Wednesday 20 July 2016

नमूने (५)…

साधारण तेंव्हा सत्तरीचे असतील ते. मी ९६ ला पहिल्या नोकरीत होतो तिथे फक्तं पगाराचं काम करायला ते यायचे. एकूण काम महिना संपल्यावर असायचं खरंतर पण ते वेळ घालवायला दिवसाआड तरी येऊन बसायचे. कार्ड अपडेट कर, हातानी ते मस्टर लिहून काढ अशी रोजगार हमीची दुष्काळी कामं ते करत बसायचे. अतिशय सुरेख अक्षर (मराठी, इंग्लिश दोन्ही), कामात एकही चूक नसायची, कधीही उशीर झाला नाही पगार काढायला, रजेचा हिशोब सुद्धा वर्ष संपलं की आठवड्याच्या आत सुवाच्य अक्षरात - 'श्री.***साहेब यांना सविनय सादर, सन १९९६-९७ या वर्षाकरिता अर्जित रजेचा तपशील' - या हेडींगखाली पुढे निबंध लिहिलेला नाटकी प्रकार ते द्यायचे. बोनसचा हिशोब पण कायम तयार असायचा. आडवी, उभी बेरीज करा, चुकणार नाही. वाढलेला डी.ए.पुढच्या महिन्यात देताना कधीही घोळ नाही. असे सगळे कामातले गुण त्यांच्याकडे निश्चित होते. पण अतिशय नाटकी माणूस. आता ते हयात नाहीत.

ते एस.टी.त होते. तिथून रिटायर्ड झाल्यावर ते इकडे यायचे. त्यांचा एक डोळा काचेचा होता. एकाच डोळ्यानी बघायचे त्यामुळे तिरके बसून चालवायचे ते. स्कुटर अशी मारायचे की मागचा जीव मुठीत धरून बसेल. एका पायात रॉड होता त्यांच्या, त्यामुळे लंगडल्यासारखे चालायचे. सगळे पांढरे केस मागे फिरवलेले, तोंडात कवळी पण एकशेवीस तीनशे पान कायम, शर्टची दोन बटणं उघडी टाकून बसायचे. दाढी कायम गुळगुळीत आणि चेह-यावर फाउंडेशनचे थर. खारेदाण्यासारखा चेहरा दिसायचा. काचेचा डोळा लक्षात येऊ नये म्हणून तपकिरी गॉगल घालायचे. अत्तराचा घमघमाट असायचा. कानात कायम फाया. डबा चार पुड्याचा आणायचे. अगदी साग्रसंगीत काम जेवण म्हणजे. तोंडावर इतकं गोड बोलतील की तुम्ही दत्तक जाऊ का विचार कराल. मूलबाळ काही नव्हतं त्यांना. बायको यांच्या वरताण होती. पासष्ठीची असेल म्हातारी पण कायम लो कट स्लिव्हलेस, बॉबकट, चामडी लोंबणारे हात, सुरकुतलेलं उघडं पोट आणि तोंडावर फाउंडेशनचे थर, फार ओंगळ प्रकार होता तो.

त्यांचे तिथेच व्याजानी पैसे होते. तारखेच्या आधी दोन दिवस प्रचंड गोड बोलायचे. व्याज दिलं की मी कोण तुम्ही कोण. मुका घ्यायची फार सवय त्यांना. कुणाचाही घ्यायचे. मी आधीच सांगितलं, तसलं काही केलं तर मी शिव्या देईन. त्यामुळे त्यांचा माझ्यावर प्रचंड राग. एकतर मला नाटकी माणसांचा प्रचंड तिटकारा आहे आणि त्यात उगाच कुणी अंगाशी आलं तर मग मी शिव्या देतो. त्यांचं वय बघता त्यांच्याकडून वारसदार पत्रं घ्यायचं होतं म्हणून त्यांना फोन करून बायकोचं नाव विचारलं होतं. यांचं इनिशियल एम.एस.टी.आणि बायकोचं पी.एम.टी., जाम हसलो होतो. मला म्हणाले, 'तुझं टाक, तू मला मुलासारखाच आहेस' वगैरे. दुस-या दिवशी घाईनी आले ते. म्हाता-यानी खाली जाऊन ते पत्रं स्वतः चार वेळा, दुस-याकडून दोन वेळा वाचून मग सही करून वर आणलं. मी मग सोडतो काय? म्हटलं, 'आलो असतो दत्तक पण ** आडनावापेक्षा विद्वांस लई भारी आहे म्हणून माझं नाव टाकलं नाही'.

