Tuesday 17 May 2016

उद्योग (१)…

आडनावाच्या अपभ्रंशाला साजेसे उद्योग मी लहानपणापासून करत आलो आहे. त्याकरता अनंतवेळा मारहाण होऊनही अजून काहीही फरक पडलेला नाही. वय वाढल्यामुळे आता ते चुकून झालं असं म्हणता येतं एवढाच फायदा, बाकी नुकसान करण्याचं कार्य इमानेइतबारे चालू आहे. हात मोडून झालाय (माझाच), दुसरीत असताना स्टोव्हवरून नुकत्याच उतरवलेल्या पिठल्याच्या कढईत बसून झालंय. चार दिवस वाडियाला अर्धदिगंबरावस्थेत पालथं झोपावं लागलं होतं. मलम ब्रशनी लावावं लागलं होतं. तुझी का ** जळते असं कुणी म्हणू शकत नाही मला, आधीच बेक्ड आहे. बोलताना अवस्था अशी होती की 'बोलतोय बघ कसा तोंड वर करून' ही वस्तुस्थिती होती. ती सवय मला तेंव्हा पासून लागली असावी नाहीतर मी तसा मुखदुर्बळ माणूस आहे. तर असे अनंत विध्वंसक उद्योग करून मी आता सोबर झालो आहे. 

आईनी एकदा मोठ्या मेहनतीनी मोठ्ठ्या बरणीभर तूप साठवलं होतं. पुरणपोळी केलेली आणि ती घरात नव्हती. म्हटलं तूप थोडं पातळ करून घेउयात पोळीसाठी. ग्यास लावला, झाकण काढलं, वरती मानेपाशी बरणी धरली आणि होळीत ते ढुमकं जसं फिरवतात तसं बर्नरवर झोका दिल्यासारखं पातळ करत होतो तूप. काचेची क्वालीटी भंगार असणार. एका मिनिटात वरची थ्रेडची काचेची रिंग माझ्या हातात आणि मनसेच्या खळखट्याकसारखं टोलनाका फोडल्यासारखा आवाज करत सगळ्या ओट्यावर काचा, बर्नरवर तुपाचा अभिषेक, ग्यास गेला. त्या लहान वयात पण मी कामसू होतो. सगळं पुसून घेतलं, खुनाचा पुरावा गायब करतात तशी परिस्थिती अगदी. आई आली. मी चिडीचूप. ग्यास लावायला गेली कशाकरता तरी. बर्नरचं सर्दी झाल्यासारखं नाक चोंदलेलं, तो कशाला पेटतोय. बरं दुसरा पेटतोय त्यामुळे सिलेंडर हयात आहे. कुठल्याही गोष्टीत परकीय शक्तींना जसं जबाबदार धरतात त्याप्रमाणे संशयाची सुई आधी होकायंत्रासारखी कायम माझ्याकडे वळते. अत्यंत निष्पाप चेह-यानी मी फार अंगाशी येणार नाही इतपत सगळं सांगितलं पण अभिनय कमी पडला असावा. नाके फोडणा-यांना आत घेतल्यावर जशी चूक कळते तसंच झालं माझं. शब्दश: अंगाशी आलं. 

तेंव्हा दरवर्षी डिस्टेंपर द्यायचो आम्ही. बाबा जायचे त्या दुकानात नाना बहिरट म्हणून अत्यंत गरीब व्यक्तिमत्व होतं एक. बाबांच्या भाषेत तोंडात बोट घातलं तरी चावणार नाही, इतका गरीब. ते यायचे मदतीला. शनिवार सकाळची शाळा. लवकर सुटायची. 'नाना. मुलांना घेऊन येता का सायकलवरून?' 'हो. आणतो की'. नानांना बघून आम्हांला चालत जायला लागणार नाही याचा प्रचंड आनंद झाला. आनंद झाला की माणसाला सुचत नाही काय करायचं ते. मी पुढे, भाऊ मागे. तेंव्हा एवढी गर्दी नसायची रोडला. नाना बुलेट ट्रेनच्या स्पीडनी चालवायचे सायकल. मधे उतरा, कुणाशी बोला, जॉगिंग करत परत सायकल पकडा. प्रवास निरस वाटायला लागला मला. मोजून सहा सात चौकावर घर. पुढे बसलेलो मडगार्डवर पाय ठेऊन. चुकून स्यांडल लागला टायरला. मस्तं आवाज आला खर्रखर्र असा. दहाबारा वेळा ट्रायल घेतली. भारी वाटत होतं. वडिलांच्या गाडीला मागे आर्मिचर होता दिव्यासाठी तो असाच वाजायचा पण आवाज जरा कमी. म्हटलं जरा एकसारखा पाय धरला तर सलग आवाज येईल. अंदाज घेऊन मी टायरला पाय लावला. अर्धा मिनिट सलग तान झाली असेल. पुढे घात झाला, शनिवार जन्मवार असून घातवार बघा. 

सारसबागेच्या आधी पाय सटकला आणि चाकात गेला. अर्ध्यात स्वप्नं तुटावं तसं झालं सायकलचं. मी नाही जाणार पुढे, रागावलीये मी, असं म्हणत ती जागीच थांबली. नाना समरसॉल्ट मारून सायकलच्या पुढे, भाऊ मागे पडला, मी ऋणानुबंध असल्यासारखा साथ न सोडता स्पोक तुटलेल्या चाकात पाय घालून सायकलला कवटाळून पडलेलो. तुरळक पब्लिक धावलं. नानांना उपदेशपर डोस पाजून झाले. मूडदूस झाल्यावर पोट मोठं होतं फक्तं तसा उजव्या घोट्याजवळ फुगा आलेला. एकानी स्पोक पिळून दुस-यात गुंतवले. परत लफडं नको म्हणून आम्हांला दोघांना बसवून त्यांनी चालत घरी आणलं. त्यांची काहीही चूक नसताना त्यांनी माफक ऐकून घेतलं. रक्तचंदन, आंबेहळद यांचा फेसप्याक लावून झाला घोट्याला. कुठलाही काम करावं लागलं नाही रंगाचं. तसंही सांडलवंड जास्ती असल्यामुळे कमी नुकसान होईल अशीच कामं मला दिली जायची आधीपासून. 'मैं चूप रहूंगी'च्या मीनाकुमारी सारखं मी मौन धारण केलं आणि 'काय माहित कसं झालं पण पाय आत गेल्यावरच मला समजलं' या एका वाक्यावर मी ठाम राहिलो. मला डबलसीट घेऊन चाललेत हे स्वप्नं पडून नाना अर्धवट झोपेत दचकून उठायचे म्हणे. 

हुशारी जशी उपजत असते तसा वेंधळेपणाही उपजत असतो. सांडणं, फुटणं, तुटणं हे नक्षत्रगुण आहेत त्याला मी काय करू. काप-या आवाजाच्या तलतचं कौतुक होतं, तो हृदयाचे तुकडे करतो तर त्याचं कौतुक. इथे कप-या हातांनी वस्तू पडतात इतकाच फरक. कौतुकसुद्धा नशिबात लागतं. :P 

जयंत विद्वांस          

No comments:

Post a Comment