Monday 4 July 2016

सत्तर एमएम चे आप्त (१४)… मदनमोहन कोहली...

बॉडी बिल्डिंगची हौस असलेला, बॉक्सिंग करणारा, उत्कृष्ट बिलियर्ड खेळणारा, उत्तम  पाककला येणारा, पोहण्याची आवड असणारा, रणजीसाठी राज्याकडून थोडक्यात निवड हुकलेला, बॉल रूम डान्समध्ये रुची ठेवणारा, चांगलं गाता येणारा, गाणी लिहू शकणारा तो, एक ऍथलिट पण होता. त्यानी तलतसारखा हिरो व्हायचा पण प्रयत्न केला. तो सैन्यात सेकंड लेफ्टनंट होता दोन वर्ष. दुस-या महायुध्दानंतर तो रिटायर्ड झाला. संगीताचं कुठलंही औपचारिक शिक्षण न घेतलेला, दिसायला अत्यंत देखणा असा हा गुणी संगीतकार. बगदादमधला जन्मं, लाहोरला शिक्षण आणि मुंबईला कर्मभूमी. देशभक्तं मदनलाल धिंग्रांच्या पुतणीशी - शीला धिंग्रांशी - त्याचं लग्नं झालं होतं. पंचवीस वर्षांच्या सांगितीक कारकिर्दीत त्यानी ९५ प्रदर्शित चित्रपटात ६४८ गाणी, बारा डबाबंद चित्रपटात २८ आणि एका डॉक्युमेंटरीसाठी एक एवढी गाणी दिली. 

हरलेल्या किंवा अनिर्णित सामन्यात काढलेलं शतक, पाच विकेट्स कुणाच्या लक्षात रहात नाहीत. एरवी फार कर्तृत्व न दाखवलेला हृषीकेश कानिटकर शेवटच्या चेंडूवर चौकार मारून सामना जिंकून दिला म्हणून लक्षात रहातो आणि सतत उपयोगी खेळ्या केलेला यशपाल शर्मा आणि त्याच्यासारखे इतर अनेक मात्रं लोक पटकन विसरतात. त्याचं तसंच झालं. अनेक हिट गाणी देऊनही त्याचे चित्रपट फार चालले नाहीत. त्यामुळे तो बी ग्रेड किंवा न चालणा-या चित्रपटांचा संगीतकार असं त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं. तेंव्हाच्या खप असलेल्या संगीतकारांनी रेकॉर्डिंग स्टुडिओ महिनोंमहिने बुक करून ठेवले. त्यामुळे लायकी असलेल्या पण खप नसलेल्या संगीतकारांना त्यांच्या मिनतवा-या कराव्या लागायच्या. या मानी माणसाला कसं जमणार ते. लता, तलत, रफी असं जबरदस्त त्रिकुट त्याच्याकडे गायचं. आता त्यांची गाणी ऐकून लगेच लोक गहिवर काढतील, रुमाल डोळ्यांना जातील पण त्याला स्टुडिओ मिळू दिला जात नाहीये याबद्दल कुणीही बोललं नसणार.

एक डाव्या हाताला हार्मोनियम घ्यायची, शाल टाकायची, फर्माईशी मागवायच्या आणि आपल्याला म्हणायचंय तेच म्हणायचं, आवाज जरा मुलायम काढायचा, शब्दांच्या जागी नि सा ग, रेगम असं काहीतरी फास्ट गाऊन दाखवायचं (नव्याण्णव टक्के लोकांना त्यातलं काहीही कळत नाही असं माझं शंभर टक्के मत आहे), टाळ्या आल्या की मोक्ष मिळतो मग परत शब्दांवर यायचं, आपले प्रशंसासंघ पोसायचे, कॉर्पोरेट मैफिली करायच्या, कॅसेट खपवायच्या, व्हिडीओ काढलात तर अर्थाशी सुसंगत नसेना का एचडी क्वालिटी व्हिडीओ आणि देखण्या बायका घ्यायच्या की झालात तुम्ही प्रथितयश गझलगायक. डझनभर गझल वाजल्या असतील तुमच्या बाजारात तर तुम्ही थोर आहात. या लोकांच्या कार्यक्रमाचा एक फॉरमॅट आहे. काहीही न कळता हातवारे करणारे, मांड्यांवर चुकीचे ताल धरणारे, पाठ गझला त्याच्या बरोबरीने म्हणणारे, 'प्रश्नच नाही, काय तोडतो तो, त्याचं हे ऐकलंय?, खल्लास, तरी आज वरचा स्वर कमी लागतोय' अशा 'अभ्यासू' कॉमेंट करणारं पब्लिक असतं. पहिला शब्दं आला भरघोस खपलेल्या गझलेचा की गगनभेदी टाळ्यांचा कडकडाट व्हायला पाहिजे. बेडकांच्या विहिरीत भरणा-या मैफिली या.

