Wednesday 29 April 2015

वन्स अपॉन अ टाईम (१६).....

लंकेचा मर्वान अटापटटू, अमिताभ आणि अमेरिकेचे अध्यक्ष अब्राहम लिंकन यांच्यात साम्यं काय? काहीही नाही. पण तिघांचं आयुष्यं एका बाबतीत वंदनीय आहे, तिघांनाही वारंवार अपयश आलं पण तिघांनीही हार न मानता प्रयत्नं चालू ठेवले हे विशेष. पडणं हा गुन्हा नाही, परत उठण्याची इच्छा संपणं हे वाईट आहे. एडिसननी बल्ब करता केसापासून ते नायलॉनच्या धाग्यापर्यंत शंभर एक वस्तू बल्बच्या फिलामेंट करता वापरून बघितल्या. एकानी कुत्सिततेनी म्हटलं, शंभर प्रयोग फुकट गेले. एडिसन म्हणाला, 'चूक, या शंभर गोष्टींनी दिवा लागत नाही हे मला कळलं की त्यातून'. तात्पर्य आपला दृष्टीकोन महत्वाचा. लोकांचा आपल्यावर किती विश्वास आहे ये पेक्षा आपला आपल्यावर किती आहे ते महत्वाचं. अटापटटू, अमिताभ आणि लिंकनची अपयशं बघा म्हणजे कळेल. 

एकतर देवीचे व्रण असलेला खप्पड चेहरा, कृश शरीरयष्टी पण मनानी पोलाद असलेल्या लिंकनची १८३२ ला नोकरी गेली, सिनेटच्या निवडणुकीतही तो हरला. पुढच्या वर्षी तो धंद्यातही बुडाला. १८३५ मधे त्याच्या प्रेयसीचं निधन झालं. पुढच्या वर्षी त्याला नैराश्याचा झटका बसला. १८३८ मधे तो स्पीकरची निवडणूकही हरला. १८४३ मधे तो काँग्रेसच्या नॉमिनेशनसाठी उभा राहिला आणि पुलंच्या अण्णू गोगटयासारखा पडलाही. परत १८४८ ला रीनॉमिनेशनसाठीही पदरी निराशाच आली. १८४९ ला ल्यांड ऑफिसर या पदासाठी पण त्याला नाकारण्यात आलं. १८५४ ला तो सिनेटची निवडणूक पण हरला. १८५६ ला उपाध्यक्षाच्या नॉमिनेशनसाठी पण हरला. १८५८ ला तो सिनेटची निवडणूक यशाचा बट्टा लागू नये म्हणून परत एकदा हरला. १८६० ला मात्रं तो अमेरिकेचा अध्यक्ष झाला. एवढ्या वेळा अपयश पदरी पडूनही तो लढत राहिला. त्याला ज्यांनी आधी हरवलं ती माणसं काळाच्या ओघात विस्मृतीत गेली पण आयुष्याची शेवटची निवडणूक जिंकलेला आणि फक्तं चार वर्ष अध्यक्ष झालेला लिंकन टिकून आहे आणि राहील.  

घोड्यासारखा चेहरा, जिराफासारखी उंची, ओळीनी पहिले साताठ चित्रपट फ्लॉप दिलेला, जया भादुरी सोडल्यास कुणी बरोबर काम करायला तयार नसलेला, आकाशवाणीवर निवेदकाची नोकरी न  मिळालेला, मायस्थेनिया ग्रेव्हिस या दुर्मिळ आजारानी आणि कुलीच्या अपघातानी आयुष्यातून जवळपास उठलेला, केवळ राजीव गांधीचा मित्रं म्हणून बोफोर्स प्रकरणात विनाकारण बदनाम झालेला, धंद्यात कर्जबाजारी झालेला, कर्ज फेडायला यश चोप्राच्या दारात जाऊन चित्रपट मागणारा, दिवाळखोरी जाहीर करण्याचा सल्ला मिळालेला, आयकराची थकबाकी वळती करण्यासाठी 'दो बुंद जिंदगीके' ही जाहिरात करणारा अमिताभ आज तरुणाला लाजवेल असा भक्कम आणि कार्यरत आहे. इतरांपेक्षा जास्ती पैसे घेतोय हे दिसतं फक्तं पण एवढी अपयशं झेलली ते आपण विसरतो. अजूनही तो दोन तास जिम करतो, दारू, सिगरेट, नॉन व्हेज पासून लांब आहे आणि फिट रहाण्यासाठी घरात किराणा मालाच्या यादीत साखरेऐवजी मध लिहितो.    

