Wednesday 20 May 2015

गझलरंग.....

कालच्या गझलरंगला गेलो होतो. आपल्याला ज्यातलं फार कळत नाही तिथेही मी जातो. कानावर पडून कधी काळी काही समजेल या आशेने जातो. त्यांचे चार पाच कार्यक्रम बघितलेत मी. कविता, गझल हा माझा प्रांत नाही, लिहिण्याचा सोडाच, फार समजण्याचाही नाही.
आधी कोकणी गझलगायन झालं. भाषा फार समजत नसली तरी आधी मराठीत कोकणी गझलेचा भावार्थ सांगितल्यामुळे समजायला सोप्या गेल्या. राधा भावे त्यांच्या काप-या आवाजात गझल छानच वाचतात, त्यांची अस्तुरीची गझलही सुंदर होती. एक तबला, एक हार्मोनियम आणि दोन गायक पण मैफिलीची मजा देऊन गेले. खणखणीत आवाज होते दोन्ही नाईक मंडळींचे आणि चालीही ऐकताना सोप्या वाटणा-या पण म्हणायला अवघड होत्या. त्यानंतर नेहमीचा कार्यक्रम सुरु झाला.

अण्णा वैराळकर! कार्यक्रम वेळेत सुरु करणारा आणि संपवणारा विरळ माणूस. अण्णांनी त्यांचा जीव गझलवरून वैराळून टाकलाय. अण्णा रमाकांत आचरेकर आहेत. भुछत्रासारखे उगवणारे आणि लवकर नाहीसे होणारे तेंडूलकर ते बाळगत नाहीत. नवीन चेहरे स्टेजवर नेतात. त्यांचं कौतुक करतात, सांभाळून घेतात, पाय जमिनीवर राहू द्यात तर आकाश गाठाल असा स्पष्टं इशारा ते स्टेजवरून देतात. समान व्यसनी, समान शील, समवयस्कं लोकांशी मैत्री लवकर होते असं म्हणतात. अण्णांना वय आड येत नाही. फेसबुकावर चांगले लिहिणारे ते शोधतात, त्यांना मंचावर आणतात. क्रिकेटमधे पदार्पणाच्या सामन्यात त्या खेळाडूला जेष्ठ खेळाडूच्या हस्ते मानाची टोपी देतात. अण्णांनी अनेकांना अशा टोप्या (पदार्पणाच्या) घातल्यात. दर्दी रसिकांच्या पुढे गझला सादर करणं काही खायचं काम नाही पण आजची तरुण पोरं हे सगळं आरामशीरपणे करतात.

भालचंद्र भूतकर आणि मनोज दसुरी हे काल पहिल्यांदाच मंचावर आले होते. दोघांनीही आत्मविश्वासपूर्ण वाचलं. भूतकर तर सराईत माणूस वाटला मला. हच का छोटा रिचार्ज सुशांत खुसराळे. वयाला, वजनाला  न शोभणा-या पण झेपणा-या वजनदार शेरांनी तो धमाल उडवून देतो. कौस्तुभ आठल्येनी पण त्याच्या वजनाप्रमाणेच वजनदार शेर आणि गझल पेश केल्या. पूजा फाटे आणि स्वाती शुक्लं पण 'दाद'णीय गझला सादर करून गेल्या. 

सदानंद बेन्द्रें म्हणजे जेष्ठ माणूस. 'आन - मेन अॅट वर्क' मधला तो मनोज तिवारी जसा नमस्कार करतो तसा हा दाद स्विकारताना करतो. गंभीर मुद्रेने सूचक शेर लिहितो, वाचतो आणि पिंगट डोळ्यांनी मजा बघत असतो. दराडे मास्तरांची शेराची दुसरी ओळ इतरांपेक्षा जास्ती भेदक असते (शेर म्हटल्यावर ती असायलाच हवी) आणि तो ती पोचवतोही उत्तम. तो अनुभवाची गझल लिहितो, शब्दांचे नुसते पिसारे नसतात तर प्रत्येक शेराला तो अर्थांची अनेक अस्तरं लावून आणतो. सुधीर मुळीक हा डेल स्टेन आहे. त्याचा म्हणून एक खास ढंग आहे गझल वाचण्याचा. पहिली ओळ टिपेला नेली की दुसरी तो हळुवार वाचतो. त्याला कागद फार लागत नाही. सगळं पाठ असतं आणि स्टेनच्या स्पीडनी तो गझल आणि शेर आपल्या अंगावर सोडतो. पहिला यॉर्कर कुठे पचवतोय तर तो लेट आउटस्विंग टाकतो. त्यामुळे आपण चेंडू अंगावर घेणं हे जास्ती सोपं काम आहे. 

एकूण हा कार्यक्रम नेहमीच रंजक असतो. समोर बसलेल्या मनीषा नाईक, सुप्रिया, ममता सपकाळ अशा गझलकारा दुस-याला पण दाद देतात आणि एकूणच अण्णांनी जमवलेली सगळी माणसं लोभापोटी येतात आणि एका अनौपचारिक आनंद देतात. अण्णा आणि त्यांच्या टीमला अनेकानेक शुभेच्छा. 

--जयंत विद्वांस 




No comments:

Post a Comment