Monday 9 May 2016

फणस…

फणस…
 
आता पासष्ठीचे झालेत बाबा. पद्मनाभ दिक्षित हे त्यांचं खरं नाव. श्री.दुर्वास फणसे आम्ही ठेवलेलं. आता जरा निवळलेत. नाहीतर जमदग्नी, दुर्वास हे शांतीदूत माझे चुलत वगैरे काका म्हणून खपतील इतके ते भडक डोक्याचे होते. अजून आहेत असं आईचं म्हणणं. बाबा मोठे शिस्तप्रिय होते, आहेत. काय करतील ते वेळेत, काटेकोर, शिस्तीत. बेशिस्त दिसली की त्यांचं डोकं फिरलंच म्हणून समजायचं. सख्खी मुलगी असो नाहीतर अजून कुणी सगळ्यांना नियम एकंच. आईला एकदा मी म्हटलं होतं, 'कसे दिवस काढलेस ते तुझं तुला माहित'. आई म्हणाली होती, 'शिस्तीचा, नियमांचा, पथ्थ्याचा त्रास सगळ्यांनाच होतो. मलाही झाला सुरवातीला. पण कसं आहे माहितीये का एकदा कळलं नं आपल्याला, या या गोष्टींचा राग येतो समोरच्या माणसाला, त्या करायच्याच कशाला आपण? बरं, ते सांगतात ते वाईट नाही, फायदाच आहे त्याचा. अर्थात जगाला शहाणं केलं नाहीतर जग बुडणार लवकरच हा स्वभावाचा भाग आहे त्यांच्या. त्याचा त्रास आपण करून कशाला घ्यायचा? आपण शक्यतोवर वाद होणार नाहीत ते बघावं'. मला काही तिचं बोटचेपे धोरण पटलं नाही पण मी वादही घातला नाही.

मी एकुलती एक मुलगी त्यांची. बाबा शिक्षक होते (शाळेतून मुख्याध्यापक म्हणून रिटायर्ड झाले म्हणून 'होते' म्हणायचं फक्तं). घरची परिस्थिती तालेवार होती, अजूनही आहे पण यांनी पत्रिकेत वरून येतानाच लिहून आणलं असेल ते शिक्षक होतील असं. प्रॉमिसरी नोट पण लिहून दिली असेल 'शिक्षक' म्हणूनच काम करेन अशी. 'अभ्यास करून माणूस मेला असं आलंय का पेपरात कधी? तुम्ही गेलात तर तुम्ही बाकी कशात नाही तरी यात तरी पहिले म्हणून नाव होईल, रेकॉर्ड होईल, जगलात तर हुशार व्हाल. दोन्हीकडून तुमचाच फायदा आहे, त्यामुळे मला कारणं सांगू नका' अशा शब्दात ते वासलात लावायचे कारणांची. बाबांची बोलणी खाल्लेली सगळी मुलं कायम वरच्या नंबरात पास झाली पण कुठेतरी कटुता शिल्लक राहिलंच असंच बाबा बोलायचे. दहावी झाल्यावर सुटलो एकदाचे असं प्रत्येकाचं मत होतं. मला वाटायचं हे सुटले पण माझं काय? अर्थात तो सगळा त्या वयातला खुळेपणा होता हे नंतर कळलं.

अर्थात मी काही सारखी नाही बोलणी खायचे पण महिन्यात एकदा तरी पूजा व्हायचीच माझीही. बाबांची काही वाक्यं ठरलेली होती. ती ऐकण्यापेक्षा अभ्यास केलेला बरा. 'दारोदार करवंट्या घेऊन भिका मागायच्या असतील तर देवाला पास कर म्हणून जो नारळ फोडताय तो नीट निम्म्यात फोडा, तो ऐकणार नाहीये दहा रुपयाच्या नारळात, पॉलीश पेपरचे पैसे मी देतो, एकदम गुळगुळीत करा करवंट्या आणि मागा भिका, तोंडाकडे बघून नाहीतर निदान देखण्या करवंटीकडे बघून तरी कुणी टाकेल काहीतरी'. 'हागस्तोवर खाता तसा अभ्यास का करत नाही ओ येईस्तोवर, अभ्यास केलात तर मेंदू फुटेल अशी भीती आहे का?' 'पाच आंब्यातले कुठलेही तीन खा म्हटलं तर ऐकता का, भिका-यासारखे पाचही खाल ना? मग तसेच पेपरात सगळे प्रश्नं सोडवा. 'कुठलेही तीन' हा तुमचा अपमान समजा परीक्षकांनी केलेला'. गाईड बघीतलं कुणाच्या हातात की त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला जायची अगदी. 'मुलींकडे चोरून कसं बघायचं ते कसं स्वत:चं स्वत: शोधता, उत्तरं पण शोधता आली पाहिजेत तशी, परत गाईड दिसलं किंवा त्यातलं छापील उत्तर लिहिलं तर त्याची सुरनळी करेन आणि ***त घालेन'.   

