावर पाणी पडल्यासारखं झालं. म्हटलं असेल. सारसबाग ओलांडली तेंव्हा एकदा गाडी बुकबुक झाली, म्हटलं असेल, निलायमच्या पुलाखाली गाडीनी व्हेंटिलेटर सपोर्ट काढलेल्या पेशंटसारखा सरळ रेषेचा मॉनिटर दाखवून मान टाकली. मी हैराण, गाडी कडेला घेतली.  चोक दिला, ऑनॉफचं बटण उगाच ऑनॉफून बघितलं चारवेळा. गाडी पुलंच्या एसटीसमोर आलेल्या म्हशीसारखी ढिम्म. मागून एक टू व्हीलरवाला आला. 'मालक, पेट्रोल सांडतंय' म्हणाला आणि पुढे गेला. मी खाली बघून गार पडलो. तालिबानी व्हिडिओत मान कापतात तशी पेट्रोलची ट्यूब टाकीच्या खालच्या पायपापासून सुरी फिरवल्यासारखी तुटलेली. एक लिटरभर पेट्रोल गेलं असेल इंजिनाभिषेकात. आता आली का पंचाईत. मग मी लहानपणापासून खूपच हुशार असल्यामुळे पहिल्यांदा कॉक बंद केला (याला डॅमेज कंट्रोल असं म्हणतात). सकाळी सहाला कोण मिळणार गॅरेजवाला आणि ते ही पुण्यात. नवीपेठेत दिक्षीतांचं एमबी गॅरेज होतं माहितीचं. त्या समोरच्या बिल्डिंगमध्ये आमचा अनंत सावरकर रहातो. 

मी एका पायानी लहानपणी ती पायानी ढकलत गाडी खेळतात तसं फिएरो ढकलत नवीपेठ गाठली. जर्किनमुळे अंगातून घाम. म्हटलं आठला उघडेल, तोपर्यंत सावरकरकडे जाऊ. पावणेसातला देणेक-यासारखा रविवारचा दारात त्याच्या. ते बिच्चारे झोपी गेलेले जागे झाले. माझी स्टोरी सांगून झाली. मी चक्कर येऊन पडलो तर पुढचे उपद्व्याप करायला लागतील या भीतीनी बहुतेक दोन लाडू पण दिले त्याच्या बायकोनी पोहे होईस्तोवर. लहान मुलं शाळेत ती गुबगुबीत ससा वगैरे होतात ना त्यात चेह-यावर आतला मुलगा किती बारीक आहे ते कळतंच, तसा मी दिसत असणार जर्किन मध्ये. त्याच्या बायकोनी चेहरा वाकडा न करता भन्नाट पोहे केले, चहा झाला. 'आता जेवायला थांबतो की काय हा' अशा अर्थाचं त्यांनी एकमेकांकडे बघायच्या आत मी निघालो. गॅरेजला लागून असलेल्या टपरीवाल्यानी सांगितलं, ते साडेनऊपर्यंत येतात. मी पर्वती पायथ्याला शेलार टीव्हीएसकडे गाडी टाकायचो, म्हटलं चालत गेलो तरी परत येईन नवाच्या आत. निघालो. ते जर्किन वेटलॉसच्या जाहिरातीत खपलं असतं असा घाम काढायचं. साडेआठला त्याच्या दरवाज्यात उभा. 'संडे क्लोज्ड' ची लाल पाटी बघून तिथेच पायरीवर मटकन की काय तसा बसलो. वधस्तंभाकडे निघालेल्या चारुदत्तासारखा परत चालत नवीपेठ. 

साडेनवाला एमबीचा एक कामगार आला. माझ्याकडे दुर्लक्ष करून त्यानी झाडलोट, सडासंमार्जन, उदबत्ती सोपस्कार पूर्ण करेपर्यंत मी बिनकुत्र्यांच्या दत्तासारखा तिथे झाडाला टेकून उभा. 'एवढंच ना, आलोच' म्हणून तो फरार झाला. साधारण वीसेक मिनिटांनी आला. 'सायेब, फिएरोची ट्यूब मिळत नाहीये'. हातात कमीत कमी सोळा सत्रा आणि वीस बावीसचा पाना हवा होता. दोन्ही कान हाणले असते. 'अरे पेट्रोल ट्यूबला काय करायचीये फिएरोची ओरिजिनल, कुठलीही लाव'. मग तो परत गेला आणि राहुलकुमार बजाजचा टर्नओव्हर वाढवून आला. एक मीटर आणलेली त्यानी. मी एक तुकडा लावून अजून एक स्पेअर घेऊन ठेवला. सगळं आवरून निघायला साडेदहा झाले. निघालो. इथे पुणे लोकेशन सीन संपला. 

कट टू बदलापूर. मी सहाला निघणार म्हणजे साडेनवाच्या आत पोचणार म्हणून बायको दहापर्यंत हजर. मग अकरा, बारा, साडेबारा, एक वाजला. आमच्या आशा काळेनी घरी फोन केला. आई म्हणाली मी सहाला गेलोय. जीए, मतकरी, धारप एकापाठोपाठ एक प्रत्येकाच्या डोक्यात हजर. आता काय ऐकावं लागतंय नी काय नाही. बायकोनी भांड्यात पाणी रेडीच ठेवलेलं गणपतीला ठेवायला. मैं दुनियासे बेखबर निवांत आलो दीडला. खाली गाडी लावली तर वर बाल्कनीत काका, काकू आणि अर्धांग उभं. वरूनच ड्रॅगनसारखे फुत्कार आणि जाळ खाली यायला लागले. मग मी पीसीओवरून घरी फोन केला. वर गेलो. मुकाट जेवलो. जेवताना रेडिओवर दुपारच्या संथ बातम्या लागतात तसा वृत्तांत सांगितला. अंधार लवकर पडतो म्हणून लगेच साडेतीनला बायकोला घेऊन निघालो. 'नीट चालवणार, रस्त्याच्या कडेकडेनी, साठ मॅक्सिमम स्पीड' अशी शपथ घेऊन झाली. 

कॉर्नरला गाडी वळल्यावर मग हाणायला घेतली, 'तुला गरजच काय घरी फोन करायची, उगाच तिकडे आणि इकडे टेन्शन'. पण मागून अस्पष्ट हुंदका ऐकायला आल्यासारखं वाटलं आणि मग मिसाईल कानावर आलं, 'काळजीनी फोन केलाय, मी आहे म्हणून एवढं तरी केलंय, मला उशीर झाला असता तर तूम्ही कॉटवर पडूनच सांगितलं असतंत 'ती काय लहान आहे का, येईल, त्यात काये एवढं काळजी करण्यासारखं?' मी निदान तसं तरी नाही केलेलं'. गाडी चालवताना ड्रायव्हरनी कुण्णाशी बोलायचं नसतं त्यामुळे गप्प बसलो आणि सुखरूप घरी पोचलो. 

जयंत विद्वांस 

No comments:

Post a Comment