Friday 10 June 2016

फेसबूकीय साहित्य - कविता (१)…


श्री.मार्कराव झुकेरबर्गसाहेब यांच्यामुळे बाकी कुठल्या भाषेत नसेल इतका साहित्य प्रसव मराठी भाषेत फेसबुकावर झाला असावा हे माझं फार अभ्यास न करता मांडलेलं ठाम मत आहे. सातत्यानी फक्तं चांगलंच लिहिणारे पुलं, गदिमा, वपु, खेबुडकर वगैरे मंडळी आणि गांधारीसुद्धा लाजली असती इथला साहित्यप्रसूतीचा स्पीड बघून. सकाळी उठल्यापासून ब्याटरी संपल्यामुळे किंवा डोळे मिटल्यामुळे नाईलाजाने झोपेपर्यंत, सांडगे टाकतात तसं लोक, सॉरी, साहित्यिक इथे बादल्याच्या बादल्या अंगणात आणून ओतत असतात. सचैल स्नान घडतं, सदासर्वदा शंकराची पिंड जशी अभिषेक करून सतत ओली, ताजीतवानी दिसते तसं वाटतं अगदी. मला तर वेगळीच भीती वाटायला लागलीये. त्या मोबाईल गेम्स मध्ये आधीची लेव्हल नाही जमली तर तिला वगळून पुढच्या लेव्हलकडे जाताच येत नाही. झुक्यानी पेड बेसिसवर करावं तसं, अमक्या माणसाच्या पोस्टीला लाईक केल्याशिवाय एफबी वापरूच शकणार नाही तुम्ही. तसं काही फेबुवर झालं तर अकौंट बंद करावं लागेल.

कुठला म्हणून प्रांत इथल्या साहित्यिकांनी सोडला नाहीये. स्तिमित व्हायला होतं. एवढे साहित्यप्रकार चकटफू वाचायला कुठे मिळाले असते. कविता प्रांतात तर नुसती रेलचेल आहे. नुसत्या टिंबापासून, एकशब्दी, द्विशब्दी ते एकोळी, दोनोळी, तीन ओळीची हायकू, चारोळी, पाचोळीची लिमरिक, षडाक्ष-या, अष्टाक्ष-या, चौदा ओळीची सुनितं, ओव्या, आर्या, अभंग, भूपाळी, गवळण, वासुदेव, भारुड, मुक्तछंद (निबंध लिहून नंतर एंटर दाबून चारचार ओळींचे पॅराग्राफ केलेले मुक्तछंद वेगळे), अनेक वृत्तातल्या, वृत्तीतल्या कविता, विडंबन, विटंबन, दुर्बोध, विद्रोही, बालिश, बाष्कळ, चावट, निरर्थक कविता, गझला (रदीफ असलेल्या, नसलेल्या - राम नसलेल्याच्या धर्तीवर), हझला, सुट्टे शेर, मिसरे, अनुवाद, दुस-याच्या आपल्या नावावर खपवलेल्या (इथे घाम टिपलाय, टॉवेल पिळून वाळत घातलाय, नोंद असावी)  आणि अजून काही राहिले असतील तर ते, इतके वैविध्यपूर्ण प्रकार वाचायला मिळतील. यात दिग्गजांच्या कॉपी पेस्ट हा अजून वेगळा प्रकार. त्यावर आलेले उमाळे, मूळ आणि इथल्या स्वयंघोषित विद्वानांनी काढलेले अर्थ, रसग्रहण, नुसती गजबज आहे तुम्हांला सांगतो. यात सिझनल काव्यंप्रसव वेगळा. सणासुदीच्या शुभेच्छा, आठवणी, ऋतूबदल, थोरामोठ्यांच्या जयंत्या, निधन, सॉरी, महानिर्वाण हे वर्षभर पुरवलं जातं.

