Saturday 25 June 2016

शिवरंजनी...


'थोडा है थोडेकी जरुरत है' हे गाणं' मला फार आवडतं. कितीही मिळालं तरी माणसाची ओढ संपत नाही. 'अजून' या शब्दाला मरण नाही. जगणं, खाणं, पैसा, संपत्ती, इंद्रियसुख, सत्ता 'अजून' हवी असते. व्हिडिओकॉनचे धूत म्हणाले होते, 'कितीही मोठं घर असलं तरी एक खोली कमी पडते आणि पगार कितीही असला तरी नेहमी हजार रुपयांनी कमी पडतो'. कोंड्याचा मांडा करून जगणारी पिढी आता दुर्मिळ प्रजातीत मोडेल. कर्ज उपलब्ध आहे म्हणून घेणं वाढलं आणि नंतर पर्यायाने देणं वाढलं, गरजेसाठी घेणारे कमी झाले. आहे त्यात सुखी राहणं याकरता कसब लागतं. आहे म्हणून उधळण केली तर छानच दिसते की, पण असलं तरी मोजकं निवडून पण काही सुंदर करता येतं. माझी आजी एक वाटी चक्का होईल एवढ्याच दह्याला फाशी द्यायची आणि फडक्याला बोटं पुसावीत तेवढं जेवताना वाढायची सगळ्यांना, आता चार किलो आणून आंबे, सुकामेवा घातलात तरी तशी चव येणार नाही. सात शुद्ध स्वर, चार कोमल आणि एक तीव्र असा डझनभर ऐवज आहे म्हणून उधळण न करता निगुतीने कसं करायचं हे भूप आणि शिवरंजनीत बघायला मिळेल. 
भूप, शिवरंजनी आणि सामान्य माणसाचा खिसा यात साम्यं काय तर तिघातही 'म' 'नी' नाही, भूपात शुद्ध गंधार आणि शिवरंजनीत कोमल एवढाच, काय तो फरक. जुन्या लॉईड, रिचर्ड्सच्या विंडीज टीममध्ये एकटाच गोरा असलेला लॅरी गोम्स उठून दिसायचा तसा इथे सगळ्या शुद्ध स्वरातला कोमल गंधार लॅरी गोम्स सारखा आहे. शिवरंजनी हा अतिशय करूणरस ओतणारा राग आहे. रागात, दु:खात माणूस जसा तिरमिरत निघतो तसं इथे आहे. काही वगळल्याची भावना या 'रागा'ला पण होत असावी का? दुवा तोडावा तसं सारेग नंतर म कडे दु:खी नजरेने बघत पुढे जायचं आणि नंतर नी ला टाटा करून जावं लागत असल्यामुळे खंतावलेला राग असावा का हा? मोजक्या स्वरात असल्यामुळे याच्या सुरावटी कदाचित लवकर ओळखता येत असाव्यात किंवा त्यातल्या चाली सारख्या वाटत असाव्यात.
वाटव्यांची दोन गाणी सापडली शोधता शोधता या रागात, नावडीकरांनी म्हटलेलं 'रानात सांग कानात' आणि वाटव्यांनी म्हटलेलं 'वारा फोफावला', अजूनही असतील. वर्तुळाकार चेह-याचे नावडीकर आम्हांला मराठी शिकवायला होते सहावीला पण ते भावगीत गायक आहेत हे कुठे तेंव्हा कळायला. ते भावगीत गायन मागेच पडलं आता. एखाद्या अल्बमच्या जोरावर आणि दोनचार तुरळक हिट गाण्यांवर जगणारे गायक आले. सगळी बत्तीशी दाखवून, खूप त्रास होत असल्यासारखी तोंडं करून, बद्धकोष्ठ झाल्यासारखे हावभाव करून, शब्दं थुंकल्यासारखे बाहेर फेकणारे गायक आता जोरात आहेत. तिस-या आघाडीचं सरकार जितके दिवस टिकायचं तेवढे दिवस त्यांची गाणी कानावर पडतात म्हणजे तशी व्यवस्था असते. पेटीच्या मागे बसलेले तोळामासा वजनाचे वाटवे कुठलाही आव न आणता भाव असलेलं गीत गायचे. माणिक वर्मांचं 'सावळाच रंग तुझा' त्यातलंच. एक धागा सुखाचा' वर मी मागे लिहिलं आहे त्यामुळे परत इथे लांबी वाढवत नाही. त्या हातमागाच्या ठेक्यावर गाणारे हताश राजा परांजपे, गदिमांच्या शब्दातलं जीवनसार आणि बाबूजींचा आवाज असा सगळा तो सुरेल योग आहे. जोगांनी संगीत दिलेलं 'बाजार फुलांचा भरला', निसर्गराजा ऐक सांगतो' हे संवादगाणं, भीमसेनजींचं 'राजस सुकुमार मदनाचा पुतळा', राम कदमांचं 'दिसला ग बाई दिसला' आणि अतिशय सुंदर ठेका असलेलं हृदयनाथ मंगेशकरांचं आज गोकुळात रंग खेळतो हरी' हे सगळी शिवरंजनी मधली गाणी आहेत.

