Tuesday 7 June 2016

खिडकी…

डोकावून बघणे ही उत्सुकता माणसाला जन्मजात असते मग ते दुस-याच्या आयुष्यात असेल किंवा बाहेर काय आहे हे बघणे असेल. अध्यात्मं ही फार मोठी गोष्टं आहे, माझ्या बुद्धीला झेपणार नाही ते मी करत नाही पण अध्यात्मं हेच सांगतं, आधी आत बघा, शोधा. आतल्या गोष्टी फार त्रासाच्या असतील तर कोण आत बघणार, सद्सदविवेकबुद्धीची टोचणी फार टोकदार असते त्यामुळे माणूस अंतर्मुख होत नसावा, त्यापेक्षा बाहेर बघणं जास्ती सोपं, मनाला दिलासा देणारं असतं, हवं तेवढंच बघता येतं, नकोय त्याच्याकडे दुर्लक्ष करता येतं. खिडकी… खिडकीचा सगळ्यात जास्ती वापर त्यासाठीच होतो - डोकावून बघणे. प्रत्येक गोष्टीचा वापर वय, आकलन शक्ती, ज्ञानाप्रमाणे बदलतो.

लहानपण देगा देवा म्हणतात ते उगाच नाही. लहान मुल खिडकीत उभं केलं की तासंतास बाहेर बघतं. कुठलाही पूर्वग्रह नसल्यामुळे ते प्रत्येक गोष्टं आश्चर्यानी बघतं. दोन चिमण्यांचा खेळ बघण्यात सुद्धा त्याला मजा असते. रहदारी, चित्रंविचित्रं आकाराच्या गाड्या, त्यांचे आवाज असतात. कधी निरभ्रं, कधी कापूस सांडलेलं तर कधी काळवंडलेलं आभाळ असतं. ढगांचे आकार कधी हत्ती असतात, कधी पक्षी असतो, तर कधी निराकार  उगाचच 'कुठली बरं ओळखीची आकृती आहे' असं वाटायला लावणार असतं. त्याच्या चिमुकल्या मेंदूत काय काय साठत असतं. तेंव्हा कुणीतरी कडेला बसून त्याला ते सांगायला हवं. वा-यानी हलणारे ढग, त्यांची पळापळ, पकडापकडी, रेंगाळलेपण बघण्यात पण मजा असते. मावळतीचा रंग, अफवा ज्या झटक्यात पसरते, तसा आकाशभर पसरतो त्याचं वर्णन त्याला करता येणार नाही पण ते रंगकाम डोळ्यात निश्चित साठतं. सकाळी आईला, बाबाला अच्छा करताना तो त्याच खिडकीत रडवेला उभा रहातो तर बाबाच्या, आईच्या गाडीचा आलेला आवाज ऐकून तो तेवढाच हसरा चेहरा करून संध्याकाळी त्याच खिडकीत बघायला धावतो. एवढ्याश्या चौकोनातून दिसणारे त्याच्या आवडीचे चेहरे त्याला इतर कुठल्याही चित्रापेक्षा सुंदर दिसतात. शाळा सुटायची वाट बघणारी, खिडकीतून आपल्या माणसाला पालकांच्या गर्दीत शोधणारी मुलं काय गोड दिसतात. बावरलेपण, अधीरता, डोळ्यांना घातलेला बांध, ते पुढे आलेले ओठ, डोळ्यात सशाचे भाव आणि एकमेकाला बाजूला सारून बघण्याची घाई मोठी विलोभनीय असते. वर्गात जाताना मुलं कधीच सरळ जाणार नाहीत. आपला वर्ग येईपर्यंत लागणा-या प्रत्येक वर्गाच्या खिडकीतून बघणारच ते. आता शाळा सुधारल्या आणि तास चालू असताना मागच्या खिडकीतून पळ काढायची मजा गेली.