याच्या गझल ऐका किंवा कुठलंही गाणं ऐका. ऐकताना माणूस हरवून जातो. मूळव्याध होईल अशा चाली आहेत म्हणायला गेलो तर. काय एकेक शब्दं आहेत. राजघराण्याचे दागिने घडवणारे सोनार वेगळे असतात. तसा तो स्पेशल नमुन्याचे दागिने घडवायचा गझलेचे. त्याची कित्येक गाणी अशी आहेत की ऐकल्यावर 'अरे, याचं आहे हे? माहित नव्हतं' असं होतं. का असं होत असावं? चांगल्या लोकांना का विसरतो आपण त्यांच्या हयातीत? माणूस मेल्यावर भारत रत्नं, जीवन गौरव, फाळके पुरस्कार दिला काय, न दिला काय, काय फरक पडणार आहे. तो नैराश्यात, आर्थिक विवंचनेत दिवस काढतो तेंव्हा कुणीही फिरकत नाही आणि मरायला टेकला की सत्कार करून थैल्या द्यायच्या, मानपत्रं द्यायची. एक लाचार, हताश माणूस गौरवायचा आणि पाठ थोपटून घ्यायची. गेलाच तर गुणवर्णन करताना थकत नाहीत माणसं. पण जिवंत आहे तोवर तो कुणाच्या खिजगणतीतही नसतो. शमशाद बेगम गेल्या तेंव्हा एकजण मला म्हणाला होता, 'होत्या अजून? मला वाटलं कधीच गेल्या त्या'. यशस्वी न झालेल्या,  झालेल्या चांगल्या लोकांचं विस्मरण आपल्याला लवकर होतं.

त्याच्या गाण्यांची यादी द्यायची गरज नाही तरीही काही काही गाण्यांचा उल्लेख करावाच लागेल. एकाचढ एक रत्नं आहेत. जाना था हमसे दूर, यूं हसरतोंके दाग, उनको ये शिकायत है, वो भुली दास्तां, भुली हुई यादों, 'अनपढ'मधली - आप की नजरोने समझा, है इसीमें प्यारकी आबरू, जिया ले गयो जी मोरा सावरीयां, 'आपकी परछाईयां'मधलं - अगर मुझसे मोहब्बत है, 'गझल'मधलं - रंग और नूरकी बारात किसे पेश करू,  'हकीकत'मधली - जरासी आहट होती है, होके मजबूर उसने, अब तुम्हारे हवाले वतन साथीयों, 'जहांआरा' मधलं तलतचं 'फिर वो ही शाम, वो  ही गम', 'वह कौन थी'मधली लग जा गले, नैना बरसे रिमझिम रिमझिम, जो हमने दास्तां अपनी सुनाई, 'मेरा साया'मधली झुमका गिरा रे, आपके पहलूमें आकर रो दिए, नैनोमें बदरा छाये, तू जहां जहां चलेगा, 'दस्तक'मधली बैयां ना धरो,माईरी मैं कासे कहू, हम है मताए कुचें, 'हीर रांझा'मधली मिलो न तुम तो, ये दुनिया ये महफिल, 'हसते जख्म'मधलं तुम जो मिल गये हो, 'लैला मजनू'मधली हुस्न हाजीर है, तेरे दरपे आया हूं, इस रेशमी पाजेब की झनकार के सदके, 'मौसम'मधली रुके रुकेसे कदम, दिल धुंडता है, छडी रे छडी, 'भाई भाई'मधलं ऐ दिल मुझे बता दे, 'बावर्ची'मधली भोर आई गया अंधियारा, काहे करत बरजोरी, तुम बिन जीवन. मला माहीत नसलेली, मी न ऐकलेली यादी याच्यापेक्षा मोठीही असेल पण ही गाणी मला अत्यंत प्रिय आहेत.

हिरो हिरोईनचं चुंबन दाखवलं म्हणून (इम्रान हाशमी तू लैच लकी आहेस बाबा) भारतातलं पहिलं U/A प्रमाणपत्रं मिळालेल्या '१९४२ - अ लव्ह स्टोरी'ची गाणी केल्यावर आरडी म्हणाला होता, 'ह्याच्यानंतर माझा जमाना परत येईल'. तो जानेवारी ९४ ला गेला आणि सिनेमा आला एप्रिल ९४ ला. नंतर बेस्ट म्युझिक डायरेक्टर म्हणून फिल्मफेअर पण मिळालं. काय करायचं त्याचं? मी आता यशस्वी नाही ही खंत घेऊन तो गेला सुद्धा. गीता दत्त वयाच्या एक्केचाळीसाव्या वर्षी, सैगल बेचाळीसाव्या वर्षी, शैलेंद्र पंचेचाळीसाव्या वर्षी, शॉर्ट स्टोरीजचा बादशहा ओ हेन्री सत्तेचाळीसाव्या वर्षी, शब्दभ्रमकार असलेला, गिटार वाजवता येणारा लक्ष्मीकांत बेर्डे पन्नासाव्या वर्षी, आरडी चोपन्नाव्या वर्षी गेला. त्यांची कारणं त्यांना माहीत. त्यांच्या व्यसनांवर बोलायला आपण लायक नाही कारण त्यांच्यातला कलेचा अंशही आपल्यात नाही. पण कुठेतरी वाटतं, यांना कुणीतरी तोडीच्या, जोडीच्या माणसांनी सावरायला हवं होतं. अजून काहीतरी चांगलं करून ठेवलं असतं त्यांनी.

तो अजरामर राहील पण त्याला स्वतःला त्याचा काय उपयोग नाही. देणगीचा आकडा लिहावा तसं फक्तं एक्कावन्न वर्षाचं आयुष्यं जगलेला देखणा मदनमोहन चुनीलाल कोहली शेवटी लिव्हर सिरॉसिसनी गेला हे खरं. 

जयंत विद्वांस



 

No comments:

Post a Comment