Wednesday 22 June 2016

यमन...

आर.बी.आय.ची रेपोरेट, व्याजदर पॉलिसी, जीडीपी, अर्थसंकल्प या आर्थिक बाबी, ब्रिज, पोकर, गोल्फ, बेसबॉल, स्क्वॅश हे खेळ, राग, शास्त्रीयसंगीत, आपलं परराष्ट्रधोरण, फिजिक्स, वाद्यंवादन, एफबीवरच्या अनेक दुर्बोध कवितांमधले अर्थ, स्वतः:च्या पोस्टला स्वतःच लाईक करण्यातलं लॉजिक आणि इतर एकूणच ब-याच बाबीतलं मला फार कळत नाही. त्यातलं माझं ज्ञान अनेक वर्ष एकाच म्हणजे अतिशय खालच्या पातळीवर आहे. तरीही मला न्यूनगंड येत नाही कारण प्रत्येक गोष्टं प्रत्येकाला कशी येईल असं कुठेतरी वाचलं होतं मी. त्यामुळे तरीपण मी त्यावर बोलतो हा निव्वळ आगाऊपणा किंवा अतिशहाणपणा आहे असं माझं स्वतः:चं ठाम मत आहे. माझ्यापेक्षा कमी माहिती असलेला माणूस मला बरा पडतो अशावेळी. त्याच्या नजरेत कौतुक दिसलं की अगदी 'याचीसाठी केला होता अट्टाहास' अशी भावना होते. परवा भैरवीवर लिहिलं तेंव्हा माझं पितळ उघडं पाडण्यासाठी असेल पण कुणीतरी म्हणालं, 'इथे थांबू नका, येऊ दे अजून'. :P 

मला आवडलेलं गाणं महत्वाचं, ते अमुक एक रागात आहे असा माझा समज किंवा गैरसमज असला म्हणून त्याची गोडी काही कमी होत नाही, फार तर फार मी कसं आत्मविश्वासाने चुकीचं बोलतोय एवढंच सिद्ध होईल त्यातून. तर माझा दुसरा आणि शेवटचा आवडता राग म्हणजे यमन आणि त्याचा भाऊ यमनकल्याण. आयत्यावेळी घरी पाहुणे आलेत, भाजी आणायला जायला वेळ नाही, सुगरण बाई काय करते? तर ती बटाट्याची भाजी करते. तसा यमन आणि यमनकल्याण हा बटाटा आहे. एक संगीतकार म्हणाला होता, 'चाल सुचत नाहीये, वेळ कमी आहे पण चाल तर सुरेल हवीये मग 'यमन' घ्या. सोप्प्या, सहज गुणगुणता येतील अशा सुरेल चाली त्यात आपोआप होतील'. एक संगीतकार म्हणाला होता, 'सात तर सूर आहेत, किती चाली कराल? कुठल्या स्वरानंतर कुठला घेता, तिथे किती थांबता, कुठला सोडता, कुठला वेगळा पकडता यावर तुमच्या चालीचं वेगळेपण ठरतं'. एकाच रागातल्या अनेक गाण्यांमध्ये काही गाणी एकसारखी वाटू शकतात, त्यात गैर काही नाही पण सतत तेच करत राहणं गैर आहे. अर्थात सोन्यापेक्षा पितळ काहीवेळा चमकूनही जातं.

