Tuesday 7 June 2016

संडे सिनीअर लीग…

मिहिर भागवत, मयुरेश बुधकर, केतन तेरेदेसाई, मनोज गद्रे, मनोज गोडबोले, विनायक लिमये, नरेंद्र बापट, अविनाश रहाळकर, नितीन करमरकर, नितीन अंमलदार, चंद्रकांत खिरीड, रविंद्र उटगीकर, प्रशांत शिरोडकर, रोहित दणाणे, सुशांत पाटील, अक्षय चिपरीकर, समीर व्होरा, केदार जोगळेकर, मिलिंद धाडगे, सचिन साबणे, प्रविण देवधर, अजय मराठे, जयंत विद्वांस - आयपीएल किंवा दौ-याआधी सराव संघ निवडावा तशी ही यादी आहे. यादीतल्या नावांवरून फार सभ्य लोकं क्रिकेट खेळतात असा समज होण्याची दाट शक्यता आहे पण मैदानावर उपस्थित असणारे लोक असा समज करून घेणा-या माणसाला भिंतीशी मान दाबून मारहाण करतील अशी परिस्थिती आहे. संघ निवडताना तो समतोल असावा वगैरे प्रकार इथे दोन तीन मुद्द्यांवर संपतो. एक भांडखोर, नविन नियम जुनेच आहेत असं सांगून लादणारा, एक प्लान आखणारा, एक पिंच हिटर आणि एक खांदा निखळला तरी चालेल पण आरोप झटकून टाकावा तसा, चेंडू फलंदाजाला दिसेल की काय अशा भीतीनी जोरात टाकणारा चेंडूफेक्या हवा, संपली टीमची निवड.  
मनोज गोडबोले, डॉ.विनायक लिमये, प्रशांत शिरोडकर - यांची निवड कुठल्याही संघात केली तरी बिचा-यांची तक्रार नसते. सुंदरतेला दृष्टं लागू नये म्हणून तीट लावावी तसा प्रशांत एकदा आल्या आल्या पडून घेतो. चरणसिंघ, चंद्रशेखर यांचं सरकार जसं कधीही कोसळू शकेल असं वाटायचं तसा प्रशांत कधीही पडू शकतो. शनिवार घातवार असल्यामुळे असं होत असावं. पुण्यात काश्मीरपेक्षा जास्ती बर्फ शनिवारी रात्री ग्लासात पडतो म्हणे आणि बर्फावरून पाय घसरतोच. मनोज गोडबोले हे 'गली'तले (गल्लीतले कोण म्हणालं रे) नामवंत क्षेत्ररक्षक आहेत. उंची, जागचा हलायला लागणारा वेळ यामुळे त्यांना हातात आलेला चेंडू झेल म्हणून पकडणं क्रमप्राप्त होतं, उगाच सुटला तर आपल्यालाच पळावं लागेल किंवा नंतर आपल्यालाच फलंदाजी करायची आहे असे सुप्तं हेतूही त्यामागे असू शकतात. विनायक लिमये धुमकेतू आहेत. कधी सलग तर कधी आफ्रिदीसारखी  निवृत्ती मागे घेऊन पुनरागमन केल्यासारखे येतात. केक आणलेल्या दिवशीची त्यांची फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अजून लोक विसरलेले नाहीत. त्यांनी परत फॉर्ममध्ये येण्यासाठी हा खर्चिक उपाय करून पहायला हरकत नाही. पहिल्या चेंडूवर बाद केल्यास, गोलंदाजी दिल्यास ते दोन रविवार येत नाहीत असा अभ्यासपूर्ण निष्कर्ष आहे.    