आता ग्रिल्स आली, स्लायडिंग विंडोज आल्या, आतून खिट्ट्या लावायचे लाकडी दरवाजे दुर्मिळ झाले. विशिष्ठ नक्षी दाखविणा-या रंगीत काचा बसवलेल्या खिडक्या आता दिसत नाहीत. बंद खिडकी म्हणजे शून्यं मजा. अर्ध्या खिडकीतून दिसणारा आपल्याला हवा असलेला चेहरा ओझरता दिसला की जो आनंद व्हायचा तो शब्दात कसा सांगणार. खालून ओळखीची शीळ आल्यावर मान बाहेर काढून 'आलो रे' म्हणायला, पहिल्या विसरलेली वस्तू जिने चढून जाण्यापेक्षा खाली झेलायला, पावसाचे तुषार ओंजळीत धरायला, लाईट आपलेच गेलेत की सगळ्यांचे हे बघायला, पाणी, पोळीचे तुकडे ठेवल्यावर घाबरत घाबरत येणा-या चिमण्या तुकडा उचलून ससाण्याच्या वेगाने जातात ते बघायला खिडकी सोपी पडते. 

हिंदी चित्रपटात कशावर गाणं करतील सांगता येत नाही. 'तेरे घरके सामने' मध्ये 'तू कहा ये बता' गाण्यात देवानंदला वेडावणारी खिडकीतली नूतन, 'पडोसन'मध्ये समोरच्या खिडकीतला चंद्राचा तुकडा सायराबानू, 'मैं तुलसी तेरे आंगन की' मधलं 'ये खिडकी जो बंद रहती है', 'जॉनी मेरा नाम' मध्ये असंख्य खिडक्या दारं असलेलं ' पलभर के लिये कोई हमे प्यार कर ले', 'माया मेमसाब'मध्ये पडद्याआडून शाहरुखला खिडकीतून बघणारी दीपा साही, 'शोले'मधे जय विरु स्टामीना चेकिंगच्या फायटिंगला खिडक्या फोडून बाहेर येणारी ठाकूरची माणसं, 'बर्फी'मधे खिडकीतून रणबीरला पहाणारी एलेना डिक्रूज, ज्याकीच्यानच्या सिनेमात त्यानी पळताना एकच खिडकीचा दरवाजा उघडून मागच्याला तोंडावर आपटवणे आणि आल्फ्रेड हिचकॉकचा त्या खिडकीतून बघणा-या जेम्स स्टुअर्टसारखा आपल्यालाही खुर्चीत खिळवून ठेवणारा 'रिअर विंडो'. आपल्याकडे असे थ्रिलर्स फार येत नाहीत. नाही म्हणायला त्या 'मेरे हमदम मेरे दोस्त'मध्ये मात्रं असा सस्पेन्स होता. पास होणा-या दोन ट्रेन्स आणि पलीकडच्या ट्रेनमध्ये होणारा खून या ट्रेनमधली बाई खिडकीतून बघते.

संगणकाच्या आत शिरायला आडनाव 'गेट्स' असलं तरी त्यानी दिलेली 'विंडोज' खिडकी नसेल तर चुकल्यासारखं वाटेल. 'हे घ्यायचंय आपल्याला', 'मला काय मस्तं दिसेल ना हे', 'कधी घेणार मी हे, या जन्मात तरी वाटत नाही' असे विचार मनात आणून पण नजरेला सुखावणारं 'विंडो शॉपिंग' आहे. प्रत्येकाला प्रवासात खिडकी हवी असते. मग ट्रेन, एसटी, कार, विमान काहीही असो. वारा तोंडावर येणारी विंडो सीट मिळाल्याचा आनंद म्हणजे काय हे मुंबईला लोकलनी रोज जाणा -या माणसाला जास्ती माहित. आता सिनेमाची तिकीट ऑनलाईन बुक होतात पण त्यात खालच्या अर्धगोलातून पैसे देऊन वरच्या गोलाकार खिडकीतून 'दोन बाल्कनी, कॉर्नर सीट' सांगून किंवा 'हाउसफ़ुल्ल'चा बोर्ड सतत लागलेल्या चित्रपटाची, भले पहिल्या रांगेतील असतील, पण तिकीटं मिळाल्यावर झालेला तो आनंदी चेहरा त्या खिडकीसमोरून हलतो तेंव्हा जगज्जेत्या सिकंदरसारखा असायचा.