इन्स्पिरेशन घेणं आणि जसंच्या तसं उचलणं यात फरक आहे. १९६४ च्या 'मि.एक्स इन बॉंबे' मधलं 'खूबसूरत हसीना' 'एल.पी.'चं होतं आणि १९९३ च्या 'बाजीगर'मधलं 'ऐ मेरे हमसफर', हे इन्स्पिरेशन नाही (अन्नू मलिक - बेस्ट म्युझिक डायरेक्टर - फिल्मफेअर होतं) कारण स्वतः:अन्नूच्या सुरेल चाली अमाप नाहीत म्हणून. इन्स्पिरेशन म्हणजे काय? एस.डी.नी 'ठंडी हवाए, लहराके आये' केलं यमनमध्ये (नौजवान - १९५१) मग १९६४ च्या 'आपकी परछाईयाँ'' मधे मदनमोहननी यमन मधे 'यही है तमन्ना' केलं. मग एस.डी.ला रीतसर रोशननी ती चाल घेऊ का विचारलं, तो ही घे म्हणाला मग त्यानी त्याच चालीत 'रहे ना रहे हम' (ममता - १९६६) केलं. त्यावर  पुढे मग आरडीनी त्यात 'सागर किनारे दिल ये पुकारे' (सागर - १९८५) बसवलं. तसंही राजेश रोशन कशाला परवानगी घेईल कुणाची, त्याच्या पण वडिलांचं गाणं होतं की मग त्यानी पण 'घरसे निकलतेही' (पापा कहते है - १९९६) उरकून घेतलं यमनात. 

काहीवेळेस मला वाटतं जुन्या चाली जरा घासूनपुसून नव्याने यायला हव्यात. तेंव्हाची जरा बोजड भाषा, गायक नसलेल्या माणसांचे आवाज, तांत्रिक मागासलेपण यामुळे कितीतरी सुंदर चाली अज्ञात आहेत त्या तुकारामाच्या गाथेसारख्या जाणकार माणसांनी वर काढून ब्रासो लावून चमकवायला हव्यात. काळाचा गंज निघून गेला की कशा उन्हात चमकणा-या पितळी कळसांसारख्या मान वर करून उभ्या रहातील. याचा अर्थ नविन वाईट आहे सगळं असं नाही. पण मेलडी अस्तंगत झालीये. ठेका महत्वाचा ठरतोय, शब्दं अर्थवाही नाहीत. चाल कशी पाण्याच्या धारेसारखी हवी. सतत, सलग, ओघ असलेली. सैगलची काही मोजकी गाणी मी ऐकलीयेत, जी मला आवडतात. त्याची कित्त्येक गाणी मला माहीत नाहीत. त्या चाली नव्या रूपात बाहेर येऊ शकतात. 'मैं क्या जानू क्या जादू है', 'नुक्तंची है गमेदिल', 'दो नैना मतवारे तिहारे' ही त्याची गाणी यमन रागात आहेत हे समजल्यावर मला या रागाचं काहीतरी गवसल्यासारखं झालं. कुठलीही मात्रा, काना, अनुस्वार, रफार, वेलांटी, उकार नसलेला यमन हा अत्यंत सरळमार्गी राग आहे. राहुल द्रविड आणि यमन यात साम्य आहे मग. सरळमार्गी, प्रथमदर्शनी चित्ताकर्षक नाही वाटणार पण काहीतरी जादू आहे त्यांच्यात एवढं खरं. ग्लॉसी नसेल काही त्यांच्यात पण मॅट फिनिशमध्ये पण एक रॉयल टच असतो तसे आहेत दोन्ही.  