उन्हाळा आणि हिवाळा हे तसे तळागाळातले ऋतू. त्यांच्यावर फार कविता वगैरे होत नाहीत. एकात आहेत ते कपडे काढावे लागतात, एकात घालावे लागतात, यात वेळ जात असावा. मधल्या पावसाळ्याला मात्रं कायम कौतुक नशिबात आहे. पावसाळ्याची वाट शेतकरी आणि चातक पहात नाही इतकी कविवर्ग बघतो. पहिला थेंब, मातीचा वास कंटाळा येईपर्यंत हुंगावे लागतात. आधी वारा सुटला, लाईट गेले, गुरं हंबरू लागली की थोड्याच वेळात पाऊस येणार असं असायचं. परवा तर एकानी कविता लिहायला घेतो असा विचार केला तर ढग गोळा झाले होते म्हणे. एका कविमंडळात दुष्काळावर उपाय सुचविण्यात आला होता. एकानी केरळात जायचं. ढगाखाली उभं रहायचं आणि रिले किंवा दिंडी पद्धतीनी कविता करत इकडे महाराष्ट्रात यायचं म्हणजे पाऊस मागोमाग येईल आणि दुष्काळ कधीच पडणार नाही. नदीचं पाणी पळवतात तसं ढग पळवले म्हणून वाद होईल म्हणून ती योजना बारगळली. इतकी चांगली योजना अंमलात न आणता आल्यामुळे मंडळात झालेला अश्रुपात पावसापेक्षा जास्ती होता म्हणे. उघड्या जिलबीवर जश्या थव्यांनी माश्या बसतात ना तसे कवीलोक जथ्थ्यानी हिंडत असतात पावसात.

त्यात पण प्रकार आहेत, प्रत्येक गोष्टीवर कलाकुसर आहे - त्याची आठवण, विनवणी, वळीवाचा शिडकावा, तो आल्याचे स्वागत, थांबल्याचं कौतुक, मधेच गायब झाल्यावर झालेला विरह, न पडल्यावर किंवा अती पडल्यावर झालेल्या नुकसानीचा ताळेबंद, पाठवणीच्या विरहण्या. त्यात तुम्ही महाराष्ट्रात कुठे रहाता त्या प्रांतातला पाऊस त्यात वेगळा दिसला पाहिजे. बटाटे, आलं, भुईमुग, रताळी रोपाला जमिनीवर येतात की खाली असल्या किरकोळ गोष्टी माहित नसल्या तरी शेतक-यांची दु:खं ओसंडून वहात असतात शहरी कवितातून. किरकोळ पंधराएक हजार कर्ज असलेला शेतकरी कवितेतलं त्याचं दु:खं वाचून डिप्रेशन मध्ये जाईल इतकं मूलगामी दु:खं असतं त्यात. नात्यातल्या लग्नात एखादी आत्या, काकू, मामी जशी ट ला ट जोडून मंगलाष्टक लिहिते आणि गाते पण हौसेने तसं पावसाळ्यात असतं. पावसाचे प्रकार, रंगछटा पावसाला माहित नाहीत तेवढे कवींना माहित असतील. विणीचा हंगाम असतो पावसात कवितेसाठी. सुफला १५:१५:१५ आधीच टाकून ठेवलेलं असतं, त्यामुळे तुफान पीक येतं.

एकदा ते काव्यं पोर फेबूच्या भिंतीवर डकवलं की त्याचं संगोपन करावं लागतं. ते तुमच्या भिंतीवर किंवा कुठल्या ग्रुपात टाकलं असेल तर दुसरी प्रसूती होईपर्यंत त्याला तळागाळातून वर काढावं लागतं वरचेवर. काही धूर्त लोक कॉमेंटला चार दिवसांनी उत्तर देतात म्हणजे ते नव्यानी पावडर बिवडर लावून बोर्डावर येतं. त्यात तुम्ही कुणाच्या नावाच्या मुसक्या बांधत असाल पोस्टीत तर तेवढं कौतुक नक्की. काही विद्वान तर लोकाच्या पोस्टीत जे असतं त्या सदृश यांनी काही आधीच लिहिलेलं असतं ते फेवीक्विक लावून कामेंटीत चिकटवतात, काहीजण पोस्टीतल्याच चार ओळी टाकून पुढे अंगठा आणि शेजारच्या बोटाची सुंदर अशी आकृती काढतात. बाकी 'सुंदर, अप्रतिम, क्या बात है, मार डाला, चाबूक, कसं सुचतं हे असलं भन्नाट, लैच आवडलंय, तरल, जीव घेशील एक दिवस, …., ….!, या अगम्य खुणा सांस्कृतिक वारसा असलेला __/\__ आणि आवडली असल्यास, नसल्यास, कळली नसल्यास उगाच वाईटपणा नको म्हणून टाकलेल्या असंबद्ध स्मायलीज या झुक्यानी अधिकृत केलेल्या कॉमेंट्स आहेत असा समज होईल इतक्या प्रमाणात असतात. कुणी अमुक अमुक यांची तमुक तमुक कविता आठवली असा उल्लेख करून 'कॉपी असण्याची दाट शक्यता आहे' अशी गर्भित अर्थ असलेली कॉमेंट टाकून मज्जा बघतो. माझा कंटेंट कसा वेगळा आहे किंवा ग्रेट मेन थिंक अलाईक या चर्चेवर दोन दिवस आरामात निघू शकतात.

