Wednesday 27 July 2016

बाई आणि सर...

ते गुरुपौर्णिमा वगैरे ठीक आहे. फुलवाल्यांचा धंदा होतो. पण माझ्या बालपणी जी किंमत होती शिक्षकांना तेवढी तीव्रता आता नाही राहिली. गुरु म्हटल्यावर एक प्रचंड आदरार्थी भावना असायची, वचक असायचा. त्यांच्या चारित्र्याचा, राहणीमानाचा, ज्ञानाचा, आपलेपणाचा, रागाचा, माराचा एक जाचक वाटणारा पण हवाहवासा वचक असायचा. जुन्या आठवणी काढून अश्रू येण्याचे, हुरहूर लागण्याचे दिवस हळू हळू नाहीसे होतील. आताचे शिक्षक हे गाईड, वर्कबुक, शिकवण्या यातच गुंतले आहेत. कित्त्येकजण शिक्षक आहेत हे सांगावं लागतं. काळानुसार वेष बदलतो हे मान्यं आहे पण प्रत्येक पेशाला एक ग्रेस असते, जी त्याच्या कपड्यातून दिसते. युनिफॉर्मचा खरा उपयोग त्यासाठी होतो. उद्या एखाद्या हॉस्पीटलमध्ये बर्म्युडा, स्लिव्हलेस जाळीचं लाल बनियान, डोक्याला हैड्रोजन लावून केलेले कलरफुल मातेरं असा न्यूरो किंवा दुसरा कुठला सर्जन दिसला तर पेशंट आहे ती हाडं आणि तब्येत गोळा करून ऑपरेशनच्या आधी दुस-या हॉस्पिटलात जाईल. त्या पांढ-या कोटाला, स्टेथोला एक रिस्पेक्ट असतो. माणूस त्या पदाला गेला इथपर्यंत ठीक आहे पण त्याच्यामुळे ते पद शोभेल इतकं ज्ञान, वागणूक हवी.

कीर्तनकार भा.रा.घैसास आमचे मुख्याध्यापक होते. मराठी शिकवायचे दहावीला. डोक्यावर टोपी, क्वचित धोतर घालून पण यायचे. काय टाप होती त्यांनी हाक मारल्यावर पोरगा पुढे जाण्याची असा त्यांचा दरारा होता. कायम दोन जाडजूड पुस्तकं हातात, मितभाषी, ज्ञानी माणूस, ते जवळून गेले तरी आवाज बंद व्हायचे. द.मु.आंबेकर आम्हांला इतिहास शिकवायचे. धडा कधीच शिकवला नाही, इतिहास सांगायचे. काय वाणी होती त्यांची ओघवती, ऐकत रहावं नुसतं, एकपात्री प्रयोगच तो. मला इतिहासात मार्क नाही पडले फार कधी पण शिवाजी डोळ्यसमोर उभा रहायचा. अत्यंत हसतमुख माणूस. विनोद करणारे, समजणारे, जाता जाता टोपी उडवणारे. संस्कृतला आम्हांला गुर्जर बाई होत्या. नुकत्याच गेल्या त्या. जोकरला नाकाला, गालाला जसे ते लाल गोळे लावतात तसे त्यांचे गाल होते. अतिशय प्रेमळ, स्पष्टवक्त्या आणि ज्ञानी. आमचा एक दोस्त आणि त्या एकाच वाड्यात रहायच्या पण म्हणून फेव्हर नाही.

तिसरीला खोचे बाई होत्या आम्हांला. नऊवारी घालून येणा-या, मागे चिक्कूच्या आकाराचा अंबाडा घालणा-या, सगळे दात पडलेल्या. कुणी मुलगा रडला की त्याला मांडीवर घेऊन बसायच्या. इंदिरा कुलकर्णी (बहुतेक) म्हणून एक होत्या, गडद वेस्टइंडीज काळ्या अगदी पण त्यांचा रंग तेंव्हा कुणाच्या नजरेवर आघात वगैरे करायचा नाही. अनेक शिक्षक लाभले, तेंव्हा कुठे काय कळायचं त्यांचं महत्वं (याचा अर्थ आता कळतं असा होतो, पण तसं काहीही नाहीये). संस्कार आणि ज्ञान ते लोक आव न आणता देत होते. आमची बुद्धी भांड्याएवढी, त्यांनी घागरीच्या घागरी ओतल्या, आमचं भांडं जेमतेम भरलं एवढंच. त्यांच्या फटक्यात जादू होती. ज्याची त्याची कुवत त्याप्रमाणे कुणाची बुद्धी ठोक्याच्या भांड्यासारखी झाली, कुणाला पोचा आला. आज जाणवतं, कुठला संस्कार डोकावला, सद्सद्विवेकबुद्धी टोचणी द्यायला लागली की, हे त्यांचं देणं आहे. तेंव्हा रुजलं पण लक्षात नव्हतं आलं.

चिंचेच्या तालमीजवळची अडीच वर्ष मॉन्टेसरीं , मग मारुतीच्या देवळातली बदलापूरची पहिली, दुसरीला आपटे प्रशाला, तिसरी ते दहावी सरस्वती मंदिर, अकरावी विमलाबाई गरवारे हायस्कुल,  काही दिवस स्वाध्याय महाविद्यालय मग आदर्श विद्या मंदिर, बदलापूर, मग एम.जी.कॉलेज, अंबरनाथ अशा साताठ शाळातून फिरून आलो. मला कुणी लक्षात ठेवलं असेल असं माझं कर्तृत्व नाही पण या सगळ्यातले गुरुजन कडू गोड आठवणींसकट माझ्या लक्षात आहेत. आता आपल्याला खूप समजतं असं वाटायला लागलं आणि विद्यार्थीदशा संपली. बाकी दुस-याला अक्कल शिकवायला नाहीतरी कुठे अक्कल लागते हल्ली. आता सगळेच शिक्षक, कुणी विद्यार्थी नाही अशी परिस्थिती.

आता मिस आणि सर रग्गड झाले पण आम्ही मिस करतो ते आमच्या 'बाई' आणि सरांना. टाका एक आवाज त्या कोप-यातून, बघा थांबतो की नाही ते.

जयंत विद्वांस

No comments:

Post a Comment