Monday 25 April 2016

सावल्या…

सावल्या… 

तुम्ही तरुण असता त्यावेळेस तुम्हांला वेळ कायम कमी पडतो. स्पर्धेत रहाण्यासाठी, उद्दिष्टं, ध्येय गाठण्यासाठी, थोडा है थोडेकी जरुरत है वाली जरुरत पूर्ण करण्यासाठी, भला उसकी कमीज मेरे कमीजसे सफेद कैसी म्हणून अजून उजळण्यासाठी, स्टेटससाठी, सुखं विकत घेण्यासाठी, पोटासाठी, म्हातारपणाच्या तरतुदीसाठी, कर्तव्य पार पाडण्यासाठी आणि बहुतांशी वेळा जगण्यासाठी आपली धावपळ चाललेली असते. त्यात गैर काहीही नाही. हौशी लोक त्यातही वेळ काढून छंद जोपासतात, वाचतात, ऐकतात, गातात आणि जगतात ही. आपण खूप बिझी आहोत हे दाखवण्याचा जो आनंद आहे त्याला तोड नाही. वपु म्हणतात तसं माणूस रिटायर्ड झाला की तो फक्तं रिटायर्ड असतो. कुठलीही पोस्ट, मानमरातब, श्रीमंती त्याला चिकटलेली नसते. तारुण्यात वेळ नसल्यामुळे कित्त्येक गोष्टी माणूस उतारवयात करायचं ठरवतो. पण सगळयांना ते शक्यं होतंच असं नाही. 

आधी न पुरणारा वेळ नंतर पुरून खूप उरणारा वेळ असतो. शरीर थकतं, पंचेंद्रियं रुसायला सुरवात झालेली असते, दरवाजा वाजत नाही एवढी हाडं करकर वाजतात, उठताना त्रास होतो म्हणून हळूहळू उठणं बंद होतं आणि माणूस इंजिन नसलेल्या बोगीसारखा एकाजागी ठुप्पं बसायला सुरवात होते, जाणं येणं कमी होतं, बोलणं तुटतं, तुम्ही सोडून बाकी सगळ्यांना कामं असतात. गाणी ऐकावीत तर कमी ऐकू येत असतं, वाचायला गेलं की डोळ्यातून पाणी येतं, फक्तं जगण्याकरता सगळी धावपळ केलेल्या माणसाला कसले छंद नसतात, वाचन नसतं, कुठे जावं म्हटलं तर सोबत लागते त्यामुळे ते हळूहळू बंद होतं. पिढ्या बदलतात, विषय पूर्ण वेगळे होतात, तंत्रज्ञान पटकन अंगवळणी पडत नाही. काहीवेळा तर तुमच्या वयाचे मित्रं, नातेवाईक हयात नसतात, असले तरी त्यांचीही परिस्थिती तुमच्यासारखीच असते. मग करायचं काय?

बाई म्हातारी झाली तरी तिचं फार अडत नाही. तिच्यासाठी भरपूर कामं असतात. एक नातवंड वेळ कमी आहे असं वाटायला लावतं. सून गेल्यावर आवराआवर, पेपर वाचन, जेवण, वामकुक्षी, दुपारचा चहा, संध्याकाळच्या कामाची किरकोळ तयारी, अधूनमधून भिशी, वेळ कसा जातो कळत नाही त्यांना. पुरूषाचं मात्रं अवघड असतं. एक तर झोप कमी झालेली असते. मग चालू होतो टि.व्ही. मी ही सिरिअल्स, होम मिनिस्टर अशा अनेक प्रोग्राम्सची खिल्ली उडवत आलेलो आहे पण हे सगळं त्यांच्या दृष्टीने खूप महत्वाचं असतं, हे मला जाणवलं. कित्त्येक वयस्क मला माहितीयेत जे फक्तं डोळ्यासमोर काही रंगीत हलतंय एवढ्यासाठी टिव्ही लावतात. समोर काय चाललंय याच्याशी काही सोयरसुतक नसतं. वेळ… अतिशय भयानक प्रकार आहे. घालवायचा असला की शिक्षा परवडली पण ते नको. बरं आज गेला, घालवला, ढकलला, उद्या? मला आत्तापासूनच याचं दडपण आहे. (समाजपयोगी कामं करता येतील, छंद जोपासता येईल, शिकवता येईल गरिबांना, पेन्शनर ग्रुप जॉईन करता येईल, फिरायला जायचं वगैरे सल्ले नकोत. कुठे जाऊ न शकणा-या, जगण्यातला रस संपलेल्या माणसांबद्दल बोलतोय मी हे). 

वीसेक वर्ष झाली. माझ्या ओळखीत एक आजोबा होते. बायको गेलेली. घरातली सगळी माणसं कामाला जायची. रस्ता चुकल्यासारखे ते घरात एकटेच असायचे मग दिवसभर. त्यांच्याकडे एक पूर्वी शाळेला दप्तर म्हणून असायची तशी अल्युमिनिअमची पेटी होती. त्यात साताठशे रुपयाची चिल्लर होती. पाच पैसे ते रुपये अशी नाणी होती. सकाळी सगळी माणसं कामावर गेली की ते ती पेटी काढायचे. चादर ताणून घ्यायची आणि पेटी ओतायची त्याच्यावर. मग पुढचे दोनेक तास मस्तं जायचे त्यांचे. वीस x पाच पैसे = एक रुपया यापासून सुरवात, सगळ्यात शेवटी दोन रुपये पाच वेळा. त्यात पण सगळे सिंह एकाच बाजूला डोकं करून. षटकोनी वीस पैसे, अल्युमिनिअमचे वेगळे, पितळी वेगळे. दहा पैसे छोटे वेगळे, मोठे वेगळे, नवीन पन्नास पैसे वेगळे. त्यावर छापलेल्या वर्षानुसार ते लावायचे नाहीत एवढाच प्रकार काय तो शिल्लक होता. मग त्यांची रांग करायची आणि पैसे मोजायचे. कमी भरायचे नाहीतच पण जर भरलेच तर परत सगळे गठ्ठे मोजायचे. हॉरिबल. 

एकदा त्यांना म्हणालो कंटाळून, 'कोण घेणार आहे त्यातले पैसे, रोज मोजताय ते'. 'घेतंय कोण कशाला रे, घेतले तर उलट मला शोध लावायला बरं पडेल, त्यात निघतील चारेक दिवस. वेळ जात नाही रे, तुला नाही कळणार. घड्याळाचे काटे पायाला मुंग्या आल्यासारखे हळू चालतायेत असं वाटतं. तासाभरानी घड्याळ बघितलं तरी वीसेक मिनिट झालेली असतात म्हणून मी घड्याळ बघणं पण सोडलंय. पण इतकी वर्ष जगलोय, उन्हावरनं कळतंच किती वाजले असतील ते. संध्याकाळी सावल्या लांब पडतात नुसत्या, गायब व्हायची वाट बघतोय'.

मला नाही कळणार म्हणे. माझ्याही संध्याकाळच्या सावल्या काही वर्षात लांब पडू लागतील. गायब व्हायची वाट बघायला लागायला नको, एवढंच मागणं.

जयंत विद्वांस 

No comments:

Post a Comment