'बाबुल मोरा' लिहिणा-या बहादूरशहा जफरचं 'लाल किला' मधलं रफीचं 'न किसकी आँख का नूर हू' या रागातलं सुंदर गाणं आहे. वैषम्यं, विफलता, हताशपणा शब्दात तर आहेच पण चालीत पण आहे. रफीची यातली अनेक गाणी  मला सापडली. 'गझल' मधलं 'रंग और नूरकी बारात किसे पेश करू', 'सूरज'मधलं 'बहारो फूल बरसाओ', 'ब्रह्मचारी'मधलं 'दिलके झरोकोमें तुझको बिठाकर', लता बरोबरची तीन 'प्रोफेसर' मधलं 'आवाज दे के हमे तुम बुलाओ', 'जनम जनम के फेरे मधलं 'जरा सामने तो आओ छलिये' आणि अंजाना'मधलं 'रिमझिमके गीत सावन गाये', लताची पण अनेक लोकप्रिय गाणी आहेत यात - 'जंजीर'मधलं 'बनाके क्यू बिगाडा रे', घुंघट'मधलं   'लागे ना मोरा जिया', 'तुम्हारे लिए' मधलं जयदेवचं 'तुम्हे देखती हूँ, तो लगता है ऐसे', 'एक दुजे के लिए'चं 'तेरे मेरे बीचमें', 'मेहबूब की मेहंदी मधलं 'जाने क्यू लोग मोहब्बत करते है', 'आँखें' मधलं 'मिलती है जिंदगीमे, मोहब्बत कभी कभी', लता मुकेशचं 'संगम'मधलं 'ओ मेरे सनम'. लताचं आणि किशोरचं एक टँडम आहे 'मेहबूबा'चं 'मेरे नैना सावनभादो, फिर भी मेरा मन प्यासा', करूणरस तर यात दिसतोच पण हॉन्टेड मटेरिअल पण यात आहे. जुन्या 'बीस साल बाद'चं लताचं 'कही दीप जले, कही दिल' पण यातलंच आहे. 'जिस देशमें गंगा बहती है'मधलं अप्रतिम 'ओ बसंती पवन पागल' यातलंच आहे. डोंगर कुठला आहे माहीत नाही तो पण तो डोंगर आणि पद्मिनी छान दिसते या गाण्यात.

बाकी मग 'साथी'मधलं मुकेश, सुमन कल्याणपूरचं 'मेरा प्यार भी तू है' आहे. शम्मीकपूरची नक्कल केलेल्या राजीव कपूरच्या पदार्पण चित्रपट 'एक जान है हम'चं टायटल सोंग 'याद तेरी आयेगी' आहे, अन्वर, शब्बीरकुमार, मोहम्मद अझीझ भाग्यवान माणसं, हिमेश रेशमियाच्या तुलनेत खूप बरी म्हणा, नाकात म्हणूनही, केवळ रफीची नक्कल म्हणून ही माणसं चालली. 'मर्द'मधली गाणी(?) ऐकून अझीज आणि शब्बीरकुमारनी कान मेण ओतून बंद केले असते. प्यार झुकता नही'चं शब्बीर लताचं 'तुमसे मिलकर ना जाने क्यू' याच रागात आहे. एरवी नाक मुरडणा-या गायिकेला हे गेंगाणे आवाज का खटकले नाहीत याचं आश्चर्य वाटतं. 'कर्मा'चं किशोर कविता कृष्णमूर्तीचं 'ना जैय्यो परदेस' यातंच आहे. 'प्रेमरोग'चं 'मेरी किस्मतमें तू नही शायद' यातलंच आहे. वाडकर लागले की मी गाणं म्यूट करतो. कुठलंही गाणं त्यांच्यावर चित्रित झालंय असंच गातात ते, हिरो ओळखता येणार नाही तुम्हांला. एक अपवाद, 'सत्या'चं 'सपनेमें मिलती है' पहिल्या फटक्यात आवडलं होतं मला. माधुरीला हिट एन हॉट करणारं 'बेटा'मधलं 'धक धक करने लगा' पण यातलंच आहे

