Wednesday 15 June 2016

श्रद्धा…

गेल्या कित्त्येक वर्षात मी आवर्जून कुठल्या देवळात गेलेलो नाही, खास असं कारण नाही किंवा मी नास्तिक आहे वगैरे असं अजिबात नाही. पण कुठलीही गोष्टं मनातून वाटली तर करावी, जुलमाचा रामराम काही खरा नाही. अज्ञानामुळे असेल किंवा अतिज्ञानामुळे असेल माहित नाही पण काही गोष्टी केल्या म्हणजेच श्रद्धा असते, हे मला मान्यं नाही. बालपणाचा बराच काळ अनेक देवळांच्या सानिध्यात जाऊनसुद्धा असं का झालं असावं हा विचार मलाही पडतो. आजी भिकारदास मारुतीच्या वर रहायची. खाली हणमंतराव, समोर सदावर्ते राममंदिरबाजूला नारद मंदिर. तिथे रोज संध्याकाळी किर्तन असायचं, अजूनही असतं बहुतेक. आफळ्यांच्या इथे खाली कीर्तन शिकायला मुलं होती, त्यांचे अभ्यास कानावर पडायचे. सिन्नरकर, कोपरकर, गोविंदस्वामी आफळे, त्यांची मुलगी क्रांतीगीता महाबळ, सज्जनगडावरून आलेले रामदासी आणि अशा अनेक बुवांची किर्तनं मी तिथे ऐकली आहेत. आठवड्यातून दोनदा पुणतांबेकर भजनं घ्यायचे. प्रवचनं असायची.
दर शनिवारी रात्री मारुतीच्या पुढे भजन असायचं. कधी असायचं ते लक्षात नाही पण हातात विणा घेऊन ती खाली ठेवता अखंड नामसप्ताह असायचा. राम आणि हनुमानाचे वाढदिवस जोरात असायचे. लक्ष्मण आणि सीतेच्या जन्मं तारखेबाबत घोळ असावा म्हणून त्यांच्या नशिबी तो नाही असा माझा थोडं मोठं झाल्यावर समज होता. देवांमध्येसुद्धा आपलं आवडता नावडता प्रकार असतोच बघा. शेकडो वर्ष मिसेस राम आणि मिस्टर लक्ष्मण हे दीर भावजय मुकाट हा अन्याय सहन करत आहेत. भक्तीपेक्षा कथा ऐकण्याच्या ओढीने किर्तनं, तो भजनी ठेका आणि ते कच्चे, असंस्कारित आवाज आवडतात म्हणून भजनं ऐकली आहेत मीअंजिओग्राफित तो नॉन आयनिक डाय फिरतो शीरेतून तसा श्रवणानंतर भक्तिरस अंगातून मात्रं कधीही फिरला नाही. कुठलंही मत ठाम व्हायला अनेक गोष्टी कारणीभूत असतात. चटकन तयार झालेलं मत चुकीचं असण्याची शक्यता असते.
आयुष्यंभर सतत रामनाम घेऊन सुद्धा माझ्या निष्कांचन आजीच्या आयुष्यात सुखाचा एकंही दिवस कधी आला नाही. तिच्यावर लिहिताना मी म्हटलं होतं 'ज्या हातानी तिनी सतत जपमाळ ओढली त्या हातातली, ज्या पायांनी तिनी प्रदक्षिणा घातल्या त्या पायातली, ज्या तोंडानी तिनी फक्तं त्याचंच नाव घेतलं त्या तोंडातली ताकद शेवटी त्यानी का काढून घेतली? गरजेपेक्षा जास्तं पुण्य जमवलं म्हणून?' 'थोडं मोठं झाल्यावर म्हणजे आपल्याला आता सगळं कळतं असा भ्रम झाल्यावर मी तिच्या भक्तिची, नामस्मरणाची चेष्टा करायचो. 'इतकी वर्ष नाव घेतेस, कुणाचं वाईट केलेलं नाहीस मग तुला त्यानी एकही दिवस का सुखाचा दाखवला नाही?' ती शांतपणे म्हणायची, 'अरे मागच्या जन्माचं देणं राहिलं असणार आणि मला नाही उपयोग झाला तरी तो तुम्हाला होईल. बरे दिवस आले की वाटतं ही तिची पुण्याई उपभोगतोय आपण'. पण हे तिच्यावरच्या प्रेमापोटी आलंय. एकूणच तेंव्हा पाहिलेला ढोंगीपणा लक्षात मात्रं राहिला. निरीक्षणाची सवय वाईट, उगाच काय काय लक्षात रहातं आणि आठवतं मला.

