Tuesday 7 June 2016

सुवास…

चित्रंविचित्रं गोष्टींचं आकर्षण माणसाला असतंच, मलाही आहे. काही विशिष्ठ वास आणि सुवास मला आवडतात - आयोडेक्स, पेट्रोल, चिरूट, थिनर, जळलेली काडी, फ्रेंच पॉलीश, विडी, टायर जाळल्याचा, दृष्टं काढल्यावर येणारा जळका वास, हे सुवास नव्हेत पण काहीतरी आहे त्यात जे ओढून घेतं, वेगळेपण नाकाला जाणवतं. उग्र वासानी माझं, बायकोचं, मुलीचं डोकं दुखतं - चाफा, डिओ, कुठलाही स्प्रे, अत्तर, आफ्टरशेव्ह (शेवटचं किती साली लावलं, आठवत नाही), त्यामुळे असल्या महाग आणि ऐपतीच्या बाहेर असलेल्या गोष्टींपासून आपोआप सुटका झालेली आहे. वास आणि सुवास यात फरक आहे. वास म्हटलं की त्यात शक्यता आली, अहाहा, काय वास येतोय आणि वास मारतोय म्हटलं की भिन्नं अर्थ येतात. सुवास म्हटलं की एकंच शक्यता. नाकपुडी पंपून आत तो वा-यावर सांडलेला भाग पदरात पाडून घ्यायचा. निसर्ग किती फुकट सुख वाटत असतो आणि आपण खर्च करून नकली सुवास विकत घेत असतो. 

लहानपणी चाळीत तो फकीर यायचा रात्री, हातातल्या धुपाटण्यावर ती उद आणि धुपाची पावडर फिसकारली त्यानी की जो पांढरा धूर आणि वास येतो तो अजून विसरलेलो नाही. ती धुपाची कांडी ज्यानी काढली त्याला मारला पाहिजे, उदबत्तीच्या पिठात रोल करून काहीतरी देतात. लालबुंद कोळशावर ते उद, धूप टाकल्यावर स्वप्नं विरावं तसे ते चटचट वितळतात आणि काय गंधाळून टाकतात. त्याची तुलना बाळंतिणीच्या खोलीतील सकाळी शेक शेगडी देऊन झाल्यावर रेंगाळलेल्या वासाशी होऊ शकते फक्तं. वासाला देह नाही असं कुणी म्हणेल तर चूक आहे ते. तेलानी मालिश करून, शेक झाल्यावर, डाळीचं पीठ, साय लावून अंघोळ घातलेल्या लहान बाळाला कधी नाक लावून पहा. लाल तेलाचा, धुपाचा, धुरीचा, जॉन्सनच्या पावडरीचा, डाळीच्या पिठाचा, आणि दुपट्यात घट्ट बांधल्याने मानेच्या वळ्यात आलेल्या हलक्याश्या घामाचा जो काही एकत्रित वास येतो ना त्याला तोड नाही. बाळाच्या कपाळाला, वळलेल्या मुठीच्या आत, शहाळ्यासारखा लागणा -या डोक्याला स्पर्श करा आणि नाकानी ओढून घ्या. काहीतरी हरवलेलं सापडल्यासारखं होतं. असल्या आनंदाला नाव नसतं. फोटोत ते वय, तो क्षण, ती भावना धरता येते, सुवास, गंध, परिमल धरता येत नाही, हे दु:खं आहे.

ते पहिल्या पावसाच्या मातीचा वगैरे सगळ्यांनाच येतो. त्यावर एवढ्या कविता होतात की घाबरून पाऊस गायब होतो. पण कधी पुदिन्यावर पाणी मारल्यावर वास घेतलाय? त्याचा एक अफाट वास येतो, पाच रुपयात आणलेल्या पुदिन्यावर नाही म्हणत, आमच्याकडे मागे बागेत एक पुदिन्याचा चौकोन होता लावलेला, त्यावर पाणी मारलं की येतो जो एक परिमल सुटायचा त्याला तोड नाही. त्या सुवासाला गारवा आहे, छातीत भरून घ्यायचा नुसता, फेश वाटतं एकदम. गावठी गुलाबाला जो वास येतो तो ही असाच फ्रेश करतो. आधी रातराणीचा मग सकाळी पडलेल्या प्राजक्ताच्या सड्याचा वासाइतकाच शेणाचा वासही मला आवडतो. अंगण सारवणे हा प्रकार अस्तिवात नाही आता शहरातून. पण ताज्या शेणानी सारवलेल्या अंगणाचा वास काय सुंदर असतो ते तो फुफ्फुसापर्यंत ओढून घेतल्याशिवाय कळणार नाही. स्वच्छ न्हायलेली परकर पोलक्यातली पोर छोटंसं कुंकवाचं बोट लावलं की जेवढी सुंदर दिसते तेवढंच नुकतंच सारवलेलं, रांगोळीनी श्रीराम लिहून त्यावर इवलीशी पिंजर टाकलेलं अंगण देखणं आणि सुवासिक असतं.

