Tuesday 7 June 2016

नमूने (३)…

माणूस अप्रिय असण्याची अनेक कारणं असतात. पण माणूस वयस्कं झाला की त्याच्या वागण्यानी, अती बोलण्यानी, नाक खुपसण्यानी, सल्ले लादण्यानी तो अप्रिय होतो. काळबदल स्विकारता येत नाही. मुळात आपल्यामुळे दुस-याला त्रास होतोय ही भावना हवी म्हणजे त्रास झाला आणि नाईलाज असेल तरी कुणी काही बोलत नाही. पण हेकटपणा, विक्षिप्तपणा, त-हेवाईकपणा, संतापी स्वभाव यामुळे स्वत:ला आणि दुस-याला त्रास देतात. कसला सूड असतो काय माहित. स्वकर्तुत्व शून्यं असलं तरी केवळ जन्म दिलाय या आमरण उपकारासाठी परतफेड हवी असते. माझ्या एका मित्राचे वडील होते असे (तेच ते 'एक घोट आहे अजून' पोस्ट मधले).

पंचाहत्तरीचे असतील ते तेंव्हा साधारण. तर्कट माणूस. अटलबिहारी ते मरायच्या आधी पंतप्रधान व्हावेत अशी त्यांची इच्छा, सगळे काँग्रेसी यांचे शत्रू त्यामुळे. अटलजी पंतप्रधान झाले त्यावेळेस ते नव्हते. स्वत:ला सोयीस्कर पडेल तेवढ्या हिंदुत्वावर ते फक्तं बोलू शकायचे. मला नाटकी माणसांचा पहिल्यापासून तिटकारा आहे. कुटुंबाचं पालनपोषण, जबाबदारी या गोष्टी कधी काळजीच्या वाटल्या नाहीत पण धर्म, संस्कार, समाजातला घसरत चाललेला आचार विचार यावर पांडित्य झाडायचे. एक सत्यनारायण सांगायला गेले की चारपाच तास तिथेच. पूजा सोडून अवांतर इतकं बोलणार की पूजेला बसलेला माणूस कंटाळेल, तो माणूस यांना परत बोलावणार नाही याची हमी. किती बोलायचं, काय आणि कधी बोलायचं नाही याचं तारतम्यं शून्यं.

माझ्याशी कमी बोलायचे ते कारण माझ्या मुर्ख विधानांना ते खोडून काढू शकायचे नाहीत. एकदा मी सापडलो त्यांना. चित्रपटातील गाणी, अंग उघडकीला आणणारे कपडे, स्वैराचार यानी कसं पाप वाढतंय पृथ्वीवर याबद्दल सांगू लागले. पाप वाढतंय, दहावा अवतार जवळच आहे आता वगैरे. मी सरळ साधा माणूस, चेहरा कोरा ठेवून मी मुर्खासारखं म्हणजे माझ्यासारखंच बोलू शकतो. म्हटलं. "पण ते वाईट आहे तर तुम्ही बघताच कशाला? ते पाप आहे हे कुणी ठरवलं? आपल्या धर्मात पापावर प्रायश्चित्त किंवा इतर उपायांनी तोडगा निघू शकतो, तर यावर कुठला आर्थिक किंवा जप वगैरे उपाय आहे? समजा गंगेत अंगभर कपडे घालून त्या हिरोईनी उभ्या राहिल्या वर्षातून चार दिवस तर त्या पापातून मुक्तं होतील की न्यूमोनिया होऊन मुक्तं होतील जगातून? ती त्यांना शिक्षा झाली असं समजायचं की मोक्ष मिळाला म्हणायचं? समजा आपण पाप खूप केलं तर अवतार लवकर होईल आणि धर्माची स्थापना होऊन उरलेल्या लोकांना समाधानी आयुष्यं जगता येईल, हा विचार का नाही? अवतार लवकर होण्यासाठी केलेली मदत हे पाप होईल का की देव प्रसन्न होऊन वर देईल?" 'तुला अक्कल नाहीये म्हणून चेष्टा करतोयेस. भ**, अडाण** आहेस तू' वगैरे फुलं टाकून त्यांनी विषय बंद केला.

डिसेंबर एक्क्याण्णव सालची गोष्टं आहे म्हणजे पच्चीस साल पहिले की बात है! घरी ते आणि त्यांचा मुलगा फक्तं. तो दोन ठिकाणी काम करून यायचा नऊच्या पुढे रात्री. त्याच्या मावशीच्या मुलाचं लग्नं होतं वसईला. तिच्या घरातलं शेवटचं लग्नं. तेंव्हा यांना जलोदर झाला होता. पोट भोपळ्यासारखं. दर पंधरा मिनिटांनी लघवीची भावना व्हायची मात्रं धोतरात लघवीला झालेली पण कळायची नाही. सतत धोतरं ओली असायची, मग कंड सुटायची. पथ्यं होती, कसं नेणार यांना. मोठा भाऊ आणि त्याचं कुटुंब एशियाडनी जाणार होतं. दर पंधरा मिनिटाला एसटी कोण थांबवेल यांच्याकरता? त्यामुळे यांना न्यायचं नाही असं दोघा भावांचं ठरलं. तेंव्हा एक दोन एसट्या असतील वसईला, तो सकाळीच गेला. म्हाता-याला तारीख लक्षात, ते घरात वाट बघतायेत, मोठा कधी न्यायला येतोय याची. पाचच्या सुमारास त्यांच्या लक्षात आलं, आपल्याला हॉर्स लावून तो गेला हे. त्यांनी एका पिशवीत कपडे भरले आणि ते निघाले स्वारगेटला. शेजारची बाई मला बोलवायला आली घरी. मी कसबसं समजावून त्यांना घरी आणलं. 