रोहित दणाणे, सुशांत पाटील, अक्षय चिपरीकर - ही सगळी यंग ब्रिगेड आहे. गगनचुंबी षटकार, घणाघाती चौकार, फसवी गोलंदाजी, चपळ क्षेत्ररक्षण आणि बिन ब्रेकच्या गाडीसारखा सुसाट थ्रो हे एवढं सगळं एकटा रोहित करतो. प्रविण आणि त्याची ताटातूट केल्याशिवाय सामना तुल्यबळ होत नाही. सुशांत आणि अक्षयला रोहित दम देत असावा, 'याद राखा माझ्यापेक्षा चांगलं खेळाल तर'. ते दोघे बिचारे दबलेले दिसतात त्याच्यापुढे. अलीकडे गोलंदाजांनी त्याला स्वस्तात काढलाय असं कानावर आलंय याचा अर्थ गोलंदाजीत सुधारणा झालीये की त्याचा फॉर्म गेलाय हा चर्चेचा विषय होऊ शकतो. त्यानी घेतलेल्या झेलांमुळे त्याला दोन झेल प्रतिदिन असं बंधन घालण्याची मागणी वारंवार पुढे येत आहे. तो आउट झाल्यावर प्रतिपक्षात अमेठीची सीट जिंकल्यासारखा आनंद होतो याचा अर्थ तो सरस खेळतो असा आहे
प्रविण देवधर, मिलिंद धाडगे - इमारती पडल्यात पण कधीकाळी भरभराट होती अशी जाणीव अधूनमधून होते. मिलिंद धाडगे आता इतिहासाचं पुस्तक झालंय. त्याला पाय दिसत नाहीत असा घेर वाढलाय. एकेकाळी दमदार फलंदाजी करायचा, अचूक गोलंदाजी टाकायचा या सांगण्याच्या गोष्टी झाल्या आता. पण तरीही तो हौसेने येतो. येताना ब्रेकफास्ट आणतो. मैदानावर जाण्यात पण खेळल्याचा फील आहे बहुतेक. त्यानी लवकरात लवकर फीट होऊन घणाघात चालू केल्यास अजून सामने रंगतदार होतील. प्रविण यायचाय अजून खेळायला हा विश्वास असतो. तो बोलला की त्याची पुढची बाजू कुठली हे कळतं. -या अर्थानी तो ऑलराउंड आहे पण षटकार मारताना यातलं काही आड येत नाही. रन्स पळून काढून कशाला दमा त्यामुळे तो शॉर्टकट वापरतो. फसवे, हळुवार ऑफस्पिन पण तो टाकतो. उंच, अशक्यं झेल घेतो पण पंचवीस यार्ड पळत जाऊन झेल वगैरे स्वप्नं पण पडू शकत नाही त्याला. चेष्टेचा भाग सोडून देऊ पण दोघेही नैसर्गिक तडाखेबंद फलंदाज आहेत हे नक्की. त्यांनी फिट होऊन अजून रंगत आणावी अशी इच्छा आहे
कुणाच्या अध्यात मध्यात अशी एक जमात असते त्यात केदार जोगळेकर, आनंद कुलकर्णी, मयुरेश बुधकर, समीर व्होरा, सचिन साबणे, अविनाश रहाळकर हे लोक मोडतात. कुठलेही वाद नाहीत, चिडचिड नाही. निमूटपणे खेळतात. अविनाशचं गणित चांगलं आहे हा मुद्दा नाही, बाकीच्यांचं पण चांगलं आहे पण तो सभ्य असल्यामुळे स्कोअर, चेंडू, ओव्हर्स बरोबर मोजले जातात. त्यानी सांगितलं की बात खतम. अजय मराठे यांची बोटं मोजताना चुकतात, तो मुद्दाम करत नाही, होतं तसं. पहिलीपासून त्याचा हा प्रॉब्लेम आहे असं ऐकिवात आहे. केजरीवालसारखा तो दोनच्या फरकानी फक्तं सम विषम धावसंख्या मोजत असावा. केदार सगळ्यात जास्ती टीकास्त्र अंगावर घेणारा माणूस आहे. मोडेन पण वाकणार नाही हा त्याचा बाणा शारीरिक नाईलाजानी आहे. अधून मधून तो नेहरू स्टेडीअमवर कोचिंग क्लासमध्ये लहानपणी मारलेला कव्हर ड्राईव्ह आठवल्यासारखा मारतो. आकाश, दत्ता मोरे हे पाहुणे कलाकार आहेत. हयातीचा दाखला द्यायला ते अधून मधून येतात

