Monday 18 April 2016

'आखरी रास्ता'…

'आखरी रास्ता'… 
 
उन्मळून पडणे, उध्वस्त होणे, विश्वासघाताचा धक्का, जिगर, बदले की आग, खर्जातले संवाद, चेह-याच्या हलणा-या नसा वगैरे गोष्टी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या बघण्यापेक्षा के.भाग्यराजनी लिहिलेला तमिळ 'कमल हसन अभिनित - Oru Kaidhiyin Diary' चा हिंदी अवतार 'आखरी रास्ता' बघावा. मी अनंतवेळा तो पाहिलाय, अजूनही पाहीन. 'तूने मेरा दुध पिया है' ह्या भंकस गाण्याला फक्तं मी रिमोट घेतो हातात (मोहम्मद अझीझ, शब्बीरकुमार ही खूप नशीबवान लोकं, यांना हिमेश रेशमियासारखे स्वत:साठी पिक्चर काढावे लागले नाहीत. 'मर्द' हा आधीच टुकार होता त्यात ह्या दोघांची गाणी म्हणजे सुधीरच्या तावडीतून सुटलो तर शक्तीकपूरच्या ताब्यात गेल्यासारखं), त्यामुळे एकूणच या आणि इतर काही सिनेमात गाणी नसती (उदा : अर्जुन, घायल, 'चायना गेट'ला नाईलाजानी 'छम्मा छम्मा' घेतलं असणार संतोषी बाबानी) तरी चालली असती. सिनेमाची लय हरवते, कथानकाची पकड सैलावते. असो! के.भाग्यराजला जास्ती कळतं. या सिनेमासाठी मी बोहारणीसारखे अमिताभचे 'गिरफ्तार', 'मृत्युदाता', 'मर्द', 'गंगा जमुना सरस्वती' वगैरे महान सिनेमे बदल्यात द्यायला तयार आहे. 

चित्रपटाची कथा मी इथे सांगायची गरज नाही. बच्चा बच्चा जानता है! डेव्हिड डिकास्टाचा विग, ती दाढी, तो गांधी चष्मा, शाल हा गेटप ज्यानी केला असेल तो महान माणूस आहे. त्याचे कपडे पण चोबीस साल पुराने फ्याशनचे आहेत सिनेमात. डिटेलिंग बॉस, मजा येते बघायला. संपूर्ण चित्रपटात इन्स्पेक्टर विजय हा अमिताभच्या चित्रपटात शशी, ऋषी कपूर जसे दबलेले असतात तसा आहे. अर्थात ही किमया 'बिग बी'ची आणि पटकथेची. कुठेही 'विजय' वरचढ वगैरे वाटत नाही. जेलात जायच्या आधीचा खेळकर डेव्हिड आणि बाहेर आल्यावर गंभीर झालेला बुढ्ढा डेव्हिड, दोन वेगळी पात्रं, वेगळ्या देहबोली आहेत. अमिताभनी या चित्रपटात सरसर बदलणारे चेहरे काय अप्रतिम दाखवलेत. नेमक्या वाक्याला, शब्दाला त्याचा चेहरा जो काही बदलतो ना त्याला तोड नाही (तो ज्या भोळेपणानी रडतो, दलीप ताहिलला विश्वासानी सांगतो, ते बघाच). पात्राच्या वयोमानानुसार बदललेला आवाज ऐकणीय आहे त्याचा. डेव्हिडचा आधीचा गमत्या आवाज, विजयचा कठोर माणसाचा आवाज, म्हाता-या डेव्हिडचा खर्जातला, राग दाबलेला आवाज. त्या आवाजाला पार्श्वसंगीत आहे संताप, चीड, धुमसण्याचं. राही मासूम रझा. त्यांचे संवाद सांग बघू गाजलेले असं कुणी म्हटलं तर मी पळ काढेन पण या चित्रपटातले संवाद मात्रं तुफान होते.