मोबाईल कुठले त्यावेळेस. दुस-या नोकरीवर तो सहाला जायचा. एक बूथवर थांबून डॉट ५.५५ ला फोन केला आणि स्टोरी सांगितली त्याला. तो इंस्ट्रक्टर होता. त्याच्याकडे परीक्षा होत्या. नऊला आल्यावर नेतो म्हणून सांग म्हणाला. मी साडेसहा ते आठ बसून त्यांच्याकडे शिव्या ऐकत. नाटक सगळं व्यवस्थित. कपडे भरून येतो म्हटलं. नऊ पाचला हे आमच्या दारात, मुलाला आणि मला शिव्या, तुम्ही फसवताय मला. म्हटलं, 'डेक्कनवरून पाच मिनिटात सायकलवर येतं का कुणी, तुम्ही येउन दाखवा रिक्षेनी, तो करतोय तर तुम्हांला हे सुचतय, जा स्वारगेटला जायचं असेल तर, उगाच धमक्या कशाला देताय'. मग घरी गेले. तो साडेनऊला आला. यथेच्छ शिव्यागाळी झाली त्याला. तो माझ्याकडे आला, म्हणाला ट्याक्सीनी जाऊ, तू चल माझ्याबरोबर. वसईला कसं जायचं माहित नाही दोघांनाही. स्टेशनला येउन, मधे थांबायला लागलं तर कटकट नको म्हणून, स्पेशल ट्याक्सी केली दादर पर्यंत. त्यानी ज्ञान वाटलं. सकाळी पहिली लोकल पकडा पाचची, गर्दी नाही काही नाही, आरामात जाल. हे मस्तं मागे आरामात डोकं ठेवून झोपले दादरपर्यंत. साडेतीनच्या आसपास दादरला पोचलो आम्ही. दिडेक तास थांबलो की लोकल. म्हातारा ताजातवाना भांडायला. इथून ट्याक्सी करा म्हणाला वसईला. त्याला कुणी तयार होईना.

मग दहिसरला आलो ट्याक्सीने तिथून रिक्षा ठरवली वसईला. थंडी मरणाची. रिक्षाचा दिवा म्हणजे मेणबत्ती. रिक्षात मागे आम्ही तिघे आणि ड्रायव्हर धरून पुढे तिघे. पेपरला नाव येणार उद्या असं वाटायचं मला खड्डा आला की. साडेसहा-सातच्या सुमारास पोचलो वसईत. लोकलनी लवकर गेलो असतो. लग्नघरी दरवाजा वाजवला आणि यांनी ज्येष्ठ पुत्राची सगळ्यांसमोर वस्त्रं काढायला सुरवात केली. घृणा वाटली. केवळ वय आणि नातं यामुळे दोन्ही मुलं गप्पं होती, नाहीतर कुणीही रागाने हात उचलेल अशी वर्तणूक होती. लग्नं लावून आम्ही दुपारीच निघालो ट्रेननी. ती ब्याद येताना मोठ्याच्या गळ्यात मारली त्यानी. तो एसटीनी कुठलाही त्रास न होता घेऊन आला हे त्याचं नशीब. आपल्यामुळे दुस-याला त्रास होतोय हे न कळायला काय लहान होते का? उपभोग घ्यायचा नाही, घेऊ द्यायचा नाही अशी काहीतर विकृत मनोवृत्ती. त्यांची बजाजमध्ये एफडी होती वीस हजाराची. त्यांना एकट्यालाच माहित असलेली. ते गेल्यावर तीनेक वर्षांनी कपाट साफ करताना सापडली. वारस नेमलेला नव्हता. पैसे बिनव्याजी पडून तिथे. सक्सेशन, सगळ्यांच्या एनोस्या देईपर्यंत परत मिळायला वर्ष गेलं. व्याज नाहीच. काय मिळालं? न स्वत:ला, न मुलाबाळांना.

रोज साईचं दही आणि ताक पण हवं असायचं त्यांना. एक लिटर दुधात रोज किती साय पडणार अशी. आल्यागेल्याला सांगायचे, मुलगा आणि मुलगी चोरून खातात मी नसताना. हे दिवसभर घरात, कधी खाणार चोरून. ऐकणारा गप्पं बसायचा. संस्कार ना आपल्यावर, मोठ्या माणसांना उलट बोलू नये. पोसायची ताकद नाही एकालाही, मुलं मात्रं सहा, तेंव्हा कुठे गेली होती अक्कल? का वागतात माणसं अशी? आपल्या जाण्यानी कुणाला तरी बरं वाटेल, आपल्याला लोक कंटाळलेत, आपलं काहीतरी चुकतंय याची जाणीव इतर बाबतीतल्या पांडित्यामुळे का होत नाही? कसला सूड उगवतात आपल्याच मुलाबाळांवर? भोग त्यांचे नसतात, त्यांची ही कौतुकं निमुटपणे सहन करणा-या लोकांचे असतात.

जयंत विद्वांस

No comments:

Post a Comment