Friday 15 April 2016

ओळख…

ओळख… 
 
मुळात मला देवादिकांचा ओढा कमीच आहे. रांगेत, गर्दीत दर्शन घ्यायची मला हौस नाही. चेंगराचेंगरीत हाताला लागलेला दगडी भाग म्हणजे परमेश्वराचे पाय आहेत याचा आनंद घ्यायची मला अज्जिबात हौस नाही. पण माझं सुट्टीतलं बालपण मात्रं अनेक देवळांच्या परिसरात गेलंय. आज्जी भिकारदास मारुतीच्या वर रहायची. परवाच बघितलं, तिथे आता ती रहायची ती लोड बेअरिंगची एकमजली इमारत कधीच नामशेष झालीये. कॉन्क्रीटची सुबक इमारत तिथे उभी आहे. खालचा मारुती नावानी भिकारदास असला तरी बाजूनी रहाणारी लोकं सुखवस्तू आहेत. मारुतीच्या समोर सदावर्ते राम मंदिर, बाजूला नारद मंदिर आहे. आता राम आणि मारुती मंदिर बोन्साय झालेत. पहिल्यांदा प्रशस्त जागा होती आता अतिक्रमण केल्यासारखे दोघे उभे आहेत. संगमरवरातली ती अडीच एक फुटांची राम, लक्ष्मण, सीतेची आणि समोर बसलेला रामदास हनुमान यांची मूर्ती मात्रं सुबक आहे. शंकर, विष्णू, राम हे सगळे देव, कुठलीही देवी बघा, कशा एकदम देखण्या, नाजूक जिवणी, सरळ नाक, सौष्ठव असलेल्या असतात फोटो आणि मूर्त्यांमध्ये. हनुमानाला ते भाग्यं नाही. शेकडो वर्ष जिम केलेली बॉडी (काहीवेळा केसाळ ही), फुगलेले गाल, खांद्यावर गदा, चेह-यावर शोलेतल्या 'रामलाल' सत्येन कप्पूसारखे इमानी सेवकाचे भाव. 

तर रामनवमी. मोठा उत्सव असायचा (आता असावाही, माहित नाही). कुंटे कुटुंब देखरेख करायचं. अक्का कुंटे. त्यांच्यावर आम्हां सगळ्या मुलांचा राग. दुपारी पुढच्या कट्ट्यावर त्या खेळू द्यायच्या नाहीत म्हणून आणि लाकडी व्यासपीठावर बसलो की ओरडायच्या म्हणून. पण आम्ही त्यांना अजिबात धूप न घालता कोकलायचो तो भाग वेगळा (त्यांची नातवंडपण घरची भेदी असल्यासारखी आम्हांला सामील असायची). एका वेगळ्याचा सांस्कृतिक वातावरणाची रेलचेल असायची. आठवड्यातून दोन दिवस दुपारी पुणतांबेकरांचं भजन असायचं, रोज संध्याकाळी नारद मंदिरात किर्तन असायचं. सज्जनगडावरून रामदासी लोक यायचे. मोठं अभ्यासपूर्ण, गंभीर बोलायचे ते लोक. पण ऐकत रहावं असं वाटायचं. एक फक्तं रामाला समर्पित छोटीशी पुस्तिका होती. त्यात मनाचे श्लोक होते, करुणाष्टके होती आणि पहिल्याच पानावर १०८ रामाची नावं होती. बरंच काही हरवलं त्यात ते ही हरवलं. अर्थ कळो न कळो ती सगळ्या मुलांना क्रमानी पाठ होती. अगदी तालात ती म्हटली जायची.