दुष्टंचक्रं आहे सगळं. हेरोइनची सुई एकदा टोचून घेतली की नंतर तरणोपाय नाही तसं होतं. एखादी संस्कृती नैसर्गिक कोपात जशी पृथ्वीच्या उदरात गडप होते (कालांतराने निरुद्योगी लोक ती खणून काढतात आणि वर्तमानात मुलांचा पुस्तकी इतिहास अवघड करतात) तसं जर उद्या फेबू बंद पडलं तर ही काव्यंसंस्कृती किंवा विकृती गडप होईल अशी मला भीती वाटते. एक धंदा बुडाला म्हणून माणूस अजून दुसरा धंदा करतो तसं दुसरं काहीतरी मिळेलच पण या लाईक, कॉमेंटच्या संख्येची झालेली सवय मोठी अवघड आहे लवकर सुटायला. पिंड ठेऊन कावळ्याची वाट बघतात तसे लोक पोस्टून वाट बघतात कुणी त्याला शिवण्याची, त्याची मोजदाद ठेवतात. सगळेच वाईट, टुकार आहेत असं अजिबात नाही. जे चांगले आहेत ते टिकतीलच. पण बदकांची संख्या वाढली की हंस एकटा पडतो तसं झालंय. वाचणारा पण राजहंस हवा, नीर वगळून क्षीर कुठलं ते त्याला समजायला हवं. फेबू म्हणजे वर्तमानपत्रं, उद्या शिळं होणारं. पाठोपाठ डिलीव्ह-या झाल्या की मूल अशक्तं होतं हा निसर्गनियम प्रतिभेला पण लागू आहे. अपवाद असणारच पण अपवाद विरळ असतो म्हणून तो अपवाद.

पद्य असो वा गद्य आतून आलं पाहिजे. मुद्दाम टोक करून टुचुक केलेलं वेगळं आणि अनपेक्षित काही टोचल्यावर जे लागतं यात फरक आहे. भावना कुठलीही असो, वेदना, आनंद, दु:खं, राग ती सहजतेने भिडली पाहिजे. आव न आणता लिहिलं की जमतं. लिहिणा-याचं नाव विस्मृतीत गेलं तरी लिहिलेलं 'अक्षर' पाहिजे, 'अ-क्षर' म्हणजे ज्याचा क्षय किंवा नाश होत नाही ते. शेकड्यात मोजल्या जाणा-या वर्षांपूर्वीचे ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, मोरोपंत टिकून का राहिले? कुठलाही आव नाही, या मनातलं त्या मनात पोचेल, समजेल, पटेल इतक्या सोप्या भाषेत आणि मुळात उपजत लय, गेयता असलेलं त्यांनी लिहिलं म्हणून. शांता शेळके, इंदिरा संत, अनिल, बी, पाडगांवकर, विंदा, बोरकर, कुसुमाग्रज नाव विस्मृतीत जातील कदाचित पण कुठेतरी त्यांनी लिहिलेलं 'अ-क्षर'टिकून राहील.

जाऊन अठ्ठेचाळीस वर्ष झालेल्या तुकडोजी महाराजांची 'राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली' सारखं सोप्पं, 'अक्षर' कुणी लिहिलं आत्ता तर या झुक्याच्या पुस्तकाचा उपयोग होईल नाहीतर डंपिंग ग्राउंड आणि यात फरक तो काय राहील?

जयंत विद्वांस

No comments:

Post a Comment