वेळ झाला की कधीतरी बैजवार 'मुकद्दर का सिकंदर'वर लिहीन. त्यातली सगळी गाणी सुंदर होती. त्यातलं 'ओ साथी रे' शिवरंजनीत आहे. सात विभागात निवड झाल्यामुळे असेल एकही फिल्मफेअर नव्हतं याला. अतिशय सुंदर व्यक्तिरेखा त्यात छोट्या छोट्या तपशिलांनी उभ्या केल्या आहेत. राखीला मनोमन चाहणारा, मालकीण म्हणून तिच्याबद्दल आदर वाटणारा अमिताभ. त्यानी तिकिटं घेतलेली राखीला आवडलेलं नाहीये, त्याच्या रस्त्यावर गाण्याबद्दल ती कुचकं बोलून माईक त्याच्याकडे देते. मितभाषी सिकंदर नंतर जे बोलतो ते त्या गाण्यासाठी परफेक्ट इंट्रो आहे.डबडबलेल्या डोळ्यांनी गाणारा अमिताभ, काहीही माहीत नसलेला विनोद खन्ना आणि कोड्यात पडलेली 'मेमसाब' राखी. जोहराजानचा रोल भावखाऊ होताच पण राखीचा रोल ही छान होता त्यात. विविध भावना तिनी काय सुंदर दाखवल्यात. परिस्थिती पालटल्यावरची गंभीर, विनोद खन्नाचं आहे असं समजून मिळालेल्या पत्रानंतर झालेला आनंद, शेवटी मेमसाबला झालेला उलगडा. बाई एखाद्याचा तिरस्कार कसा करते हे बघायचं असेल तर तिची मेमसाब बघावी यातली. 

आणि आता मला या रागात आवडलेलं शेवटचं गाणं. 'मेरा नाम जोकर' यशस्वी न होण्याचं एक कारण जसं अपप्रचार होतं तसंच थकलेला आर.के.हे पण होतं. आधीच तो सहा वर्ष चालू होता, लेंग्दी होता, त्याचं वय जाणवतं. पहिले दोन प्रेमभंग फार वरवरचे वाटतात त्यात मला तरी. सगळ्याजणी एकेक करून आयुष्यातून निघून गेल्यावर आलेलं एकाकीपण पद्मिनी गेल्यावर जास्ती जाणवतं. सिमी ग्रेवालच्या सोडून जाण्यात दु:खं फार नव्हतं, ते होणारच होतं, मुळात ते एकतर्फी प्रेम होतं. रशियन सुंदरी मरीना परत जाण्यात ती परदेशी आहे हे मनाला समजवायला कारण होतं पण प्रसिद्धीसाठी स्टेपिंग स्टोन करून पुढे गेलेली पद्मिनी जरा जास्तीच जिव्हारी लागते. अंधारात डोळयांवर गॉगल लावून बसलेला आर.के., त्याच्याजवळ राहिलेला 'तो'च, मागे ती रंगीत जळमटं आणि त्याच्या हातातला तो छोटा जोकर तो खाली सोडतो, तो चालतो हे तेंव्हाच कळतं. या गाण्याची चाल आर.के.चीच होती. एकटेपण फार भीषण असतं. हात विस्फारून सगळीकडे धावणारा आर.के. डोळे ओलसर करतो. सोडून गेलेली माणसं त्याला बोलावतायेत असा निव्वळ भास आणि त्या रंगीत जळमटलेल्या एकांतातून तो आरश्याच्या तुकड्यात दिसणा-या पद्मिनीपाशी येऊन थबकतो. 'जाने कहां गये वो दिन'....
आयुष्यं जगावं लागतंच. सगळी सप्तकं, साती सूर लाभतीलच असं नाही. भूप, शिवरंजनी सारखं काही वगळून तुटपुंज्या स्वरांचं काही नशिबात आलं तरी त्यातून स्वर्ग निर्माण करता यायला हवा. आनंद महागडा गोल्फ खेळून पण मिळतो आणि पत्त्यांचा बंगला करून पण मिळतो. शेवटी तात्पर्य काय, प्रत्येकाच्या पेटीचे सूर निराळे. काहींच्या काही स्वरपट्ट्या रिकाम्या असल्या म्हणजे रुसायचं नसतं. आपल्या आवडीची सुरावट त्यावर वाजत नसेल तर ते दु:खं जोपासण्यापेक्षा जी वाजतीये ती ही वाईट नाही हे समजून घेण्यात जास्ती आनंद आहे. :)

जयंत विद्वांस

No comments:

Post a Comment