मिहिर भागवत, नितीन करमरकर सभ्य आहेत? हा प्रश्नं केवळ होकारार्थी उत्तर यावं अशा हेतूनीच विचारलेला आहे. मिहिर आहे पण तो एकटा पडला तर. स्वत:च्या जीवावर निवडून आलेले आमदार, खासदार जसे उपद्रव मूल्य बाळगून असतात तसा तो आहे. त्याला युती लागते. सहसा अंमलदार आणि रवि असला तर त्याला बहर येतो. लहानपणी राज्यं आल्यावर घरात गेलं की यायचंच नाही हा त्याचा स्वभाव बदलला आहे असं कानावर आलंय पण घरात गेलेले चेंडू सापडत नाही म्हणायचं आणि सापडल्यावर परत द्यायचेच नाहीत हे अजून चालूच आहे म्हणे. नितीन करमरकर फ्रीलान्स क्रिकेटर आहेत. ते मनात आलं की अंपायर, स्लीप फिल्डर, गोलंदाज, लगेच आउट होण्याची खात्री असलेला फलंदाज अशी कुठलीही भूमिका स्विकारतात. शक्यतो ते सगळ्यांना मान्य आहे असं त्यांचं ते गृहीत धरतात. अतिशय निष्पाप चेह-यानी ते उपहासात्मक बोलतात. किमान शब्दात कमाल अपमान करू शकतात. चुकून झालेला रनआउट, एखादा हातात बसलेला झेल वगैरे घेतला की चेहरा बघावा, साधारण दोन रविवार तरी ते ऐकावं लागतं, बाकी माणूस चांगला आहे. वापरला नाही तर आंबेल अशा भीतीनी त्यानी स्प्रे संपवला. एका ओव्हर नंतर फवारणी परवडत नाही संघाला पण त्याला तरी कोण खेळायला घेणार या वयात म्हणून कुणी बोलत नाही.     

