Tuesday 7 June 2016

मार्टका स्मार्ट…

महागाई कितीही वाढली तरी सगळी हॉटेल्स, ढाबे, मल्टीप्लेक्स, मॉल्स, शोरूम्स, ज्वेलर्स, सुपर मार्केट कुठल्याही तारखेला बिनगर्दीची दिसणार नाहीत. डिस्काउंट, अमक्यावर अमकं फ्री, याचे एवढे नग घेतले तर त्याचे एवढे नग निम्म्या किंमतीत. स्वकमाईनी घेतलेल्या गोष्टींपेक्षा फुकट मिळालेल्या वस्तूंचा आनंद सगळ्यात जास्ती असतो आपल्याला. सगळ्या ऑफर्स ठराविक दिवसांकरीता असतात त्यामुळे 'हाच तो क्षण, हीच ती संधी' अशी परिस्थिती असते. तरी तिथे घ्या नाsss ही, छान आहे असा कुणी लाडिक वगैरे आग्रह करत नाहीत, आपल्याला हवं असेल ते घ्या आणि निघा, पन्नास किलो बासमती एकावेळी घेतलात म्हणून तिथला माणूस/बाईमाणूस तुमच्याकडे 'अजी म्यां श्रीमंत पाहिला' वगैरे भावनेने अजिबात बघणार नाही उलट रिकाम्या झालेल्या जागी त्या पिशव्या घाईच्या वेळेत लावणं आलं म्हणून रागानीच बघेल एक वेळ, बघितलं तर.  

माणसांचे नमुने बघायला मात्रं मजा येते तिथे.  आपण काही आर्थिकदृष्ट्या कमी नाही असा आव चेह-यावर आणलेले तिथे जास्ती असतात. नविन क्रेडीट कार्ड मिळालेले, आयटीमधले, नविन लग्नं झालेले, मैत्रिणीला, होणा-या बायकोला इंप्रेस करायला घेऊन आलेले, पहिल्यांदाच मॉलमधे आलेले ओळखू येतात. सामान खरेदीला आला आहात तर पिशवी बरोबर घेऊन येण्यात लाज वाटण्यासारखं काय आहे हे मला कळलेलं नाहीये. बरं, तसंही ती पिशवी बाहेर जमा करायची असते किंवा तिच्या मुसक्या बांधून ती आपल्या हातात असते पण हे सगळे नविन लोक तिथे पैसे देऊन प्लास्टिकच्या पिशव्या घेऊन फालतू पैसे घालवत असतात. पिशवी हवीये का विचारल्यावर नको म्हणणा-या माणसाकडे (म्हणजे माझ्याकडे) लोक आणि तिथले सेल्समन अतीव तुच्छतेने किंवा दयार्द नजरेने बघतात. आयत्यावेळी एखादी वस्तू आठवली आणि घ्यावी लागली तर पिशवी घेणं समजू शकतो. तिथला तीस टक्के सेल्स हा न लागणा-या, फारश्या आवश्यक नसलेल्या, ज्यावाचून लगेच फार अडणार नाही गोष्टींचा होतो असं माझं मत आहे. 

क्वांटिटी डज म्याटर. एकतर तिथे सगळ्या वस्तू विपुल प्रमाणात असतात त्यामुळे सगळीकडे सुबत्ता आहे, आता कुठलीही अडचण नाही, स्वस्ताई आली असं वाटत असावं. आकर्षक प्याकिंग, स्कीम, डिस्काउंटचे बोर्ड जागोजागी टांगलेले असतात, झगझगीत दिव्यांमुळे सगळ्या वस्तू काय प्लास्टिकचे मरतुकडे मग्गे सुद्धा खतरा दिसतात. मुलांचा हट्ट हे सगळ्यात भंपक विधान आहे. हट्ट केल्यावर एकदा घ्या फारतर पण त्याला पटवून देऊ शकता की हे आपल्याला गरजेचं नाही. यांनाच घ्यायचं असतं पण मुलांच्या नावावर खपवतात. एका माणसाची ट्रोली बघून मी आणि मुलगी एकमेकांकडे बघून हसू लागलो होतो. खालचा मजला बिस्किटस, टोस्टच्या पाकिटांनी पूर्ण भरला होता, वरती कॉर्न फ्लेक्स, बोर्नव्हीटा, कॉम्प्लान मटेरियल, हलदीरामचे फरसाण, मूगडाळ, शेव यांचे जंबो पुडे आणि त्या 'बिग'च्या ऑरेंज आणि कोलाच्या अवाढव्यं पाच सहा बाटल्या. दोन तीन हजारांचा ऐवज असेल. काय ऐटीत उभा होता तो माणूस बिलिंग करताना.  झाल्यावर त्यानी रक्कम चार जणांना ऐकू जावी या हेतूनी उच्चारली. डेबिट/क्रेडिटकार्ड चालतं सगळीकडे आता तरीही कार्ड देऊ की क्याश असं उगाचंच विचारात पाकिटातील नोटा झळकवून झाल्या. फाटक्या शर्टाचा एखादा गरीब माणूस वगैरे दिसला आजूबाजूला तर त्याचंही बिल भरून टाकू अशा आविर्भावात तो सगळीकडे नजर फिरवत होता. मी शर्ट फाडायलाच घेतला होता पण त्याचं बिल झालं म्हणून शर्ट वाचला माझा.   

