Wednesday 27 July 2016

मालस...

काल 'डोळ्यात डिग्री चुकलेली पारेखांची आशा मला कधीच आवडली नाही' असं म्हटल्यावर लोकांचा ती त्या कारणाकरता मला आवडत नाही असा समज झाला. पण मला ती त्याकरता नावडती नाहीये. ती अतिलाडिक आणि चिरक्या आवाजात बोलायची. सतत लाडात बोलणा-या नट्या माझ्या डोक्यात जातात (उदा : निशिगंधा वाड, किशोरी शहाणे) तशी मला सरळ डोळ्यांची तनुजा पण कधी फारशी आवडली नाही. प्रत्येक गोष्टीला कारण नसतं. नाही आवडली तर नाही आवडली. बात खतम पण तिच्या काणेपणाबद्दल बोलण्याचा, नावडण्याचा हेतू नव्हता म्हणून हे लिहिणं आलं. त्यांचं माझ्यावाचून काही अडलं नाही आणि माझंही नाही. :D

शारीरिक वैगुण्यं असणं आपल्या हातात नाही. पण ज्याच्या नशिबी असतं त्याला न्यूनगंड असतो अशी आपल्याकडे परिस्थिती आहे. इतरांपेक्षा आपण वेगळे आहोत असं वाटणं वेगळं आणि आपल्यात काही कमतरता आहे हे वाटणं वेगळं. तिरळेपणा हे सगळ्यात मोठं चेष्टा होणारं वैगुण्यं आहे. तिर्री, तिकडम, हेकण्या, कर्जत कसारा, लुकिंग लंडन टॉकिंग टोकियो (LLTT ) असे अनेक कुचेष्टेचे शब्दंप्रयोग मी लहानपणापासून ऐकत आलोय, बोलतही आलोय कारण तेंव्हा तेवढी अक्कल नव्हती. तिरळा हा फार अपमानास्पद शब्दं आहे. आपल्याकडे निखळ विनोदनिर्मिती फार कमी असते. कुणाच्या तरी वैगुण्यावर आधारित विनोदाला लोक खूप हसतात हे त्यामुळेच असावं. इंग्रजांची तरल, सूक्ष्म विनोद बुद्धी आपल्यात नाही, आपल्याला स्वतःवर हसता येत नाही, दुस-याच्या कुठल्याही गोष्टीवर मात्रं विनोद झाला नाही तरी आपल्याला मनमुराद हसता येतं. इथे मला पुलं त्याकरता वंदनीय वाटतात. त्यांनी व्यंग लिहिलं पण कधीही व्यंगाचा विनोद केला नाही.

बुटकेपणा हा त्यातलाच एक विनोदाचा भाग. अतिउंची हे मात्रं लोकांना व्यंग वाटत नाही. जमैकाची शेली फ्रेझर पाच फूट होती फक्तं पण तिची उंची तिच्या आड आली नाही ऑलिम्पिकमधे १०० मीटरच्या गोल्ड मेडलला. एका दिव्यं माणसाचं अफाट मत मी ऐकलंय, 'हे निग्रो लोक उंच असतात त्यामुळे त्यांचा ढांगा लांब पडतात म्हणून ते इतरांपेक्षा फास्ट पळू शकतात'. आपण लक्ष नाही द्यायचं, गेल डेव्हर्स (५'३") शेली फ्रेझर कोण वगैरे त्याला माहितीच नसणार. ब्रॅडमन, गावसकर, तेंडुलकर, विश्वनाथ - चौघेही साडेपाचफुटांच्या आसपास. पण तेंडुलकर जे पळायचा बावीस यार्डात त्याचा ढांगेशी संबंध नाही हे त्याला कोण सांगणार. बाउन्सर डोक्यावरून जायचे न वाकता म्हणून गावसकर विंडीजविरुद्ध विनाहेल्मेट खेळू शकला असं मत ऐकून तर मी गार पडलो होतो. बुद्धीनी बुटकीच, सॉरी बोन्साय राहिलेली माणसं अशीच बोलणार म्हणा.

पाकिस्तानचा गोलंदाज अझीम हफीजच्या उजव्या हाताला दोन बोटं मिसप्लेस होती पण तो डाव्या हातानी सुसाट टाकायचा. वैगुण्याचा सगळ्यात सुंदर फायदा कुणी करून घेतला असेल तर आपल्या भागवत चंद्रशेखरनी. त्याचा पोलिओ झालेला हात मनगटातून कसा वळेल हे त्यालाही सांगता यायचं नाही. फलंदाज काय डोंबल हात बघून ठरवणार की गुगली आहे की लेगब्रेक. सैन्यात असताना चाचणीत बॉंम्ब कडेलाच फुटल्यामुळे दृष्टी अधू झालेला आफ्रिकेचा फॅनी डिव्हिलीअर्स लवकर निवृत्त झाला नाहीतर तेंडुलकरला १०० x १०० साठी अजून थोडं खेळावं लागलं असतं. वैगुण्यावर मात करायला जिद्द लागते. लाकडी पायाची सुधाचंद्रन जिद्दीमुळे लाडकी झाली. आता खुनी असेल तो पण वयाच्या अकराव्या महिन्यात गुडघ्याखाली दोन्ही पाय कापलेला ऑस्कर प्रिस्टोरीअस ब्लेड रनर झाला. वैगुण्यं असतं पण त्याच्यावर मात करायला जिगर लागते.