आजीमुळे एकदाच पंढरपूरला गेलोय आत्तापर्यंत. खूप लहान होतो. चल म्हणाली, गेलो. पावसाळ्यात जागोजाग भुछत्रं उगवावीत तसं लोकांनी चंद्रभागेपर्यंत 'विधी'पूर्वक ठिपक्यांची रांगोळी काढली होती, ती चुकवत अंघोळीला गेलो चंद्रभागेत आणि आत्मा क्लीन करून येताना पायाला भौतिक घाण लावून आलो. त्यानंतर आजतागायत माझी आणि विठ्ठलाची भेट नाही. आता एकेक गोष्टी आठवून हसायला येतं. माळ घातल्यावर आमच्या शेजारचे मारणे श्रावणात पोथी वाचायचे. दहा साडेदहाच्या पुढे सगळा कारभार सुरु व्हायचा. रात्री कॉल रेट कमी असल्यामुळे जास्ती बोलतात लोक तसं ट्राफिक कमी असल्यामुळे डायरेक्ट देवाशी विदाऊट डिस्टर्बंस बोललं जात असावं. बरं नुसतं वाचन नाही तर ते अर्थही सांगायचे त्याचा. जे वाचायचे तेच अशुद्ध असायचं, अर्थ पोथीत नसलेला असायचा. कित्त्येकवेळा झोपेने विष्णूसारखे अर्धोन्मिलित नेत्रं झाल्यामुळे तेच पान परत वाचलं जायचं आणि त्यावर कुणीही ऑब्जेक्शन घ्यायचं नाही कारण ते चुकीचं ऐकण्यापेक्षा झोपलेलं उत्तम म्हणून घरातलं निम्मं पब्लिक निद्रासमाधीत गेलेलं असायचं. आत्मानंद मिळण्यासाठी करणारे लोक कमी आणि मी करतोय हे दाखवण्यासाठी करणारे जास्ती.
किर्तन ऐकताना एक आजी वाती करायच्या, अफाट स्पीड होता त्यांचा. काही मागच्या बाजूला आत्ता करतोय त्यापेक्षा अमुक एक कसा चांगला करतो यावर बोलायच्या, काही बाहेर उभे राहून ऐकणार, आत बसण्याचा आग्रह केला कुणी, तरी ऐकणार नाही त्याचं कारण कधीही सटकायला बरं पडतं, मधेच उठून गेल्याचा वाईटपणाही नाही. अखंड नामस्मरणात झोप आल्यावर वीणा खाली ठेऊन आडवे झालेले भक्तं मी पाहिलेत, चारला पहाटे उठून तोंड धुवून परत फ्रेश जप चालू. अट्टाहास का पण? जेवढं जमतंय तेवढंच करा की. मामा खाली मंदिरात झोपायचा. मी पण जायचो. शनिवारी जे भजन असायचं ते बाराच्या पुढे चालायचं. मधे टाईमप्लीज घेऊन रात्री चहा करायचा त्यांच्यापैकी कुणी एक आणि ते मस्तं चिलीम ओढायचे. तो दाट पांढरा धूर मला बघायला फार आवडायचा. एकदा गांजाला पैसे नव्हते तर एकानी कोळसे हलवायचा लांब चिमटा काढला, दक्षिणा पेटीतून पाचाची नोट काढली आणि एकाला धाडून दिला. मारुती दर शनिवारी फुकट ऐकतो म्हणजे काय, घेतले पाच रुपये तर कुठे बिघडलं, इतका शुद्ध विचार असणार. चोरी हा उद्देश असता तर त्यानी अजून नोटा काढल्या असत्या की, तो खरा भक्तं. मामा गाढ झोपायचा, चहा केला की त्याला उठवायचे, तो दोन विड्या ओढून चहा ढोसून परत घोरायला लागायचा. मारुती आणि तो दोघंही ब्रम्हचारी. कुठलीही करमणूक त्यांच्यासाठी नव्हती, इतके अलिप्त.
जपाचे, प्रदक्षिणेचे प्रकार तर बघत रहावेत. कुणी दोन्ही गालांवर 'याराना'मध्ये बच्चन 'कच्चा पापड, पक्का पापड' म्हणताना घेतो तसे आलटून पालटून हात घेऊन पुटपुटतात, कुणी घाईची लागल्यामुळे टमरेलासकट धावतो त्या स्पीडला प्रदक्षिणा घालतात, काही दिसेल त्या घंटीला वाजवून, कासवाला, नंदीला नमस्कार करून मगच पुढे येणार, साईड हिरोसारखे डाव्या उजव्या बाजूला जे देव, फोटो, मुर्त्या असतील त्यांच्या पायाला हात लावणार, नेमका त्यातला एखादा पापपुण्याचा हिशेब ठेवणारा असला तर नाराज नको व्हायला, सरकारी ऑफिसमध्ये आपण वेगळं काय करतो नाहीतरी. प्यून पासून सुरवात ते आतल्या केबिनपर्यंत, काहीजण वेळ घालवायला आल्यासारखे लांबून प्रदक्षिणा घालतात, देवाच्या मागे आले की लेन सोडून तिथे डोकं टेकवणार किंवा हात लाऊन परत हेवीच्या थर्ड लेनला जाणार, त्यात एखादा उसेन बोल्ट त्याला धडकतो पण कितीही तापट असला माणूस तरी तिथे शिव्या देत नाही, एवढंच. काहीजण पिशवी हाताला बांधून आणतात, त्यात माळ असते, जप गुप्तं असतो त्यांचा. हा विनोदी प्रकार मात्रं माझ्या बुद्धीबाहेरचा आहे. काहीजण एन्ट्रीलाच शंभो, मारुतीराया, रामा वगैरे जोरात खणखणीत हाक मारतात. उगाच देव दुसरीकडे बघण्यात दंग असेल तर मी आलोय हे सांगितलेलं बरं.  
