Wednesday 27 July 2016

कॉफीपे चर्चा...

नवलकोल, दुध्या, शेपू, कारलं, फरसबी असे अनेक माझे शत्रू आहेत. चांगले संस्कार करण्याच्या नादात यावरून बोलताना माझ्या बालपणात कुणीही थकलेलं नाही, आता बोलून काही उपयोग नाही. बायको जेवणाच्या बाबतीत आई वडिलांनी एक चांगली सवय म्हणून लावली नाही हे म्हणून थकल्याला सुद्धा काळ लोटला. मी ही To ignore is the best revenge या वाक्याप्रमाणे वागून कुठलीही सुधारणा करू शकलेलो नाही. एखादी चव नाही आवडत जिभेला त्याला आपण काय करू शकतो सांगा मला. चव लादता येते का? डेव्हलप होते वगैरे मला पटत नाही.

इथे मग तोंडी लावणं उपयोगाला येतं. आजी अर्ध्या पळी तेलात चार ठेचलेल्या लसणी, मोहरी घालून चुर्र आवाज काढून पोळीबरोबर द्यायची त्याबरोबर मी जेवण करू शकायचो, इतकी सुंदर चव त्याला असायची. गूळ थोडा चिरडायचा त्यावर दोनचार थेंब लिंबू पिळायचं, अप्रतिम लागतं पोळीबरोबर. दोन कप पाण्यात चिमूटभर जिरे टाकून उकळवा आणि त्यात कधी पाव बुडवून खा आणि सांगा मला. अतिशय गोड लागतो. तेंव्हापासून मला अशा गोष्टी एकत्र करायची सवय लागलीये.

मला कुठलीही पाककृती येत नाही, कॉफी सोडून. त्यामुळे मला शोध लावणं गरजेचं होतं भाजी आवडीची नसली की. मस्तं पिकलेल्या चिक्कूची साल काढायची, पोळीबरोबर चांगला लागतो. दहीभात आणि तिखट फरसाण झकास लागतं. केळं सोलायचं त्यावर मध घालायचं, जरा कुस्करायचं, मस्तं लागतं नुसतंही आणि तोंडी लावणं म्हणूनपण. ताजा फोडणीचा भात सुद्धा वेगळा लागतो. सायभात आणि लसूण चटणी कालवली की त्यासारखं सुख नाही. पोह्याच्या चिवड्यामध्ये चुरलेला मोतीचूर किंवा बेसनाचा लाडू (एका लाडवाचे साधारण आठ दहा तुकडे) हे मिश्रण मी तिन्हीत्रिकाळ खाऊ शकतो.

या सगळ्यांपेक्षा मला मी केलेली कॉफी आवडते. एक चमचा मध, कुणी बघत नाहीये हे बघून घेतलेली दोनतीन चमचे साय, एक चमचा साखर आणि एक चमचा ब्रू असं मस्तं फेटायचं, त्यात गरम दूध घातलं की लागणारी चव अद्वितीय असते. बरोबर खारे काजू, महिनाखेर असेल तर बुधानीचे वेफर्स हवेत, त्यात अचूक मीठ असतं. लपाछपी खेळल्यासारखी कॉफी त्या सायीच्या आत कुठेतरी कणभर चिकटून येते आणि वर्ज्य स्वर लागल्यावर जशी मजा येते तशी चव बदलते. त्या मधाची चव पुढे तासभर तरी जिभेवर प्रेमात पडल्यासारखी रेंगाळत असते.

तात्पर्य काय तर खारट, कडू, गोड, मधाळ, सायीची मायाळू अशी मिश्र चव मला आवडते. आयुष्य तरी वेगळं काय असतं. एकंच चव सतत असेल तर बेचव होईल ते. असो! आलात कधी तर खारे काजू वगैरे घेऊन या, कॉफी मी देईन, होऊ दे खर्च. रंगेल जरा कॉफीपे चर्चा. ;)

जयंत विद्वांस

No comments:

Post a Comment