Tuesday 7 June 2016

आठवतं? (३)...

आभाळ दाटून आलेलं. पाच वाजताच सातचा अंधार. नेहमीप्रमाणे किलोमीटरभर चालत एक चक्कर मग पूनमला कॉफी पित सातला अच्छा करायचं, सगळं नेहमीप्रमाणेच. हातात हात, बोटात बोटं, झाडाचा आडोसा, नकळत झाल्यासारखे वाटणारे मुद्दाम स्पर्श असल्या गोष्टींची गरज नव्हतीच कधी. हलक्या आकाशी रंगाची फुलं असलेला चिकनचा ड्रेस आणि गडद निळी ओढणी. जातीच्या सुंदराला काहीही शोभूनच दिसतं. शुभकार्यात आंब्याच्या डहाळीनी पाणी शिंपडतात तसे मधूनच पडणारे पावसाचे टपोरे थेंब.

'छत्री नाही का आणायचीस, दुपारपासूनच भरून आलेलं, भिजशील उगाच'. 'हं, भिजू दे, मोड नाही येत एवढ्या पावसानी'. पाऊस मोठा नाहीच आला. थोडेसे वाळायला शिल्लक असलेले कपडे दमट असतात तेवढे ओले झालेले कपडे फक्तं. चपलांनी पोटरीवर काढलेली तांबूस चिखलाची हलकीशी खडी, केसांवर मोत्यासारखे तरंगणारे पाण्याचे फुगे, नेमक्या जागी भिजून चिकटलेला ड्रेस आणि चिमटीत धरून त्याला पुढे ओढायची धडपड. चालताना कधी नव्हे तो कोपरापाशी धरलेला हात, चालताना होणारा तो लोण्यासारखा मऊ स्पर्श.

कॉफी पित ओल्या कपड्यांनी खुर्च्यात ते अस्वस्थ बसणं आणि बाहेर कोसळणा-या पावसाकडे दुर्लक्ष करत एकमेकांकडे एकांत मिटावा असं बघणं. 'भिजूयात?' 'नको, तुझ्या नाकाचा वॉशर लगेच जातो'. 'पावसात काय कळणारे काय गळतय ते ;) ?' :) . 'सात वाजले रे, अंधार खूप वाटतोय, निघूयात?' 'हो, कशी जाणारेस, बस? भिजशील स्टॉपपासून घरापर्यंत. प्राण्यांना आधी कळतं, तुला कसं नाही समजलं पाऊस येईल, छत्री न्यावी ते?'  'आला मोठा शहाणा, नीट जा, गाडी हळू चालव, हिरोगिरी नको, मला सोड की आज, काही नाही होत, पावसामुळे उशीर झाला सांग'. 'बरं, चल कमी झालाय'.

भुरभुरत्या पावसात लूनावर मागून ते घट्ट धरून बसणं, पाठीला कळणारे ते ह्रदयाचे ठोके आणि मानेला जाणवणारे ते ओले गरम श्वास. पटकन संपला असं वाटणारा तो लांबलेला प्रवास. घराच्या कोप-यावर उतरताना मानेवर उमटलेली ती मधाळ खूण. कुणाला असं सोडून एकटं परत येताना जीव होत नाही खरंतर.

'नीट जा, बाय'. एवढं म्हणून ती खट्याळ हसली आणि पर्समधून फोल्डिंग छत्री काढून खट्टकन बटन दाबून तिनी खांद्यावर छत्री धरली आणि म्हणाली, 'मठ्ठ, म्हणे छत्री नाही का आणायचीस?

आठवतं? 

जयंत विद्वांस

No comments:

Post a Comment