Wednesday 29 June 2016

बढती का नाम...

दाढी हा खरडण्याचा विषय आहे? एकार्थाने आहे, एकार्थाने नाही. वयात आलेली मुलगी जशी सारखी आरशात बघते, तशी मुलं दिवाळीत किल्ल्यावर अळीव टाकून येते तशी ती आलेली नाजूक लव कुरवाळत वेगवेगळ्या कोनातून बघत असतात. एकदम त्याला आपण आता पुरुष, मोठा माणूस वगैरे झाल्यासारखं, रुबाबदार दिसायला लागलोय असं वाटायला लागतं. काही जणांना उपेंद्र लिमयेसारखी हिटलर जेवढी ठेवायचा त्या जागी मिशी येतंच नाही आणि अंबुजा सिमेंटची दिवार मधे असल्यासारखी त्यांच्या मिशीची फाळणी होते. कित्त्येक जणांना टी.व्ही.वर हवामानाच्या अंदाजात चार कोप-यात चार ढग दाखवावेत तशी मधली शहरं वगळून दाढी फुटते. बोकडासारखी हनुवटीवर, कानाच्या बाजूला कल्ला लांबल्यासारखी येते बाकी मधला भाग वाळवंट असतो. मग एखाद्या त्याच्याच वयाच्या मुलाच्या गालावर पीक काढल्यासारखी संपूर्ण दाढी दिसली की त्याला असूया वाटते. मग नापीक जमिनीवर शेतकरी लावतो त्यापेक्षा जास्ती आशेवर आज ना उद्या दाढी उगवेल म्हणून पहिल्यांदा झिरो मशिन किंवा कात्री मग वस्तरा चालवून मशागत केली जाते. सगळ्यांनाच तिथे खुंट फुटतात असं नाही. अशा लोकांबद्दल मला सहानुभूती आहे. बिचा-यांना सतत दाढी करावी लागते, पूर्ण दाढी वाढवून ती कोरायचा वगैरे आनंद घेता येत नाही.

प्रत्येक गोष्टीतलं नवखेपण गंमतीशीर असतं. पोरगा नेहमी वडील कशी दाढी करतात ते बघून शिकतो. मग कुणी नसताना तो ट्राय करतो. आता जेल आली, फोम आलं, मशिन्स आली, एकशे ऐंशी डिग्रीत झोपवणा-या आणि मग रेट बघून तिथेच बेशुद्ध पाडणा-या खुर्च्या, स्वप्नात बघाव्यात अशा अप्राप्यं बायका आफ्टर शेव्ह लावल्यावर चिकटतात असं स्वप्नं दाखवणारी आफ्टरशेव्ह, अनंत फळांच्या वासाचे फेसवॉश, फेसपॅक, मसाज आले. पण मी केली ती पहिली दाढी वेगळीच होती (अर्थात माझीच). बाबा करायचे तशी. गोदरेजचा तो पांढ-या झाकणाचा निळा गोल डबा, त्यात मधे पोट खपाटीला गेलेली ती पांढरी साबणाची रिंग, एक प्लास्टिकचा मग, एक स्टीलचा रेझर, गुबगुबीत केसाळ ब्रश, टोपाझचं ब्लेड, फोल्डिंगची कात्री आणि तुरटी हा सरंजाम ठेवायला एक पत्र्याचा डबा (शक्यतो वनदेवी बांधानी हिंगाचा) असायचा. स्टुलावर आरसा ठेवून बसायचं, गालफडं बसली असतील तर गालात जिभा घालून टेंगळं आणायची आणि तिथे साफसफाई चालू करायची.

आम्ही कटिंगला जायचो लहान असताना बजरंग न्हाव्याकडे. त्याच्याकडे तो चामडी पट्टा अडकवलेला असायचा वस्त-याला धार लावायला. त्याची ती अल्युमिनियमची पाण्याची वाटी, एकमेव लाकडी खुर्ची, धुरकट आरसा, गुन्हयांवर पांघरुण घालावं तसं ते त्याचं काळं कापड वर्षानुवर्षे तसंच होतं. एक तर त्याला सोडा वॉटर चष्मा होता. वाढलेले केस कापणे हे एकंच काम त्याच्याकडे व्हायचं. 'काय करू?' 'नेहमीसारखी, बारीक'. यापुढे कुठलाही संवाद तिथे झाला नाही. नंबर असेल तर दाढीचं जि-हाईक बघावं त्याचं. गुगल मॅप दोन बोटांनी जसा मोठा करून बघतात तसा तो गालाचा साधारण एक स्क्वेअर इंच एरिया ताणून धरायचा आणि कुठे तीळ बीळ आहे का शोधल्यासारखा अगदी डोळे चिकटवून दाढी करायचा. कानाचे केस, नाकपुड्या तिरक्या आणि वर करून तिथले केस कापणे वगैरे फुकट काम. गालफडं बसलेल्या वृद्धांची दाढी मात्रं हे लोक काय छान करतात, स्किल हवं त्याला. बजरंग दाढी झाल्यावर पाण्याचा फवारा असा मारायचा की कुणाला वाटेल, माणूस बेशुद्ध पडलाय आणि उठवण्यासाठी हा तोंडावर पाणी मारतोय. माणूस घाबरेल असा हल्ला, मग तुरटीची ती रिनच्या आकाराची वडी फिरवायची, खसाखसा तोंड पूसून मागचा लिव्हर हलवला की उठायचं गप.   

