Monday 18 January 2016

सत्तर एमएम चे आप्तं (१०)…बिंदू

सत्तर एमएम चे आप्तं (१०)…बिंदू

आपल्याकडे वास्तवातील प्रतिमा चांगली असून चालत नाही, पडद्यावरची प्रतिमा पण चांगली लागते. वास्तवात चार माणसांना दारू पिऊन गाडीखाली चिरडा पण पडद्यावर निरागस, भोळा, मातृभक्तं, सगळ्यांवर 'प्रेम' करणारा अशी प्रतिमा असेल तर ती खरी धरली जाते. सौ.बिंदू झवेरी आणि अजून असे अनेक याच मानसिकतेचे बळी आहेत. बिंदू पडद्यावर दिसली की बुब्बुळं मोठी होतात, जीभ ओलसर होऊन बाहेर सटकते, हात शिवशिवतात अशी तिची प्रतिमा आहे. आता वास्तवात ही आत्ता चौसष्ठ वर्षांची आज्जीबाई समोर दिसली तर आपण तिला निदान वयाप्रमाणे नमस्कार करू? नाही, करणार. कारण तिची पडद्यावरची प्रतिमा आपल्याला जास्ती आवडते, आपण त्यावर स्वप्नं रंजन केलेलं असतं, तो ठसा पुसायला मन तयार होत नाही आणि त्या प्रतिमेच्या आपण पाया वगैरे पडत नाही, इतकंच. एखादा विनोदी नट अभ्यासपूर्ण, वैचारिक काही बोलला तर आपण किती गंभीरपणे ते ऐकतो? कारण त्यानी फक्तं विनोदी बोलायचं, करायचं, लिहायचं हे आमच्या डोक्यात ठरलेलं आहे.    

देमार चित्रपटांचा निर्माता नानूभाई देसाईची ही सर्वात मोठी मुलगी, वयाने आणि शरीराने पण. ती तीन वर्षाची असतानाच नानूभाईनी 'दि एंड'ची पाटी लावली आणि नकळत्या वयातच तिच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली. धर्मेंद्रच्या 'अनपढ' मधे ती अकरा वर्षांची होती. मूळची सणसणीत शरीरयष्टी तिला वयापेक्षा मोठं दिसायला कामी आली. 'इत्तेफाक'मधे ती फक्तं अठरा वर्षांची होती (वाटत नाही ना). ती रूढार्थाने सुंदर नव्हती. 'गॉडझिला'च्या जाहिरातीत 'साईझ डज म्याटर' अशी ओळ होती. दारासिंह, झीनत आणि बिंदूला चेह-याची आवशक्यता नव्हती कारण काहीवेळेला 'साईझ डज म्याटर'. हसत हसत म्हटलेलं गाणं किंवा गाता गाता मधेच हसलेलं  'कटी पतंग'चं गाणं 'मेरा नाम शबनम' तिला यशाच्या हमरस्त्यावर घेऊन गेलं. पद्मा खन्ना 'हुस्नं के लाखो रंग' नी जेवढी प्रकाशझोतात आली तेवढी पुढे टिकली नाही. हेलन, बिंदू, अरुणा इराणी, काही प्रमाणात जयश्री टी असा मॉब होता तेंव्हा, व्ह्याम्प, डान्सर, बदचलन औरत, कुटील सहकारी यापुढे त्यांना काहीही जमणार नाही अशी पब्लिकला खात्री होती. त्यामुळे या सगळ्या वेगवेगळी नावं घेऊन त्याच त्याच भूमिका करत राहिल्या. 

त्यामानानी बिंदूला काही चित्रपट चांगले मिळाले. 'इत्तेफाक' मधली खन्नाची मेव्हणी, 'अभिमान' मधली बच्चनची मैत्रीण, 'अमर प्रेम'मधली विनोद मेहराची कुचकी, सावत्र आई, 'इम्तिहान'मधली विनोद खन्नावर एकतर्फी प्रेम करणारी कॉलेजकुमारी, 'लावारीस'मधली अमजदची दुसरी बायको, 'बिवी हो तो ऐसी'मधली फारूक शेखची कडक आई, 'किशनकन्हैया' मधली छळ करणारी सावत्र आई ('सीता और गीता'ची मनोरमा डोळ्यात सरस होती, काही म्हणा) आणि 'जंजीर' मधली अजितची मोना डार्लिंग. शब्बो आणि मोना म्हटलं की बिंदूच येणार डोळ्यासमोर, इतकी ती नावं तिला चिकटली. ललिता पवार आणि बिंदू अत्यंत विषारी बघायच्या. खलप्रवृत्ती दाखवण्यासाठी त्यांचं बघणंच पुरेसं होतं. त्यात बिंदू भारदस्त पण होती. मराठीत तिची तोड म्हणजे पद्मा चव्हाण. कमलाकर तोरणे दिग्दर्शित, मराठीतील प्रति शोले अशी विनोदी जाहिरात असलेल्या 'दरोडेखोर'च्या (यात वाळक्या अंगाची, गालफडं बसलेली रिमा भडभडे - लागू आहे) प्रिमिअरला मी त्यांना पाहिलं  होतं. न्यूनगंड वाटेल अशी देखणी आणि भारदस्त बाई.

