Thursday 15 September 2016

गेला तो गेलाच...

गेल्या कित्त्येक वर्षात गणपती बघायला, विसर्जन मिरवणुकीला गेलो नाहीये. तेवढीच गर्दी कमी. पूर्वी दिवाळीपेक्षा ती धमाल जास्ती असायची. लहान असताना आमचा मामा विजय अभ्यंकर आम्हांला गणपती दाखवायचा. तसे कुणी दाखवणार नाही आता आणि बघणारही नाही. विक्षिप्तपणाचा इसेंस त्याच्यात ओतप्रोत होता. पुणे दर्शन असायचं. भिकारदासला त्याच्याकडे जायचं, मग तो आला की निघायचं. दिशा ठरायची मग त्याच्यामागे जायचं फक्तं, का, कुठे वगैरे विचारायचं नाही. तिकडे पार कॅम्पापर्यंत, इकडे शिवाजीनगर, पश्चिमेला डेक्कन असा एरीया कव्हर व्हायचा. माणूस तिरळा होईल त्याच्याबरोबर गणपती बघताना कारण एक डोळा गणपती आणि एक त्याच्यावर ठेवायला लागायचा. फार कुठे न रमण्याचा त्याचा स्वभाव होताच. लहान मुलांचे हात धरण्याची वगैरे पद्धत नव्हतीच आमच्यात. एक तर तो तरातरा चालायचा आणि कधी पुढच्या गणपतीकडे सटकेल ते सांगता यायचं नाही. त्याचा बघून झाला म्हणजे आमचा पण झाला असा त्याचा समज होता. तक्रार केली तर उद्यापासून गणपती बंद. त्यामुळे हरवलो तर चूक आमचीच. 'नाही दिसलो मी तर शोधत बसायचं नाही, भिकारदासला जाऊन झोपायचं' इतका सोपा सल्ला होता. 

देखावा कितीही भारी असो, मूर्ती देखणी असो, भन्नाट लायटिंग असो, तो निर्विकार चेह-यानी बघायचा. कुठल्या वाड्यात वगैरे असलेला गणपती पण तो दाखवायचा. गुहेत शिरून बघायचे झाकलेले देखावे तो बघून या म्हणायचा. कॅम्पापर्यंत एवढे गणपती नसायचेच फार, उगाच तंगडतोड व्हायची पण बोलणार कोण. पेशव्यांचा रयतेचा एखादा गणपती बघायचा राहिला हा बट्टा नको म्हणून आम्ही जायचो, अगदी चार दिशांना स्वार सोडावेत तसं. 'इकडे कशाला'? कोण बोलणार. त्याच्या आवडीची मंडळं ठरलेली होती आणि त्या प्रत्येक मंडळाची खासियत पण होती. मंडईचा लाकडी शारदा गणपती, बाबू गेनूला फुलांची सजावट आणि पुढे वाजणारा तो चौघडा, सनई, ते ऐकत बराच वेळ आम्ही उभे रहायचो, तुळशीबाग अवाढव्य मूर्ती आणि खेडकरांची शिल्पकला, हिराबागेला कारंजी नाहीतर देखावा, जिलब्या मारुती, जोगेश्वरी, गुरुजी तालीम साधी मंडळं, दगडूशेठ म्हणजे न पाहिलेलं कुठलं तरी अवाढव्य मंदिर असायचं, सगळ्यात खतरा गणपती म्हणजे नातूबाग. 'हॊठोपे ऐसी बात', 'मुंगडा', 'नाच रे मोरा', 'परदेसीया, ये सच है पिया', 'ये मेरा दिल' असल्या गाण्यांवर उघडझाप करणारे विविध पॅटर्नचे रंगीबेरंगी दिवे बघण्यात तास निघायचा. क्षणार्धात गोल, त्याची चांदणी, तारा, लंबगोल, उभ्या सळया, आडव्या लहरी, तिरके बाण, स्वस्तिक काय नी काय एकेक व्हायचं. बघताना संगम साडी सेंटरच्या पायरीवर नाहीतर नवा विष्णूच्या दारात तो विड्या फुकत बसायचा निवांत. 

आमचं पर्वती दर्शनचं मंडळ अदृष्यं देखाव्यासाठी 'सौ साल पहिले'च्या धर्तीवर प्रसिद्ध होतं/आहे/राहील. गणपती आणि मंडप फक्तं, आपण मनातल्या मनात देखावा बदलून बघायचा. क्वचित दारूच्या किंवा ताडीगुत्त्यातून वगैरे वर्गणी बरी आली तर लाजेकाजेखातर गणपतीला अगदी उघड्यावर पडलोय असं वाटू नये म्हणून काहीतरी उभं रहायचं. त्यामुळे गावात पळ काढणं जास्ती आकर्षक होतं. या सगळ्या प्रकारात भेळ किंवा भजी मिळायची फक्तं. एकेवर्षी नऊला निघून पण आम्ही मंडईच्या पुढे सरकतच नव्हतो, साडेअकरा झाले तरी. बरं सांगायची पद्धत नव्हतीच आमच्यात. कंटाळून विचारल्यावर तो म्हणाला बारा वाजले की मग जाऊयात कारण त्याचा शनिवारचा उपास होता. 'समाधान'च्या बाहेर पोहे, भजीचा स्टॉल होता. १२.०१ मिनिटांनी रविवार लागल्यावर आम्ही पोहे, भजी हाणली मग विश्रांती घेऊन ताज्या दमाचे घोडे कूच करतात तसे आम्ही निघालो. दुस-या दिवशी पाय जाम दुखायचे तरीपण आम्ही जायचो. नंतर आमचे आम्ही जाण्याची अक्कल आल्यावर ते न बोलता बंद झालं.
.
बदलापूरहून, ओळखीतून, कुठून कुठून माणसं गणपतीत यायची आणि आम्ही हौसेने फिरायचो. धमाल यायची. आता तो उत्साह राहिला नाही. खिशात पैसे आहेत, कंटाळा येईल तिथून रिक्षानी घरी येऊ शकण्याची, भूक लागल्यावर समोर दिसेल त्या हॉटेलात खाण्याची ऐपत आहे पण जाणं काही होत नाही. देखावे अजून सुंदर असतील, लायटिंगचे पॅटर्न जास्ती मनोहारी असतील, नुसता ठेका असलेली शब्दं हरवलेली गाणी असतील पण पुणं काय किंवा अजून कुठलं दुसरं शहर काय लहान मुलांनी चुकण्यासारखं राहिलेलं नाही. 

आता ती रुपयात बचकभर मिळणारी गरम गोल भजी आणि तर्कटासारखा पुढे निघून जाणारा विजूमामा पण नाही. तो २५ जानेवारी २००६ निघून गेला तो गेलाच. 

जयंत विद्वांस    

No comments:

Post a Comment