अटापटटूनी पदार्पणात पहिल्या दोन्ही डावात शून्यं काढलं. एवढा स्कोअर कुणी पण करेल म्हणून त्याला काढलं आणि एकवीस महिन्यांनी त्याला परत घेतलं कारण त्यानी फर्स्ट क्लासमधे पोत्यानी धावा काढल्या. यावेळेला मात्रं त्यानी प्रगती केली  पहिल्या डावात शून्यं आणि दुस-या डावात चक्कं एक धाव काढली. मग परत त्याला काढल. तो पण येडाच, त्यानी परत फर्स्ट क्लासमधे जाऊन शतकांची माळ लावली. सतरा महीन्यांनंतर परत एकदा त्याला संधी देण्यात आली आणि त्यानी सिलेक्टरला तोंडावर पाडत दोन्ही डावात शून्यं काढलं.  त्याच्याकडे मोठ्या स्तरावर खेळण्याचं टेंपरामेंट, टेक्निक नाही असा निष्कर्ष काढण्यात आला. तो बिचारा परत एकदा वाळूचे कण रगडायच्या नादाला लागला.  

तीन वर्षांनी त्याला परत संधी मिळाली. यावेळी मात्रं तो चमकला. सोळा शतकं त्यात सहा डबल काढत त्यानी साडेपाच हजार धावा टेस्टमधे आणि वनडेत अकरा शतकांसह साडेआठहजार धावा कुटल्या. तो लंकेचा कप्तानही झाला. हे सगळं दुस-या संधीत सिद्ध करायला त्याला सहा वर्ष गेली. सहा वर्ष कशाला म्हणतात महाराजा. तेवढ्या काळात तो कौंटी कडे गेला असता, दुस-या खेळाकडे वळू शकला असता किंवा करिअर थांबवून दुसरं काहीतरी केलं असतं किंवा मी कसा दुर्दैवी, कसे प्रयत्न केले पण कसं नशिबात नाही याच्या आवृत्त्या काढत बसला असता.  

यश कुठल्या वळणावर भेटेल हे आपल्याला माहीत नसतं. यशस्वी लोकांची चरित्रं वाचावितच पण सतत अपयशी होऊनही जिद्दीनी यश मिळवणा या लोकांची मुद्दाम वाचावीत. यांच्या बाबतीत अपयश ही यशाची पहिली पायरी नव्हती तर अपयशाच्या अनेक पाय-या होत्या, काळ बदलला की संदर्भ बदलतात, त्याच्यानुसार काही वाक्यं बदलायला हवीत. अपयशाच्या अनेक पाय-या उत्तुंग यशासाठी गरजेच्या असतात असं म्हणायला हवं आता. मुकेश अंबानी विमानातून रोज चार वेळा एव्हरेस्टवर गेला तरी पाठीवर वजन घेऊन बर्फात हालअपेष्टा सहन करत जो वर जातो ना त्याचा आनंद अंबानीपेक्षा मोठा आहे हे खरं. चला तर शेर्पा होऊयात सगळे यशाच्या वाटेवरचे. 
 
आपण थांबलो की द एंड असतो. तोपर्यंत फारतर इंटरव्हल घ्यायचा, पण शो चालू ठेवायचा.

--जयंत विद्वांस

No comments:

Post a Comment