Tuesday 7 June 2016

लल्याची पत्रं (२९)…. 'तू प्यार का सागर है…'

लल्यास,

मागे आपण बलराज सहानीबद्दल बोललो होतो. तो काही नटीच्या मागे फिरत, उड्या मारत, लोचटपणा करत गाणी म्हणणारा माणूस नव्हता पण काही अजरामर गाणी त्याला मिळाली, त्याच्यावर किंवा त्याच्या चित्रपटातील. 'दो बिघा जमीन'मधली सगळी, 'वक्तं' मधलं 'ऐ, मेरी जोहराजबी', 'काबुलीवाला'मधलं 'ऐ मेरे प्यारे वतन', 'भाभी' मधलं 'चल उड जा रे पंछी', 'हकीकत' मधलं 'होके मजबूर उसने मुझे बुलाया होगा', 'कठपुतली' मधलं सुबीरसेनच्या आवाजात पियानोवर बसून म्हटलेलं 'मंझील वोही है प्यार की' आणि 'सीमा' मधलं खुर्चीत बसून 'तू प्यार का सागर है' म्हणणारा बलराज सहानी. काही माणसं रुबाबदार असतात, काही आब राखून असतात, काहींचं व्यक्तिमत्व असं असतं की त्यांच्याशी, त्यांच्याविषयी आपण सैल जिभेने बोलत नाही. जुन्या काळातला रेहमान आणि बलराज सहानी तसे होते बघ. कुठलीही भूमिका असो, रेहमानचा भांग तसाच असायचा, सगळे केस चापून चोपून बसवलेले. पायलट होता तो. (एकाच वर्षात तीनवेळा हृदयविकाराचे झटके आणि मग घशाचा कर्करोग होऊन गेला बिचारा). स्वत:चा एक आब राखून राहिलेली माणसं ही.

'सीमा' पाहिला आहेस? नसशील तर पहा. पात्रं उभी करणं एकवेळ सोप्पं आहे पण वातावरण उभं करणं अवघड काम आहे. ते अनाथालय, ती रागावलेली, बंडखोर 'गौरी' नूतन, तो संयमित 'अशोकबाबू' सहानी पहाण्यासारखं आहे. पंचावन्न साली म्हणजे एकसष्ठ वर्ष झाली तरी हे गाणं आणि सिनेमा लक्षात आहे अजून लोकांच्या यात त्याचं मोठेपण आलंच. कृष्णधवल सिनेमे जास्ती जवळचे का वाटत असावेत? चार्ली चाप्लिन, लॉरेल हार्डी आणि आपल्याकडचे मराठी, हिंदी जुने चित्रपट बघ खोटं वाटत असेल तर, जवळचे वाटतात. रंगीत किती चांगलं दिसतं खरंतर पण सुख-दु:खं, आशा-निराशा, आसक्ती-विरक्ती, प्रेम-द्वेष, हिंसा-अहिंसा या जोड्या आहेत तशीच जोडी कृष्णं-धवल. माणसं आपलीच प्रतिमा बघतात त्यात, एक उजळ, एक काळी बाजू, लख्खपणे डोळ्यापुढे येत असावी. तांत्रिक चकचकाट डोळे दिपवून टाकतो, सुखावेलच असं नाही. एन.चंद्राचा 'अंकुश' आता बघताना हसू येतं, पस्तीस एमेम आहे. तो सिनेमास्कोप नव्हता म्हणून अडलं काहीच नाही कारण विषय भन्नाट होता. तसं मला वाटतं एखाद्या दिग्दर्शकानी आवाहन स्वीकारावं आणि अप्रतिम 'कृष्णधवल' चित्रपट या काळात काढावा. बघूयात तरी चांगल्या सशक्त पटकथेला, संगीताला, अभिनयाला आणि दिग्दर्शकीय कौशल्याला रंगाची गरज भासते का?