लोक काय नी काय घेत असतात तिथे. न ऐकलेल्या ब्रांडच्या अनंत वस्तू तिथे असतात. भावाची घासाघीस नाही, क्वालिटीबद्दल माहित नाही तरीही घेतात. रस्त्यावरून घेतलं की तिथे मात्रं वीस रुपयाच्या वस्तूकरता कचाकचा भांडतील, इथे खराब लागल्यावर कोणसुद्धा उभं करत नाही तुम्हांला. पायपुसणी करायच्या लायकीचे बर्मुडे असतात तिथे. एक दिवाळीत मी बिग बझारला एकाबरोबर गेलो होतो. दोनवर एक शर्ट फ्री. फ्री चा मरू दे, पहीले दोन सुद्धा निवडता आले नाहीत अर्धा तास, इतका भिक्कार माल. तिथल्या प्यांटी तिथे आहेत म्हणून त्या नविन आहेत असं मी मानून घेतो. तुळशीबागेत कोप-याकोप-याला मिळणारी झबली, होजिअरी, पायपुसणी तिथे लेबल्ड रेट्सला विकली जातात. नुकतंच लग्नं झालेलं एक खेडवळ जोडपं होतं. दोन उश्या, दोन अंडरप्यांट, एक गाऊन, एक जीन, एक बेडशीट, एक मॉप, दोन प्लास्टिकच्या बादल्या असे चित्रंविचित्रं मटेरीअल घेऊन उभं होतं. बिलाचा आकडा त्याच्या डोळ्यापुढे नाचताना दिसत होता, बायको मात्रं जाम खुश होती त्याची. पहिल्यांदाच पाहिलेल्याच समजू शकतो पण अमक्याकडे आहे म्हणून माझ्याकडे पण आहे याला अंत नाही. 

खोट्या मोठेपणापायी लोक अव्वाच्या सव्वा खर्च करतात मग दुष्टचक्रात अडकतात. कार्डाची देणी थकतात, मग त्याचे हप्ते होतात, आजचं कर्ज वर्षभर लांबवलं जातं. मूळ वस्तूंवर मिळालेली एकूण सूट आणि कार्डावर भरलेलं व्याज याचा हिशोब कुणी करत नाही. घेतोय ते गरजेचं आहे? हा प्रश्नं विचारता आला पाहिजे स्वत:ला. उद्याचं सुख आज पदरात पाडून घेतोय आणि हप्ते भरताना त्याचा उपभोग राहून जातोय. आपलं निम्मं आयुष्यं माझ्या मते आपण काय असायला हवं होतं हे स्वप्नं बघण्यात आणि उरलेलं ते तसं आहे याचा आभास निर्माण करण्यात जातं. आपण आपल्याला आहोत तसे स्विकारू शकलो तर निम्मे त्रास कमी होतात. मी आजतागायत फक्तं एमआरपीपेक्षा कमी किंमत आहे ते तिथून आणत आलोय. काय घ्यायचंय ते जातानाच ठरलेलं असतं. त्यामुळे फालतू वेळ जात नाही. उगाच खर्च होत नाही, अनावश्यक गोष्टी घेतल्या जात नाहीत, क्रेडीट कार्ड नाही (कुणी देत नाही म्हणून आणि मिळालं तरी घेणार नाही कारण मोह लवकर होतो) त्यामुळे आपोआप खिसा बघूनच घेतलं जातं. अनोळखी माणसाचं माझ्याबद्दल काय मत होतंय याची काळजी मी करत नाही.  

हातावर पोट असलेले लोक जसे रोजचं आणून खातात तसे लोक आट्याच्या पिशव्या, तेलाची पुडकी, अंगी न लागणारी बेकरी प्रॉडक्टस, बादल्याभरून वर्षाकाठी कोल्ड्रिंक्स तिथून आणून पितात. उधारी होत नाही हे मान्यं पण अ-गरजेच्या वस्तू आपण किती घेतोय हे कळत नाही. साठवण गहू, तांदूळ, डाळ याची करायचे आधी. गव्हाला एरंडेल आणि तांदळाला बोरिक पावडर लावायचा उद्योग असायचा. तांदुळात मायाळू चिकट ते फडफडीत तुसडा अशी होत गेलेली स्थित्यंतरं कळायची. परिस्थिती काही येऊ दे, वीसेक पाहुणा अचानक जेवायला आला तर जेवण तरी नक्की देता येईल याची खात्री होती. आता साठवण आणि आठवण शून्यं. 

मार्ट में जाओ, स्मार्ट बनो या न बनो, फालतूका पैसा उडानेका सिख लो! 

जयंत विद्वांस

No comments:

Post a Comment