किशोरची संथ गाणी घ्या ही - 'आपके अनुरोधपे', 'इस मोडसे जाते है', 'हजार राहे मुडके देखी', 'जिंदगी का सफर', 'सवेरे का सूरज' आणि 'वो शाम कुछ अजीब थी'. सगळी यमन. धबधबा आकर्षक असतो, तिथे गर्दी होतेच (कुणी उंचावरून पडतंय म्हटलं की आपल्याला आनंद होतो त्याचं मूळ इथे असावं का? :) ) पण संथ लयीत वहाणारी नदी सुद्धा तालबद्ध असते, खळखळाट नसेल फार पण एक उपजत लय असते तसा हा राग आहे. सगळे शुद्ध स्वर आणि मधे दगड आल्यावर प्रवाह जरा वळसा घेतो तसा तीव्र मध्यम. बाकी चालीत तीव्रता डोकावणार नाही ती. आर्ट फिल्म मधे काहीवेळा एक जीवघेणा संथपणा असतो, काहीच घडत नाही पण ते अंगावर येतं तसं त्या 'वो शाम कुछ अजीब थी'ला होतं. जुने संगीतकार विचार करत असणार, चाल देताना. अर्थ, चित्रपटातला प्रसंग, मूड असं सगळं बघून राग निवडत असावेत का? 'सवेरे का सूरज' एक असंच गाणं आहे त्याचं. 'इस मोडसे जाते है' मधे 'कुछ सुस्त कदम रस्ते' ऐकताना पण एक वातावरणातली शांतता अनुभवायला येते. त्यात राहे आणि रस्ते असे दोन शब्दं का असावेत? रस्ता शब्दात डांबरीपण आहे आणि राहे मधे एक पायवाटेचा, मातीचा फील वाटत आलाय मला कायम. 'एक राह तो वो होगी, तुम तक जो पहुचती है'.   

शुद्ध 'म' घेतलात की त्याला 'यमनकल्याण' म्हणायचं. 'यमनकल्याण'मधली ही गाणी काही फार वेगळी नाहीयेत - 'जिया ले गयो रे', 'चंदनसा बदन', 'रसिक बलमा', 'एक प्यार का नगमा है', 'जिंदगीभर नही भुलेगी', 'जब दीप जले आना', 'प्रिय प्राणेश्वरी', 'जहां डाल डालपर', 'ढलती जाये रात', 'जरासी आहट होती है', 'बीती ना बिताई रैना', 'मैं जिंदगीका साथ निभाता चला गया', 'सारंगा तेरी यादमें'. 'जिया ले गयो रे मोरा सावरिया' तर अगदी बांधून ठेवतं ऐकताना. 'चंदनसा बदन'तर नूतन एवढंच सोज्वळ आणि शांत आहे. पेटी किंवा सिंथेसायझर शिकताना सुरवात करायला 'एक प्यार का नगमा है' एकदम सोप्पं गाणं आहे. 'सा रे ग, ग म प, मम ग' हे त्याचं नोटेशन झालं. पण दोन स्वरांमध्ये पूल बांधल्यासारखं जोडून वाजवता आलं पाहिजे तर त्या पुस्तकी ज्ञानाचा उपयोग. नुसते वादी संवादी स्वर, आरोह अवरोह कळले म्हणजे राग समजतो असं नाही.    

'पाकिजा'चं यश पहाणं संगीतकार गुलाम महंमद आणि मीनाकुमारीच्या नशिबात नव्हतं. दारिद्र्यात गेला तो. नौशादचा कित्त्येक वर्ष तो असिस्टंट होता. तो गेल्यावर नौशादनी पूर्ण केला पाकिजा. 'इन्ही लोगोने' आणि 'मौसम है आशिकाना' ही कालातीत गाणी यमनमध्ये आहेत. 'इन्ही लोगोने'चा तबला कुणी वाजवलाय माहीत नाही पण अजून लक्षात राहिलेले दोन म्हणजे 'शोले'चा पाठलाग आणि 'मेरी सुरत तेरी आँखे'च्या 'नाचे मन मोरा मगन धिक धा धिगी धिगी'चा सामताप्रसादांनी वाजवलेला. शब्दं सापडत नाहीत त्या ठेक्याचं वर्णन करायला. लहान मूल जसं आपण त्याला त्रास होणार नाही पण आनंद मिळेल अस खेळवतो ना तसा ठेका आहे तो, शब्दांना इजा न होईल याची काळजी घेणारा आणि रूळ जसे समांतर एकसारखे पळतात तसा सोबत चालणारा. आई जसं कौतुकाने मुलाकडे बघते ना तसा ठेका आहे 'इन्ही लोगोने'चा. तळहाताच्या फोडाप्रमाणे शब्दांना, चालीला जपणारा, उठाव आणणारा आणि वेगळं अस्तित्व असलेलाही. 'मौसम है आशिकाना'च्या ओळी म्हणजे तर बोलायलाच नको (कैफी आझमी). विरोधाभास, वैषम्य काय तलम शब्दात आलंय. 'बेखाब मेरी आँखे, मदहोश है जमाना'. काळजाला चीर पडेल असं आक्रन्दून पण दु:खं सांगता येतं आणि नि:शब्द करेल असंही सांगता येतं. शल्यं, बोच, सल हळुवारपणे सांगणारा राग आहे हा.      