शैलेंद्र विषयी काय बोलू. म्हातारी अनुभवी माणसं जशी साध्या बोलण्यातून आयुष्याचं सार सांगून जातात तसं शैलेंद्र लिहितो. मला तो, खेबुडकर आणि गदिमांच्यात एक कायम साम्य वाटत आलंय, साधे शब्द हात जोडून पुढे उभे असल्यासारखे असायचे यांच्या. चपखल बसतील असे बोजड शब्दं कुणालाही सापडतील पण आपलंसं करणारे साधे शब्दं लिहिणं अवघड आहे. खुर्चीच्या कडेला बसलेल्या लहान मुलीच्या डोक्यावर हात फिरवत प्रार्थना म्हणणारा अशोक बाबू आणि इकडे घुसमटलेली बंडखोर गौरी. पहिल्या कडव्यात नूतनबद्दल वाटणारी काळजी किती सुंदर मांडलीये त्यानी. अभी बच्ची है, नादान है वो, हे वेगळं सांगावं लागत नाही. पंख है कोमल, आंख है धुंदली आणि जायचय हा भवसागर पार करून. मधेच गळाठली तर? ही काळजी आहे त्याला. बाप होणं सोपं असतं, पालक होणं अवघड आहे. चांगल्या वाईटाची पारख नसलेलं, विरुद्ध जाण्याची इर्षा असणारं, बंडखोर वय असतं, एक मुरलेलं लोणचं, एक उमलू पहात असलेली कळी. एक संयम, एक उत्साह, उतावीळपणा. जो तो स्वत:च्या मते योग्यं. बाप रागावतो, पालक समजावतो. त्यानी जास्ती पावसाळे काढलेले असतात, त्याला लांबचं वादळ दिसत असतं त्यामुळे त्याचा जीव तुटत असतो. मी सांगून झालं, आता तू सांग म्हणतोय तो परमेश्वराला, 'अब तू ही इसे समझा, राह भुले थे कहांसे हम'.

तारुण्यात जगण्याचा वेग जास्ती असतो, ब्रेक नसलेली, वंगण घातलेली, न कुरकुरणारी गाडी असते. सगळ्यांचेच अपघात होतील असं नाही पण रस्ता चुकण्याची, क्वचित संपण्याचीही शक्यता असते. दुर्लक्ष केलं तर मृत्यू कदाचित येणार नाही या भ्रमात जगत असतो आपण. 'इधर झूमके गाए जिंदगी, उधर है मौत खडी' या ओळीनी डोळे खाडकन उघडतात. जिंदगी पे मौत का हक है, जब मर्जी बुला लेगी. कुठपर्यंत? याचं उत्तर माहित नाही म्हणून जगण्यात मजा आहे. प्रत्येकाला मरणवर्ष माहित असतं तर शेवटची वर्ष भीतीच्या सावटाखाली जगले असते सगळे, इन्शुरन्स प्रकार अस्तित्वात आला नसता, इस्टेटीकरता खून करायची गरज पडली नसती. कुठून आलो माहित नाही, कुठे जाणार माहित नाही. सगळाच कल्पनाविलास. आयुष्यं म्हणजे सहल असते पण आपण तंबू ठोकतो, जमवाजमव करतो, माणसं जोडतो. ठसा नाही उमटवता आला प्रत्येकाला तरी छाप सोडून जायला हवी काहीतरी. परत एकदा शैलेंद्र किती सुंदर म्हणून गेलाय बघ 'दो बिघा जमीन' मधे, 'अपनी कहानी छोड जा, कुछ तो निशानी छोड जा, कौन कहे इस और तू फिर आये ना आए'. शहर काय आयुष्यं काय, सोडताना नाव सोडून जाता येईल असं काहीतरी करायला हवं.

किशोरचा आवाज जसा काही गाण्यांना वेगळा लागतो तसा मन्नाडेचा पण लागत असावा. हे, लागा चुनरीमे दाग, ए भाय..च्या शेवटच्या ओळी, यारी है इमान मेरा, ऐ मेरे प्यारे वतन, ऐ मेरी जोहराजबी, 'प्रहार'मधलं 'हमारी ही मुठ्ठीमे आकाश सारा' ही आणि अशी अनेक गाणी आहेत. प्रार्थनेचा दर्जा दिला जावा अशी गाणी म्हणजे 'ऐ मालिक तेरे बंदे हम' (पाकिस्तानात हे प्रार्थना म्हणून म्हटलं जातं) आणि 'तू प्यार का सागर है'. तत्वज्ञान रुक्ष असतं पण गाण्यातून आलं की सोपं वाटतं. शैलेंद्र काय या गाण्यातले सगळेच 'जाना है उसपार' म्हणायच्या पलीकडे गेले. उसपार काय आहे ते माहित नाही, जे गेलेत ते सांगत नाहीत. म्हटलं ना सगळा कल्पनाविलास, तोपर्यंत इसपार आहे ते बघून घेऊ, तिकडचं तिकडे गेल्यावर.  
  
जयंत विद्वांस


तू प्यार का सागर है, तेरी एक बूंदके प्यासे हम
लौटा जो दिया तूने, चले जायेंगे जहांसे हम    

घायल मनका पागल पंछी, उडनेको बेकरार
पंख है कोमल, आंख है धुंदली, जाना है सागर पार
अब तू ही इसे समझा, राह भूले थे कहांसे हम

इधर झूमके गाए जिंदगी, उधर है मौत खडी
कोई क्या जाने कहा है सीमा, उलझन आन पडी
कानोमे जरा कह दे के आए कौन दिशासे हम

(सीमा, १९५५, शैलेंद्र, शंकर जयकिशन, मन्ना डे)

No comments:

Post a Comment