पोराच्या समर्थनार्थ बोलणा-या आईबापाला पण ऐकावं लागायचं, 'मी शिकवण्या घेतो ते माझ्या संसाराला हातभार म्हणून नाही, त्यांची पोटं भरायला माझा पगार आणि इस्टेट पुरेशी आहे, तुमचे शंभर रुपडे आत्ता अंगावर फेकू शकतो, मस्ती म्हणून नाही, ऐपत आहे म्हणून, घरात कुणी गेलं असेल, पोर आजारी असेल तर यायचं नाही फक्तं शिकवणीला, दुसरी फालतू कारणं असतील तर आपला राजकुमार/कुमारी घरात मखरात ठेवा'. बाबांनी खूप जणांना फुकट शिकवलं पण कधीही त्याची वाच्यता केली नाही. ते एकदा एका उर्मट, पैशाचा माज असलेल्या पालकाला म्हणाले होते. 'मी पैसे घेतो ते नाममात्रं, फुकट दिलं की किंमत नसते म्हणून. इतकी वर्षे शिकवणीचे सगळे पैसे मी कर्व्यांच्या 'अनाथ हिंदू महिलाश्रमाला' देतोय. तुमच्या बायकोनी आत्तापर्यंत पेपरच्या जाहिरातीत जेवढं सोनं पाहिलं असेल तेवढं माझ्या तिजोरीत अस्ताव्यस्त पडलंय त्यामुळे पैशाचा रुबाब मला दाखवू नका, निघा.'

ताकद असूनही बाबांनी कुणावरच कधीही, कितीही राग आला तरी हात मात्रं उचलला नाही. लोकाची मुलं, त्यांना कशाला मारेन मी, माझ्या मुलीला कुणी फटकावलं तर मी त्याची मान मोडेन राग येउन असं त्यांचं त्याबाबतचं तर्कशास्त्रं होतं. त्यांच्या बोलण्याचाच मार जास्ती परिणामकारक होता. मी दहावी झाले. मला म्हणाले, 'तू म्हणशील त्या दिशेचा खर्च मी करू शकतो. तुला काय आवडतं ते तू ठरव. प्रत्येक मूल पहिलं येऊ शकत नाही, येऊही नये, किंमत रहाणार नाही. पण जे काय शिकशील ते साठ टक्के तुला येत असेल तर त्या साठ टक्क्यातलं शंभर टक्के ज्ञान तुला हवं, एवढं लक्षात ठेव. पैसे कमावण्यासाठी शिकायचं असेल तर माहिती मिळेल, ज्ञान नाही. स्वत:ला नविन काही कळावं, त्यात अजून काही भर घालता येईल का असं वाटलं पाहिजे शिकताना'. मी इंग्लिश मधून एम.ए.केलं. जर्मन शिकले. मी दुभाषी म्हणून काम करते. लहान वयात जगभर फिरले पण बाबांनी कधी तोंडावर कौतुक म्हणून केलं नाही. आईजवळ म्हणतात, 'कायच्या काय शिकली गं पोरगी, मला मागे टाकलंन तिनी'.

माझ्या लग्नात सुद्धा ते ढसाढसा वगैरे रडले नाहीत. थोडेसे पाणावलेत की काय अशी शंका येईल इतपत डोळे ओलसर होते. आम्ही दोघंही दुभाष्याचंच काम करतो. प्रेमविवाह माझा. मला म्हणाले होते, 'आम्ही जुळवला असता म्हणजेच तुझं भलं झालं असतं असं अजिबात नाही. आईबाप आयुष्याला पुरे पडत नाहीत. तुझा जोडीदार तू निवडलास यात राग नाही, फक्तं विचार करून निर्णय घे म्हणजे झालं. निर्णय चुकला असं वाटलं तर तो चुकीचा कसा आहे हे पटवून द्यावं लागेल, ही भातुकली नव्हे, मग मी तुझ्या पाठीशी आहे याची खात्री बाळग आणि निर्धास्तपणे लग्नं कर'. माझ्याकडे दिल्लीला ते फार येत नाहीत. आत्तापर्यंत दोनवेळा आलेत फक्तं चार वर्षात. मलाही फार जमत नाही सुट्ट्यांमुळे जायला वरचेवर. आता ते दोघंही थकलेत. आईशी बोलणं होतं दिवसाआड तरी, बाबांशी फार नाही. 'कशी आहेस, बाकी बरंय ना, जावई काय म्हणतात' यापुढे आमची गाडी सरकत नाही. 

