Tuesday 7 June 2016

हक्कं…

आत्तापर्यंतच्या आयुष्यात कुणाला 'आय लव्ह यू' म्हणायला जीभ रेटली नाही यापुढेही म्हणलं जाणार नाही (जसं काय कुणी अगदी आसुसलंय ऐकायला, मार खायची लक्षणं, दुसरं काय). कधी धीर झाला नाही, कधी भिडस्तपणा आडवा आला, कधी न्यूनगंड वाटला, कधी नकाराची भीती वाटली. पण काहीवेळा दोन्हीकडूनही हे न बोलताही बरंच काय काय घडलं. म्हणायलाच लागतं असं काही नाही हे उशिरा समजलं. न बोलता कळतं सगळं. मोठं मस्तं फीलिंग असतं खरंतर ते. ह्या गोष्टी मला उशिरा कळतात एकतर. मी भोळा वगैरे नाहीये पण कुणी मोकळेपणानी बोललं म्हणून मी उगाचच गैरसमज करून घेत नाही. माझं एकूण वकूब मला माहित आहे या बाबतीतला. तुसडेपणा, कुचकेपणा, विक्षिप्तपणा माझ्या बोलण्यात उपजत आहे त्यामुळे फार काळ माझ्याशी कुणाचं पटत नाही. असो!

तर मूळ मुद्दा हक्कं. तीच ती मसाला डोसा, वेंधळा, सवाई वाली. साल एक्क्याण्णव. एस.वाय.झालेलो फक्तं. अकौंटसला रग्गड दत्तू लोक होते मी धरून. वंदना, वर्षा, मी, मणियार, त्रिवेदी आणी ती. एकाच्या ठोक्याला मी आजतागायत जेवायला बसत आलेलो आहे ते तेंव्हापासून. आमचं एल टाईप ऑफिस होतं. आतल्या बाजूला एक लांबसडक टेबल होतं. तिथे आम्ही जेवायला बसायचो. चेअरपर्सन असल्यासारखा मी कडेला आणि बाकी सगळे काटकोनात बसायचे. आमचा क्रम ठरलेला असायचा. मी, ती, वर्षा, वंदना, मणियार, त्रिवेदी. सगळ्यांची खेचत, दात काढत जेवणं चालायची. खूप गमती केल्या आम्ही तिथे. एकदा मी म्हणालो, आज कुणीतरी फ्लॉवरची भाजी आणलीये, वास येतोय उग्रं. प्रत्येकजण म्हणाला, येतोय, पण मी आणलेली नाहीये. शेरलॉक होम्ससारखे सगळे पर्याय शोधून झाले.नाद सोडून दिला सगळ्यांनी. जेवताना मी माझी फ्लॉवरची भाजी दाखवली सगळ्यांना. मग प्रत्येक घासाला पब्लिक मला हाणत होतं. मी विचारलंय म्हणजे माझ्याकडे नाही हे तुम्ही गृहीत धरलं ही चूक माझी नाही हे बोलल्याने अजून हाणला मला.

