Saturday 30 April 2016

दिसतं असावं...

दिसतं असावं... 

परवा दोन मुंजीना गेलो होतो मुंबईला. दगदग, धावपळ करून माणसं येतात, जमतात, लगेच गायब होतात. पहिल्यासारखं आधी चारपाच दिवस तयारी मग बोडण किंवा पूजेला थांबण्याचे दिवस इतिहासजमा झाले. वेळ नाही, जागाही कमी आणि उत्साह पण कमी झालाय एकूणच. प्रथा चालत आल्यात म्हणून पार पाडल्या जातात. संध्या कोण करतंय तसंही आता? मुंज झालेल्या मुलानी विचारलंच चुकून तर आधी वडिलांना यायला हवी ना. त्यामुळे तिची सुरवातच होत नाही. ती केली म्हणजे काय होतं, नाही केली म्हणून काय होतं याचा उहापोह नको. मी ही ती एकदाही केलेली नाही. पण संस्कार असतात, ते करायचे एवढं खरं. मुलगा आता शिकायला आश्रमात जाणार नाही, ब्रम्हचर्य पाळणं शक्यं नाही लग्नं होईस्तोवर, बरं , त्या काळासारखे बालविवाह झाले असते तर थांबायची गरजही नव्हती. पण एकूणच इतर बाबी, हेतू, कारणं बदलली तरी संस्कार चालू आहे अजून तरी तो.

धार्मिक गोष्टं बाजूला राहू दे, मी जातो कारण की तिथे सगळे भेटतात. आपल्या मुंजीत ज्यांनी लगबग केली त्या आत्या, काकू. मामा, माम्या आता थकलेल्या असतात. त्यांना भेटता येतं, म्हणून जायचं. हे सगळे म्हातारे लोक उठून दिसतात, वेगळे दिसतात त्या सगळ्या झगमगाटात. गळ्याशी कातडी लोंबत असते. हातात काठी, ती नसली तरी, आहे पण आणलेली नाहीये, हे कळतं. फार वेळ उभं रहावत नाही, बसूनही रहावत नाही. उकाड्याचा त्रास होत असतो. त्यांची बायकोही त्याच वयाची असते. म्हातारी नटून थटून आलेली असते. दिवस खराब म्हणून सोन्याचा दागिना घरात असतो. पण मोत्याचे चारपाच घालतीलच. कधीकाळी कमरेपर्यंत असलेल्या शेपटाची मानेवर टोचेल एवढी लांब बोन्साय वेणी असते किंवा मग अंबाडा घालून त्यावर गजरा गोल फिरवलेला असतो. ब्लाउजच्या हाताला घड्या असतात. म्हातारी बाहेर ब-याच दिवसात गेलेली नाहीये हे कळतं. हाताशी छोटीशी पर्स असते. कुणी आलंच बाळाला घेऊन भेटायला तर? म्हणून आत पन्नासाच्या नोटा असतात. 

त्यांच्या वयाचे एकत्रं छान कोंडाळं करून बसतात. गप्पा असतात त्या म्हणजे फक्तं चौकश्या - तब्येतीच्या, अनुपस्थित माणसांच्या, कुणाचं तरी कळलं का - अशाच. कुणीकडे सुनेनी, मुलीनी मिरवताना अडचण नको म्हणून आणून दिलेलं वाह्यात पोर असतं. ते काही केल्या एका जागी बसत नाही आणि म्हातारीचा प्राण कंठाशी येतो. तरीपण ती त्याला सांभाळत असते आणि गप्पात भाग घेत असते. त्याच गावात असेल घर तर जास्ती वेळ बसता येतं. पण जेवणं  झाल्यावर लोकल, रिक्षा पकडून एसटी/रेल्वे पकडायची असेल तर तारांबळ उडते त्यांची. जाऊ ना वेळेत? या धास्तीपोटी लक्ष लागत नाही आणि मग 'चला लवकर'चा धोशा एक कुणीतरी लावतो. कुणाचं अर्धांग घरीच असतं त्यामुळे लवकर जाणं गरजेचं असतं. धावपळ होते. निघावं लागतं. ब-याच वर्षांनंतर कुणाची तरी भेट होते. आठवणी निघतात. दाटून येतं. तो/ती पाया पडतात. म्हाता-यांना भरून येतं.

आता लोकांना आशीर्वाद तरी कुठे देता येत आहेत. 'आयुष्यमान भव' हे कानावर पडायला तर हवं ना. कुणीतरी अजून आशीर्वाद देतंय वाकल्यावर ह्यात पण अजून आपण म्हातारे नाही झालो असा छुपा आनंद आहे खरंतर. दरवेळेला कुठे जाणं झालं की सगळी माणसं बघून बरं वाटतं. दरवर्षी कार्य निघेलच असं नाही, एवढी संख्याही आता घराघरात नाही. त्यामुळे भेटी होणं अवघड होत जाणार यापुढे. म्हणून मी आपला वर्षातून एकदा फुलपुडी टाकल्यासारखा का होईना पण जाउन येतो. गदिमांची आई पुलंना म्हणाली होती, 'माणसानी दिसतं असावं रे'. खरंय, माणसानी दिसतं असावं, कोण कधी 'नसतं' होईल काय सांगावं?    


जयंत विद्वांस 


No comments:

Post a Comment