Tuesday 28 June 2016

यमन (२)...

परवा यमनवर लिहिल्यावर त्यातली बरीच मराठी गाणी उल्लेखायची राहिली अशी तक्रार आली म्हणून हा दुसरा भाग. हिंदी गाणी सतत कानावर पडतात, ते चित्रपट बघितले जातात त्यामुळे ती जास्ती लक्षात रहातात पण मातृभाषेतही अतिशय सुंदर गाणी झालेली आहेत. मराठी गाणी ऐकताना अर्थ जास्ती पोचतो किंवा त्याकडेच जास्ती लक्षं असतं आधी. द्रविड, सचिन, लक्ष्मण, गांगुली, कुंबळे एकाचवेळी देशासाठी खेळले हा खरा योग. त्या अर्थाने ब्रायन लारा दुर्दैवी. वॉल्श आणि अँब्रोज सोडले तर तो खेळायचा ती टीम डबघाईला आली होती. ग्रिनीज, हेन्स, लॉईड, रिचर्ड्स आणि लारा असा योग असता तर? असाच योग मराठी संगीतात मात्रं आपल्या नशिबात होता. गदिमा, खेबूडकर, पी.सावळाराम असे कवी गीतकार, बाबूजी, पुलं, तीन वसंत (प्रभू, पवार, देसाई), राम कदम असे दिग्गज संगीतकार एकाच काळात जन्माला आले आणि आपल्या कानांना सोन्याची कर्णफुलं घालून गेले. योग्यं वेळी जन्मं घ्यायला पण नशीब लागतं. आपलं आहे. 
पुलं साहित्यिक म्हणून जितके गाजले तितकं त्यांच्या संगीताचं कौतुक नाही झालं असं माझं आगाऊ मत आहे. सायीचा मऊपणा, गोधडीची उब, आजीच्या सुरकुतलेल्या हाताचा स्पर्श आणि माणिक वर्मांच्या आवाजातला शांत स्नेहगोडवा शब्दात कसा सांगता येईल? तसंच हे पुलंचं यमनातलं गाणं 'कबीराचे विणतो शेले', गदिमा तर काय डोक्यात १६ जीबी रॅम बसवल्यासारखा सीपीयू त्यांचा, टेन जी कनेक्शन असल्यासारखे योग्यं, पर्यायी शब्दं सापडायचे त्यांना, माणसानी किती साधं लिहावं? तर गदिमांसारखं, त्यापेक्षा साधं, सोप्पं वाचण्यात नाही. या गाण्यात 'एकएक धागा गुंते, रूप ये पटास' या ओळीत पट (म्हणजे वस्त्रं) हा म्हटलं तर एकंच अवघड शब्दं आहे. डोळ्यांवर काकडीचे काप ठेवून जेवढा गारवा जाणवणार नाही तेवढी शीतलता माणिकताईंच्या आवाजात आहे. कबीर सगळीकडे पोचला पण गदिमा नाहीत कारण ते अनुवादीत झाले नसावेत आणि चित्रपटगीत म्हणजे प्रतिष्ठा नाही हे कारण असावं. संतांच्या तोडीची रूपकं, सोपा परमार्थ हा माणूस अनंत गाण्यातून श्वास घ्यावा इतक्या सहजपणे सांगत आलाय पण चित्रपटगीत यापुढे आपण त्याची किंमत करायला तयार नाही हा आपला करंटेपणा.  
बाबूजींची अनेक गाणी या रागात आहेत. ते, गदिमा आणि आशाबाई अफाट त्रिकूट होतं. एकाचढ एक गाणी त्यांनी दिलीयेत. तिघांचं यमनातलं 'का रे दुरावा, का रे अबोला' आणि यमनाची तीट लावलेलं 'जिवलगा, कधी रे येशील तू' ऐका. हनुवटी हा शब्दं गाण्यात यातच असावा फक्तं. 'नीज येत नाही मला एकटीला, कुणी ना विचारी धरी हनुवटीला'चा आवाज अगदी ढाकेकी मलमल सारखा सुळसुळीत आहे. केवढी शृंगारिक तक्रार. 'जिवलगा'चा ठेका तर काय अप्रतिम आहे. एखाद्या संगीतकाराकडे एखादा गायक/गायिका फुलतो/फुलते. आशा/आरडी-ओपी-बाबूजी, किशोर/एसडी, आरडी या जोड्या वेगळ्या भासतात. केमिस्ट्री जुळल्यासारखी वाटते अगदी. त्यांचं अजून एक यातलं गाणं म्हणजे 'धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना'. तुझा शब्द की थेंब हा अमृताचा' यात 'तुझा सूर हा, शब्दं हा, अमृताचा' अशी परिस्थिती आहे. फास्ट, -हिदम बेस्ड गाणी म्हणायला सोपी असतात. पण अशी ठहराव असलेली, प्रेयसीच्या बटा हळुवारपणे बाजूला केल्यासारख्या निवांत चाली म्हणायला तयारी हवी. शोएब अख्तरच्या १५५ केएमपीएचला मजा आहेच पण वॉर्नच्या हळुवार लेगीत पण मजा आहे. तशी गाणी आहेत ही. संमोहित करणारी.   