एसटी, रेल्वे रिझर्व्हेशंस, सरकारी देणी द्यायच्या खिडक्या, पोस्ट, बँका, पासपोर्ट ऑफिस इथल्या खिडक्यातून कमाल अपमान, हाड्तुड झाल्याशिवाय त्या खिडकी मागच्या पदाच्या ताकदीची किंमत आपल्याला कळत नाही असा त्यांचा समज आहे, तो दूर करण्यासाठी तिथे जाणं प्रत्येकाला गरजेचं आहे. तिथून काम झाल्यावर पुढे सरताना 'सुटलो' ही अक्षरं चेह-यावर उमटतात. गर्दी नसलेली एकमेव सरकारी खिडकी म्हणजे मयताचा पास मिळतो ती. तिथे स्वत:करीता कधीच जावं लागत नाही एवढा एकंच दिलासा. एकांतवासात ठेवलेल्या कैद्याला ज्या चौकोनातून जेवण आत ढकललं जातं ती खिडकी उघडल्याचा आवाज सुद्धा किती मधुर लागत असेल कानाला. माणसांची लगबग, कसला का होईना आवाज, आत येणारी झुळूक, बाहेरचा गंध किंवा दुर्गंध त्या पोकळीतून त्याला क्षणभर का होईना पण येतो.

पोट जाळण्यासाठी, चेहरा दाखवणारी, इशारे करणारी पण खिडकीच असते. रंगरंगोटी केलेले चेहरे इशारे करतात, सौदा पटला की काही घटका खिडकी बंद होते. शृंगार नसलेला यांत्रिक भोग झाला की थोड्या वेळाने खिडकी परत उघडते. परत थकेपर्यंत प्रयत्नं चालू. खिडकीमागचे चेहरे सुरकुतले जातात, त्यांच्या जागी नवी फौज येते. तिथून बसायची सुटका रोगांनी किंवा मरण आलं तरंच. तिथल्या म्हाता-या खिडक्यांना कुणी विचारत नाही, त्या बंद असल्या काय किंवा उघडल्या काय. तिथली खिडकी तरुण हवी.

निर्जीव वस्तूशी सुद्धा माणसाचं नातं असतं कारण त्या नात्यात पलीकडून काही त्रास नसतो, आपण सांगेल ते ऐकलं जातं, ते चूक आहे किंवा कितीवेळा तेच तेच असली उत्तरं पलीकडून येत नाहीत त्यामुळे हे एकतर्फी नातं दृढ होत असावं. आपल्याला एक जागी बसायला भरपूर वेळ लहान असताना आणि वय झाल्यावर मिळतो. मधला सगळा काळ फक्तं खिडकीतून डोकावण्याचा. लहान असताना उत्सुकता असते. म्हातारपणी कसलीही ओढ नसते. पुलंनी त्यांच्या आजोबांवर लिहिलंय 'ऋग्वेदी' मध्ये. त्यात ते 'येणा-या निरोपाची वाट बघण्यासाठी खिडकीत बसतो' अशा अर्थाचं म्हणालेत. आयुष्याची काय किंवा दिवसाची काय, संध्याकाळ कातरच तशीही. थकल्या भागल्या देहाला विश्रांतीची गरज असते.

उतारवयात काय बघत असावीत माणसं खिडकीत बसून? शून्यात बघितल्यासारखी बसतात. गतायुष्याचा चित्रपट डोळ्यांसमोरून सरकत असावा. बायोस्कोपमध्ये तोंड खुपसून बघावं तसं त्या खिडकीतून बघताना तो समोर चालू असावा. याच खिडकीतून त्यांनी कायमसाठी जाणारी, कधीच मागे वळून न बघणारी, परत न येणारी माणसं बघितली. त्यांच्या आठवणी, चेहरे डोळ्यासमोर दिसत असावेत. खिडकीच्या अलीकडचं एकलेपण सुसह्य नसतं, पल्याड गेलेल्या माणसांची आठवण येते. मनात अजूनही मरणाची भीती असतेच तरी पण खिडकीत बसून काय बघत असतील? मरणाच्या भीतीपेक्षा जगण्याचा कंटाळा ताकदवान आहे. कशाची वाट पहात असतील मग? निरोपाची. म्हणून तिथे रोज बसायचं असतं. निरोप आपला असेल तर उगाच चुकामुक नको, राजाचं फर्मान मान तुकवून स्वत: घ्यायचं असतं, म्हणून थांबायचं तिथे.  

तात्पर्य, खिडकी 'बघण्यासाठी' नसतेच मुळी, 'वाट' बघण्यासाठी असते.

जयंत विद्वांस

No comments:

Post a Comment