अन्नाचा सुवास हा वेगळाच भाग आहे. नुसत्या वासानी भूक खवळेल, खावंसं वाटेल तो वास खरा. मसाल्यासाठी परतत असलेल्या कांद्याचा, चुर्र आवाज करून उठवळ बाईसारखा उंडारत आलेल्या फोडणीचा, इडलीच्या आंबलेल्या पिठाचा, लाडवासाठी भाजलेल्या बेसनाचा, कुकरच्या शिट्टीमधून येणारा फ्लॉवरचा, खमंग पोळीचा, रटरट शिजणा-या रश्श्याचा, उग्र बिरड्या, पावटयाचा, अमसुलाचा, पुरणाचा, वरणाचा, आंबेमोहोराचा, फेसलेल्या मोहरीचा नाकात जाणारा हे आणि असे अनेक अनंत वास कारणीभूत असतात जेवावसं वाटायला. कधी अंधा-या जागेत अढी घातलेल्या आंब्यावरचं गवत बाजूला करून बघा, काय दरवळ सुटतो ते. अनारसे जमत नाहीत म्हणून दिवंगत झाले. आई घरी करायची विक्रीसाठी पीठ. वाळत घातलेल्या तांदुळाचा तो घरभर पसरणारा आंबूस वास आणि गुळ घातल्यावर त्या पिठाला आलेली वासाची चव किंवा चवीचा वास फार मादक असायचा. नावं देणं आणि नावं ठेवणं हे आपलं आवडीचं काम पण यातल्या कुठल्याही सुवासाला आपण नावं देऊ शकलेलो नाही, ते एक बरंय. सुख निनावी असावं. याचा आनंद सांगता येत नाही, ज्याच्या त्याला भोगता मात्रं तेवढाच येतो. 

प्रत्येक गोष्टीच्या व्याख्या माणसानुसार बदलतात. एखाद्याला सुवास वाटेल तो दुस-याला वास असेल. मोहाच्या दारूचा वास असाच आहे, उग्र, नुसत्या वासानीही झिंग येईल असा. आता कल्हई फक्तं डोक्याला होते, आधी भांड्यांना व्हायची. नवसागर लागल्यावर येणारा तो पांढरा धूर असाच उठवळ वासाचा असायचा. कधी गुळ खायला गेलात गु-हाळावर तर तो वास आधी भरून घ्या नाकात, त्यावर येणारी ती गुळाची पिवळसर खवाबर्फीला मागे सारेल अशी चव आणि तो गुळमट वास भन्नाट असतो. स्कॉचचा बाटली उघडल्यावर येणारा तो उग्र आणि बर्फात तिचं अद्वैत होत जाताना येणारा तो मंद पण मादक सुगंध दरवेळी मला वेगळा भासत आलाय. नविन कपड्याचा, पुस्तकांचा वास एक अगदी कोराकरकरीत आणि कुमार असतो. अशिक्षित माणसाला तो वारंवार दिला तर कदाचित आत काय लिहिलंय ते वाचता यायला हवं असं त्याला वाटायला लावेल इतका तो सुंदर आहे.     

फुलाला येणारा गंध हा अंगचा गुण असतो त्याच्या. प्रत्येकाला आवडणारं फुल वेगळं, गंध वेगळा, त्याच्याशी निगडीत व्यक्ती, ठिकाण, प्रसंग, घटना यामुळे लक्षात राहिलेला गंध वेगळा. पण काही सुवास शब्दांच्या पलीकडे असतात. परमेश्वरानी नुसता स्पर्श दिला असता तर तारुण्य निरस ठरलं असतं, जोडीला वास आहे म्हणून मजा आहे. चौथ्या दिवसाचं नहाणं झाल्यावर त्य शिकेकाईरिठ्याचा वास अंगाला येतो तो दुर्मिळ झालाय आता. अंग कसं करकरीत लागतं स्पर्शाला. बाई अत्तराचा बुधला असते तेंव्हा. रंध्रारंध्रातून मंद मंद सुवास आतली प्रत्येक पेशी सुगंधून हळुवारपणे बाहेर पडत असतो. त्या वासाला एक धुंदी आहे मोहाच्या फुलासारखी. ती तिकडे वा-यावर मन तिरकी करून केस झटकत असेल आणि तुम्हांला वास येत नसेल तर, शरीरात काही हालचाल होत नसेल तर रविवारी अप्पा बळवंतला जाऊन पोथ्या आणणे एवढा एकंच मार्ग शिल्लक आहे असं खुशाल समजा. देवानी अवयव दिला तरी त्याचा उपयोग व्हायला हवा हे ज्याला समजलं नाही त्याचं जीवन व्यर्थ.

काही वास मात्रं आता दुर्मिळ झाले. माणसे नाहीशी झाली तसे ते स्पर्शही गेले आणि वासही गेले. आता बायका ओच्याला हात पुसत नाहीत. आजीच्या, आईच्या साडीला या सगळ्याचा एक संमिश्र सुवास असायचा. जाताजाता आपण हात, तोंड पुसायचो, तो वास हरवला. फेसवॉशनी जेवढं वाटत नाही तेवढं फ्रेश पदराला पुसलेल्या तोंडाला वाटायचं. आजी पेज करायची. भांड्यावर ते अर्ध ठेवलेलं झाकण आणि ती रटरटणारी पेज, त्याला एक सुवास असायचा. मिठाचा दाणा घालून दिलेलं ते अमृत आता कुणी पीत नाही. तिनी मायेनी हातावर, तेल्या मारुती दिसेल असं, लावायला घेतलेल्या खोबरेल तेलाचा वास, दिवाळीतला तो माक्याच्या तेलाचा, उटण्याचा वास, पहाटे येणारा तो फटाक्यांच्या दारूचा वास अजून डोक्यात आहे. तो तिथून निघत नाही त्यामुळे नविन वास तिथे रहायला घुसमटतो.

निसर्ग मोठा सुंदर आहे. देवानी पंचेंद्रिये दिली, त्यांना प्रिय होईल असं निसर्गात काय काय पेरून ठेवलंय त्यानी. आपण पैसे निर्माण केले आणि आपल्याला वाटायला लागलं आपण सुख तयार करू शकतो. कधी तर याचा तिटकारा येईल, उबग येईल आणि मग त्याचा 'वास' मारायला लागेल तेंव्हा नाकाला खरे सुवास सापडायला सुरवात होईल, एवढं खरं.

जयंत विद्वांस


 

No comments:

Post a Comment