काहीजण कोण कोण आहे उपस्थित, ओळखीचे कुणी आहेत का, प्रेक्षणीय काही आहे का म्हणजे प्रदक्षिणा वाढवायला असा सगळा हिशोब करून पुढे सरणार. तरी मी ब्लॉकबस्टर देवाकडे जातंच नाही. तिथे ती 'तबकं घ्या, चपला ठेवा दादा इथे'चा हल्ला, सुरक्षा यंत्रणेतून पास व्हायचं, त्या यू आकाराच्या रेलिंगमधून फिरत जायचं, सांगितलाय कुणी नसता व्याप. सारसबागेसमोर महालक्ष्मीच्या देवळात नवरात्रात अफाट गर्दी असते. आमचा एक दोस्तं फार आतुरतेने रोज जायचा. मला कळेना एवढी भक्ती लेव्हल वाढली कशानी. 'अरे ते रांगोळी काढतात ना बायका उकिडव्या बसून, मागून गो-या पाठी आणि इतर भाग फार मस्तं दिसतात आणि वाकून काढतात त्यामुळे पुढूनही काय काय दिसतं'. हे कारण मला नविनच होतं देवळात जाण्यासाठीचं. नारायणभाऊ तीर्थ आणि खोबरं द्यायला बसायचे तेंव्हा लोक समोर नोट किंवा रुपया टाकून दान वगळून उरलेली चिल्लर उचलायचे म्हणजे सगळी नोट जायची नाही. आईसक्रीम करता मी एकदाच कमी पडत होते म्हणून चार आणे टाकून आठ आणे उचलून आणले होते. आले परत की टाकलेले पेटीत. ओव्हरड्राफ्ट म्हणतात त्याला हे नंतर समजलं.
लोक देवळात पावत्या घेतात दानाच्या, अभिषेकाच्या (प्रसाद घरपोच आला नाही बर्का मागच्या वेळेला पोस्टानी). ज्यानी दिलंय त्यानी कधी हिशोब ठेवला नाही आणि त्याचेच त्याला परत देताना पावती घेता? बरं आपली पोन्झी स्कीम असते. एक दिला की पटीत हवं असतं. एक बरंय, देवळं अजून रेडी रेकनर काढत नाहीयेत, नाहीतर बढती, अचानक धनलाभ, चांगली (म्हणजे देखणी, गोरी, एकुलती एक, कमावती) बायको, परीक्षा पास, कुणापेक्षा तरी जास्ती हवंय, घर अशा प्राईम मागण्यांसाठी दर ठरले असते. परवाच कुठेतरी वाचलं, 'देवाच्या समोरची ती दानपेटी काढून टाका, तुम्हांला आत जाताना अडवायला कुणी नसेल'. अब्जात संपत्ती असणारे 'देव' पाहिले की हसू येतं. ज्याला कुणी पाहिला नाही त्याला खूष करण्याकरता माणसं वेडी झालीयेत. देव आपणच तयार केला आणि आपणच त्याचे नियम केलेत. ओमपुरीसारखा देवीचे व्रण असलेला देव मिळणार नाही तुम्हांला. सगळे देव कसे चिकणे, बायकीपणाकडे झुकणारे चेहरे आणि खाली बलदंड शरीरयष्टी, अत्यंत सुरेख डोळे, लालचुटुक जिवणी आणि कमनीय, गो-यापान देव्या असतात. राक्षस काळाकुट्ट, कुरूप आणि अवाढव्य असतो हे गोष्टीतून, सिनेमातून अगदी बालनाट्यातूनसुद्धा सांगतात. म्हणून फेअर एन लव्हली खपतंय कारण ते मनावर ठसलंय आपल्या.  
देव कसा मित्रासारखा हवा. ब-याच दिवसात भेट होवो न होवो, दोस्त रुसत नाही. त्याला आपल्याकडून काही अपेक्षा नसते, तो आपलं ऐकून घेतो. अमूक एक केलं नाहीतर तो रागावतो हे कसं काय? सगळे मार्ग संपतात आणि अडचणी दूर होत नाहीत त्यावेळी जी जागा उरते ती देव. आपण त्याला पार खालच्या पातळीला आणलाय. पैसे, सोनं नाणं, पशुबळी घेऊन काम करणारा एजंट असतो, देव कसा असेल? आपली पातळी जशी घसरत जाते तशी देवाची पण आपण खाली आणतो असं मला वाटतं. आपल्याला सोयीस्कर ते आपण एरवीही करतोच की. कुणीतरी पाठीशी आहे याने मानसिक ताकद येते, हुरूप येतो. परीक्षेला जाताना देवाला नमस्कार करण्यामागे तोच हेतू असतो.कुणापुढे तरी आपण खुजे आहोत, नतमस्तक होतो याची जाणीव रहावी म्हणून त्याच्या देवळात जायचं असतं. जर तो खरंच आहे आणि त्यानीच सगळं घडवलंय तर मग त्यानी दिलेलंच त्याला देऊन अजून पदरात पाडून घेण्यात काय अर्थ आहे. जो एवढं देऊ शकतो, त्याला तुमच्या देण्यानी काय फरक पडणार आहे? एकूणच 'अजून हवं' यापोटी मागणं संपत नाही.    