रामनवमीला लोणीसाखर हा प्रसाद असायचा. जन्माच्या वेळेला बायका लोटायच्या अगदी एकमेकींवर. आम्हांला इंटरेस्ट प्रसादात. अक्का अत्तर लावल्यासारखं लोणीसाखर तळहातावर द्यायच्या. साखरेनी सुटलेलं पाणीच जास्ती असायचं त्यात. लाज सोडून आम्ही अजून द्या म्हणायचो, दोन शब्दं ऐकून अजून एक बोट तळहातावर मिळवायचा आनंद आता अगदी पावकिलो लोण्यात साखर कालवून खाण्यातही नाही. तिथे साखळी लावलेलं तीर्थपात्रं असायचं. खेळता खेळता आम्ही सगळे ते सुद्धा प्यायचो लहर आली की. तुळशीचं पान आलं की मस्तं चव लागायची, किती थेंब? मोजून चमचाभर फार तर, पण मस्तं लागायचं, गंमत म्हणून प्यायचो तरी डोळ्याला हात लावून हात डोक्यावरून जायचाच. कार्य पार पडल्यावर जशी एक शांतता असते तसा माहोल असायचा नंतर. आमचा खेळ थांबल्यामुळे ते सगळं कधी एकदा संपतंय असं व्हायचं. किर्तन असायचं. पूर्वरंग, उत्तररंग कुठे कळायचं तेंव्हा (आता कळतंय असा अर्थ निघतोय ना, आताही कळत नाही). पण सगळे किर्तनकार उत्तम स्टोरीटेलर, अभिनय, थोडीफार गायकी येणारे असायचे. ऐकत राहायची सगळी चुळबुळ न करता. सिन्नरकर, आफळे, कोपरकर, जावडेकर, अनेक रामदासी बुवा, रविंद्र मुळे ऐकले तिथे.    

आठवड्याभरानी हनुमानजयंती असायची. आधी श्रीमंताघरचं कार्य झाल्यावर त्याच्याच नात्यातल्या गरीबाचं कार्य असतं ना तसं वाटतं मला ते. हनुमान जयंतीला जास्ती पब्लिक लोटायचं, खणखणीत प्रसाद. रास होईल एवढे नारळ फुटायचे. जाताजाता वाटी घ्यायची आणि दगडानी फोडून खायची, कुण्णीसुद्धा ओरडायचं नाही. प्रदक्षिणेचे, जपाचे अनंत प्रकार दिसायचे. पिशवीत माळ ओढणारे, पुटपुटणारे, जोरात ओरडून आल्याची वर्दी देणारे, रमतगमत प्रदक्षिणा घालणारे, स्पीडपोस्टवाले, मारुतीच्या, रामाच्या समोर (समोर म्हणजे अगदी समोर, साईड आर्टीस्ट नाहीच चालणार) उभे राहून डोळ्यात डोळे घालून बघणारे, आव्हान देणारे, आवाहन करणारे, 'आहे ना लक्षात माझ्या कामाचं' अशी मूक विचारणा करणारे, अत्यंत भाबड्या भक्तिभावाने फुल, प्रसादाचा हार घेऊन जाणारे, कपडे मळण्याची काळजी न करता साष्टांग घालणारे (हा प्रकार तर दुर्मिळ झाला आता, हवी त्याची लाज वाटत नाही पण याची वाटते लोकांना), प्रदक्षिणा झाल्यावर खांबाला टेकून शांत बसणारे, वाती वळण-या आज्ज्या. माझ्या स्मृतीपटलावर तिथलं हे शेवटचं चित्रं कोरलं गेलंय. 

आता अक्का कुंटे, हनुमानाची पूजा करणारे नारायणभाऊ दवे, गोविंदस्वामी आफळे आणि माझी आज्जी यापैकी कुणीही नाही. मी एक उरलोय इकडे आणि तिकडे जागा आक्रसलेले राम, लक्ष्मण, सीता आणि तो शेंदरी हनुमान. माझं लहानपणीचं हे विश्वं तिथेच उदबत्तीच्या धुरासारखं हरवलंय, वातावरणात असेलही पण दिसणार नाही, जाणवेल. नेता असो की देव, त्यांच्या वाढदिवसाला गर्दी व्हायचीच. तेंव्हा एकदा गर्दी नसताना जाईन, बघू काही जुनी ओळख एकमेकांना  पटतीये का ते.
 
जयंत विद्वांस   


No comments:

Post a Comment