बाबूजींची संगीत दिलेली 'तोच चंद्रमा नभात', 'आकाशी झेप घे रे पाखरा', गायलेलं 'समाधी साधन, संजीवन नाम' यातलंच आहे. 'कशी केलीस माझी दैना', 'राधाधर मधुमिलिंद जय जय', 'देवाघरचे ज्ञात कुणाला', 'सुकांत चंद्रानना पातली', ही नाट्यगीतं, पांडुरंगकांती दिव्यं तेज झळकती', 'प्रभाती सूर नभी रंगती', 'टाळ बोले चिपळीला', वसंतरावांचं 'प्रथम तुला वंदितो' ही भक्तिगीते, 'बाळा जो जो रे' आणि 'निंबोणीच्या झाडामागे' ह्या अंगाई, 'सांज ये गोकुळी', 'बाई मी, विकत घेतला श्याम', 'जिथे सागरा धरणी मिळते', 'चाफा बोलेना', यशवंत देव आणि लताचं 'जीवनात ही घडी अशीच राहू दे' ही गाणी, 'लाखांमधुनी सख्या तुम्हाला अचूक मी हेरलं, तुमच्या नावानं गळ्यात माझ्या बांधा एक डोरलं', शोभा गुर्टू यांनी गायलेलं 'पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा' या लावण्या यातल्याच आहेत. सूर काय, चाल काय, राग काय आणि छापखान्यातले खिळे काय, जुळवणा-यावर अवलंबून असतं काय दाखवायचं ते. मुळाक्षरं आणि सूर स्वतः:काही सांगत नाहीत. कशापुढे काय ठेवायचं आणि काय निर्माण करायचं हे निर्मात्याच्या प्रतिभेवर ठरतं आणि आपल्या आकलनशक्तीवर. रामायणातलं 'लीनते चारुते सीते' यमन बिलावल आहे. 'मी मज हरपून बसले गं', 'मागे उभा मंगेश', अरुण दात्यांच्या बरोबर आजीवन जोडलं गेलेलं खळ्यांचं 'शुक्र तारा मंद वारा' ही यमनकल्याण आहेत. दोन गाणी मात्रं यमन कल्याण मधली कधीही ऐकावी अशी आहेत, एक ग्रेसांचं 'भय इथले संपत नाही' आणि रामायणातलं 'पराधीन आहे जगती'. 

आजीनी आईला घेऊन दिलेलं काही 'आणे' किमतीचं 'गीतरामायण' घरी आहे. भूर्जपत्रावर लिहिलं असावं असं वाटेल अशी आता पानं पिवळी पडलीयेत. राममंदिर बांधायला विटेला पैसे जमवतात कारण पुढे स्वतः:च्या घरावर सोन्याची कौलं चढवता येतात, सत्ता मिळू शकते पण गरजच काय मंदिराची. एक गीतरामायण घरी ठेवलत तरी पुरेसं आहे. सगळं रावणाचं सैन्यं आहे पण बांधायचंय राममंदिर. असो! ९१ साली 'सावरकर' चित्रपटासाठी बाबूजी निधी गोळा करण्यासाठी परत गीतरामायण करणार होते. हॉटेल स्वरूपला ते उतरायचे आणि त्यांचं त्या कार्यक्रमाचं तात्पुरतं ऑफिस 'हॉटेल रविराज'च्या ऑफिसमध्ये होतं. क्वचित यायचे ते तिथे. अतिशय मितभाषी आणि तापट माणूस असं कानावर आलेलं. एकदाच त्यांना मी तिथे पाहिलेलं, चार फुटांवरून. बुटकेसे, चेह-यावर प्रसन्नं भाव आणि चित्रपटाचा विषय कायम डोक्यात असलेले त्यामुळे थोडेसे तणावग्रस्त. मोठ्या माणसांना मी बघतो फक्तं, ते जवळ जाऊन सह्या वगैरे मागायचं माझं धारिष्ट्य नाही होत. त्यांच्याकडे फक्तं बघत रहावं. सहीचा कागद हरवू शकतो, डोळ्यातली प्रतिमा सेव्ह असते. 