तर एकदा ती समोर गेली होती, आम्ही जेवायला बसलो. वंदना माझ्याशेजारी बसली चुकून. कुठलाही हेतू नव्हता तिचा, मलाही त्यात काही गैर वाटलं नाही. 'ती'चा चेहरा लाल झाला तो समोरून उन्हातून जाऊन आल्यामुळे असेल असा माझा समज. दुपारी कॉफीला तिनी रिमांड घेतला. 'तुला सांगता येत नाही? माझ्याशेजारी बसू नको म्हणून?' 'अरे, असं कसं सांगणार, इंसल्टिंग आहे ते, आपल्याला असं कुणी म्हणालं तर चालेल का?' 'पण इथे *** बसते हे तुला सांगता येत नव्हतं का?' 'एखादा दिवस ती बसली तर काय बिघडलं पण? मी तरी असं कुणाला म्हणू शकत नाही कारण त्यात फार मोठं काही घडलेलं नाहीये'. 'तुलाच आवडतंय म्हणजे ती बसलेली'. 'उगाच काहीतरी, ती डबा घेऊन आली आणि जागा दिसली म्हणून बसली त्यात काय एवढं?' 'कुणीच नव्हतं तर शेवटी का बसली नाही?' 'विचारतो तिला'. 'काही गरज नाहीये, परत बसली ती तिथे तर बघच'. 'मी तिला बस असं सांगितलेलं नाहीये आणि मी एवढ्या क्षुल्लक कारणावरून उगाचच कुणाचा अपमान करणार नाही'. 'बरं, संगनमतानीच चाललंय म्हणजे सगळं'. 'माझे आई तसं काहीही नाहीये पण तुला तसं वाटत असेल तर मी काही करू शकत नाही त्याबाबत'. 'परत बसू दे, मी बघतेच तिच्याकडे'. सगळं पटत असताना समोरचीनी भांडायचंच ठरवलं की लॉजिकल स्टेटमेंट काहीही उपयोगाची नसतात हे मला तेंव्हापासून समजलंय.    

दुस-या दिवशी वंदना परत शेजारी बसली, नेमकी तिनी वरणफळ आणली होती. ते आमटीत लडबडलेले पोळ्यांचे तुकडे खाताना बघितलं तरी मला कसंतरी होतं. ती मागेच उभी होती. मला वाटलं नजरेनीच वंदना काळी पडणार बहुतेक. मी म्हटलं तिला, 'मला अज्जिबात आवडत नाही ते, तिकडे बस'. उठली बिचारी. ती आली आणि कुचक्यासारखं वरणफळ हा कसा चविष्ट प्रकार आहे हे मला जेवण होईपर्यंत समजावून सांगितलं. सुडाचाच प्रकार हा. तिस-या दिवशी ती परत समोर गेली होती,शप्पथ सांगतो माझ्या डोक्यात काहीही नव्हतं. वंदना शेजारी बसली आणि ती आली. तिचं डोकं फिरलंच होतं. माझी फूस आहे या समजानी जास्ती. तिनी वंदनाला हाताला धरून उठवलं. 'इथे मी बसते, जयंतच्या शेजारी कुणीही बसायचं नाही'. कमी शब्दात नेहमी जास्ती अपमान होतो. मला खूप ऑकवर्ड झालं. मी संध्याकाळी तिला सेपरेट सॉरी म्हटलं. तिच्या मनात काय होतं माहित नाही पण ती म्हणाली, 'अपमान मी पण करू शकले असते पण तुझ्याकडे बघून गप्पं बसले'. या वाक्याचा अर्थ आजतागायत मला उमगलेला नाही.

'ती'ला मी नंतर रीतसर हाणली. तिचं कसं चुकलं, असा अपमान तुझा कुणी केला तर? हे पटवून दिलं. तिनी मान्यंही केलं. पण काही ठिकाणी लॉजिक कामाला येत नाही. ती ओलसर डोळ्यांनी मला म्हणाली, 'बाकी मला काही माहित नाही, उद्या मी सॉरी म्हणेन तिला. पण तुझ्याशेजारी कुणीही बसलं तर मी हेच सांगेन आणि सॉरी म्हणेन. आता फार बोलू नकोस मला यावरून'. हक्कं. कुणीतरी टोकाचा दाखवला की त्रास होतो कधी, पण एवढा जीव टाकणारं कुणी तरी आहे ही भावना त्या त्रासापेक्षा जास्ती सुखद आहे. पंचवीस वर्ष झाली. उतारावरच्या गाडीसारखा काळ वेगात सरला. त्यातलं कुणीही भेटलं नाहीनंतर कधी रस्त्यातसुद्धा. वंदना विसरली पण असेल. 'ती' विसरली नसेल अशी समजूत आहे.

अर्थात मी तेंव्हापासून कामावर जेवायला एकटाच बसतो त्याच्याशी याचा काहीही संबंध नाहीये बरं का. 

जयंत विद्वांस

No comments:

Post a Comment