मुकेशचा आवाज आधीच उदासवाणा होता. सानुनासिक, वर फाटणारा अशी वैगुण्यं असलेला आवाज असून सुद्धा त्याची गाणी मात्रं हृदयाला हात घालणारी होती. 'आंसू भरी है', 'कभी कभी मेरे दिलमें', 'भुली हुई यादों' आणि कदाचित 'तुम्हे जिंदगीके उजाले मुबारक' हे गाणी यमन मधली आहेत. 'न जाओ सैय्या', 'एहसान तेरा होगा', 'वो जब याद आये', 'ये दुनिया अगर मिल भी जाये', 'रंजीश ही सही', 'बडा दुख दिना तेरे लखन'ने ही पण यमन मधलीच आहेत. कुठलाही गोंगाट नाही, धावपळ नाही. वेदनेचं, आर्ततेचं शांत लयीतलं कथाकथन आहे हे. 'बाई मी विकत घेतला श्याम', 'निंबोणीच्या झाडामागे', सांज ये गोकुळी' ही पण त्यातलीच गाणी आहेत. दिवसात कधीही म्हणता येईल असा पण सहसा संध्याकाळी गायला जाणारा हा राग आहे. सांजेची कातरता उतरत असेल का त्या स्वररचनेत? की म्हणूनच तो संध्याकाळी म्हणतात? शास्त्रं असावंच काहीतरी. खूप विचार करूनच या रागांचे गायनसमय ठरवले असावेत. एरवी गायले तर आनंद मिळेलंच पण कार्तिकी आणि आषाढीला जसं एक वेगळेपण जाणवतं एकादशीचं तसं काहीसं असावं.

आशा भोसले या बाईबद्दल मला कायम अचंबा वाटत आलेला आहे. त्यांची दोन यमन मधली गाणी मी मुद्दाम शेवटी ठेवलीयेत. १९६३ चा रोशननी रोशन केलेलला 'दिलं ही तो है' काही मी पाहिलेला नाही पण त्यातली 'भुलेसे मोहब्बत कर बैठा', 'तुम अगर मुझको न चाहो, 'लागा चुनरीमे दाग आणि ' निगाहे मिलानेको जी चाहता है' ही सदाबहार गाणी मला आवडतात. तेंव्हाची निर्मला नागपाल उर्फ आताची सरोज खान तेरा वर्षाची होती या गाण्यात ग्रुपमधे. साहिरनी लिहिलेल्या या गाण्याची सुरवातीपासून ते शेवटपर्यंत एक खटकेबाज सफर आहे. 'जिस घडी मेरी निगाहोको तेरी दीद हुई' पासून 'वो जलवा जो ओझल भी है सामने भी, वो जलवा चुरानेको दिल चाहता है' पर्यंत नुसते रोमांच आहेत. ती फार डांबरट लोकं होती. रिपीट व्हॅल्यू येण्यासाठी सगळ्या चांगल्या गोष्टी एकत्रं दाखवायच्या आणि माणसाला हे बघू की ते बघू की ऐकू असं संभ्रमात पाडून परत परत यायला भाग पाडायचं. शेलाटी नूतन काय अप्रतिम दिसते या गाण्यात, तिचे हावभाव, तो सोज्वळपणा, ते निरागस सौंदर्य, परफेकट लीप मूव्हमेंट्स हे बघेपर्यंत गाणं संपतं. मग आशाचा आवाज कधी ऐकायचा आम्ही? परत बघणं आलं ना म्हणजे. ' बरसात की रात'चं 'ना तो कारवां की तलाश है' पण आशा, रोशनचंच होतं.   