तर मूळ मुद्दा 'पराधीन आहे जगती'. बाबूजींचे सहाय्यक प्रभाकर जोगांनी सांगितलेला किस्सा आहे. नेहमीप्रमाणे फक्तं एक दिवस आधी महाकवींकडून गाणं मिळालं. त्याला बाबूजींनी दरबारी कानडा मधे चाल पण लावली. सकाळी पावणे आठाला लाईव्ह ब्रॉडकास्ट करायचं होतं. दोघं रिक्षातून निघाले आकाशवाणीकडे. रिक्षात बाबूजी म्हणाले, 'मी चाल लावलीये दरबारी कानडामध्ये पण मला ती योग्यं वाटत नाहीये'. स्टुडिओत गेल्यावर मुखड्याची नविन चाल त्यांनी ऐकवली. 'ही बसवून घ्या वादकांकडून तो पर्यंत मी अंतरे बसवतो'. साडेसातला रिहर्सल झाली. पावणेआठला लाईव्ह ब्रॉडकास्ट. या महान माणसानी दहा अंत-याचं गाणं डायरेक्ट सादर केलं. देव माना, मानू नका पण अशावेळी कोण उभं राहतं मागे डोक्यावर हात ठेवायला? काहीतरी अज्ञात दैवी शक्ती असणारच. पावसाची सलग धार असावी तशी गदिमांची लेखणी होती. कुठलाही अडथळा न येता ती जशी अखंड येते तसे गदिमांच्या लेखणीतून शब्दं झरत असावेत.   

'दैवजात दुःखें'. संचिताने सगळं मिळत असतं असं आपल्याला वाटतं. मला कायम प्रश्नं पडत आलाय, देवाचं संचित कसं वाईट असेल? दशरथाच्या वंशात येताना कुठलं पूर्वसंचित येतं मग? त्या वंशाचं येत असावं. कसे सुचत असतील पर्यायी शब्दं. आपण वनवास म्हणतो, गदिमा काननयात्रा म्हणतात. 'मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तो ही पुढे जात आहे', असं रामदास म्हणाले. गदिमांच्या ओळी बघा, 'जिवासवें जन्मे मृत्यू, जोड जन्मजात, दिसे भासतें तें सारें विश्व नाशवंत', 'मरण-कल्पनेशीं थांबे तर्क जाणत्यांचा' किंवा अजरामर 'दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट, एक लाट तोडी दोघां, पुन्हा नाहिं गांठ, क्षणिक तेंवि आहे बाळा, मेळ माणसांचा' बघा. पद्यरूपी संवाद आहे सगळा. राम सांगतोय भरताला. त्याच्या लेव्हलचं सांगणं पाहिजे. गदिमा पटकथा लिहायचे यात नवल ते काय. रामायण लिहिताना कित्त्येक पात्रात ते फिरून आलेत. 'निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता' हे कसं आलं असतं मग सहज. शुर्पणखेचा राक्षसीपणा 'सूड घे त्याचा लंकापती' मधून कसा आला मग सहज. 

सगळे शब्दं डिक्शनरीत पण असतात. गदिमांनी शब्दांचे कुंचले केले आणि या माणसांची गाण्यातून रेखाचित्रं काढली. मग त्यात बाबूजींनी सुरांचे रंग भरले आणि त्याच्या तसबिरी केल्या. आपले फोटो दिवाणखान्यात आपण गेल्यावर कुणी लावेल का माहीत नाही पण या माणसांनी मोफतमध्ये आपल्या आयुष्याच्या दिवाणखान्यात काय भरगच्चं दालनं मांडून ठेवलीयेत बघण्यासाठी. अरे किती द्याल? 'अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील दो कराने' अशी अवस्था आहे. आपलीच बुद्धीची झोळी फाटकी. मधुबाला, नूतन, माधुरी, रेखा एकाचवेळी पडद्यावर असतील तर कुणाकडे बघावं असा प्रश्नं पडेल, तसं होतं इथे, शब्दं बघू, अर्थ बघू, चाल बघू की आवाज बघू? डोळे मिटून आस्वाद घ्यावा म्हणून. बाबाजी का बायोस्कोप सारखं होतं मग. चित्रं बंद डोळ्यापाठीमागे दिसत असतात, कानात सूर आणि मेंदूत अर्थ शिरत असतो. तो हृदयात पोचला की पावसाची ओल यावी तशी डोळ्यांच्या भिंतींना ओल येते.  
देखावा प्रेक्षणीय असतो, ठिकाण रमणीय असतं, ललना कमनीय असते तशी ही सगळी गाणी 'यमनीय' आहेत. ऐकते रहो, जीते रहो. :)

जयंत विद्वांस

1 comment:

  1. सर्व गाणी श्रवणीय...यमनिय..आहेच..तुम्ही ती लिहून jv..अजुन लेखनिय केली आणि आम्ही वाचली...असिम गोड यमन त्यात कोहिनूर सारखा तुमचा हा लेख

    ReplyDelete