तोंडाला फेस आणण्याचे म्हणजे लावण्याचे पण अनंत प्रकार असतात. एकारांती आडनाव असेल तर तोंडाला दिसतोय तो साबणाचा फेस असावा असा संशय येईल इतपतच. ती गोदरेज डबी एका पिढीला एक अशी पुरेल इतका कमी. रोज दाढी करणा-यांचं तर मला फार कौतुक आहे. ते सटासट आल्यापासून जास्ती सोपं झालं असावं. माझ्या माहितीत एकजण दात घासून झाले की तोंडावर पाण्याचा हात फिरवतो की लगेच दाढी उरकून घेतो. एक अजून वस्त-यानी घरी दाढी करतो. एकाला लक्स लागतो फेस करायला. एक रेझरला त्या ब्लेडची खालची पट्टी लावतंच नाही, काय तर म्हणे एकदा हरवली म्हणून तशीच दाढी केली तर जमली, कशाला उगाच नवा आणायचा रेझर. एक सांताक्लॉझसारखा फेसाची दाढी काढतो. मग अगदी लोण्यात बुडवल्यासारखा रेझर गायब होतो. घरी दोन्ही कल्ले, मिशीची दोन्ही टोकं मापात कापणारे लोक महान आहेत. मला ते कधीच जमलं नाही. एकदाच मिशीला दोन्ही साईडला काट मारत मारत त्या मांजराच्या गोष्टीत खवा जसा दोन्हीकडून संपतो तशी ती चार्ली चॅप्लिनच्या वळणावर गेली तेंव्हा काढून टाकायची वेळ माझ्यावर आली होती आणि घोटाळ्यात सापडलेला माणूस कॅमेरामन अमुक अमुक सकट तमुक तमुक पुढे जसा चेहरा लपवतो तसा मी दोन दिवस फिरत होतो.

मी दाढी न करण्याची अनेक कारणं आहेत. आळस, आधी अगदी स्केलेटन तब्येतीमुळे होणारा रक्तपात, दाढी वाढल्यामुळे जरा मुरूम टाकून भर घातलेल्या खड्डयासारखे दिसणारे गाल, आज केली तर फार तर दुस-या दिवशीची सकाळ एवढाच वेळ ती केल्यासारखी वाटेल अशी लगेच येणारी सरला येवेलकर सारखी उफाड्याची दाढी या सगळ्याचा परिणाम दाढी ठेवणे हा आहे. सगळ्यात पहिला आवडलेला दाढीवाला म्हणजे 'अब्दुल्ला' मधला संजय खान. मग असे अनेक दाढीवाले दिसले. प्रत्येकाची स्टाईल वेगळी. टागोर, अनंत भावे, प्रणब रॉय, अनुपम गुलाटी, बाबासाहेब पुरंदरे, अच्युत गोडबोले, मंगेश तेंडुलकर, प्रकाश झा, मॅकमोहन 'सांभा', शेखर कपूर, कबीर बेदी, शॉन कॉनरी, प्रकाश जावडेकर, कलमाडी, प्रफुल्लकुमार महंत, रामदेवबाबा, वागळे, ब्रिजेश पटेल, संदीप पाटील, बॉर्डर, हशिम अमला, इम्रान ताहीर, नदीम(श्रवण), फ्रेंच 'कटा'तले बाळासाहेब, अमिताभ, विजय तेंडुलकर, आय.के.गुजराल आणि मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी. प्रत्येकाचा करिष्मा वेगळा, गाजण्याची कारणं वेगळी. 

पण या सगळ्या दाढीवाल्यांपेक्षा एक दाढीवाला खूप वेगळा होता. त्या खप्पड चेह-याच्या माणसाला एका अकरा वर्षाच्या अनोळखी मुलीनी - ग्रेस बेडेलनी - दाढी वाढवायचा सल्ला दिला होता. तो त्यानी मरेपर्यंत पाळला. एवढ्यातेवढ्या अपयशानी खचून जाणा-या माणसांनी त्याचा जीवनप्रवास बघावा. एकतर देवीचे व्रण असलेला खप्पड चेहरा, कृश शरीरयष्टी पण मनानी पोलाद असलेल्या या माणसाची १८३२ ला नोकरी गेली, सिनेटच्या निवडणुकीतही तो हरला. पुढच्या वर्षी तो धंद्यातही बुडाला. १८३५ मधे त्याच्या प्रेयसीचं निधन झालं. पुढच्या वर्षी त्याला नैराश्याचा झटका बसला. १८३८ मधे तो स्पीकरची निवडणूकही हरला. १८४३ मधे तो काँग्रेसच्या नॉमिनेशनसाठी उभा राहिला आणि पुलंच्या अण्णू गोगटयासारखा पडलाही. परत १८४८ ला रीनॉमिनेशनसाठीही पदरी निराशाच आली. १८४९ ला लँड ऑफिसर या पदासाठी पण त्याला नाकारण्यात आलं. १८५४ ला तो सिनेटची निवडणूक पण हरला. १८५६ ला उपाध्यक्षाच्या नॉमिनेशनसाठी पण हरला. १८५८ ला तो सिनेटची निवडणूक यशाचा बट्टा लागू नये म्हणून परत एकदा हरला. एवढ्या वेळा अपयश पदरी पडूनही तो लढत राहिला.

१८६१ ला मात्रं तो अमेरिकेचा अध्यक्ष झाला. त्याला ज्यांनी आधी हरवलं ती माणसं काळाच्या ओघात विस्मृतीत गेली पण आयुष्याची शेवटची निवडणूक जिंकलेला आणि हत्या झाल्यामुळे फक्तं चार वर्ष अध्यक्ष झालेला दाढीवाला अब्राहम लिंकन टिकून आहे आणि राहील. दाढी काय आम्हांला निसर्ग नियमाने आली, अशी जिद्द आणि कर्तृत्वं निसर्ग नियमाने मात्रं आलं नाही त्याचं काय करायचं? :)

जयंत विद्वांस

No comments:

Post a Comment