तर मूळ मुद्दा होता किंचित तिरळेपणा. काहीवेळेला थोडे डिफेक्ट असलेल्या वस्तू कमी किंमतीत मिळतात. मागे मी एक शर्ट आणला होता, बाराशेचा तीनशेला. मनात आलं, मूळ किंमत दीडशे असेल पण शर्ट झकास होता. उत्सुकता म्हणून मी विचारलं की पाव किंमतीला का विकताय हा. सेल्समन पण हौशी होता, त्यानी सांगितलेला डिफेक्ट मला बापजन्मात समजला नसता. पहील्या बटणाचं अंतर कॉलरपासून ठरलेलं असतं आणि मग पुढच्या बटणांचंही अर्थात. तर ते एकदीड सेंटीमीटरनी वर झालं होतं म्हणून डिफेक्टेड पीस. तसं कुणाला काय डिफेक्ट वरून येताना असेल ते सांगता येत नाही. ठार तिरळा माणूस बघितलं की हसू येतंच. केश्तो मुखर्जी बघा, तो काहीही बोलण्याची गरज नसते, त्यानी ते डोळे फिरवून ' आईये ना' म्हटलं की हसू येतंच. आमच्या वर्गात अकरावीला एक आंगणे म्हणून मुलगा होता. स्लाइट काणा होता तो, त्याला मुलं मुद्दाम कांगणे म्ह्णून हाक मारायची. पण तो स्मार्ट दिसायचा उलट त्यामुळे. अमिताभ, आशा पारेख, व्ही.शांताराम, गौतम राजाध्यक्ष ही सगळी काणी मंडळी. पण त्यांचं कुठंही अडलं नाही.

मधे कुणीतरी एफबीवरच मला त्या 'काणे'पणाला अजून एक शब्दं सांगितला, 'मालस'. सालसशी साधर्म्य असल्यामुळे असेल पण मला तो जाम आवडला. निळ्या, हिरव्या डोळ्यांचं आपल्याकडे कौतुक का? कारण ते क्वचित आढळतात. तसेच हे मालस लोक. एखादा राग गाताना तयारीचा गायक मुद्दाम वर्ज्य स्वर लावून जशी गंमत करतो तशी ही देवानी केलेली गंमत आहे. सगळं परफेक्ट नसावंच, छोटीशी उणीव सौंदर्यस्थळ होऊन जाते. मुकेशचा नाकातला, मीनाकुमारी, तलत, ऋजुता देशमुखचा कापरा आवाज ऐकताना किती गोड लागतो. जॉनीवॉकरचा चिरका आवाज, मुमताजचं अपरं नाक, हृतिक रोशनचं सहावं बोट, मीनाकुमारीच्या डाव्या की उजव्या हाताला नसलेली करंगळी, ए.के.हंगलचं टक्कल, ललिता पवारांचा अर्धोन्मीलित डोळा, मुक्रीची उंची, मधू आपटेंचं तोतरं बोलणं, जेफ्री बॉयकॉट, सिल्व्हेस्टर स्टॅलनचं - डिलिव्हरीच्या वेळेस फोरसेप लागून त्याच्या चेह-याचा डाव्या बाजूचा खालचा भाग पॅरलाईझ झाला होता - ओठ जीभ आणि हनुवटी - त्यामुळे तोंडातल्या तोंडात बोलणं त्यांच्या प्रसिद्ध होण्याला कुठे आड आलं नाही.

वैगुण्यं असतंच प्रत्येकात. माणूस ते दुस-याचा कमीपणा दाखवण्यासाठी शोधून लक्षात ठेवतो, हातचा असावा म्हणून. मन्सूर अलीखान पतौडीचा एक डोळा बक-याचा होता पण काय देखणा दिसायचा तो. महाराज रणजितसिंहांना एक डोळा नव्हता. त्यांचं पोर्ट्रेट करायला एक चित्रकार यायचा. चित्रं काढल्यावर महाराज खुश झाले. शिकार करताना काढलं होतं चित्रं. त्यामुळे बंदुकीचा नेम धरताना एक डोळा आपोआप बंद दाखवता आला. डोळे सगळ्यांनाच असतात, 'नजर' 'दृष्टी'  असेलंच असं नाही. 'नाही'ची यादी संपत नाही आपली, आहे त्यात समाधान कधीच नसतं. शारीरिक वैगुण्यं शोधण्यापेक्षा ज्यादिवशी आपल्यात एखादा चांगला गुण नसणं हे स्वतः:चं वैगुण्यं वाटेल त्यादिवशी कदाचित आपण माणूस म्हणून जगायला सुरवात करू.   

एवढं सगळं मान्यं केलं तरीपण पारेखांची आशा नाही आवडत म्हणजे नाही आवडत. :P  ;)

जयंत विद्वांस


No comments:

Post a Comment