Wednesday 4 May 2016

रद्दी…


टीव्हीच्या बातम्या बघणं मी कधीच सोडलंय, पेपर वाचायची सवय अंगवळणी पडल्यामुळे तो वाचला जातोच पण हल्ली पेपर मी अतिशय विनोद बुद्धीनी वाचतो. वास्तविक पहाता वांझोटी चीड आणणा-या, हताश करणा-या, त्रास होणा-या बातम्याच जास्ती असतात पण तेच तेच वाचून सगळं बोथट झाल्यामुळे तशा बातम्या नसल्या तर चुकल्याचुकल्यासारखं होतं. जुनाच पेपर आजची तारीख टाकून छापला तरी चालेल अशी परिस्थिती आहे. अधूनमधून चांगल्या बातम्या मधल्या पानात, कोप-यात येतात कुठेतरी, वाचताना धक्का बसू नये म्हणून त्या तिथे छापत असावेत. भारताची स्वत:ची जीपीएस प्रणाली, अनेक देशांचे उपग्रह एकावेळी सोडले वगैरे क्षुल्लक बातम्या पण छापतात. माणसाला काय बोलू नये आणि कुठे बोलू नये एवढं कळलं पाहिजे असं म्हणतात. त्याच चालीवर निदान काय छापू नये आणि कितव्या पानावर छापू नये एवढं कळायला हवं. 'दाउद मधुमेहानी त्रस्तं' ही बातमी फ्रंट पेजवर कशी काय येऊ शकते? काय अपेक्षित आहे? औषधं पाठवावीत की डॉक्टर्स पाठवावेत की मेणबत्त्या लावून प्रार्थना करावी की घंटा बडवून (देवळातल्या) आवाहन करावं?


मला बातमी वाचली की कंसातलं स्वगत दिसतं. मल्ल्याचा खासदारकीचा राजीनामा त्याची सही नाही म्हणून फेटाळला (ती सही त्याची नसेल तर मग बँकेत केलेली कुठलीच सही त्याची नाही, त्याच्या नावावर कर्ज दाखवणे हे षड्यंत्र आहे - जेठमलानी, प्लीज नोट), ऑगस्टा हेलीकॉप्टर वरून काँग्रेस अडचणीत (हेरॉल्ड बोर्डावर यायला अवधी आहे, हे कधी येणार?), अमक्याला पुढच्या महिन्यात नक्की अटक होणार (इतकी वर्ष या यंत्रणा कुठे गायब होत्या? पुरावे अचानक सापडले का? समजा पाच वर्षानंतर सत्ताबदल झाला तर  हे चालू राहील का?), पुणे सुपरजायंट्सची वाट खडतर (शेतक-याच्या आयुष्याबद्दल कुठेही, कुणालाही चिंता नाहीये), १५ जुलै पर्यंत पाणी पुरणार नाही (गाळ काढला तर पाणीसाठा वाढू शकतो ही बातमी नेमेची येतो पावसाळा या धर्तीवर मी बालपणापासून ऐकत आलो आहे, तो कधी काढणार?), ट्रंपला उमेदवारी मिळून अध्यक्ष झाल्यास भारताला अवघड जाणार (आधी काय मोठा अमेरीकेनी आपल्याला मांडीवर बसवून घास भरवलाय), बलुचिस्तान स्वतंत्र करण्याची भारताला गळ (ही मागणी अशी बोंब मारून का होते? चिडीचूप काम दाखवता येत नाही का, इस्राइलसारखं), तीन वर्षाच्या मुलीवर अमानुष बलात्कार (सौदीतले कायदे कधी लागू होणार?), कीटकनाशक पिऊन शेतक-याची आत्महत्या (कोकणातला शेतकरी आत्महत्या का करत नाही? कर्जमाफी एवढा एकंच उपाय आहे का? तीच रक्कम वापरून धरण बांधता येत नाही का?), बिपाशाचं आणि तिच्या नव-याचंही तिसरं लग्नं (लिझ टेलर आणि इंद्राणीला मागे टाकणार ही), या आणि अशा अनंत बातम्या.

यात नेत्यांची, शंकराचार्यांची बेताल वक्तव्यं, धर्मावरून, जातीवरून होणा-या चर्चा, परस्परविरोधी बातम्या, फसवणुकीच्या फक्तं रक्कम आणि स्कीम बदललेल्या बातम्या, न्यूनगंड वाटेल असे घोटाळ्यांचे आकडे, आपण सोडून बाकीच्या देशात घडणा-या चांगल्या गोष्टी, महिनाभर चालू असलेली जंगलाला लागलेली आग, कुपनलिकेत पडून मेलेलं मूल, सीमेवरचा गोळीबार आणि त्यात किडामुंगीसारखे मरणारे आपले जवान, अशा अनेक त्रासदायक गोष्टींची भर असते. मग का वाचतो आपण पेपर? कारण आपल्याला पण ते व्यसन आहे, अंगवळणी पडलंय, फक्तं चांगल्या बातम्या आल्या तर आपल्याला अळणी वाटेल. उथळपणा आला, सवयीनी तो हवाहवासा वाटू लागला हा आपलाही दोष आहे. अग्रलेख वादग्रस्त असेल तर वाचला जातो किंवा त्यावर बोललं जातं. माधव गडकरी, तळवलकर यांसारखे लोक अस्तंगत झाले. अभ्यासपूर्ण, तटस्थ अग्रलेख दुर्मिळ झाले. एकूणच सगळं सवंग होत चाललंय.

आपल्या आयुष्यात पेपरच्या बातमीत नाव येणं शक्यं नाही. आता फक्तं प्रिपेड गृह्यसंस्कार सुरु झालंय का विचारणं तेवढं बाकी आहे. ती बातमी आपली आपण दिली तरी स्वत:ला वाचता येणार नाही म्हणून निदान आकर्षक ड्राफ्ट तरी देऊन ठेवावा असं वाटतंय, तारीख टाकतील ते लोक. त्याच त्याच बातम्या वाचून कंटाळलेल्या कुणाला तरी मधली पानं वाचावीशी वाटली आणि वाचून मनात स्वगत उमटलं तर ठीक नाहीतर दुस-या दिवशी रद्दी आहेच.

जयंत विद्वांस

No comments:

Post a Comment