केतन तेरेदेसाई, डॉ.मनोज गद्रे मैदानावर असल्यामुळे त्यांना ते क्रिकेट खेळतात असं म्हणायला हरकत नाही. राहूल द्रविड ही भारतीय क्रिकेटची ' वॉल' असेल तर केतन इज ' वॉल' फॉर अस. कुठेच फिल्डिंग चांगली करत नाही म्हणून तो विकेटकीपर रहातो. कुठलाही चेंडू अडवायची, झेल घ्यायची पद्धत त्याच्याकडे नाही, त्याला चेंडू लागला की अडतोच. त्याच्या पुढ्यात पडलेल्या चेंडूवर सिंगल चोरावी लागत नाही, चालत चालत होते. रागापोटी त्याला लांब ठेवलात तर तिथे चार जातात म्हणून त्याची प्राणप्रतिष्ठा परत पहिल्या जागी करावी लागते. तयार रहाणे, थ्रो/बॉल कलेक्ट करणे, फलंदाज क्रीजच्या आत यायच्या आधी स्टंप उडवणे वगैरे क्रिया सलग करायला त्याला आवडत नाहीत. त्यानी स्टंपिंग केलं तर तो क्रीडादिन म्हणून साजरा करावा लागेल. डॉ.मनोज गद्रे वडीलधा-या माणसासारखे पोरं उपाशीपोटी खेळत नाहीत नाही याची काळजी घेतात. त्यांच्या हिंदी डायलॉग शिवाय ब्रेकफास्ट येऊ शकत नाही. अंपायर म्हणून करिअरला सुरवात करायचं त्यांच्या मनात होतं पण आक्रमक खेळाडूंच्या दडपणाला ते बळी पडल्यामुळे तो विचार सध्या त्यांनी लांबणीवर टाकलेला आहे
नितीन अंमलदार, चंद्रकांत खिरीड - ही जोडगोळी आता वयोमानामुळे खेळण्यापेक्षा बोलणं जास्ती करते. तिरंदाज खिरीड म्हणून ते ओळखले जातात. साठी गाठलेला हा तरुण माणूस लगोरी खेळतो. त्याचे दात ओठ खाल्लेला चेहरा बघून फलंदाज मागे सरकतो. गोट्या आणि गोलंदाजी यात काहीही फरक नाही. पण त्याची कुणीही केलेली चेष्टा तो हसतमुखाने स्विकारतो हा त्याचा मोठेपणा आहे. बेनिफिट सामन्यात टाकतात तशी एखादी ओव्हर तो टाकतोही. नितीन अंमलदार वेळेत उपस्थित रहातात, काळजीनी येतात, अनुपस्थिती नसतेच जवळपास इतक्या ओढीनी ते येतात. त्यांनी ठोकलेले स्टंप हे सरळ रेषेतच असतात बाकी सगळे तिरळे आहेत, सगळ्यांना आवर्जून रविवारी यायची आठवण करतात, चेंडू कुठला आणायचा वगैरे प्लानिंगचा पार्ट त्यांच्याकडे असतो. स्वत:ला सोयीस्कर नियम बनविणे, मागे आपण अशाच प्रसंगात काय बोललो होतो त्याचं त्यांना विस्मरण होतं, आत्ता ते कुठल्या पार्टीत आहेत त्यावर ते अवलंबून असतं. खांदा आणि गुडघा अशा त्यांच्या दोन्ही ठिकाणच्या हिंजेस कुरकुर करत आहेत पण ते येतात. घरी सराव करतात आणि लवकर आउट होतात अशी बातमी
नरेंद्र बापट, रविंद्र उटगीकर - दोघंही शक्यतो विरुद्ध पार्टीत असण्याची काळजी घेतात नाहीतर रविवार सुना सुना बेचव जातो. म्याच रिपोर्ट नंतर निम्मं शाब्दिक युद्धं यांचच असतं. मराठीत ज्याला कुजकं पण साहित्यिक भाषेत ज्याला उपहासात्मक असं म्हटलं जातं त्या भाषेचे शब्दंकोष दोघं मिळून लीलया लिहू शकतात. नंदूकडे पेट्रोल पंप आहे. ठिबक सिंचन पद्धतीवर त्याचा शेतक-यापेक्षा जास्ती विश्वास आहे. मुळापाशी थेंब थेंब पेट्रोल टाकण्याचा उद्योग तो थकता करतो. तो फिल्डिंगला कुठेही असला तरी कुणाला बॉलिंग, ब्याटिंग मिळाली नाही याची नोंद घेतो आणि शेकोटी पेटती रहावी याची काळजी घेत एकेक काडी पुढे सरकवतो. मनातला हेतू वेगळा असला तरी अत्यंत निरागस चेह-यानी, काळजी असल्यासारखा चेहरा करून हे तो करू शकतो. तो लॉंगऑन, मिडविकेट, स्क्वेअरलेग, डिप कव्हर कुठूनही नो, वाईड, रनाउट देऊ शकतो किंवा नाकारू शकतो. पुलंचे हरितात्या जसे इतिहास सांगताना त्यात 'हे असे आम्ही उभे आणि महाराज बघतायेत' असं म्हणून स्वत:ला गोवायचे तसं नंदू करतो. 'आम्ही (पक्षी : आयसीसी) तसा नियम केलाय' हे वाक्यं ऐकून नियमावली तयार करणारा हा थोर माणूस आपल्याला सहवासाचा लाभ देतो या कल्पनेने मी सद्गदित झालो होतो. योग्यं वेळी झेल, चेंडू सोडणे, प्रयत्नं करूनही तो कसा सुटला वगैरे अभिनय त्याच्या डाव्या हाताचा मळ आहे. त्याचा चेंडू उडतो, वेगात येतो तो त्याची उंची आणि पिचमुळे, याच्यात लपलेली 'जोरात टाकला तर कसा येईल' ही धमकी लक्षात घ्या.      
आपलं म्हणणं थकता एखाद्याच्या गळी उतरवणे, सतत तेच सांगून हळूहळू तेच सत्यं आहे असं वाटायला लावणे, धूर्तपणानी लोकं आपल्यामागे गोळा करणे आणि मी त्यांचं मत मांडतोय, माझं काही नाही त्यात असं दाखवणे, बोलून खच्ची करणे, विनोदाच्या नावाखाली टार्गेट करणे, प्लानिंग करण्याच्या नावाखाली फिल्डर हलविणे, रनाउट झाल्यास (स्वत: किंवा समोरचा) समोरच्याला फक्तं आणि फक्तं त्याचीच चूक कशी हे पटवून देणे, उगाच वेळ काढून मानसिक खच्चीकरण करणे, कुठेही उभं केलंत तरी बॉल काही माझ्याच्याने अडणार नाही कारण त्यात माझी काही चूक नाही हे दाखवणे, कमकुवत फलंदाजाचे झेल सोडणे, कधीही वेळेत येणे या सगळ्या प्याकेजला रविंद्र उटगीकर असं म्हणतात. विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर त्याला फोन करतात अशी अफवा होती. तो एक चांगला मध्यस्थ, निगोशिएटर मात्रं आहे. बोलण्यातल्या चतुराईनी तो मुद्दा गळी उतरवण्यात तरबेज आहे. आपल्या संघाचा कुठे दौरा असेल तर याला आधी पाठवावं. द्रुतगती गोलंदाजांची 'वेगाचे दुष्परिणाम' यावर एक दोन सेशन्स त्यानी घेतली तर आपण जिंकू शकतो. ते गोलंदाज विटकरीनी बोटं ठेचून घेतील आणि 'अहिंसो परमो धर्म:' म्हणत रविचे फोटो गळ्यात अडकवून रस्त्यानी फिरताना दिसतील.   

