Tuesday 7 June 2016

Truth is a shortcut...

आज दहावीचे रिझल्ट लागले. हल्ली सत्तर टक्क्यांच्या आसपास मार्क्स मिळालेले नाराज वगैरे असतात. मी ८३ ला दहावी झालो तेंव्हा सत्तरच्यावर मार्क्स म्हणजे शंखपुष्पीच्या जाहिरातीला घेतील एवढा हुशार माणूस. मला ६५.३३ होते आणि बारावीला ६५.८६. डॉट पलीकडचे टक्के वाढले हे ही नसे थोडके. पण या सगळ्यात सहा वर्ष गेली.

डिएमईला गेलो साता-याला तर फी, हॉस्टेल, क्लास खर्चाचा अंदाज घेऊन डोळे पांढरे झाले होते. पुण्यात परत येईस्तोवर वर्ग चालू झाले होते. विमलाबाई गरवारे मध्ये ओळख होती बाबांची, केळकरकाका म्हणाले, काय करायचंय तुला, म्हटलं सायन्स. जा बस समोरच्या वर्गात. खरंतर कुठली साईड घ्यावी ही अक्कल नव्हती आणि सांगायलाही कुणी नव्हतं. फिजिक्स, हा अध्यात्मापेक्षा गहन विषय आहे. एकवेळ मी ध्यान, अध्यात्म, योग यात प्राविण्य मिळवेन पण फिजिक्स मध्ये या जन्मात शक्य नाही.

पहिल्या दुस-या चाचणीत कसाबसा तरलो. सहामहीला कित्तीही सोपा पेपर असता तरी मी नापासच झालो असतो इतका मी हुशार होतो. ज्युनिअर कॉलेजला प्रगतीपुस्तक होतं अकरावीला. मी कॉलेजात ओळख असल्यामुळे रीतसर नावात लावतो त्या मधल्या नावाची सही घ्यायची ठरवलं. अत्यंत गुणी अभ्यासू अशी ख्रिस्तपूर्व ८४ काळात माझी ओळख होती. कुठलेही फार कष्ट न घेता मी ती पुढे पुसली. बाबा थबकले, 'तुझी बाई चुकली काय रे, फिजिक्स मध्ये तीन काय लिहिलेत शंभरपैकी'. 'तेवढेच आहेत, पाच गाळलेल्या जागा सोडवल्या होत्या, तीन बरोबर आल्या, अजून किती देणार त्या तरी'. त्यानंतर सही करायची वेळ मी त्यांच्यावर येऊच दिली नाही.

थुंकी उडवत बोलणा-या जोशी बाईंनी अत्यंत उपहासात्मक (कुजकं म्हणतात त्याला) शब्दात सगळ्या वर्गाला ऐकू जाईल असं हलक्या आवाजात सांगितलं, 'आडनाव काय, मार्क काय, निदान एकशे पाच तरी कर बेरीज म्हणजे वर्ष तरी सुटेल हे'. चिडून उठेन वगैरे शक्य नव्हतं. उगाच अशक्यं पैजा मी घेत नाही. मला काय येत नाही हे मला लहानपणापासून कळतं.

तिस-या चाचणीला एकच धडा फिजिक्सचा. मी वर्गात हायेस्ट, सत्तावीस तीसपैकी. बाईंनी टेबलापाशी उभा करून पद्मश्री दिल्यासारखं कौतुक वगैरे केलं. खरे हुशार, अभ्यासू लोक आयुष्यातून उठले असते, साला एवढा अभ्यास करून हा पहिला येणार असेल तर रस्त्यावर बसून पंक्चर काढलेल्या ब-या असले विचार त्यांच्या डोक्यात तरळायला लागले असणार. मी अत्यंत प्रामाणिकपणे सांगितलं, 'मला त्या धड्यातली एकही ओळ येत नाही, तुम्ही म्हणालात एकशेपाचचं बघ म्हणून त्या धड्याची गाईडची पानं माझ्या खिशातच होती.' 

जोशीबाई दयाळू म्हणून वाचलो. ती आयुष्यातली पहिली आणि शेवटची कॉपी. लाज वाटायला लावणारं यश कसं असतं ते कळलं. नंतर बरेच उद्योग झाले. त्यावर परत कधीतरी. पण तेंव्हापासून दोन वाक्यं मी कोरून ठेवलीयेत मनात 'Truth is a shortcut' आणि 'Justifying the fault doubles it'. चुकलं ते चुकलं, नाही जमत ते नाही जमत.

आपलं अपयश आपण बोंबलून सांगितलं की लोकांचा आपल्याला चघळण्यातला इंट्रेस्ट संपतो. लपवायला गेलात की लोक मागे लागतात. यश कुणीही सांगेल, अपयश पण यश मिळाल्यासारखं सांगता यायला हवं. ;)

जयंत विद्वांस

No comments:

Post a Comment