मी एक्सेलला पगारपत्रक तयार केलं होतं तर ते साहेबाच्या घरी सकाळी आठला हजर. परत गावभर बोंब, माझ्यामुळे त्यांची नोकरी जाणार वगैरे. मी जस्ट ट्रायल करून बघितलेली. त्यामुळे ते माझ्या जास्तीच डोक्यात गेले. आमच्या इथे खाली देशपांडे म्ह्णून अर्क होते. ते त्यांच्यासारखंच गोड बोलून त्यांची ठासायचे. एकदा बोलताबोलता त्यांनी काल स्वीटहोमला लोण्याची भजी खाल्ली सांगितलं, मी री ओढायला. वर्णन तर असं की तोंडाला पाणी सुटेल. म्हातारा सगळं ऐकत होता. संध्याकाळी बायकोसकट हजर तिथे. ऑर्डर दिली. वेटरचा चेहरा मख्ख, त्याला वाटलं आपण चुकीचं ऐकलं. समजल्यावर तो हसायला लागला. इकडे म्हातारा अजूनच पेटला मग. काल आमचे देशपांडे खाऊन गेलेत म्हणाला. मालकापर्यंत गेला पार. मग घरी जाताना आमच्या नावानी बोटं मोडत आणि शिव्या देत घरी गेले असणार. दुस-या दिवसापासून आमच्याशी कट्टी आठवडाभर. त्यानंतर वर्षभरानी असेल, देसाई बंधूंकडे सीडलेस हापूस आलाय, काल घेतला असं देशपांडे म्हणाले. मी री ओढली. 'फक्तं मऊ करायचा, देठाच्या जागी स्ट्रॉ घालायची आणि डायरेक्ट आमरस प्यायचा'. म्हातारा म्हातारी नटून थटून हजर देसायांकडे संध्याकाळी. तिथे ही वादावादी. काय पब्लिक हसलं असेल यावरून आम्ही लोळत होतो. जाम शिव्या दिल्या असणार आम्हांला आईबहिणीवरून.

श्रावणात सत्यनारायण असायचा कंपनीत. एकमेव डोळा मालकाकडे ठेऊन सगळ्यांना ऐकू जाईल अशी प्रार्थना करायचे नमस्कार करताना, 'देवा, साहेबांची भरभराट होऊ दे, त्यांना काहीही कमी पडू देऊ नकोस'. मी आणि बापट, 'म्हणजे मला व्याज मिळेल' म्हणायचो. आमचे बापट (* व्ही.व्ही.बी.पोस्ट) म्हणजे आधीच बोलण्यात आचरट, अश्लील माणूस. 'अरे मेकअप बघ त्याचा, तुला वाटतं ह्याने काही केलं असेल बायकोला? पोर कसं होईल मग?' बाकी वैयक्तिक कधी मी कुणावर टीका कधीच केली नाही पण विनाकारण ते माझ्या मागे कायम मला नावं ठेवायचे. त्यांचं त्यांच्यापाशी, मी मात्रं वयाचा मान ठेऊन कधीच त्यांना उलट किंवा अपमानास्पद बोललो नाही.

काय सांगावं पुढेमागे शोध लागेल पण सीडलेस आंब्यांचा, कुणी संजीव कपूर लोण्याची भजी पण करेल. दोन्हीतलं एकेक ओंकारेश्वरावर ठेऊन येईन हयात असलो तर. एका डोळ्याचा कावळा नाचत खायला पुढे आला की माझा पुनर्जन्मावर पण विश्वास बसेल. 

जयंत विद्वांस


No comments:

Post a Comment