'विजय'चा बाप आपण नसून अनुपमनी स्वत:चं नाव लावलंय त्याच्या नावापुढे हे समजल्यावर त्यानी जे तळतळून विचारलंय ना ते ऐका. व्होकलकॉर्ड आतड्याला जोडली गेलीये त्याची त्या संवादाला. कुणीतरी खोडरबरनी मजकूर पुसावा तसं बापमुलाचं नातं पुसलं गेल्यामुळे आलेली विषण्णता आहे त्यात. त्याला हाताशी धरून बदला घ्यायचे चोवीस वर्ष डोक्यात जपलेले प्लान्स क्षणात धुळीत. परत या वयात नव्यानी सुरवात आता. 'मैने अपनी जिंदगीका अंधेरा दूर करनेके लिये तुम्हे दिया जलानेको कहा था, तुमने तो मुझकोही जलाकर अपने जिंदगीमे उजाला कर दिया' (चु.भू.दे.घे.). खाऊन टाकलंय त्यानी. लगेच घाईने निघताना तो अबरप्टली विचारतो, 'पिस्तोल कहा है'! खतरा थंडपणा आहे पुढच्या संवादाला. त्याचा कन्फेशन देतानाचा, 'विजय' चेकिंग करत असतो तेंव्हा 'तीन स्पेशालिस्ट मेरे दिमाग में है', 'सहाय'ला स्टोरी सांगताना, 'तुम्हे इतनी जल्दी डि.आय.जी.बना दिया, इन्स्पेक्टर विजय' चा खवचट, स्मशानातलं ते एकेक शब्दं उच्चारून बोललेलं परफेक्ट इंग्लिश, 'समंदर के बीच जाकर जो मछलीया पकडता है' किंवा त्या आधीचा हातावर 6 आणि 9 चा संवाद, श्रीदेवीला 'And that is a fact' म्हणतानाचा आवाज. 'फर्ज करो, तुम घर जा रही हो' कुठलाही आक्रस्ताळेपण न करता तो त्याची बाजू श्रीदेवीला सांगतो, तो आवाज. किती सांगणार. 

चेहेरे बघायचेत? कोर्टात 'चतुर्वेदी' बरळत असतो तेंव्हा तो फक्तं कठडा दाबतो आणि शांत होतो, जज्जनी विचारल्यावर तो फक्तं शांतपणे भिंतीकडे बघतो, श्रीदेवीमुळे त्याला बोलणी खावी लागतात तेंव्हा, भरत कपूरला भेटणार एवढ्यात विजय येतो तेंव्हा, त्याला उडवणार तेंव्हा नेमका परत 'विजय'मधे येतो तेंव्हा, 'विजय'साठी दोरी फेकताना त्याची होणारी घालमेल, अनुपमला दाढी लावून फसवल्यावर त्याचा झालेला अर्जुन, ओम शिवपुरीनी झापल्यावर झालेला चेहरा, विजयच्या हातातून पिस्तोल उडवल्यावर झालेला करारी चेहरा, श्रीदेवीच्या लॉकेटमधे विजय दिसल्यावर झालेला हळवा चेहरा, बापलेक दोघं कबरीसमोर बसतात तेंव्हा विजयचा चेहरा, ग्रेव्हयार्डमधे 'सॉरी माय सन' म्हणतानाचे पाणावलेले डोळे, चतुर्वेदीच्या गाडीला बाँब लावयाची धडपड, चरफड आणि शेवटी कपाळात गोळी घातल्यावरचा तो विजयी चेहरा आणि लाल बर्फाळ नजर. अमिताभवर बोलणं म्हणजे कापूसकोंड्याची गोष्टं, न संपणारी.   

बाकी सिनेमा अमिताभ सोडून बोलण्यासारखं फार काही नाही त्यात. एकदा कमल हसनचा बघायला हवा. लहान मुलीसारखं लाडात बोलणं म्हणजे अल्लडपणा असं समजणारी श्रीदेवी यात फार वाव नसल्यामुळे सुसह्य वाटली ('ती कशी ग्रेट आहे' याच्या कॉमेंट्सवर उत्तरं दिली जाणार नाहीत, क्षमस्व). जयाप्रदा गोड दिसते, अनुपम खेर पण फार लाउड नाहीये. तीनही व्हिलनमधे अमरापूरकरना जास्ती फुटेज आहे आणि ते भाव खाऊन गेलेत पण. बाकी ते सेट आणि सोनी म्याक्सचे आभार मानायलाच हवेत (बच्चनचेच च्यानल नाहीत ना मालकीचे). अर्थात कुछ पानेके लिए कुछ खोना पडता है म्हणून 'सुर्यवंशम'ही बघावा लागतो, हा भाग वेगळा.

जयंत विद्वांस
 

  

No comments:

Post a Comment