तिनी बालपणापासून माहित असलेल्या, शेजारी रहाणा-या चंपकलाल झवेरीशीच लग्नं केलं. त्यानीही तिला चित्रपटात काम करायला प्रोत्साहन दिलं. स्किन कलरचं कापड लावून ती कायम वावरली. कुठल्याही फिल्मी पार्टीला ती नव-याशिवाय गेली नाही आणि शुटींग संपल्यावर स्वत:च्याच घरी गेली त्यामुळे तिच्याबाबत कुठलीही वावडी उठली नाही. पडदा आणि वास्तव यात तिनी जमीन आसमानचं अंतर ठेवलं. आपण कुणाला किती जवळ येउन द्यायचं हे एकदा ठरलं की त्रास होत नाही. ती एकदाच प्रेग्नंट राहिली पण मिसक्यारेज झालं, नंतर परत तिला मूलबाळ झालं नाही. 'हम आपके है कौन'मधे एका शॉटला अजित वाच्छानी तिला म्हणतो, 'इसलिये तुम्हारी गोद खाली है'. बिंदू आणि मी, दोघांच्या डोळ्यात पाणी होतं. तिला ग्लिसरीन नसेलच लागलं त्या वाक्याला. 'जंजीर'मधे एक शॉट आहे. तेजा त्याचा बॉस पाटीलची तारीफ करत असतो. मोना त्याला म्हणते, पहिल्यांदाच तू कुणाचंतरी कौतुक करतोयेस. त्यावेळचा तिचा तो उत्कंठावर्धक चेहरा बघा, ती पुढे विचारते, पाटीलसाहेब कुठे असतात आता. तेजा थंडपणे त्यानीच त्याला मारल्याचं सांगतो, तेंव्हा धक्का बसलेला बिंदूचा चेहरा बघा. अभिनय काही फक्तं रेखा, शबाना, स्मिता, हेमाच नव्हत्या करत. 


फिल्मफेअरसाठी सात वेळा नामांकन मिळालं पण तिला ते कधीच मिळालं नाही. मुळात ते कुणाला मिळालंय याची कुणाला आठवण होत नाही इतका त्याचा दर्जा खालावला आहे. लक्ष्मी-प्यारे मधल्या लक्ष्मीकांत कुडाळकरची ती मेव्हणी. त्यांनी तिच्या बहिणीशी लग्नं केलं होतं. आता ती पुण्यातच कोरेगाव पार्कला रहाते. रेसकोर्सला दिसेल ती सिझनला, कुणाला बघायची हौस असेल तर. शेक्सपिअर म्हणून गेलाय, नावात काय आहे? काहीवेळेस खरंही आहे ते. शाई पडल्यावर ब्लॉटिंग पेपरनी टिपल्यावर त्या पेपरवर हा भला मोठा ठिपका पसरतो तशी होती बिंदू चंपकलाल झवेरी पण नाव मात्रं बिंदू. :D

जयंत विद्वांस 


 

   

2 comments:

  1. लहान असताना मला बिंदू कधीच आवडली नाही. पण थोडं कळत्या वयात सिनेमा समजायला लागल्यावर अभिमान मध्ये त्यांच्या डोळ्यांत पाणी बघून आपसूकच माझेही डोळे पाणावले होते. माझे बाबा मला नेहमी सांगायचे कि एखादा नट चित्रपटात खूप चांगल्या माणसाची भूमिका करत असला तरी प्रत्यक्षात तो तसा असतोच असं नाही आणि एखादा अमरीश पुरींसारखा खलनायकी भूमिका करून देखील वास्तव आयुष्यात खूप सभ्य असे. मी लहानपणी 'बिवी हो तो ऐसी' बघितला आहे आणि त्यात बिंदुला जेव्हा सून म्हणून मीनाक्षी शेषाद्री छळायची तेव्हा मला फार आनंद व्हायचा. अर्थात तेव्हा मी लहान होते. बिंदू यांनी अभिनय केलेला 'प्रेम रोग' मी नुकताच बघितला आणि एखाद्या माणसाची पारख आपण उगाच त्याने निवडलेल्या भूमिकांवरून करू नये हा धडा मला मिळाला.
    हा लेख वाचून छान वाटलं. :)

    ReplyDelete