आज सकाळची गोष्टं. परवा एक लग्नं आहे त्यासाठी मी काल रात्री आले उशिरा, दीड वाजला असेल. बाबांमुळे पाचच्या ठोक्याला उठायची सवय इतकी वर्ष अंगवळणी पडलीये, गजर होण्याची गरज लागत नाही. बाबाच आले होते मला घ्यायला एअरपोर्टला. दोन विमानं बदलून दमल्यामुळे हॉल मधेच झोपले आल्या आल्या सोफ्यावर. जाग आली म्हणून मोबाईल बघितला. उठणार तेवढ्यात बाबांचा आवाज आला मग तशीच झोपले मुद्दाम डोळे मिटून. उगाच म्हटलं लवकर उठ्ण्यावरून लेक्चर नको. पण भलतंच घडलं. डोळ्यावर ऊन येऊ नये म्हणून बाबांनी पडदे सरकवले, आईला बघून तोंडावर बोट ठेवलं आणि दोघं किचनमध्ये गेले. मुद्दाम दरवाज्यापाशी जाऊन आड उभी राहिले. बोलूच देत म्हटलं उठण्यावरून, भांडतेच आज मुद्दाम. दोघं चहा पिता पिता बोलत होते. 

'अहो आठ वाजले, आत झोपायला सांगू का तिला?' 'झोपू दे गं, घरी उठतच असेल पाचाला, मी प्रत्येकाला शिस्त लावायचा प्रयत्नं केला तो त्याच्या आयुष्याला अर्थ यावा म्हणून, माझा अट्टाहास तुम्हांला जाचक वाटला असेलही पण नाईलाजाने असेल किंवा पटलं म्हणून असेल तुम्ही तसं वागलात. तुम्ही तसं वागला नसतात तर मला राग नसता आला, दु:खं वाटलं असतं. बाहेरचा कुणी म्हणू शकला असता, ' आधी घरातल्यांना लावा शिस्तं मग बाहेरची धुणी धुवा'. पण तशी वेळच आली नाही कधी तुमच्यामुळे. किती फरक आहे आपल्या दोघांच्या स्वभावात. तू स्पंजसारखी, सगळं टिपून घेणारी आणि मी नदीतल्या दगडासारखा, कितीही पाणी गेलं तरी कोरडा ठाक अगदी.  पण आज मलाही रडू आलं'. 'का ते?' 'आम्ही आलो तेंव्हा तू झोपली होतीस, सगळं सामान आत आणलं तिनीच आणि तिथेच झोपली सोफ्यावर लगेच. मी नेहमीप्रमाणे उठवणार होतो आणि सांगणार होतो, आत झोप म्हणून'. 


'पण तिचा तो माहेरी आल्याचा आनंदी चेहरा बघून मला भरून आलं. मी आतून शाल आणली आणि घातली तिला. थोपटलं जरा डोक्यावर तर झोपेत म्हणाली, 'बाबासारखं थोपटतोयेस तू' आणि माझा हात घट्ट धरला. आतापर्यंत कधी कुठल्या मायेच्या पाशात मी फार गुंतलो नाही पण काल हात सोडवून घेताना खूप कष्ट पडले बघ मला. समोरासमोर बोलणार नाही ती काही, पण किती लहानपणचं लक्षात आहे बघ तिच्या. दातात कण अडकावा तसं कुठे काय मेंदूत अडकून राहतं बघ. आज इतक्या वर्षांनतर तो स्पर्श तिच्या डोक्यात आहे.' आई हसत रडत होती आणि बाबा रडत हसत होते आणि मी दाराशी मुग्ध होऊन पहात होते. 

फणस. पिकल्यावर थोडा उकललाय, गळायच्या आत सगळे गरे काढून घ्यायला हवेत.      
   
जयंत विद्वांस


No comments:

Post a Comment