जयंत विद्वांस - याला कुणी बोलावलं पहिल्यांदा याचा शोध चालू आहे. अतिशय चांगला उत्तम फलंदाज, नऊ आउट झाल्यावर अकरावा नाईलाजानी खेळायला येतो तसा हा येतो. स्वत:ची चेंडूफेक स्वत:ला खेळायला लागत नसल्यामुळे तो सुखी आहे. मुळात ती फास्ट नाही, मी राउंड विकेट टाकत नाही त्यामुळे अंगाला लागायचा प्रश्नं येत नाही, लागलाय का आत्तापर्यंत कुणाला वगैरे मतं त्याची एकट्याची आहेत, कुणाचाही याला दुजोरा नाही याची त्याला खंत आहे. केतन पायानी बॉल अडवून पोचे काढायला ग्यारेजला गेला होता असं ऐकलंय. बाकी विशेष सांगण्यासारखं काही नाही. रवि नंदूच्या तालमीत मौखिक प्रशिक्षण चालू आहे एवढंच.

अजय मराठे - संघटक, उत्कृष्ठ समालोचक, खजिनदार. मुळात हा सगळा आनंदोस्तव चालू होण्यामागे अजयचा हात आहे. कुठलाही फायदा नसलेला हा उद्योग तो मनापासून करतो. चांगलं करण्याची नुसती ओढ असून भागत नाही. त्याकरिता कष्ट घेण्याची तयारी लागते. ती त्याच्याकडे आहे. तो कुणाकुणाला, जुन्या माणसांना फोन करून बोलावतो. त्यावरून चार शब्द ऐकून पण घेतो. उद्या रोहन गावसकर रस्त्यात दिसला तरी तो म्हणेल, 'रविवारी येत जा रे मोकळा असशील तर'. खेळ झाला पाहिजे एवढाच त्याचा शुद्ध हेतू त्यात आहे. पैसे गोळा करणे, चोख हिशोब ठेवणे, त्याच दिवशी पीसीवर काम करून फोटो काढून टाकणे, उसने मागत असल्यासारखे लोकांकडे लाजत पैसे मागणे, अचूक, मार्मिक, मोजकं, सर्वसमावेशक, वाचनीय, कुणीही दुखावलं जाणार नाही याची काळजी घेत, स्वत:बद्दल एकही ओळ लिहिता कसं लिहावं याचा उत्तम नमुना असलेला वृत्तांत लिहिणे वगैरे प्रकार तो हौसेने करतो. त्याचा स्वभाव त्याच्या खेळात दिसतो. उगाच हाणामारी, स्पीड असं काही नसतं. सहसा तो चिडत नाही. कुणी पैसे दिले नाहीत तर तो त्याच्याशी कधीच भांडणार नाही पण एक रन कमी करा, तो उज्वल निकमसारखा तावातावानी भांडेल. निरलसपणे अजय हे सगळं करतोय याबद्दल आम्ही सगळे त्याचे आभारी आहोत.   