तिचं दुसरं यमन मधलं अफाट गाणं म्हणजे १९६६च्या शैलेंद्रला रस्त्यावर आणणा-या 'तिसरी कसम' मधलं शैलेंद्र आणि शंकर जयकिशनचं 'पान खाओ सैंय्या हमारो'. 'बुगडी माझी सांडली गं' मधलं 'हाये' आणि या गाण्यामध्ये ते 'सांवली सुरतीया'च्या आधीचं 'ओय होय' आणि 'मलमल का कुर्ता'च्या आधीचं 'हाय हाय' आणि मधे ते हसणं. हे गाण्याच्या क्लासमधे शिकवत नाही, शिकता येत नाही. तो पिसारा वरूनच येताना घेऊन यावा लागतो. गरिबाघरी कार्य निघालं की श्रीमंत माणसं लागले चार पैसे तर असावेत म्हणून तयारीने जातात तसं भोसलेबाई करतात. 'तुमची मुलगी आहेच सुंदर पण मी येताना ठुशी आणलीये तिच्यासाठी, ती पण घाला, बघा किती सुंदर दिसते अजून' असं कुणी मोठ्या मनाने म्हटल्यासारखं स्वबुद्धीने स्वतःची हिरे माणकं त्यात जडवतात. भरून येतं. शब्दं तुटपुंजे ठरतात कौतुकाला. किती छान क्षण जगले ते वादक, गीतकार, संगीतकार. इतिहास असा घडताना त्याचा एक भाग असणं हे भाग्याचं लक्षण. आशा भोसलेला वय आहे, वर्ष नाहीत. काय खट्याळपणा आहे त्या बाईच्या स्वरातच. त्या गाण्यामधल्या तलवारीसारख्या धारधार ताना नायगारासारख्या आहेत. अशा कोसळतात की आ किंवा कान वासून ऐकत रहाव्यात फक्तं. सेहवाग, अमिताभ आणि आशा यात साम्यं काय तर 'वन मॅन शो' सगळा. बाईच्या गाण्यात फेरारीचा स्पीड आहे.

यात इतर उल्लेख केले त्यातलं एखादं गाणं असेलही यमनमध्ये, माहीत नाही. त्या अज्ञानचं मला दु:खंही नाही. अज्ञानात सुख असतं. ती गाणी ऐकून मला सुख मिळालं एवढं खरं. सगळी माणसं सारखी म्हटली तरी शेवटी वैकुंठात गोत्रं लागतंच. त्याप्रमाणे ही काही सगोत्री गाणी मला सापडली. एखादं नसेलही त्यातलं, काय फरक पडतो. भैरवी आणि यमन हे दोन राग मात्रं मला प्रिय झाले त्याचं कारण त्याच्या सुरावटीत दडलं असेल. बाकीचे कळत नाहीत फार. राग सगळेच चांगले. धानी आणि सलगवरळी ही रागांची नावं आहेत हे कुठे माहिती होतं पण त्याच्यातलं म्हणून दोन वेगळ्या चालीतलं 'घेई छंद मकरंद' ऐकताना कुठे काय अडतंय. चार ज्ञानी माणसं लिहितात ते वाचून लक्षात राहिलं की काहीतरी समजल्याचा आनंद होतो. गाणी सुंदर मुलीसारखी असतात. कुणाची, कॉलेज कुठलं, कुठे रहाते कळलं म्हणजे तेवढंच एक पाऊल पुढे पडल्यासारखं वाटतं एवढंच. :)

जयंत विद्वांस

No comments:

Post a Comment