सुमेध वडावाला (रिसबूड) यांनी शब्दांकन केलेलं 'मनश्री' वाचल्यावर मला जाणवलं. "देवाकडे काय काय मागावं हेच अजून आपल्याला कळलेलं नाही तिथे त्याचे आभार मानायचे वगैरे भानगडीत आपण पडतच नाही. मनश्री सोमण, सांगलीची वल्लरी करमरकर या लोकांचं समजलं, वाचलं की आपल्या देवाकडच्या मागण्यांची लाज वाटते. धडधाकट शरीर दिलंय याचे आभार कधी मानणार आपणनुसतं आपल्याला नाही तर आपल्या प्रियजनांना पण. पुस्तक वाचून रडू येईल, चार जणांना सांगू, त्यांच्या दु:खाची, कष्टाची, कल्पना येईल पण जो माणूस या दिव्यातून गेला त्याच काय? जिद्द आपोआप येते की लादली जाते? मन होतं तयार की करावं लागतं? देवाचा राग त्यांनी केला तर काय चूक आहे? आपण मात्रं साधे आभार सुद्धा मानत नाही". तेंव्हा मी त्याला सांगितलं होतं, 'देवा, एकवेळ पैसा देऊ नकोस, मान मरातब नको, गोरा रंग नको, देखणेपण नको, दीर्घायुष्य नको पण या पुढे निदान प्रत्येकाला फक्त धडधाकट शरीर तरी दे रे. तुला यात काही आनंद मिळत नसणार हे माहित आहे. दुस-याच्या दु:खात आनंद मानायला लागलास तर मग तुझ्यात आणि आमच्यात फरक तो काय? त्यामुळे लई नाही मागणं. बघ काही जमतंय का'. 

श्रद्धा भाबडी असते, तिला हेतू चिकटला की त्याची अंधश्रद्धा होते. त्यामुळे तो आहे ही माझी श्रद्धा आहे पण मी देवळात गेलो नाही तर रुसेल ही अंधश्रद्धा आहे माझ्या दृष्टीने. आम्ही दोघं एकमेकांना अजिबात त्रास देत नाही. त्याच्याकडे मी काहीही माझ्यासाठी मागत नाही, उलट काही चांगलं घडलं तर त्याची कृपा म्हणतो. जर असेल तो आणि झाली भेट तर विचारेल तो मला, 'काय रे भोसडीच्या, दिसला नाहीस कधी देवळात तो'. काय उत्तर द्यायचं ते बघू तेंव्हाचं तेंव्हा.  

जयंत विद्वांस

No comments:

Post a Comment