एकावेळी अकरापेक्षा जास्ती खेळाडू फिल्डिंगला असतात तरी रन्स होतातच. इथल्या फिल्डिंग पोझिशन्स कदाचित क्रिकेटच्या पुस्तकात सापडणार नाहीत. वाढलेल्या वयात ते हरवलेलं लहानपण, ती भांडण, ते वाद डोक्यात तरळत असतात. त्याची पुनरावृत्ती केल्यामुळे तो काळ जगता येतो. चित्रपटात विग घालून जसा वयस्क माणसाचा तरुण काळ दाखवतात तसाच प्रकार आहे हा. पण मजा येते. कुठलीही कटुता बाळगता आपणा सगळं विसरून खेळतो. भेटणं होतं, गप्पा होतात. खेळताना, भांडताना हुद्दा, वय, आर्थिक परिस्थिती आड येत नाही. हे क्षण जेंव्हा आपण खेळू शकणार नाही तेंव्हा आठवतील. रमायला चांगल्या आठवणी तर हव्यात माणसाकडे, आपण त्या एकेक करून साठवतोय

रविवारी घरी आल्यानंतर स्पेअर्स चेकावे लागतात. दिवसभर काय पुढच्या रविवार पर्यंत पुरतं. गरम पाण्याची पिशवी, आईसपॅक बारा पर्यंत तयार ठेवायला निघतानाच सांगायचं, वेळ कमी लागतो म्हणजे. व्हॉलिनी अर्ध्या किलोच्या डब्यात यायला हवं. पंचवीस एमेम ब्रश घेऊन बसायला बरं पडेल म्हणजे. एकदा चंदनासारखा त्याचा लेप लावला की झालं. दुपारी गप पडायचं. एक ग्लेनग्रांट नाहीतर शिवास तीस एमेल पाण्यातून पेनकिलर म्हणून चालते. सुखाची झोप लागते. स्वप्नात दीपिका, अनुष्का वगैरे कुणी त्रास देत नाही. डोळ्यापुढे सकाळी पडलेला लेगकटर, बुंध्यात पडल्यावर आलेला काठीचा आवाज, उडालेल्या बेल्स, चेंडू अडवताना लाल झालेला हात, बधिर अंगठा, तिसरी पळताना गळयाजवळ पोचलेली फुफ्फुसं. काय नी काय तरळत असतं. पुढच्या रविवारचे प्लान्स तयार होत असतात. थोडा टप्पा अजून मागे हवा, राउंड विकेट आलो तर बाहेर जातो पण कटरची मजा जाते, मिडल लेगला पडून ऑफ जातो त्यासारखं दुसरं प्रेक्षणीय काही नाही. स्वप्नं बघायला काय हरकत आहे निदान

देवाकडे तसंही मी कधी काही मागत नाही पण मरेपर्यंत कुठला नं कुठला खेळ खेळण्याची ताकद रहायला पाहिजे एवढं सिंपल मागणं आहे. बाकी काय लिहू, असाच लोभ असावा, धन्यवाद.
 
जयंत विद्वांस
(यातील चेष्टेने कुणाची मन दुखावली असतील तर दुखू देत, खिल्ली उडवण्याच्या हेतूनेच ते लिहिलंय)

No comments:

Post a Comment